कमालीची अस्वच्छता आणि त्यामुळे निर्माण होणारे विषाणू आणि जिवाणू, हे भारतीय समाज आणि ‘आरोग्य’ व्यवस्थेचे कायमस्वरूपी लक्षण झाले आहे. अशा अनारोग्यकारी वातावरणात जगण्याची लढाई करणाऱ्या बालकांना पुरेसे पोषणही मिळू शकत नसल्यामुळे या विषाणूंना सामोरे जाण्यासाठी आवश्यक असणारी प्रतिबंधक ताकदही या बालकांच्या अंगी असत नाही. परिणामी ती बालके विनाकारण मृत्यूच्या खाईत लोटली जातात. बिहारमधील मेंदुज्वराच्या प्रादुर्भावाने हे याही वर्षी सिद्ध केले आहे. स्वातंत्र्यानंतरच्या काळात सार्वजनिक आरोग्याबाबत दाखवलेला कमालीचा निष्काळजीपणा आणि उदासीनता यामुळे आजही देशातील बहुतेक भागांत आरोग्य सेवेचे तीनतेरा वाजले आहेत. मेंदुज्वरासारख्या रोगावर हमखास इलाज करणारी औषधे तयार करण्यात आजवर फार मोठय़ा प्रमाणावर प्रयत्नच झाले नाहीत, हे केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांच्या कृतीमुळे सिद्ध होते. त्यांनी आता सलग दुसऱ्या वर्षीही अशी बालके मृत पावत असल्याचे लक्षात आल्यानंतर आता बालमृत्यूंबाबत तपासणी करण्यासाठी अत्याधुनिक संशोधन केंद्र स्थापन करण्याचा निर्णय घेतला! एखाद्या राज्यात एवढय़ा मोठय़ा प्रमाणावर बालमृत्यू होत असताना तेथील आरोग्यमंत्री मंगल पांडे हे भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्याची माहिती घेण्यात दंग होते, ही तर अधिकच लाजिरवाणी गोष्ट. सरकारी पातळीवर अशा दुर्दैवी घटनांबाबत असलेली असंवेदनशीलता यामुळे पुन्हा एकदा चव्हाटय़ावर आली आहे. बिहारमधील मुले लिची हे फळ खातात. त्या फळातील रसायने डासांमुळे पसरणाऱ्या मेंदुज्वरासाठी पोषक असतात. त्यात परिसरातील अस्वच्छतेमुळे फैलावणारे रोगजंतू आणि वैद्यकीय सेवेची होत असलेली परवड या सगळ्या वाईट गोष्टी बिहारमध्ये एकत्र झाल्या आणि हे भयानक मृत्युसत्र सुरू झाले. डासनिर्मितीला पूरक वातावरण संपूर्ण देशभर सर्वत्र असल्यामुळे डासांची उत्पत्ती आणि त्याद्वारे पसरणारे विविध रोग हे भारतीयांच्या जगण्याचे अविभाज्य अंग बनले आहे. बिहारमध्ये याहून वेगळे चित्र असण्याचे कारण नाही. तेथील रुग्णालयांमध्ये भरती झालेल्या या मुलांवर उपचार करण्यासाठी यंत्रणा पुरेशी सज्ज नव्हती आणि त्याचबरोबर अशा मेंदुज्वरावर कोणती औषधयोजना करायला हवी, याचीही माहिती नव्हती. परिणामी जुजबी पातळीवरील उपचार सुरू झाले. तरीही त्यातून सुमारे ८० बालके वाचली. या रोगावर औषध तयार करणे ही संपूर्ण देशाचीच गरज आहे. पण त्यासाठी जे संशोधन व्हायला हवे, ते येथे होत नाही. सरकारी पातळीवर त्यासाठी जे प्रोत्साहन द्यायला हवे, ते दिले जात नाही. याचे कारण या मुलांचा आक्रोश सरकारला हलवू शकत नाही. शहरी भागात डेंगी आणि स्वाइन फ्लू यांसारख्या रोगांची लागण होताच जो हाहाकार उडतो, तसा ग्रामीण भागातील मेंदुज्वराने उडत नाही. त्यामुळे अशा घटना सातत्याने घडत राहतात. बिहारमध्येच गेल्या वर्षीही मेंदुज्वराने काही बालके दगावली होती. तरीही कोणत्याही पातळीवर त्याची गंभीर दखल घेतली गेली नाही. त्याचा परिणाम या वर्षी किती तरी अधिक पटींनी झाला. बिहारमध्ये हा ‘चमकी बुखार’ ही नित्याची बाब बनते आणि तरीही त्याकडे दुर्लक्ष करण्याएवढे निर्ढावलेपण सरकारी पातळीवर असू शकते, हे भारतातील बालकांचे भागधेय बनले आहे. पटकी, देवी, नारू यांसारख्या रोगांवर नियंत्रण मिळवून ते समूळ नष्ट करण्यात भारताला यश आले, हे खरे, परंतु ज्या रोगाने मोठय़ा प्रमाणात मनुष्यहानी होते, अशा मेंदुज्वरासारख्या अन्य रोगांवरही तातडीने औषधे निर्माण करणे ही सामान्यांसाठी अत्यावश्यक बाब आहे.
संग्रहित लेख, दिनांक 19th Jun 2019 रोजी प्रकाशित
निर्ढावलेला ‘मेंदुज्वर’
सरकारी पातळीवर अशा दुर्दैवी घटनांबाबत असलेली असंवेदनशीलता यामुळे पुन्हा एकदा चव्हाटय़ावर आली आहे.
Written by लोकसत्ता टीम

First published on: 19-06-2019 at 00:04 IST
मराठीतील सर्व अन्वयार्थ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Death toll due to acute encephalitis syndrome in bihar