धसाला न लागणाऱ्या आरोपांवर भर, हे केजरीवाल यांच्या बालिश राजकारणाचे लक्षण. ते आता त्यांच्याचवर उलटते आहे..

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना आरोग्यमंत्री सत्येंद्र जैन यांच्याकडून दोन कोटी रुपयांची लाच स्वीकारताना आपण पाहिले असा याच मंत्रिमंडळातील माजी मंत्री कपिल मिश्रा यांनी केलेला आरोप म्हणजे नि:संशय खुळचटपणा आहे. याचे कारण केजरीवाल हे ज्या जैन यांच्याकडून पैसे घेतल्याचे बोलले जाते ते त्यांचे मंत्रिमंडळातीलच सहकारी आहेत. त्यामुळे, केजरीवाल यांच्या हाती जी काही कथित रक्कम दिली गेली ती लाच होती असे म्हणण्याचा अधिकार या संदर्भात फक्त जैन यांनाच आहे. जैन यांनी समजा अशी रक्कम केजरीवाल यांना दिली हे जरी खरे मानले तरी त्यास लाच कसे म्हणणार.. दुसरा मुद्दा खुद्द मुख्यमंत्र्यांनी अशी रोकड स्वीकारण्याचा. भारतीय राजकारणाचे किमान निरीक्षण जरी कोणी करणारे असेल तरी त्यांना लक्षात येईल की खुद्द मुख्यमंत्री स्वत:च्या हाताने हे असले उद्योग करीत नाही. त्यासाठी रीतसर वेगळी ‘व्यवस्था’ असते. तेव्हा मुख्यमंत्री केजरीवाल हे स्वत:च अशी रोकड स्वीकारतील ही शक्यता अगदीच कमी. केजरीवाल एके काळी सरकारी सेवेत होते. तेव्हा त्यांना हे उद्योग कसे चालतात हे माहीत नसणे अगदीच अशक्य आहे. खेरीज, तो पक्षासाठी आलेला निधीही असू शकतो. तेव्हा त्यास लाच म्हणण्याचा कपिल मिश्रा यांचा आरोप अगदीच बालबुद्धीचा ठरतो. पण तरीही त्याने खळबळ माजली.

याचे कारण हे असले बालबुद्धीचे राजकारण करीतच आप आणि केजरीवाल मोठे झाले. कोणावरही काहीही आरोप करावेत, आपल्या कथित नैतिकतेच्या आधारे ते जनसामान्यांच्या गळी उतरवावेत आणि आपण म्हणजे कोणी हरिश्चंद्राचे अवतार आहोत अशा आविर्भावात यावर आपल्याकडे तोडगा असल्याचे भासवावे असे आपचे राजकारण होते आणि आहे. आपच्या या बालिश राजकारणावर आम्ही तेव्हाही कोरडे ओढले होते आणि त्यांतील फोलपणा दाखवून दिला होता. आता ते सर्व खरे होताना दिसते. याचे कारण आप हा मुळात राजकीय पक्षच नाही. आसपासचा परिसर स्वच्छ करायला हवा असे वाटून चला आता आपण राजकारण राजकारण खेळू या असे म्हणत एकत्र आलेल्या बोलघेवडय़ांची ही संघटना आहे. निव्वळ भाबडेपणातून अण्णा हजारे यांच्या मागे गेलेल्या मेणबत्ती संप्रदायातून हा पक्ष आकाराला आला. हा संप्रदाय होता इंडिया अगेन्स्ट करप्शन अशा तितक्याच भाबडय़ा आंदोलनासाठी जमलेला. अशा भाबडय़ांच्या भाऊगर्दीतही काही बेरके असतात आणि ते आपला स्वार्थ अचूक साधतात. अरविंद केजरीवाल हे या गर्दीतील असे बनेल. अण्णांच्या खांद्यावरून आपले स्थान निश्चित केल्यानंतर त्यांनी अण्णांहाती नारळ दिला आणि आम आदमी पक्ष नावाची जनसेना त्यांनी काढली. हेतू राजकारण बदलण्याचा. भारतीय राजकारणात हा असा बदलाचा उद्घोष करीत अनेक जण आले. जयप्रकाश नारायण ते विद्यमान सत्ताधारी अशा प्रत्येकाने आपण कसा बदल घडविणार आहोत, याची भरघोस आश्वासने दिली. परंतु इतिहास असा की ज्या व्यवस्थेला बदलण्याच्या बाता या मंडळींनी मारल्या त्याच व्यवस्थेच्या कुशीत राहून हे सर्व आपापले सत्ताकारण करीत राहिले. अरविंद केजरीवाल यांस मुळीच अपवाद नाहीत. त्याचमुळे दिल्ली विधानसभा निवडणुकीत आपने भरघोस मते मिळवली त्यास दोन वर्षेही होत नाहीत तोच दिल्ली महापालिकेच्या निवडणुकीत तेथील जनतेने आपला चांगलेच नाकारले. हे असेच होणार होते.

कारण या आश्वासनांच्या पूर्तीत आणि राज्यकारभारात मुळात केजरीवाल यांनाच रस नाही. तसा तो असता तर दिल्लीत स्वत:च्या सरकारच्या अखत्यारीत असलेले मुद्दे त्यांनी हाती घेतले असते आणि काही किमान बदल घडवून दाखवला असता. परंतु असे करावयाचे तर काही विधायक दृष्टिकोन असावा लागतो आणि विकासाचे काही प्रारूप डोळ्यासमोर नाही तरी डोक्यात असावे लागते. केजरीवाल यांच्याकडे ते नाही. केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारला बोल लावणे हाच त्यांचा एककल्ली कार्यक्रम. दिल्ली हे पूर्ण राज्य नाही, हे खरेच. बऱ्याच गोष्टींसाठी त्यामुळे दिल्लीस केंद्रावर अवलंबून राहावे लागते. केजरीवाल यांनी या वास्तवाचा फायदा घेतला आणि आपल्या प्रत्येक अपयशासाठी मोदी यांच्यावर दुगाण्या मारण्यात धन्यता मानली. हे आपले खरे राजकीय वास्तव. विरोधी पक्षाच्या अपयशाचा पाढा वाचणे म्हणजे आपल्या पक्षाच्या यशाची मुहूर्तमेढ रोवणे असे सर्वच राजकीय पक्षांना वाटते. केजरीवाल तेच करीत गेले. हे करताना त्यांचे भान इतके सुटले की भ्रष्टाचाराच्या मुद्दय़ावर राजकारणात उतरलेला हा गडी बिहारात थेट लालू प्रसाद यादव यांच्या प्रचाराची धुरा वाहू लागला. आपल्याला कोणत्या कोनातून लालू हे अभ्रष्ट आणि प्रचारयोग्य वाटतात हे सांगण्याचा प्रामाणिकपणादेखील केजरीवाल यांनी कधी दाखवला नाही. आपचा जन्म जनतेतून उभारल्या गेलेल्या निधीतून झाला. परंतु या पक्षाची पुढची सारी वाटचाल मात्र अन्य राजकीय पक्षांच्या मार्गानेच झाली. पहिली मोटार पै पै साठवलेल्या पैशातून घ्यावी आणि तिच्यात इंधन मात्र धनदांडग्यांच्या कृपेने घातले जावे, तसेच हे. याच निलाजऱ्या राजकारणामुळे आपच्या अनेक मंत्र्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप झाले आणि केजरीवाल यांच्या साथीदारांकडून होणाऱ्या दौलतजादाच्या अनेक कथा बाहेर आल्या. याआधीच्या काँग्रेस सरकारातील मंत्रीदेखील जेवढी उधळपट्टी करीत नव्हते त्याच्या कैक पट सरकारी सामग्रीचा गैरवापर आपच्या काळात सुरू आहे. तरीही हे बोगस लोक साधेपणाच्या बाता मारणार आणि इतरांना नैतिकतेचे धडे देणार. खुद्द केजरीवाल स्वत:च्या खटल्यासाठी किती सरकारी खर्च करतात हे उघड झाल्यानंतर तर नवनैतिकशिरोमणींची उरलीसुरली लाजही वेशीवर टांगली गेली. त्यातूनही जी काही शिल्लक होती ती आज कोणा कपिल मिश्रा नावाच्या आप आमदाराने चव्हाटय़ावर आणली.

यानंतर काँग्रेस आणि भाजप या दोन्ही महत्त्वाच्या पक्षांना आनंदाच्या उकळ्या फुटल्या असून आप आणि केजरीवाल हे कसे आपल्यातलेच एक आहेत हे दाखवण्याची जणू स्पर्धाच दोन्ही पक्षांत लागली आहे. भ्रष्टाचाराचे अनेक आरोप आणि प्रकरणे पचवून बसलेल्या या दोनही पक्षांनी केजरीवाल यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. ती केविलवाणी म्हणावी लागेल. तरीही तसे होणे अपरिहार्य होते. कारण तशी वेळ केजरीवाल यांनीच आणली आहे. वास्तविक दिल्ली हे अर्धे राज्य वगळता आप या पक्षास कोठेही स्थान नाही. ते मिळावे यासाठी आपने वाटेल ते उद्योग केले. उदाहरणार्थ पंजाब. नुकत्याच झालेल्या या राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या प्रचारदौऱ्यांदरम्यान आपने जुन्या खलिस्तानवाद्यांना आपलेसे करण्याचा नीच उद्योग केला. तेथे जनतेने आपला लाथाडले. त्यानंतरही केजरीवाल यांचे डोके ठिकाणावर आले नाही. देशात नरेंद्र मोदी यांना पर्याय म्हणून उभे राहायच्या कल्पनेने केजरीवाल पछाडलेले असून काँग्रेसच्या पिछाडीमुळे निर्माण झालेल्या पोकळीत त्यांना आपला बसवायचे आहे. त्यांच्या या उद्दिष्टासाठी आक्षेप घेण्याचे कारण नाही. प्रश्न आहे तो त्यांनी निवडलेल्या मार्गाचा. तो खोटा आणि भ्रामक आहे. केजरीवाल हे अमान्य करीत राहिले तर आप अधिकाधिक विरळ होत जाईल आणि अखेर आपल्या मरणाने मरेल.

  • आपचा जन्म जनतेतून उभारल्या गेलेल्या निधीतून झाला; तरी पुढची वाटचाल अन्य पक्षांच्या मार्गानेच झाली. पहिली मोटार पै पै साठवलेल्या पैशातून घ्यावी आणि तिच्यात इंधन मात्र धनदांडग्यांच्या कृपेने घातले जावे, तसेच हे. भ्रष्टाचाराचे अनेक आरोप आणि प्रकरणे पचवून बसलेल्या काँग्रेस व भाजपने केजरीवाल यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. ती केविलवाणीच, पण असे होणे अपरिहार्य होते..
मराठीतील सर्व अग्रलेख बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Kapil mishra cm arvind kejriwal kapil mishra allegation on kejriwal aap crisis satyendra jain
First published on: 09-05-2017 at 01:10 IST