scorecardresearch

नीला आसमाँ.. 

आपल्या सरकारच्या चुका आणि त्याने केलेला अतिरेक पाहून ते अस्वस्थ झाले.

जमिनीवरचे नीट समजून घेण्यासाठी पत्रकारितेस आभाळाइतके उंच व्हावे लागते. नील शिहान यांची पत्रकारिता तशी होती..

सत्तर-ऐंशीच्या दशकांत ज्यांना मिसरूड फुटत होते त्यांना अमेरिका, व्हिएतनाम युद्ध, चे गव्हेरा, बीटल्स, आदींविषयी आपोआपच कुतूहलमिश्रित आकर्षण निर्माण झाले ते कायमचेच. राजकीय अंगाने पाहू जाता, त्यातील व्हिएतनाम युद्ध, तत्कालीन अमेरिकी अध्यक्ष रिचर्ड निक्सन यांची त्यातून झालेली गच्छंती आणि त्यामुळे अमेरिकी माध्यमांचा मोठेपणा या गोष्टी अनेकांसाठी आयुष्यात कायमच्या आकर्षणाचा भाग झाल्या. यातील बॉब वुडवर्ड, कार्ल बर्नस्टीन आणि त्यांची ‘ऑल द प्रेसिडेंट्स मेन’ ही अजरामर कलाकृती, ‘द वॉशिंग्टन पोस्ट’च्या धीरोदात्त कॅथरिन ग्रॅहम हे अनेकांना अनेक कारणांनी माहीत असतात. पण हा सारा डोलारा ज्यांच्या ‘परमवीरचक्र’ दर्जाच्या शौर्यशोध पत्रकारितेवर उभा होता ते नील शिहान हे मात्र तुलनेने अपरिचित राहिले. तथापि, ज्यांनी कोणी योग्य वयात नील यांचे ‘अ ब्राइट शायनिंग लाय : जॉन पॉल व्ॉन अ‍ॅण्ड अमेरिका इन व्हिएतनाम’ हे पुस्तक वाचले, त्यांच्या मनात शिहान यांच्याविषयी केवळ अपार आदर आणि आदरच असणार. माध्यम व्यावसायिकांनाच भावेल अशी काही ती केवळ पत्रकारितेची कहाणी नव्हे. ती एक सनद आहे. व्यक्ती असो वा देश; एकदा का त्यांस अनिर्बंध सामर्थ्य मिळाले की त्यातून एक दैत्य कसा तयार होतो, याची ती थक्क करणारी कहाणी. पण तिने इतिहास घडवला. त्याच शौर्येतिहासावर आज अमेरिकेतील पत्रकारिता उभी आहे. डोनाल्ड ट्रम्प व त्यांच्या बेशरम उद्योगांना त्यांच्या अध्यक्षपदाच्या पहिल्या दिवसापासून आव्हान देणाऱ्या या पत्रकारितेचे महत्त्व खुद्द ट्रम्प यांनीच गेल्या काही दिवसांतील आपल्या उद्योगांनी अधोरेखित केले. त्यातून ट्रम्प यांची गच्छंती निश्चित झाली. ट्रम्प यांनी अमेरिकी लोकशाहीस भले हादरवले असेल. पण ती फार खिळखिळी होणार नाही याची हमी तेथील माध्यमांनी दिली. ते पाहूनच नील शिहान यांनी समाधानाने आपले प्राण सोडले असतील.

त्यांच्या वर उल्लेखिलेल्या पुस्तकातील जॉन पॉल व्ॉन हा अमेरिकी कर्नल. युद्धकाळात तो व्हिएतनाममध्ये तैनात होता. त्याच काळात त्या देशातून बातमीदारी करण्याची संधी शिहान यांना मिळाली. आपले मायबाप सरकार व्हिएतनाममध्ये काय सुरू आहे त्याविषयी किती धादांत खोटे बोलत आहे, हे शिहान आपल्या डोळ्यांनी पाहात होते आणि अधिकाधिक माहिती घेत होते. त्यात त्या देशातील काही बौद्ध भिक्खुंनी आत्मदहन केले. त्याबाबत अमेरिकी सरकारने केलेला दावा म्हणजे महासत्तेच्या महामस्तवालपणाचा नमुनाच. पण हे जगास कळले ते शिहान यांच्या पत्रकारितेमुळे. आधी ‘यूपीआय’ या तुलनेने लहान वृत्तसंस्थेच्या वतीने शिहान व्हिएतनाममध्ये असताना ‘एपी’सारख्या वृत्तसंस्थेचे तीन-तीन प्रतिनिधी त्या देशात त्याच कामावर होते. पण तरीही ‘यूपीआय’चे शिहान हे अन्य बलाढय़ वृत्तसंस्थांना आपल्या वृत्तांकनाने शब्दश: दमवीत. वृत्तसृष्टीत अनेक नेक पत्रकार केवळ लहान वा दुर्लक्षित वृत्तसंस्था वा वृत्तपत्रामुळे मोठे होऊ शकत नाहीत. सुदैवाने शिहान यांचे तसे झाले नाही. त्यांना ‘द न्यू यॉर्क टाइम्स’साठी आधी न्यू यॉर्क आणि नंतर व्हिएतनाम येथून बातमीदारी करण्याची संधी मिळाली. तिचे त्यांनी सोने केले. त्यातूनच वृत्तसृष्टीच्या शौर्याचे अढळ शिखर उभे राहिले.

झाले ते असे. अमेरिकेच्याच संरक्षण मंत्रालयाने व्हिएतनाम युद्धात आपण कसकशी माती खाल्ली याचे दस्तावेजीकरण सुरू केले. दुसऱ्या महायुद्धोत्तर शीतयुद्धात अगदी आयसेनहॉवर, केनेडी, जॉन्सन ते निक्सन अशा सर्व अध्यक्षांची व्हिएतनाम धोरणे सातत्याने कशी चुकत गेली याचे हे प्रामाणिक संकलन. अत्यंत गुप्तपणे होणारे हे काम तसेच गुप्त राहणे अपेक्षित होते. पण त्याच विभागात काम करणाऱ्या डॅनिएल एल्सबर्ग यांनी त्याची एक प्रत गुप्तपणाने काढून स्वत:जवळ ठेवली. आपल्या सरकारच्या चुका आणि त्याने केलेला अतिरेक पाहून ते अस्वस्थ झाले. पुढेमागे आयुष्यात कधी तरी हे सारे बाहेर यायला हवे, कारण आपल्या चुका आपल्याच देशवासीयांना कळायला हव्यात, अशी त्यांची इच्छा. एकीकडे अमेरिकेत राहून व्हिएतनाम युद्धातील स्वकीयांचे अत्याचार पाहून अस्वस्थ झालेले एल्सबर्ग, दुसरीकडे प्रत्यक्ष व्हिएतनाममधे बातमीदारी करताना झालेल्या सत्यदर्शनाने संतप्त झालेले शिहान आणि या सरकारी अत्याचार-कार्यात सहभागी व्हावे लागल्याने अस्वस्थ कर्नल वॅन आणि तसे अन्य असा एक अदृश्य त्रिकोण तयार झाला. त्यातील दोन कोन- शिहान आणि एल्सबर्ग- हे व्यावसायिक योगायोगाने एकत्र आले. शिहान यांना आपल्या देशाच्या दुष्कृत्यांचा अनुभव होताच. पण त्याचे साद्यंत संकलन पाहून त्यांच्यातील बातमीदार हरखून गेला. त्यांनी एल्सबर्ग यांना हा अहवाल पाहू देण्याची गळ घातली. एल्सबर्ग तयार झाले. अट एकच. हा अहवाल फक्त पाहायचा. प्रत काढायची नाही. शिहान यांनी होकार दिला. त्यानंतर ज्या घरात एल्सबर्ग यांनी हा अहवाल ठेवला होता त्याची चावी शिहान यांना दिली. दोघांनी तेथे एकत्र असणे अयोग्य म्हणून त्या काळात एल्सबर्ग त्या घरापासून दूर राहणार होते. त्यानंतर घडले ते अभूतपूर्व होते.

हा अहवाल पाहून शिहान हादरले. तो तसाच्या तसा छापण्याची गरज होती. पण या तब्बल सात हजार पानी अहवालातील काय काय आणि कसे लक्षात ठेवणार हा प्रश्न. म्हणजे त्याची प्रत काढणे आले. पण ते प्रत न काढण्याचा शब्द देऊन बसले होते. आता काय करायचे या प्रश्नातून त्यांची त्यांच्याइतकीच गुणवंत लेखिका/पत्रकार पत्नी सूजान शिहान (‘न्यू यॉर्कर’च्या वाचकांना त्यांचा परिचय असेलच) यांनी मार्ग काढला. प्रत हाती असल्याशिवाय इतका खळबळजनक अहवाल वृत्तान्त छापणे अंगाशी येईल, या त्यांच्या सल्ल्यानंतर शिहान यांनी त्याची प्रत काढण्याचे ठरवले. मग पत्नी, एका परिचिताच्या कार्यालयातील प्रकाशचित्रप्रत (झेरॉक्स) यंत्र आणि एकच एक टॅक्सी यांच्या साहाय्याने या उभयतांनी ही सात हजार पाने छायांकित केली. शेवटचा कागद नकलून झाल्यानंतर त्यांनी विमानात तीन आसने नोंदवली. दोन स्वत:साठी आणि अन्य एक बॅगांसाठी. विषय इतका संवेदनशील होता की, त्यांना या बॅगा क्षणभरही डोळ्यांआड करायच्या नव्हत्या. न्यू यॉर्कला उतरल्यावर त्यांना थेट कार्यालयात नेण्याची व्यवस्था होती. ‘टाइम्स’चा वकीलवर्गही हजर होता. यात कायदेशीरदृष्टय़ा आक्षेपार्ह काय हे ते पाहणार होते. त्याचा गोषवारा शिहान यांनी तयार केला. तो वाचून वकिलांचे पाय शब्दश: लटलटले. त्यांनी सल्ला दिला : हे छापू नका. अंगाशी येईल.

‘द न्यू यॉर्क टाइम्स’ने तो जसाच्या तसा छापला. मालिकाच केली त्यावर आधारित. अपेक्षेप्रमाणे अध्यक्ष निक्सन यांनी त्यावर दावा ठोकला. देशद्रोहापासून सर्व आरोप ‘टाइम्स’वर लावले गेले. सर्वोच्च न्यायालयाने त्यावर निकाल देताना अध्यक्ष निक्सन व सरकारच्या सर्व आक्षेपांना केराची टोपली दाखवली आणि वर्तमानपत्रांस काहीही प्रसिद्ध करण्यापासून कोणतेही सरकार रोखू शकत नाही, असा ऐतिहासिक निकाल दिला. त्याच्याच आधारे माध्यमस्वातंत्र्यावरील सर्व निर्बंध उठवणारी अत्यंत महत्त्वाची घटनादुरुस्ती त्या देशात झाली. आज ती माध्यमस्वातंत्र्याचा जागतिक मापदंड मानली जाते.

आणि शिहान हे पत्रकारितेचे मापदंड. त्यांना अर्थातच त्याप्रीत्यर्थ पुलित्झरसह अनेक पुरस्कार वाटय़ाला आले. पुढे पुस्तक लिखाणासाठी त्यांनी नोकरी सोडली. पण आधी अपघात आणि नंतर व्याधी यांमुळे त्यांना काही लेखन जमेना. त्यासाठी आगाऊ घेतलेली रक्कमही संपली. तो काळ त्यांच्या परीक्षेचा आणि हलाखीचाही. भाषणे देऊन आणि पत्रकारितेचे अध्यापन करून ते उपजीविका करीत. त्या काळात पत्नी सूजान यांनी त्यांना मोलाची साथ दिली. पुढे सूजान यांनाही लेखनासाठी पुलित्झर मिळाले. नील यांना त्या काळात कंपवातही जडला. पण त्यांच्या कामाचे मोल लक्षात घेऊन अन्य लेखक, संपादकांनी त्यांना लेखनात मदत केली. तरीही त्यांना त्यांनी अनुभवलेले, वर उल्लेखिलेले ‘शायनिंग लाय’ हे अजरामर पुस्तक लिहिण्यास १६ वर्षे लागली. ‘‘ते लिहिताना अमेरिकेच्या या अनावश्यक युद्धात हकनाक मारल्या गेलेल्या हजारो सैनिकांचे चेहरे माझ्या डोळ्यांसमोर येत होते,’’ असे ते लिहितात तेव्हा या युद्धाशी दुरान्वयानेही संबंध नसलेल्या आपल्यासारख्या वाचकांच्या अंगावर काटा आल्याखेरीज राहात नाही. नंतर त्यांची अन्य पुस्तकेही तितकीच गाजली.

असे हे शिहान वयाच्या ८४व्या वर्षी निवर्तले. ‘पेंटागॉन पेपर्स’चा ऐवज आपल्या हाती लागला कसा हे त्यांच्या निधनानंतर उघड झाले. ‘ते सत्य माझ्या निधनानंतरच उघड होईल,’ असा शब्द त्यांनी एल्सबर्ग यांना दिला होता. याबाबतच्या संघर्षांतून तयार झालेल्या ‘फर्स्ट अमेण्डमेंट’ची फळे आज अमेरिकी माध्यमांना मिळत आहेत. जमिनीवरचे नीट समजून घेण्यासाठी पत्रकारितेस आभाळाइतके उंच व्हावे लागते. नील शिहान यांची पत्रकारिता तशी होती. जावेद अख्तर यांच्या एका अप्रतिम कवितेचा आधार घ्यायचा, तर आज हा ‘नीला आसमाँ सो गया..’ ‘लोकसत्ता’तर्फे या निरभ्र पत्रकारितेस आदरांजली.

मराठीतील सर्व अग्रलेख ( Agralekh ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Loksatta editorial on journalist neil sheehan zws

ताज्या बातम्या