राजकीय पक्ष बाल्यावस्थेत असताना खस्ता खाणारे पक्षाने बाळसे धरल्यावर नकोसे होतात हा इतिहास आहे. पण आपल्या पक्षाच्या बदलत्या संस्कृतीची दखलही खडसे यांनी घेतली नाही. आजचा भाजप हा वाजपेयी, अडवाणी यांचा भाजप नाही..

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

एकनाथ खडसे हे भाजपस अलीकडे बाधा झालेल्या आजाराचे लक्षण आहे. पण तो आजार नाही. आजारावरील उपचारात प्रत्यक्ष आजारापेक्षा लक्षणे महत्त्वाची असतात. म्हणून भाजपच्या या खडसे लक्षणाकडे लक्ष वेधणे आवश्यक. भाजपस बाधा झालेल्या आजाराचे नाव आत्मनिर्भरता हे होय. हा आजार झालेल्या व्यक्तीच्या मनी आपण आपले मुखत्यार आहोत, आपण सर्वशक्तिमान आहोत, आपले कोणावाचून काहीही अडू शकत नाही, आपणास कोणाची गरज नाही, आपण हवे ते करू शकतो इत्यादी भावना दाटून येतात आणि बाधित व्यक्तीचे वर्तन त्यानुसार होऊ लागते. सातत्याने मनासारखे होत जाण्यात या आजाराची बीजे असतात असे मानसोपचारतज्ज्ञ सांगतात. त्यामुळे मी म्हणेन ती पूर्व असे संबंधितास वाटू लागते. इतकेच नव्हे तर सूर्यदेखील आपण म्हणतो त्या पूर्वेलाच उगवत असल्याची सदरहू व्यक्तीची खात्री असते. ही सर्व लक्षणे भारतीय जनता पक्षात सांप्रतकाळी आढळत असून त्यामुळेच व्यक्ती, आघाडीतील मित्रपक्ष त्यास एकापाठोपाठ एक सोडून जाताना दिसतात. सबब खडसे गेले यात आश्चर्य नाही. कारण ते तसेही भाजपस नकोसेच झाले होते.

याचे कारण राजकीय पक्ष बाल्यावस्थेत असताना खस्ता खाणारे, पक्षाने बाळसे धरल्यावर नकोसे होतात हा इतिहास आहे. हे असे होते याचे कारण संघटनेच्या शून्यावस्थेत तिच्यासाठी कष्ट करणारे नकळतपणे संघटनेवर मालकी सांगू लागतात आणि त्यांची उपस्थिती इतरांना काचू लागते. ‘हे काल आलेले आम्हास काय सांगणार,’ अशा प्रकारचा युक्तिवाद अशा व्यक्तींकडून होऊ लागतो. हे ‘सेवाज्येष्ठता’ या आजाराचे लक्षण. त्याची दखल घेऊन संबंधिताने वेळीच स्वत:वर उपचार केले नाहीत तर हा आजार बळावतो आणि बाधित व्यक्तीचा प्रवास अडगळीच्या दिशेने होऊ लागतो. खडसे यांचे तसे झाले होते. राजकारण हे सरकारी सेवेप्रमाणे नाही. तेथे केवळ ज्येष्ठता हे कारण पदोन्नतीसाठी पुरेसे ठरू शकते. पण राजकारणासारख्या कलात्मक क्षेत्रात ज्येष्ठता हा गुण निर्णायक ठरण्याची हमी नाही. खडसे यांनी हे सत्य लक्षात घेतले नाही आणि ते सतत आपल्या ज्येष्ठतेचे तुणतुणे वाजवत राहिले. ते सत्य मान्य करताना खडसे यांच्याकडे गुणवत्ता नव्हती आणि फक्त ज्येष्ठता हाच त्यांचा आधार होता, असे अर्थातच अजिबात नाही. आज महाराष्ट्र भाजपमध्ये देवेंद्र फडणवीस यांच्या तोडीस तोड किंवा काही मुद्दय़ांबाबत त्यांच्यापेक्षा सरस, माहिती/अभ्यास खडसे यांचा असेल. तेव्हा आपल्यावर अन्याय झाला असे त्यांना वाटत असेल तर ते विनाकारण नाही. तथापि या गुणवत्तेच्या जोडीने खडसे यांचा सर्वात मोठा दोष असा की ते आपली गुणवत्ता स्वत:च सातत्याने मिरवीत राहिले. आपण गुणवान आहोत हे समोरच्याने म्हणावे यासाठी खडसे त्यास संधीच देत नसत. एकदा का असा स्वत:विषयीचा समज इतका घट्ट झाला की संबंधित व्यक्तीची विचारशक्ती साधे संदेशदेखील नोंदवत नाही आणि अशी व्यक्ती मग स्वनिर्मित अन्यायकोशात स्वत:स गुरफटून घेऊ लागते. एखाद्या संस्था/ संघटनेत इतकी वर्षे काढल्यावरही एखादी व्यक्ती ‘माझ्यावर अन्याय झाला’ असा टाहो वारंवार फोडत असेल ती व्यक्ती न्याय करण्याच्या योग्यतेची नाही, हा व्यवस्थापनशास्त्रातील साधा आडाखा. कारण त्या व्यक्तीस आपल्या संस्था/ संघटनेची संस्कृतीच उमगलेली नाही, हे यातून ध्वनित होते.

हे सर्व खडसे यांना लागू होते. आपल्या पक्षाच्या बदलत्या संस्कृतीची दखलही खडसे यांनी घेतली नाही. आजचा भाजप हा वाजपेयी-अडवाणी यांचा भाजप नाही. हा नरेंद्र मोदी-अमित शहा यांचा भाजप आहे. एखाद्यास काही द्यावयाचे असेल तर ते त्याच्या/ तिच्या उपयुक्ततेइतकेच असेल, कणभरही अधिक असणार नाही आणि उपयुक्तता संपुष्टात आल्यास हे दिले दान परत घ्यायलाही हा आजचा भाजप मागेपुढे पाहणार नाही. अटलबिहारी वाजपेयी यांच्या आणि लालकृष्ण अडवाणी यांच्या ‘राष्ट्रीय लोकशाही आघाडी’त दोन डझन पक्ष गुण्यागोविंदाने राहिले हा ताजा इतिहास आहे. ममता, समता ते जयललिता इतकी व्यापक ती रालोआ होती. पण सध्याच्या रालोआ मित्रपक्षांतील अवघा एक साथीदार तूर्त नरेंद्र मोदी मंत्रिमंडळात आहे. तो म्हणजे रामदास आठवले. पण त्यामागे भाजपच्या गरजपेक्षा आठवले यांची लाचारी अधिक. उद्या ते जातो म्हणाले तरी भाजपचे नेतृत्व आठवले यांना एका पैशाने थांबवण्याचा प्रयत्न करणार नाही. याचा अर्थ असा की बेरजेच्या राजकारणात आजच्या भाजपला शिलकीत सत्ता राहात असेल तर आणि तरच अर्थ असतो. अन्यथा नाही. त्यामुळे अकाली दलासारखा त्या पक्षाचा सर्वात जुना सहकारी पक्ष सोडून गेला तरी भाजपवर काहीही परिणाम झालेला नाही. इतकेच काय, त्याआधी शिवसेना या सर्वात आद्य आघाडी पक्षाशीही भाजपचा सराईतपणे काडीमोड झाला. भाजपने गतवर्षीच्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेशी आघाडीचे नाटक केले खरे. पण पडद्यामागून शिवसेनेचे कमीत कमी उमेदवार कसे विजयी होतील असाच भाजपचा प्रयत्न होता, हे त्या पक्षाचे समाजमाध्यमी टोळभैरवदेखील नाकारणार नाहीत. इतके करून अपेक्षेइतके यश मिळाले नाही, हे भाजपचे दु:ख. मिळाल्या त्यापेक्षा पंधरा-वीस जागा भाजपस अधिक मिळाल्या असत्या तर मिळेल तो पक्ष फोडूनदेखील भाजप सत्ता मिळवता. ते जमले नाही तेव्हा अजित पवारांशी क्षणिक हातमिळवणी करून आपण किती काँग्रेसी झालो आहोत, याची चुणूक भाजपने दाखवलीदेखील. तीही अंगाशी आली.

आता बिहार निवडणुकीत भाजप हाच खेळ नव्याने खेळताना दिसतो. धर्मनिरपेक्ष ते धर्मवादी असा झोका घेणाऱ्या नितीशकुमार यांच्यासमवेत भाजप त्या राज्यात सत्तेवर आहे. त्याच पक्षाशी आघाडी करून भाजप विधानसभा निवडणुकीत उतरला आहे आणि नितीशकुमारच आपले मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार असतील असे त्याने जाहीर केले आहे. पण तरीही भाजपचे सर्व प्रयत्न आहेत ते नितीशकुमार यांचे नाक कसे कापता येईल या दिशेने. चिराग पासवान यांचे लोकजनशक्ती पक्षाचे बांडगूळ भाजपने कुरवाळले आहे ते यासाठीच. उद्या त्या पक्षाच्या प्रयत्नांना यश येऊन नितीशकुमार यांचा विजय आकसलाच तर हाताशी हे पासवान आहेत, असा हा हिशेब.

पण राजकारण हे बुद्धिबळ नाही. म्हणून त्याच्या पटावरील घोडे अडीच घरेच जातील असे नाही. प्रसंगी ते किती मोठी मजल मारू शकतात, हे शिवसेनेने दाखवून दिले आहे. उद्या बिहारातही तशी वेळ आल्यास नितीशकुमार हेच खुद्द लालूपुत्रांशी हातमिळवणी करणार नाहीत वा यादव-कुमार-पासवान हे तिघे भाजपच्या विरोधात एकत्र येणारच नाहीत, असे नाही. तेव्हा आपल्या या आत्मनिर्भरता आजाराचा उतारा हा सहयोगी पक्षांची आत्मनिर्भरता असू शकतो, हे भाजपने लक्षात घ्यावे. राजकारणात वारे बदलायला वेळ लागत नाही. सर्वसाधारणपणे पक्षाच्या खडतर काळात नेते सोडून जातात. पण आघाडी घटक पक्ष आणि खडसे यांच्यासारखे नेते भाजपचा सूर्य तळपत असताना पक्षत्याग करीत आहेत, हे चांगले लक्षण नाही. माणसांना सोसणे हे चांगल्या राजकारण्याचे आद्य कर्तव्य असते. ‘जो बहुतांचे सोसीना। त्यास बहुत लोक मिळेना॥’ याचा विसर विजयधुंदीतल्या भाजप नेतृत्वास पडत असल्यास परिणाम काय असतील ते उघड आहे.

मराठीतील सर्व अग्रलेख बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Editorial on senior bjp leader eknath khadse resign from party abn
First published on: 22-10-2020 at 00:04 IST