शिमॉन पेरेझ यांची आठवण नेतृत्वाच्या शैलीबदलापुरतीच नसून, मध्यपूर्वेच्या समकालीन इतिहासाशीही अतूटपणे जोडला गेलेला हा नेता होता.. राजकीय उचापतखोर अशीच त्यांची संभावना केली जात होती. परंतु राजकीय कारकिर्दीच्याच नव्हे, तर आयुष्याच्याही अखेरच्या पर्वात, वयाच्या ८३व्या वर्षी त्यांनी देशाच्या अध्यक्षपदाची धुरा खांद्यावर घेतली आणि स्वतबरोबरच इस्रायलच्या प्रतिमेलाही त्यांनी झळाळी आणली..

इस्रायलकडे पाहण्याची एक खास नजर भारतीयांनी कमावलेली आहे. इटुकला, पण अरब-मुस्लीम देशांना माती चारणारा, सतत युद्धछायेत जगणारा, लष्करी शिस्तीचा, लढाऊ बाण्याचा देश अशी त्याची प्रतिमा. तिच्या प्रेमात आपण आकंठ बुडालेले असतो. खुद्द इस्रायलमधील अनेक जण त्या प्रतिमेचे कैदी आहेत. या देशाचा जगण्याचा संघर्ष सतत सुरूच आहे. त्यासाठी आपण सतत तयार असलेच पाहिजे ही त्यांची भूमिका. शिमॉन पेरेझ यांचाही त्याला पाठिंबाच होता. किंबहुना आज इस्रायलचे जे लष्करी सामथ्र्य आहे त्याची मुहूर्तमेढ रचणाऱ्यांत पेरेझ यांचा मोठा हातभार होता. इस्रायलच्या संरक्षण मंत्रालयाचे ते पहिले महासंचालक. त्या पदावरून त्यांनी इस्रायलच्या औद्योगिक आणि लष्करी क्षमतेची पायाभरणी केली. अत्यंत गुप्ततेने अण्वस्त्र प्रकल्पाची पायाभरणी केली. असा हा नेता इस्रायलच्या लोकप्रिय प्रतिमेच्या चौकटीत मात्र अजिबात न बसणारा होता. असे असणे हे कोणत्याही नेत्यासाठी मोठे जोखमीचे. त्यापेक्षा लोकानुनय सोपा. ती वाट अंतिमत लोकप्रियतेकडे नेते. पेरेझ यांचे मोठेपण असे की त्यांनी नेहमीच आडवाटेने प्रवास केला. अशा प्रवासाचा शेवट अनेकदा लोकविस्मृतीच्या गर्तेत होत असतो. परंतु पेरेझ यांनी ती रहाटीही मोडली. बुधवारी त्यांनी अखेरचा श्वास घेतला तो लोकांचा आवडता नेता म्हणून. याचे एक कारण म्हणजे त्यांची नेतृत्वाबातची भावना. ‘नेता बनायचे असेल, तर सेवा करा. कारण सद्भावनेतून तुम्ही जे प्राप्त करू शकता, ते सत्ता गाजवण्यातून मिळू शकत नाही,’ असे त्यांनी एका मुलाखतीत सांगितले होते. ते जगलेही तसेच. देशाची सेवा करीत. आता देशसेवा, जनसेवा वगैरे शब्दांना केवळ भाषणातील शाब्दिक बुडबुडे एवढेच मोल राहिले आहे. अशा काळात एखाद्यास देशसेवक म्हणणे हे त्या शब्दाचीच टिंगल केल्यासारखे. परंतु पेरेझ यांचे वैशिष्टय़ असे, त्यांच्या अन्य कोणत्याही भूमिकेबाबत वाद होऊ शकत असला, तरी त्यांच्या देशसेवेवर कोणी आक्षेप घेऊ शकत नव्हते. साठ वर्षांच्या त्यांच्या राजकीय कारकिर्दीबाबत अनेकांची अनेक मते आहेत. इस्रायलबाहेर त्यांचे चाहते अनेक. देशात मात्र त्यांच्या टीकाकारांची संख्या मोठी होती. मधल्या काळात तर राजकीय उचापतखोर अशीच त्यांची संभावना केली जात होती. परंतु राजकीय कारकिर्दीच्याच नव्हे, तर आयुष्याच्याही अखेरच्या पर्वात, वयाच्या ८३ व्या वर्षी त्यांनी देशाच्या अध्यक्षपदाची धुरा खांद्यावर घेतली आणि स्वतबरोबरच इस्रायलच्या प्रतिमेलाही त्यांनी झळाळी आणली. आज संपूर्ण जग त्यांच्याकडे पाहात आहे, ते एक प्रौढविचारी मुत्सद्दी म्हणून. त्यांना आदरांजली वाहताना त्यांचा हा जो कायापालट झाला तो समजून घेणे महत्त्वाचे आहे. कारण त्याचा संबंध केवळ त्यांच्या नेतृत्वाच्या शैलीबदलाशीच नसून, तो मध्यपूर्वेच्या समकालीन इतिहासाशीही अतूटपणे जोडला गेलेला आहे.

इस्रायलनामक राष्ट्राचा जन्म हा मध्यपूर्वेच्या इतिहासातील एक महत्त्वाचा टप्पा. पेरेझ हे त्याचे केवळ साक्षीदारच नव्हते, तर त्या राष्ट्राचा पाळणा हलविण्यातही त्यांचा सहभाग होता. भारतानंतर नऊ महिन्यांनी स्वतंत्र झालेले हे राष्ट्र. त्याआधीची काही वर्षे अत्यंत संघर्षांची होती. इजिप्त, लेबनॉन, सीरिया, जॉर्डन अशा सर्वच शेजाऱ्यांचा या राष्ट्राच्या निर्मितीला विरोध होता. इस्रायलचे पितामह मानले जाणारे डेव्हिड बेन गुरियन यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण ज्यू समाज आपल्या हक्काच्या भूमीसाठी लढत होता. अखेर १४ मे १९४८ या दिवशी इस्रायल हे राष्ट्र स्थापन झाले. त्याच्या दुसऱ्याच दिवशी शेजारी राष्ट्रांनी त्यावर हल्ला चढविला. या काळात पेरेझ यांची भूमिका अत्यंत महत्त्वाची होती. देशाला शस्त्रसज्ज करण्याची जबाबदारी बेन गुरियन यांनी त्यांच्यावर सोपविली होती. इस्रायल हे आज एक स्वतंत्र राष्ट्र म्हणून टिकून आहे. तेव्हा त्याचे काही श्रेय पेरेझ यांच्याकडे निश्चितच जाते. पेरेझ यांनी त्यांच्या ९३ वर्षांच्या आयुष्यात एकदाही लष्करी वर्दी धारण केली नाही. पण त्यांची राजकीय कारकीर्द सुरू झाली ती संरक्षण मंत्रालयातून. पुढे १९५९ मध्ये ते ‘नेसेट’मध्ये – इस्रायलच्या संसदेत – निवडून आले. त्या वेळीही त्यांच्याकडे संरक्षण उपमंत्री म्हणून जबाबदारी सोपविण्यात आली होती. या काळात त्यांच्यावर झालेला आरोपही लक्षणीय आहे. १९५४ मध्ये इजिप्तमधील ब्रिटिश आणि अमेरिकी ठिकाणांमध्ये बॉम्बस्फोट करण्यात आले होते. मुस्लीम ब्रदरहूड या संघटनेने ते केले असे भासवायचे, म्हणजे मग ब्रिटन इजिप्तमधून आपल्या फौजा काढून घेणार नाही, असा तो इस्रायली डाव होता. तो फसला. त्या कारस्थानात पेरेझ यांचा समावेश असल्याचा आरोप झाला आणि त्यावरून १९६५ मध्ये त्यांना राजीनामा द्यावा लागला. तर अशा लष्करी षड्यंत्रात भाग घेणाऱ्या नेत्याची भाषा युद्धखोरीची असणे ही रीत झाली. एके काळी पेरेझ यांनीही इस्रायलव्याप्त पश्चिम किनारपट्टीतील ज्यूंच्या वस्त्या उभारण्याची वकिली केली होती. पण संघर्ष संघर्षांलाच जन्मास घालतो हे लवकरच त्यांच्या लक्षात आले. ‘पॅलेस्टिनी हे आपले जवळचे शेजारी आहेत आणि ते आपले जवळचे मित्र बनू शकतात असा माझा विश्वास आहे,’ हे त्यांचे उद्गार या जाणिवेचेच द्योतक होते आणि याच जाणिवेतून त्यांनी १९९२ साली यासेर अराफत आणि पॅलेस्टिन लिबरेशन ऑर्गनायझेशन ही संघटना यांच्याबरोबर गोपनीय वाटाघाटी केल्या. त्या वेळी ते यित्झाक राबिन मंत्रिमंडळात परराष्ट्रमंत्री होते. त्या वाटाघाटींचे फलित म्हणजे १९९३चा ओस्लो शांतता करार. यासेर अराफत यांना संपूर्ण राष्ट्र जेव्हा दहशतवादी समजत होते. अनेक इस्रायली नागरिकांच्या रक्ताने त्यांचे हात बरबटले आहेत असे म्हणत होते, त्या वेळी हा करार करून पेरेझ यांनी नवा इतिहास घडवला. त्याबद्दल शांततेचे नोबेल त्यांना (अराफत यांच्यासमवेत विभागून) मिळणे साहजिकच होते. ही शांतता इस्रायलमधील तथाकथित राष्ट्रवाद्यांना मानवणे अवघड होते. त्यातून एका ज्यू कट्टरतावाद्याने राबिन यांची हत्या केली. त्याचे पुढचे लक्ष्य पेरेझ होते. राबिन यांच्या हत्येनंतर ते इस्रायलचे पंतप्रधान बनले. त्यानंतर त्यांचे पुढचे लक्ष्य होते अध्यक्षपद. पण त्याच्या प्राप्तीसाठी त्यांना २००७ सालाची वाट पाहावी लागली. हे पद तसे शोभेचेच. पण पेरेझ यांनी त्याला शोभा आणली. इस्रायलमधील आघाडय़ा आणि युत्यांच्या राजकारणात सत्तास्थाने मिळविणारे ‘उचापतखोर’ पेरेझ आणि अध्यक्ष पेरेझ यांच्यात बराच फरक होता. एक जागतिक पातळीवरील मुत्सद्दी म्हणून आता ते ओळखले जात होते. देशाचे नेतृत्व बेंजामिन नेतान्याहू यांच्यासारख्या उजव्या नेत्याच्या हातात असताना, पेरेझ हे इस्रायलचा मवाळ, शांतताप्रिय चेहरा बनले होते.

राबिन यांची हत्या, त्यानंतर मोडलेला ओस्लो करार, २००० मधील इंतिफादा, लेबनॉनबरोबरचे युद्ध, नेतान्याहू यांचा फेरविजय अशा अनेक घटनांनी काळवंडलेला हा काळ. पण तोही पेरेझ यांच्या शांततेवरील श्रद्धेला तडा देऊ शकला नाही. ‘मला मरणाची घाई नाहीये. तो दिवस येईल. त्या वेळी मी मरण्यास विसरणार नाही. पण तोवर मात्र मी माझे आयुष्य वाया घालविणार नाही,’ असे सांगत ते अखेपर्यंत शांततेच्या आवाजाच्या शोधात होते.. इस्रायलमधील शांततेचा आवाज बनून.