शिवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना या दोन्ही पक्षांनी आपापली तोंडे विरुद्ध दिशेला ठेवण्याचा केलेला प्रयत्न हळूहळू गळून पडतो आहे, याचे निदर्शक म्हणून नाशिक महानगरपालिकेतील स्थायी समिती अध्यक्षपदाच्या निवडणुकीतील, या दोघांच्या परस्पर सहकार्याकडे पाहावे लागेल. तेथे मनसेचे रमेश धोंगडे शिवसेनेच्या पाठिंब्याने यशस्वी झाले आहेत. शिवसेनेतून बाहेर पडून राज ठाकरे यांनी नवा पक्ष स्थापन केल्यापासूनच या दोन्ही सेनांच्या सहकार्याच्या स्वरूपाबद्दल सतत चर्चा होत आहेत. बाळासाहेब ठाकरे असेपर्यंत त्यांनीच याबाबत पुढाकार घ्यावा, अशा सूचनाही देऊन झाल्या. त्यांच्या निधनाच्या वेळी आणि उद्धव यांच्यावरील शस्त्रक्रियेच्या वेळी बंधुप्रेमाचे भरते पाहून महाराष्ट्रातील अनेकांचे डोळे पाणावले होते! मागील विधानसभा आणि महानगरपालिकांच्या निवडणुकीत मनसेने मारलेली बाजी पाहून, मराठी मतांचे विभाजन टाळण्याचे कारण पुढे करीत पुन्हा याच चर्चाना ऊत आला. तरीही नाशिकच्या महापालिकेत सत्तास्थापनेच्या वेळी शिवसेनेने मनसेऐवजी दोन्ही काँग्रेसला मदत केली. नुकत्याच झालेल्या स्थायी समिती अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मात्र सेनेने मनसेला पाठिंबा देऊन चित्राच्या आशयाबरोबरच रंगही बदलले. राजकारणात सगळे क्षम्य असते, असे म्हणतात. नाशिकमध्ये ते सिद्ध झाले आहे. विशाल महायुती झाली, तर लोकसभा निवडणुकांमध्ये दोन्ही काँग्रेस पक्षांची कोंडी होऊ शकेल, हे गृहीत धरूनच तर शिवसेनेने मनसेकडे टाळीसाठी हात मागितला होता. त्याची खिल्ली उडवत राज ठाकरे यांनी तो झिडकारला, तरीही नाशिकमध्ये तोच टाळीचा हात हातात घेण्यास मात्र ते मागे हटले नाहीत. कदाचित नाशिकमधील एकत्र येणे ही तेथील स्थानिक गरज होती, असे आता ते म्हणू शकतील. अशा स्थानिक गरजा वेळोवेळी निर्माण होणार आणि त्या प्रत्येक वेळी आपणच काय म्हटले होते, हे सोयिस्कररीत्या कसे विसरले जाणार, याचे प्रात्यक्षिक नाशिकच्या निमित्ताने पाहायला मिळाले. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यासाठी एकत्र येणे हा विनाकारण प्रतिष्ठेचा मुद्दा बनवला जात आहे, असे भाजपला वाटते. पण राज आणि उद्धव संधी मिळेल तेव्हा भाजपचीच कोंडी करतात. भाजपचे नवे प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांनी विशाल महायुतीचे स्वप्न बोलून दाखवताच, उद्धव ठाकरे त्यांच्यावर गरजले. पण पाठोपाठ नाशिकमध्ये मनसेला पाठिंबा देऊन धोबीपछाडही टाकला. या सगळ्या वर्तनाला राजकीय गरज असे विशेषण जोडून मोकळे होण्याचे मार्ग राज आणि उद्धव या दोघांनाही माहीत आहेत. ‘याल तर तुमच्यासह’ ही घोषणा करतानाच, आला नाहीत तर गाडून टाकण्याची भाषा जेव्हा शिवसेना करते आणि ‘खिडकीतून डोळे कसले मारता’ असे राज म्हणतात, तेव्हा मतदारांच्या आणि अन्य राजकीय पक्षांसाठीही तो ‘कात्रजचा घाट’ असतो, हे आता पुरेसे स्पष्ट झाले आहे. ताकाला जाऊन भांडे लपवायचे हा महाराष्ट्रीय विशेष मात्र नाशिकच्या निमित्ताने पुन्हा एकदा पाहायला मिळाला एवढे मात्र खरे!
संग्रहित लेख, दिनांक 23rd Apr 2013 रोजी प्रकाशित
टाळ्यांचे देणे-घेणे
शिवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना या दोन्ही पक्षांनी आपापली तोंडे विरुद्ध दिशेला ठेवण्याचा केलेला प्रयत्न हळूहळू गळून पडतो आहे, याचे निदर्शक म्हणून नाशिक महानगरपालिकेतील स्थायी समिती अध्यक्षपदाच्या निवडणुकीतील, या दोघांच्या परस्पर सहकार्याकडे पाहावे लागेल. तेथे मनसेचे रमेश धोंगडे शिवसेनेच्या पाठिंब्याने यशस्वी झाले आहेत.

First published on: 23-04-2013 at 12:48 IST
मराठीतील सर्व अन्वयार्थ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Alliance