शेतकरी आंदोलन ही भारताची अंतर्गत बाब आहे, हे सर्वपरिचित सत्य भारतीय तारे-तारकांनी दोन महिन्यांनंतर, एकच ‘हॅशटॅग’ वापरून सांगितले..

प्रत्येक चेंडू फटकावण्याचा अट्टहास फलंदाजाने केल्यास बाद होण्याचा संभव अधिक, हे माहीत नसल्यासारखे आपण वागू लागलो आहोत. अर्थात, ‘फक्त जिंकण्यासाठीच खेळायचे,’ असा हट्ट वा अहंकार असल्यास असा फटकेबाजीचा विचित्र सोस बळावतो..

निवृत्तीनंतरही ‘क्रिकेटचा बादशहा’ हे बिरुद कायम राखणाऱ्या खेळाडूचा करिश्मा काय असतो हे सचिन रमेश तेंडुलकर यांच्या जन्माच्या दोन वर्षे आधीच, सर डॉन ब्रॅडमन यांनी दाखवून दिले होते.. १९७१ साली दक्षिण आफ्रिका विरुद्ध ऑस्ट्रेलिया क्रिकेट कसोटी जाहीर झाली आणि त्या संदर्भात दक्षिण आफ्रिकेचे तत्कालीन पंतप्रधान जॉन व्होर्स्टर यांना ऑस्ट्रेलिया संघाचे प्रशासक या नात्याने भेटलेल्या ब्रॅडमन यांनी सरळच, ‘‘दक्षिण आफ्रिकेच्या संघात एकही कृष्णवर्णीय खेळाडू कसा नाही?’’ असे विचारले, त्यावर त्या वर्णद्वेषी देशाच्या पंतप्रधानांनी, काळ्यांना अक्कलच कमी असते वगैरे अहंकारी उत्तर दिले. ते ब्रॅडमन यांनी ऐकून घेतले; पण मायदेशी परतल्यावर ‘ऑस्ट्रेलिया संघ दक्षिण आफ्रिकेशी खेळणार नाही’ अशी स्पष्ट भूमिका घेतली. संघ दक्षिण आफ्रिकेचा, त्यात कोण असावे आणि कोण नसावे हे तो देशच ठरवणार- मग ब्रॅडमन यांना यात नाक खुपसण्याचे काय कारण आहे.. किंवा गॅरी सोबर्सचे असेलही ब्रॅडमनना कौतुक, पण तेवढय़ासाठी साऱ्याच काळ्यांचा कैवार घेऊन दौराच रद्द वगैरे ‘आदळआपट’ करण्याचे कारण काय.. असले प्रश्न एकाही राष्ट्रप्रेमी ऑस्ट्रेलियन व्यक्तीने विचारले नाहीत. ब्रॅडमन यांच्या म्हणण्याप्रमाणे दौरा रद्द झाला. ही ताकद ब्रॅडमन यांच्या शब्दात होती, याचे कारण ते स्वत:शी प्रामाणिक होते. गॅरी सोबर्सइतके उत्तम क्रिकेटपटू कदाचित दक्षिण आफ्रिकेतही असू शकतील आणि कुणा सरकारमुळे त्या खेळाडूंवर अन्याय होतो आहे, ही त्यांची विचारान्ती ठरलेली भूमिका होती आणि प्रसंगी प्रशासकपद गमावण्याचीही तयारी ठेवून, त्यांनी स्वत:ची ही भूमिका जाहीर केली होती. ब्रॅडमन यांची ही अर्धशतकापूर्वीची आठवण शुक्रवारी एका इंग्रजी दैनिकाने दिली, तीही भारतीय क्रिकेट व चित्रपटतारे आज कशा रीतीने सरकारची तळी उचलत आहेत, हे सांगताना. तपशील पाहू जाता हा विरोधाभास आताच सांगणे कसे अप्रस्तुत आहे, तुलनाच कशी चुकीची आहे वगैरे युक्तिवाद बेमालूमपणे गळी उतरवता येतील. पण एक बाब मात्र, ब्रॅडमन यांच्या तडफदार भूमिकेचे स्मरण कुणी दिले नसते तरीही स्पष्ट होती आणि आहे.

ती म्हणजे, २५ नोव्हेंबर २०२० पासून सुरू झालेल्या शेतकरी आंदोलनाबद्दल समाजमाध्यमांतून व्यक्त होण्याची गरज सायना नेहवाल, सचिन तेंडुलकर, अक्षयकुमार, विराट कोहली आदी भारतीय तारे-तारकांना तब्बल दोन महिने उलटल्यावर; तीदेखील कुणा रिहाना नामक अमेरिकी तारकेने केलेल्या ट्वीटला उत्तर देण्याचे हात दाखवून अवलक्षण भारताच्या परराष्ट्र खात्याकडून  झाल्यानंतर वाटली! ही जी कोणी रिहाना नामक गायिका आहे ती आपल्या गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या पासंगालाही पुरणार नाही अशीच जर साऱ्या १३० कोटी भारतीयांची भावना असेल, तर तिच्या तोंडी लागणारे ट्वीट लता मंगेशकरांनी करण्याचे कारणच काय? एखाद्याला अनुल्लेखाने मारणे हा योग्य मार्ग भारतीयांनी रिहानाबद्दलही वापरला असता, तर काय बिघडले असते? पण तसे झाले नाही. आधी आपले परराष्ट्र खाते, मग केंद्रीय मंत्रिमंडळातील ज्येष्ठ सदस्य यांनी या कुणा रिहानाने जणू काही देशाच्या अंतर्गत बाबींत ढवळाढवळ केलेली आहे असा पवित्रा घेऊन निषेधाची निवेदने प्रसृत केली. वास्तविक या रिहानाने तिच्या देशातील- अमेरिकेतील- कुणा सीएनएन नामक वाहिनीच्या संकेतस्थळावरील एका लेखाकडे लक्ष वेधले होते. तो लेख भारतात सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाबद्दल होता आणि ‘आपण याबद्दल का बोलत नाही?’ असे रिहानाने तिच्या ट्विटर खात्यावर म्हटले होते. हे तिचे ट्विटर-खाते १० कोटी १४ लाख जणांच्या आवडीचे असले, तरी ही संख्या भारतातील लोकसंख्येच्या फार तर एक दशांश, असा विचार बहुसंख्याकतावादी नेतृत्वाने केला नाही. रिहाना अमेरिकेची नागरिक असली तरी तिच्या देशात डोनाल्ड ट्रम्प सत्तारूढ असताना तिने सरकारविरोधी मजकूर याच ट्विटर खात्यावर लिहिला आहे, किंबहुना ‘अ‍ॅन्टी’ हा तिचा गीतसंग्रह तर प्रस्थापित अमेरिकी संगीत बाजाराला जे प्रिय, त्याहीविरुद्ध बंड करणारा होता, अशा प्रकारचा तिचा पूर्वेतिहासही कोणी लक्षात घेतला नाही. मुख्य म्हणजे, ती तिच्या वा अन्य देशांतील तथाकथित संगीतरसिकांना कितीही प्रिय असली तरी ती कुणी सरकारी व्यक्ती नाही, हेदेखील लक्षात घेतले गेले नाही. त्यामुळे, सरकारी उच्चपदस्थांनी दुसऱ्या देशाच्या सरकारविषयीच बोलावे- त्या देशातील खासगी व्यक्तींविषयी नव्हे, हा आंतरराष्ट्रीय राजकारणातील अलिखित नियमही आपण मोडला. हे भारतातून झाल्यानंतर अमेरिकी सरकारही मैदानात उतरले आणि त्यांनी जरी कायद्यांना पाठिंबा दिला तरी, ‘भारताने शेतकरी आंदोलन योग्यरीत्या हाताळावे’ अशी जाहीर कानपिचकी दिली. ही नामुष्की होताहोताच, ‘लौंदासि आणून भिडवावा दुसरा लौंद’ या न्यायाने भारतातील काही तारे-तारका जागे झाले आणि मग सर्वानी- हे तारे-तारका ‘भारतरत्न’ असोत वा नसोत- एकजात सर्वानी ‘इंडिया अगेन्स्ट प्रोपगंडा’ हा लक्षवेधी शब्दप्रयोग (हॅशटॅग) वापरून शेतकरी आंदोलन ही भारताची अंतर्गत बाब आहे, हे सर्वपरिचित सत्य पुन्हा सांगितले. हे म्हणजे त्या ऊटपटांग शर्जिल उस्मानीशी प्रतिवाद करताना ‘आमचा धर्म सडका नाही’ असे म्हणण्याइतकेच अनावश्यक.

तरीही भारतीय तारे-तारकांनी ते हिरिरीने केले, याची दोन कारणे संभवतात. पहिले म्हणजे, काय महत्त्वाचे वा काय बिनमहत्त्वाचे याचा विचार करण्याआधीच प्रतिवाद करण्याची आणि प्रतिक्रियात्मकता दाखवून देण्याची आपली हल्लीची सवय. प्रत्येक चेंडू फटकावण्याचा अट्टहास फलंदाजाने केल्यास बाद होण्याचा संभव अधिक, हे माहीत नसल्यासारखे आपण वागू लागलो आहोत. फक्त जिंकण्यासाठीच खेळायचे, असा हट्ट वा अहंकार असल्यास असा फटकेबाजीचा सोस बळावतो. पण हे अलीकडले कारण. दुसरे कारण अधिक काळ आपल्या मानसिकतेत रुजलेले. ते म्हणजे आपले विद्वान व कलावंत यांना असलेला ‘राजमान्यते’चा सोस. यातून एकीकडे आपल्या अकादम्यांवर राजकीय अड्डे असल्याचा आरोप होतो आणि दुसरीकडे, पद्म पुरस्कारांसारखे आदरणीय राष्ट्रीय पुरस्कार मिळवणाऱ्या कलावंतांची उघड गुपिते साऱ्यांना माहीत असतात. हा राजमान्यतेचा सोस संस्थानी काळात होता, तसा तो नेहरूकाळातही होता. लता मंगेशकरांचे गाणे ऐकून नेहरूंच्या डोळ्यांत पाणी आले म्हणून त्या मोठय़ा, असे मानण्याचा भाबडेपणा नेहरूकाळात खपून गेला. त्याच भाबडेपणाची एकविसाव्या शतकातील ट्विटर/ फेसबुकादी माध्यमांधारित आवृत्ती विद्यमान सरकारला हवी आहे काय? की, राष्ट्रप्रेम आणि सरकारप्रेम यांमधला भेद मिटवून टाकू पाहणारी इंदिरा गांधीप्रणीत आणीबाणी आपण विसरून गेलो आहोत?

कदाचित हे प्रश्न कुणाला टोकाचे वाटतील. म्हणून मग ते अतार्किकच कसे, असाही प्रतिवाद सुरू होईल. तसे झाल्यास, तो स्व-बुद्धीने व्हावा, ही अपेक्षा रास्त. प्रतिमा जपणे ठीक; पण ती जपताना आपल्याच प्रतिभेशी आपण प्रतारणा करीत नाही ना, याचा विचार सर्वच संबंधितांनी प्रामाणिकपणे करावा.