आंशू जैन यांचे जर्मनीच्या सर्वात मोठय़ा डॉइशे बँकेच्या प्रमुखपदी आरोहण कौतुकाचे, म्हणूनच आता अकस्मात पायउतार व्हावे लागणे, हे धक्कादायक ठरते. डॉइशे बँकेतील जैन यांच्या २० वर्षांच्या चमकदार कारकीर्दीला येत्या ३० जूनला पूर्णविराम लागेल. या बँकेच्या खलोटय़ाच्या कामगिरीने कावलेल्या गुंतवणूकदार समुदायाला शांत करण्यासाठी त्यांना बँकेच्या सह-मुख्य कार्यकारी अधिकारीपदाचा राजीनामा देणे भाग पडले. रविवारी त्यांनी राजीनामा पत्र देताच लगोलग त्यांच्या जागी जॉन क्रायन यांच्या नियुक्तीचीही घोषणा झाली. तर या नेतृत्वबदलाचे स्वागत म्हणून सोमवारी फ्रँकफर्ट शेअर बाजारात व्यवहाराच्या प्रारंभीच डॉइशे बँकेच्या समभागाने ८ टक्क्यांनी उसळी घेतली. डॉइशे बँकेला एक जागतिक बँक म्हणून वैभव मिळवून देण्यात ज्यांचे निर्वविाद सर्वश्रेष्ठ योगदान राहिले आहे, त्यांच्या अशा अकाली पदत्यागाने गुंतवणूकदारांना हर्ष व्हावा इतकी त्यांच्याबद्दल वातावरणात प्रतिकूलता होती. जैन यांच्याकडे नेतृत्व असलेल्या ‘इन्व्हेस्टमेंट बँकिंग’ व्यवसाय विभागाच्या कर्तबगारीच्या जोरावरच डॉइशे बँकेला आजची रया प्राप्त झाली. बँकेच्या एकूण व्यवसायात जैन यांच्या या विभागाचे योगदान तब्बल ८५ टक्क्यांपर्यंत वाढले. त्यामुळे २०१२ सालात बँकेचे सह-नेतृत्वही साहजिकच जर्गन फिश्चनसह त्यांच्याकडे आले. पण त्याच विभागातील ताजे गरव्यवहार चव्हाटय़ावर आल्याने आज जैन यांच्या कीर्तीला आणि बँकेच्या प्रतिष्ठेलाही बट्टा लागला. इन्व्हेस्टमेंट बँकिंग हा विभाग बडय़ा उद्योगांना बँकेच्या कर्जाव्यतिरिक्त अन्य किफायती स्रोतातून आवश्यक भांडवल उभारण्यास मदत करतो. या व्यवहारांच्या पूर्ततेसाठी इन्व्हेस्टमेंट बँका मोबदला म्हणून शुल्क वसूल करतात. जितका मोठा अर्थव्यवहार तितकी अधिक शुल्ककमाई असल्याने पारंपरिक बँकिंग व्यवसायापेक्षा हे तिचे एक अंगच प्रसंगी अधिक मालदार बनते. जसे आंशू जैन आणि डॉइशे बँकेबाबत घडताना दिसले. विदेशी चलन व्यवहारात विनिमय दरात तिकडमबाजी करीत गरव्यवहाराच्या प्रकरणी ज्याला युरोपाच्या वित्तीय आसमंतात लायबोर घोटाळा या नावाने ओळखले जाते, त्यात डॉइशे बँकेच्या याच विभागाचे नाव गोवले गेले. विविध बँकांची मोट बांधून संगनमताने घडवून आलेल्या या घोटाळ्यात अमेरिकी व ब्रिटिश नियामकांकडून मोठा आíथक दंड आणि नाचक्कीस बँकेला सामोरे जावे लागले. अंतर्गत चौकशीत जरी आंशू जैन यांनी व्यक्तिगत निर्दोषत्व मिळविले असले, तरी तेवढे बँकेच्या गुंतवणूकदार आणि कर्मचारी युनियनसाठी पुरेसे नव्हते. नियामकांचा दबाव, गुंतवणूकदारांचा त्रागा आणि कर्मचाऱ्यांमधील असंतोषाला शांत करताना, जैन आणि फिश्चन यांचा बळी क्रमप्राप्त ठरला. जैन यांचा या गरव्यवहारात प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष सहभाग होता वा नव्हता, हा प्रश्न त्यांच्या दृष्टीने महत्त्वाचा नव्हता. प्रत्यक्षात त्यांचे नेतृत्व अपेक्षित फलित आणि परतावा देत नव्हते, हेच त्यांच्या लेखी महत्त्वाचे. आपण यातून धडा काय घेणार? आपल्या बँकिंग व्यवस्थेत बरे म्हणावे असे काही घडताना दिसत नाही. आपल्याकडच्या राष्ट्रीयीकृत बँका म्हणजे सत्ताधारी राजकारण्यांना मिळालेले आंदणच जणू आहे. तर युरोपातील सजग गुंतवणूकदारांनी बँकेच्या वाईट कामगिरीला जबाबदार म्हणून व्यवस्थापनाला आणि बँकेच्या म्होरक्यांविरुद्ध यशस्वी बंड केले! स्टँडर्ड चार्टर्ड बँकेनंतरची ही अलीकडची दुसरी घटना आहे.



