हिंसक गुन्हा करणाऱ्यानेच आपल्या गुन्ह्यचे चित्रीकरण लोकांपर्यंत पोहोचवणे, हे साऱ्याच समाजाला बधिरीकरणाकडे नेणारे आहे..
‘कुठे चालला आहे आपला देश,’ हा केवळ मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तीचा सवाल नाही. अभिव्यक्तीपुढील धोक्यांसंदर्भात, सामाजिक सेन्सॉरशिपबाबत बोलताना उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तीच्या मनात जी संतप्त उद्विग्नता दाटून आली, तिने आज आपल्या सर्वानाच ग्रासलेले आहे. राजस्थानातील तथाकथित ‘प्रेम-धर्मयुद्धा’तून झालेल्या क्रूर हत्येने तर आपल्या सर्वानाच मोठा मानसिक धक्का बसला. ती घटना पाहिल्यानंतर सर्वाच्याच काळजात काही तरी कट्कन तुटल्यासारखे झाले. एक भयाची शिरशिरी उठली. पहाटेच्या उजेडाला गडद धुरक्याने हळूहळू गिळत जावे, तसे ते भय. त्याला चेहरा नाही, रूप नाही, अनामिक आहे ते. पण सर्वाच्याच मनाच्या कोपऱ्याला त्याने आता कसर लावलेली आहे. ‘कुठे चालला आहे आपला देश’ हा त्यातूनच उमटलेला उद्गार. तो प्रश्नही नाही. प्रश्न कोणाला तरी विचारायचा असतो, त्याचे उत्तर शोधायचे असते. येथे तर ती उत्तरे आपल्यासमोरच आहेत. पण त्यांना शिवूही शकत नाही आपण. गप्प बसणे हे सर्वात सोयीस्कर. पण तेही करू शकत नाही आपण. कारण अखेर माणूस आहोत आपण. विचार करता येतो आपल्याला. परंतु कधी कधी तोही खुंटतो. स्वतशीही काय बोलावे हेच सुचेनासे होते. जसे ते राजस्थानातील हत्याकांडानंतर आपल्या सर्वाचेच झाले. ती क्रूरता, ती अमानुषता कोठून आली असेल? आतल्या आत, स्वतशीच अस्वस्थ झालो आपण.
स्वतत मनुष्यत्वाच्या खुणा बाळगणाऱ्या कोणीही अस्वस्थ व्हावे असाच तो प्रकार होता. अंगावर येत होते ते क्रौर्य. पण नवीन होते का ते? पहिल्यांदाच घडत होता असा प्रकार या देशात? अशीच नव्हे, तर याहूनही क्रूर हत्याकांडे यापूर्वीही घडलेली आहेत. नेहमीच घडत असतात ती. अमानुषतेचे म्हणावे, तर तेही नवीन नाही. सर्वाच्याच आत असतो एक पशू. तो सुसंस्कृततेच्या साखळ्यांनी आपण जखडून ठेवलेला असतो. पण कधी कधी तोही उसळून येतो वर. झुंडीत सामील होतो आणि मग एखाद्याचा ‘न्याय’ करायला सरसावतो. ती झुंड एखाद्या सामान्य चोराला, गुंडाला चेचून मारून टाकते तेव्हा तेही क्रौर्यच असते, तीही अमानुषताच असते. समाजव्यवस्था सुरळीत आणि ‘मानवी’ पद्धतीने चालावी म्हणून आपणच उभारलेल्या न्यायसंस्थेला धाब्यावर बसवीत आपण एखाद्या गुन्हेगाराला भरचौकात फाशी द्यावी अशी जाहीर मागणी करतो, एखाद्याच्या मृत्यूबद्दल आनंद साजरा करतो, तेव्हा ते आपल्यातल्या आदिम हिंस्रतेचेच प्रदर्शन असते. तेव्हा ही विकृती नवी नाही आपल्याला. परंतु तरीही तिच्या दर्शनाने आपण मुळातून हादरलो आहोत. याचे कारण ते केवळ एका विकृत माथेफिरूचे क्रौर्य नव्हते, त्यामागे एक समाज म्हणून आपण सगळेच उभे होतो. तसे नसते, तर राजसमंद जिल्ह्य़ातल्या कुठल्याशा गावातल्या त्या स्वतला ‘धर्मरक्षक’ म्हणवून घेणाऱ्या विकृत तरुणाला आपला गुन्हा म्हणजे जणू देव, देश आणि धर्मासाठी केलेले शौर्यकृत्य असे वाटले नसते. त्याने त्या कृत्याची ध्वनिचित्रफीत तयार करून ती स्वतच गावभर पसरवली नसती. हातात भ्रमणध्वनीयंत्र आहे, त्यात कॅमेरा आहे, सबब कोणत्याही फुटकळ घटनेची चित्रफीत काढून ती समाजमाध्यमांवर झळकावणे आणि आपले गुन्हेगारी कृत्य समाजासमोर मांडणे यात फरक आहे. त्या हत्येमागील त्याचे नेमके हेतू स्पष्ट झालेले नाहीत. कदाचित ते भलतेच असू शकतात, मात्र त्या चित्रफितीतून तो तथाकथित प्रेम-धर्मयुद्धाचा प्रयत्न करणाऱ्यांची अशीच गत केली जाईल असे धमकावताना दिसतो. याचा अर्थ स्पष्ट आहे. आपण करतो तो गुन्हाच नव्हे, किंबहुना त्या कृत्याला समाजमान्यताच आहे हे त्याने धादांत गृहीत धरलेले आहे. ती त्याची चूक होती का? तसे अजिबात म्हणता येणार नाही. एक समाज म्हणून आपण अशा प्रकारच्या विकृत हिंसाचाराला केव्हाच मान्यता देऊन टाकलेली आहे. कोणत्याही हिंसाचाराचा प्रारंभ हा मनातून होतो, शब्द हा त्याचा पहिला उद्गार असतो. आजच्या समाजमाध्यमी काळात त्या शाब्दिक हिंसेबाबत आपला समाज कमालीचा निर्ढावला आहे. समाजमाध्यमांतून कोणी हत्येची, कोणी मुंडकी उडवण्याची, कोणी बलात्काराची धमकी देतो आणि त्याचीही मौज लुटणारे, त्याचेही समर्थन करणारे लोक बहुसंख्येने असतात हे सध्याचे वास्तव आहे. येथे एक गोष्ट स्पष्ट करायला हवी की, हे होते ते काहींच्या दुष्ट निर्ढावलेपणातून आणि काहींच्या बधिरपणातून.
एका दलिताला सवर्णानी राजरोस मारावे आणि त्या गुन्हेगारांना शिक्षाही होऊ नये आणि न्याय संकल्पनेवरील ती बलात्कारचित्रे सर्वानी डोळे मिटून पाहावीत, हा तो बधिरपणा आहे. एखाद्या धर्माच्या व्यक्तीची धर्मराजकीय कारणातून हत्या व्हावी आणि त्याला राष्ट्रवादाचे वा अराष्ट्रवादाचे आवरण घातले जावे आणि त्या उन्मादात आपण मनाच्या खिडक्याही लावून घ्याव्यात हा तो बधिरपणा आहे. आजूबाजूला चाललेली जातीय, वर्गीय, धार्मिक िहसा हा सगळा जणू एखाद्या व्हिडीओ गेमचा भागच आहे अशा पद्धतीने समाज त्याला प्रतिसाद देताना दिसतो तो हा बधिरपणा आहे. हिंसा इतकी कशी सवयीची झाली आपल्या हे आज आपल्यालाही कळेनासे झाले आहे. परंतु हे काही एक-दोन वर्षांत झालेले नाही. व्हिडीओ गेममधून आलेली ‘मारो-काटो’ची संस्कृती आपण कधीच अंगीकारली होती. त्याच संस्कृतीचा वापर आता आपल्याला बधिर करण्यासाठी केला जात आहे हे आपल्या लक्षातही आले नाही. राजस्थानातील ती चित्रफीत, त्याआधी ऊना येथील दलितांना झालेल्या मारहाणीची चित्रफीत या साऱ्यामागे एक प्रचारभान आहे. या असल्या प्रचाराचे चालू काळातील उदाहरण म्हणून आयसिसनिर्मित चित्रफितींकडे पाहता येईल. शिसारी आणणारी, किळसवाणी हिंसा आयसिसने प्रचाराचे साधन म्हणून वापरली. त्याचबरोबर लहान लहान मुलांच्या डोळ्यांदेखत क्रूर कृत्ये करणे, त्यांच्या हाती सुरे देऊन त्यांना शिरच्छेद करायला लावणे, रक्ताळलेल्या मुंडक्यांचे फुटबॉल त्यांना खेळायला देणे यातून त्या मुलांची मने िहसक बनवणे हे जे आयसिसने केले तो त्यांच्या मनोवैज्ञानिक युद्धाचा भाग होता. हे युद्ध खेळले जात होते ते आतल्या आणि बाहेरच्या लोकांसाठी. आतल्यांचे संवेदनाहीन यंत्रमानव बनविणे, त्यांना बधिर करणे आणि शत्रूंना घाबरविणे हे त्यातून साधले जात होते. त्याचाच कित्ता आता आपल्याकडे गिरवला जात आहे आणि त्या सगळ्याला जातीय, प्रांतीय, धार्मिक अस्मितेपासून राष्ट्रप्रेमापर्यंतचा मुलामा दिला जात आहे. त्या मुलाम्याचा फायदा असा, की कोणत्याही टीकेला, कोणत्याही विरोधाला युद्धाचा- आपल्या जातीविरुद्धच्या, धर्माविरुद्धच्या, राष्ट्राविरुद्धच्या युद्धाचा- रंग देता येतो. एकाच वेळी आतली माणसे बधिर करून बाहेरच्यांना घाबरवण्याचे हे तंत्र. ते एवढे यशस्वी होते, की मग राजस्थानातील त्या विकृताच्या कृत्याचा निषेध करतानाच त्याने ते का केले हे समजावून घ्या, अशी मखलाशी लोक करू लागतात.
या अशा समाजात आपणही कुठे तरी- म्हणजे आत किंवा बाहेर- असतोच. आणि त्यामुळेच समजत नाही आपल्याला की हे चालले काय आहे? पण या प्रश्नातही एक आशेची किनार आहे. असा प्रश्न पडणे म्हणजे आपले पूर्ण बधिरीकरण अद्याप झाले नाही याचीच पावती. ती जपून ठेवायला हवी. त्या बधिरीकरणापासून स्वतला वाचवायला हवे. ती माणूसपणाची पावती आणि पणती जपून ठेवणे हे कठीण आहे आजच्या काळात. पण ते करायला तर हवेच..