आवरोनि ‘ममता’..

ममता बॅनर्जी वा त्यांचे नवचाणक्य प्रशांत किशोर यांनी कितीही टाळायचे म्हटले तरी त्यांना काँग्रेस हा घटक आगामी राजकीय संघर्षांत टाळता येणारा नाही..

ममता बॅनर्जी वा त्यांचे नवचाणक्य प्रशांत किशोर यांनी कितीही टाळायचे म्हटले तरी त्यांना काँग्रेस हा घटक आगामी राजकीय संघर्षांत टाळता येणारा नाही..

पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत भाजपला चारी मुंडय़ा चीत केल्यापासून ममता बॅनर्जी या जणू भारतीय लोकशाहीच्या शेवटच्या रक्षणकर्त्यां असे चित्र सादर करण्याचा प्रयत्न दिसतो. त्यामुळे देशभरातील उदारमतवादी, पुरोगामी अशा अनेकांचा त्यांच्याभोवती गराडा वाढू लागला असून देशात पुन्हा लोकशाहीची पहाट आता केवळ त्यांच्यामुळेच उगवेल असे भाव या मंडळींच्या चेहऱ्यावरून ओघळू लागले आहेत. उदारमतवादी आणि पुरोगामी याचा राजकीय अर्थ नरेंद्र मोदी विरोधक असा आहे हे स्वतंत्र सांगण्याची गरज नाही. त्या सर्वास मोदी यांना कधी एकदा दूर करतो असे वाटू लागले आहे. लोकशाही व्यवस्थेचा म्हणून विचार करू जाता त्यांचे ‘वाटणे’ आक्षेप घ्यावे असे नाही. पण म्हणून ममताबाईंना नसलेली विशेषणे लावण्याची वा नसलेले गुण त्यांना चिकटवण्याची गरज नाही. असे करणारा वर्ग हा प्राधान्याने विचारबिंदूंच्या डावीकडचा. धर्माधिष्ठित राजकारणास त्यांचा विरोध असणे रास्त आणि इष्टदेखील. पण तरीही हा वर्ग ममताबाईंमध्ये धर्मविरहित राजकारणाची निरपेक्षता पाहतो हे आश्चर्यच. अशा वेळी या मंडळीस ममता बॅनर्जी आणि त्यांचा तृणमूल काँग्रेस हा पक्ष भाजप आघाडीचा भाग होता याची आणि या सर्वास ज्या लालकृष्ण अडवाणी यांचा निषेध करणे आवडते त्या अडवाणी यांच्या पंगतीतच ममताबाईंचेही ताट होते याची आठवण करून द्यायला हवी. गुजरात दंगली हा उदारमतवाद्यांचा सात्त्विक संतापाचा मुद्दा. हे अगदी योग्य. पण ममता बॅनर्जी यांची राजवटही अहिंसेसाठी ओळखली जात नाही, हे लक्षात घ्यायला हवे. अलीकडे व्यवस्थेचे विडंबन करणाऱ्या विनोदवीरांची मोठी गळचेपी होते ही मोठी दुर्दैवी आणि तितकीच धोकादायक बाब. हुकूमशाही प्रवृत्ती हास्यविनोदास घाबरतात हा सिद्धान्तही खराच. पण यावर इतिहासाचा कसलाच गंध नसलेले हे नवे कोरे उदारमतवादी ममताबाईंस साद घालतात हाही खरा विनोदच. विद्यमान व्यवस्थेस एकपात्री विनोदी कलाकारांचा विनोद सहन होत नसेल तर ममताबाई आणि त्यांच्या पक्षास साधे व्यंगचित्र रुचले नव्हते, हे कसे विसरणार? तेव्हा या सत्याचे स्मरण करून दिल्यानंतर ममता बॅनर्जी यांचा बहुचर्चित मुंबई दौरा, त्यांची ताजी वक्तव्ये आणि राजकीय वास्तव यांवर भाष्य करणे आवश्यक ठरते. त्यासाठी त्यांच्या मुंबई दौऱ्यातील दोन घटना महत्त्वाच्या.

पहिली म्हणजे मुंबई शहरातील बुद्धिजीवींशी चर्चा. अशा भेटी समाजाचे नेतृत्व करणारे, त्यास दिशा देऊ पाहणारे सर्व पक्ष/ नेते/ संघटना यांच्याकडून नेहमीच आयोजित होत असतात. यामागील हेतू संबंधितांस दुसरी बाजू कळावी, वास्तवाचे भान यावे असा असतो. त्यामुळे अशा बैठका नेहमीच बंद खोलीत असतात. ममताबाईंची ही पहिलीच मुंबई फेरी असल्यामुळे असेल पण ही बैठक तशी नव्हती आणि तिचे स्वरूप आनंददूतांचे (चीअरलीडर्स) संमेलन असे निघाले. त्यात पुरेसा संवाद नव्हता आणि सहभागींचा उन्माद पाहून शहाणेसुरते जन वास्तवापासून किती दुरावलेले असतात याची जाणीव होत होती. त्यातील बहुतेकांचे वर्तन साधारण ममता बॅनर्जी यांस पंतप्रधानपदाची शपथ देणे तेवढे बाकी आहे, असे! या संपूर्ण बैठकीत अनेकांनी जंगजंग पछाडूनही ममताबाईंनी रा. स्व. संघाविषयी एक चकार शब्दही काढला नाही ही बाब उभय बाजूंस पुरेशी सूचक म्हणावी अशी. तसे प्रयत्न करणाऱ्यांचा भ्रमनिरास ठळकपणे दिसत होता. ‘वेळ आल्यावर संघाने इंदिरा गांधी यांनाही पाठिंबा दिला होता’ हे ममताबाईंचे विधान पश्चिम बंगालात काय घडले असावे आणि भविष्यात काय घडू शकते याचा अंदाज बांधण्यास पुरेसे ठरावे.

पण कहर होता तो एका महाभागाने ममताबाईंस ‘तुम्ही सत्तेवर आल्यावर विद्यमान राजवटीतील दुराचाराची चौकशी करण्यासाठी न्युरेंबर्गप्रमाणे खटले भरणार का’ हा प्रश्न आणि असे आचरट कोणी काही विचारल्यानंतरही निर्माण झालेला हर्षोन्माद. हिटलरने दुसऱ्या महायुद्धकाळात जे नृशंस अत्याचार केले त्याची चौकशी करून दोषींस शासन करण्याचे काम ‘न्युरेंबर्ग ट्रायल्स’ने केले. पण नरेंद्र मोदी यांची राजवट कितीही नकोशी वाटत असली, त्यांचा दुस्वास करण्यायोग्य बरेच काही आहे असे वाटत असले तरी त्यातील घटनांसाठी न्युरेंबर्गचा दाखला देणे हे शुद्ध महामूर्खपणाचे ठरते. कितीही नकोसे वाटत असले तरी हे पूर्णपणे लोकशाही पद्धतीने निवडून आलेले लोकनियुक्त सरकार आहे हे नाकारता येणारे नाही. तेव्हा त्या राजमान्य प्रक्रियेद्वारेच ते दूर व्हायला हवे. ही राजवट अनेकांस मान्य नसली तरी ती स्वीकारणाऱ्यांची संख्या नाकारणाऱ्यांच्या संख्येपेक्षा जोपर्यंत अधिक आहे तोपर्यंत हा जननिर्णय स्वीकारायलाच हवा. त्यास पर्याय नाही. आम्हास जे आवडते तेच इतरांनाही आवडायला हवे, ही झुंडशाही झाली. तीच करायची तर विद्यमान राजवटीस दोष देण्यात काय हशील? तेव्हा ममताबाई आणि मंडळींनी २०२४ साली विद्यमान व्यवस्थेस मतपेटीद्वारे जरूर दूर करावे.मतपेटीतून झालेल्या परिवर्तनाचे स्वागतच  तमाम लोकशाहीप्रेमी करतील.

पण तसे करायचे असेल तर या मंडळीस काँग्रेसला दूर ठेवून चालणारे नाही. शरद पवार यांनी ममताबाईंस याची जाणीव करून दिली हे बरे झाले. त्यांच्या मुंबई भेटीतील ही दुसरी दखलपात्र घटना. या बैठकीनंतर ‘संयुक्त पुरोगामी आघाडी- यूपीए- आहेच कोठे?’ असा प्रश्न त्यांनी केला. वृत्तवाहिन्यांद्वारे त्या वाक्याचा माराच सुरू असल्याने त्यावर काँग्रेसी आणि अन्यांच्याही प्रतिक्रिया येणे साहजिक. या अशा प्रतिक्रिया ‘अरे’ला ‘कारे’ म्हणण्याइतक्या तात्कालिक असतात. त्यात धोरणात्मकता नसते. म्हणून प्रगल्भ, शहाणे नेते माध्यमी भाष्यांवर भाष्य करणे टाळतात. हा मुद्दाही तसाच. ममता बॅनर्जी वा त्यांचे नवचाणक्य प्रशांत किशोर यांनी कितीही टाळायचे म्हटले तरी त्यांना काँग्रेस हा घटक आगामी संघर्षांत टाळता येणारा नाही. अन्य पक्षांच्या समाजमाध्यमी टोळक्यांनी, फॉरवर्डी विद्वानांनी अगदी हसण्यावारी नेले तरी आज देशात भाजपखालोखाल सर्वाधिक मतसंख्या ही काँग्रेसकडे आहे हे नाकारणे अशक्य, हे यामागील साधे कारण. भाजपकडे देशभरात ३०-३१ टक्के मते असतील तर काँग्रेसदेखील इतक्या पडझडीनंतरही आपला २० टक्के मतांचा ऐवज सुरक्षित राखून आहे. काँग्रेसचे हे मत-प्रमाण अन्य सहा मोठय़ा पक्षांच्या एकूण मतांपेक्षाही अधिक आहे. या सत्याची जाणीव अन्य कोणास असेल/नसेल पण नरेंद्र मोदी, अमित शहा आणि शरद पवार यांस आहेच आहे. म्हणूनच पन्नासही खासदार नसलेल्या या पक्षावर प्रहार करण्याची एकही संधी मोदी-शहा सोडत नाहीत आणि ‘पडका वाडा’ वगैरे त्याचे वर्णन केले तरी पवार हे काँग्रेसचा हात सोडत नाहीत. संख्याशास्त्रात उत्तम गती असलेल्या प्रशांत किशोर यांनाही याची जाणीव आहेच आहे. म्हणूनच या साऱ्यांचा प्रयत्न आहे तो काँग्रेसला निवडणूकपूर्व आघाडी होण्यापूर्वीच पुरेसे झुकवणे. कमीत कमी जागा त्या पक्षाने मान्य कराव्यात यासाठी हा खटाटोप. म्हणजे एका अर्थी इंग्रजीत ज्यास ‘श्ॉडो बॉक्सिंग’ म्हणतात असा हा प्रकार. नुसतीच खडाखडी. तेव्हा ती पाहून उभय बाजूंच्या भक्तगणांस इतके उचंबळून येण्याचे काहीच कारण नाही. चहापेक्षा किटलीच अधिक गरम व्हावी तसेच हे. त्यातून केवळ तापवून घेणाऱ्यांच्या विचारक्षमतेचा तेवढा अंदाज येतो. तेव्हा सर्वानीच हुच्चपणा टाळलेला बरा. इतकेही शहाणपण नसेल तर या मंडळींनी गोविंद बल्लाळांच्या ‘सं. संशयकल्लोळ’मधील (१९१६) ‘प्रथम करा हा विचार पुरता.. अवरोनि ममता..’, या पदाची आवर्तने करावीत. तेवढीच जिवाला शांतता.

मराठीतील सर्व अग्रलेख ( Agralekh ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Loksatta editorial mamata banerjee steps against congress prashant kishor views on congress leadership zws

Next Story
अडलीस आणिक पुढे जराशी..
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी