scorecardresearch

अग्रलेख : उजव्यांच्या पराभवाचा धडा

फ्रेंच मतदारांनीही या सत्याकडे दुर्लक्ष केलेले नाही. मॅक्रॉन यांना मत दिलेल्या सुमारे ९१ टक्के इतक्या मतदारांनी हे सत्य नमूद केले.

कडव्यांना रोखायचे असेल तर सहिष्णू आणि नेमस्तांना केवळ औदार्याशिवाय कामगिरीतील परिणामकारकता सुधारावी लागेल..

युरोपमधील दोन माथेफिरू उजव्यांना एकाच वेळी पराभव पत्करावा लागल्यामुळे विवेकी युरोपियनांची अवस्था ‘आंधळा मागतो एक डोळा..’ अशी होणे साहजिक असले तरी परिस्थिती इतक्यात हरखून जावे अशी नाही. फ्रान्समध्ये अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्या आव्हानवीर मारी ल पेन आणि स्लोवेनिया देशात पंतप्रधान जानेझ जान्सा या दोघांचे पराभव एकाच वेळी होणे हा विचारी युरोपियनांसाठी मोठाच आनंदयोग असणार. यातील मारी ल पेन यांना अध्यक्षपदाने सलग तिसऱ्यांदा हुलकावणी दिली आणि स्लोवेनियाचे पंतप्रधान जान्सा यांना सलग तीन सत्तापदांनंतर पराभव पत्करावा लागला. ल पेन या फ्रान्समध्ये कडव्या पुतिनवादी मानल्या जातात तर जान्सा हे स्लोवेनियातील खंदे ट्रम्प समर्थक. या दोघांचेही राजकारण आणि व्यक्तिमत्त्व त्यांच्या त्यांच्या आदर्शाप्रमाणे पुरेसे हडेलहप्पी, असहिष्णू आणि विवेकशून्य. अर्थात पुतिन वा ट्रम्प हे कोणास आदर्श वाटत असतील तर त्यांच्याकडून फारशी अपेक्षाही बाळगण्याचे कारण नाही, हे खरे. पण तरीही अशांची सध्या चलती असल्याने त्यांच्या निवडणुकांकडे जगाचे लक्ष लागले होते. त्यातही विशेषत: फ्रान्समध्ये ल पेन किती मुसंडी मारणार याकडे अनेक चिंतामिश्रित कुतूहलाने जग नजर ठेवून होते. कारण या बाई विजयी झाल्या असत्या तर करोना, युक्रेन युद्ध यानंतर जगावरचे हे तिसरे संकट ठरले असते. ते टळले. त्यामुळे मॅक्रॉन विजयी झाले यापेक्षा ल पेन पराभूत झाल्या याचा आनंद अधिक हे नाकारण्यात अर्थ नाही. 

फ्रेंच मतदारांनीही या सत्याकडे दुर्लक्ष केलेले नाही. मॅक्रॉन यांना मत दिलेल्या सुमारे ९१ टक्के इतक्या मतदारांनी हे सत्य नमूद केले. ‘ल पेन हा मॅक्रॉन यांच्यापेक्षा वाईट पर्याय आहे. त्यामुळे आम्ही कमी वाईट असा पर्याय निवडला आणि मॅक्रॉन यांस मत दिले,’ इतक्या स्पष्टपणे फ्रेंच मतकरींनी आपल्या भावना व्यक्त केल्या. त्या लक्षात घ्यायच्या कारण ल पेन यांचे कमालीचे विद्वेषाचे राजकारण. फ्रेंच नागरिक आणि मुसलमान, फ्रान्स आणि युरोपीय संघ, फ्रान्स आणि स्थलांतरित अशा प्रत्येक मुद्दय़ावर त्यांची मते केवळ धर्माध म्हणावीत अशी आहेत. सध्या जगातील अनेक राजकारण्यांस आपले सर्वक्षेत्री अपयश झाकण्यासाठी इस्लाम गरजेचा वाटू लागला आहे. बहुसंख्याकांच्या मनात मुसलमानांविषयी पुरेसा विद्वेष निर्माण केला की यांचे काम फत्ते होते. मग त्यांच्या यशापयशाविषयी प्रश्नच निर्माण होत नाहीत. फ्रान्समध्ये ल पेन अशांचे प्रतिनिधित्व करतात. फ्रेंचांच्या सर्व समस्यांसाठी मुसलमान जबाबदार आहेत असा त्यांचा सूर असतो. त्यामुळे देशातील मुसलमान निर्वासितांस हाकलून द्यावे, सार्वजनिक ठिकाणी मुसलमानांच्या वावरावर नियंत्रणे आणावीत तसेच फ्रान्सने युरोपीय महासंघातून बाहेर पडावे या अशा काही त्यांच्या प्रमुख मागण्या. सत्ता मिळाल्यास त्या अमलात आणण्याइतका वेडसरपणा अंगी असल्यामुळे या निवडणुकीने साऱ्यांचेच श्वास रोखले गेले होते.

ल पेन यांचा हा सलग तिसरा पराभव. गेल्या वर्षीपेक्षा त्यांना या वेळी दोन टक्के अधिक मते मिळाली. या वेळी मॅक्रॉन विरुद्ध ल पेन यांच्यातील लढत अधिक चुरशीची असेल असे मानले जात होते. तसे काही झाले नाही. पण त्याचे कारण मतदारांच्या मते मॅक्रॉन यांच्यापेक्षा ल पेन या ‘अधिक वाईट’ ठरल्या असत्या. म्हणजे मॅक्रॉन यांच्यापेक्षा गुणात्मक उजवा पर्याय समोर नसल्याने केवळ नाइलाज म्हणून फ्रेंचांनी ल पेन यांस डावलून विद्यमान अध्यक्षांस आणखी एक संधी दिली. सत्ताधारी अध्यक्षास असे सलग दुसऱ्यांदा सत्तापद मिळणे हा त्या देशातील विक्रम. तो नोंदवला जात असताना सामान्य फ्रेंचांच्या मनातील हा ‘उजवा कल’ चिंता वाढवणारा आहे हे निश्चित. यातील योगायोग असा की सामान्यांतील हे टोकाचे उजवेपण पहिल्यांदा दिसून आले ते मारी ल पेन यांचे तीर्थरूप ज्याँ लुई मारी ल पेन यांच्या पदरात २००२ साली अचानक पडलेल्या भरघोस मतांमुळे. त्या वेळी ते तत्कालीन अध्यक्ष जॅक शिराक यांना आव्हान निर्माण करतात की काय अशी परिस्थिती होती. हे ज्याँ ल पेन त्याआधी तीन दशकांपासून त्या देशात विद्वेष पेरणी करीत आहेत. यहुद्यांचे हिटलरने केलेले शिरकाण नाकारण्यापर्यंत त्यांचा वेडपटपणा होता. त्यातून त्यांना दंडही झाला. पण तरी त्यांचे राजकारण थांबले नाही. त्यांच्या या टोकाच्या स्वभावामुळे असेल पण  ज्याँ ल पेन यांना त्यांची पत्नी सोडून गेली. जाताना आपल्या या अशा नवऱ्यास धक्का देण्यासाठी ‘प्लेबॉय’ मासिकात पूर्ण नग्न छायाचित्र देण्यापर्यंत त्यांची मजल गेली होती. त्या वेळी हा प्रकार बराच गाजला आणि या मासिकाचे पुनर्मुद्रण करावे लागले. अशा या दाम्पत्याची मारी ही सर्वात कनिष्ठ कन्या. त्यांचेही राजकारण असेच टोकाचे राहिले. तथापि यास फार पािठबा मिळत नाही, हे दिसल्यावर त्यांनी या निवडणुकीत स्वत:स मवाळ सादर करण्याचा प्रयत्न केला. आपणास मांजरी कशा आवडतात, प्राण्यांवर आपले किती प्रेम आहे वगैरे दाखवण्याचे हुकूमशाही मानसिकतेच्या नेत्यांचे मार्ग त्यांनी अवलंबिले. पण तरीही त्यांना यशाने हुलकावणी दिली. हे फ्रेंचांचे, युरोपचे आणि जगाचेही सुदैव.

तथापि त्यामुळे मॅक्रॉन यांच्या कारभारातील मर्यादा लपून राहात नाहीत. मॅक्रॉन यांनी आर्थिक सुधारणा धडाक्यात केल्या. पण त्याच्या लाभार्थीचे िडडिम पिटण्यात ते अपयशी ठरले. आर्थिक मुद्दय़ावर मागे पडलेल्यांकडून सत्ताधाऱ्यांच्या सहिष्णुतेचा नेहमीच दुस्वास होत असतो. कारण ज्याचे जळत असते त्यास त्या वेळी सहिष्णुतेपेक्षा स्वत:च्या फायद्यांत अधिक रस असतो. युरोपीय महासंघाची ब्रेग्झिटनंतर विस्कटलेली घडी बसवण्याच्या आणि पुतिन यांस आव्हान देण्याच्या नाही तरी प्रश्न विचारण्याच्या महत्त्वाच्या कामात मग्न असलेल्या मॅक्रॉन यांचे घरच्या आघाडीवर निश्चितच दुर्लक्ष झाले असणार. फ्रान्समध्ये निवृत्तीचे वय ६२ वरून २०३१ पर्यंत ६५ पर्यंत नेण्याचा त्यांचा मानस आहे. बेरोजगारीच्या समस्येवर त्या देशाने बऱ्यापैकी नियंत्रण मिळवलेले असल्याने ते हे करू शकतात. अशा महत्त्वाच्या आर्थिक सुधारणांसाठी वातावरणनिर्मिती गरजेची असते. ती करण्यात मॅक्रॉन यांचे दुर्लक्ष झाले. त्याचा फायदा विद्वेषी ल पेन यांनी उचलला आणि देशातील राजकारणास दुहीची फोडणी देण्याचा प्रयत्न केला. मतदानाच्या दुसऱ्या फेरीत मॅक्रॉन यांनी जोर लावल्याने तो हाणून पाडण्यात त्यांना यश आले. ल पेन यांची धोरणे अमलात आली तर काय हाहाकार उडेल हे मॅक्रॉन यांनी गेल्या दोन आठवडय़ांत प्रभावीपणे फ्रेंचासमोर मांडले. त्याचा काही प्रमाणात फायदा निश्चित झाला असणार. कडव्यांना रोखायचे असेल तर सहिष्णू आणि नेमस्तांना केवळ औदार्याशिवाय कामगिरीतील परिणामकारकता सुधारावी लागेल. पण म्हणून संकट टळले असे नाही. मॅक्रॉन यांचे हे अखेरचे अध्यक्षपद. त्या देशाच्या घटनेनुसार एखादी व्यक्ती फक्त दोन खेपेस अध्यक्ष राहू शकते. म्हणजे २०२७ साली ल पेन यांच्यासमोर मॅक्रॉन हे आव्हान नसेल. पण मॅक्रॉन यांस आपल्या सहिष्णुवादी, जागतिकीकरणवादी पक्षाचे आव्हान जिवंत ठेवायचे असेल तर आगामी पाच वर्षे देशांतर्गत राजकारणाकडे लक्ष द्यावे लागेल. म्हणून ‘‘मी यापुढे सर्व फ्रेंचांचा अध्यक्ष म्हणून अधिक काम करेन,’’ हे त्यांचे ताज्या विजयानंतरचे उद्गार वास्तवाच्या जाणिवेचे निदर्शक ठरतात. कडव्यांना रोखायचे असेल तर सहिष्णू आणि नेमस्तांना औदार्याखेरीज कार्यक्षमताही दाखवावी लागते. दोन उजव्यांच्या पराभवाचा हा धडा आहे.

मराठीतील सर्व अग्रलेख ( Agralekh ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Loksatta editorial emmanuel macron re elected as the president of france zws

ताज्या बातम्या