सोमवारी, ९ मार्च रोजी मेक्सिकोमधल्या हजारो, लाखो स्त्रिया अचानक रस्त्यारस्त्यांवरून, सार्वजनिक जीवनातून गायबच झाल्या. जणू काही सगळीकडे पुरुषांचेच राज्य असावे, जगात जणू स्त्रिया अस्तित्वातच नसाव्यात.. प्रत्यक्षात ते होते, मेक्सिकन स्त्रियांनी केलेले आगळेवेगळे आंदोलन. २५ वर्षांच्या इनग्रीड इसामेला या तरुणीच्या तिच्या जोडीदाराने केलेल्या निर्घृण हत्येनंतर तिथे होणाऱ्या स्त्रीविरोधी गुन्ह्य़ांच्या विरोधात स्त्रियांनी जणू एल्गार पुकारला आहे. मेक्सिकोमध्ये रोज जवळपास १० स्त्रियांची हत्या होते. या हत्या म्हणजे स्त्रियांचा जाणूनबुजून केला जाणारा वंशविच्छेद आहे, असे म्हणत मेक्सिकन स्त्रियांनी सार्वजनिक जीवनातून गायब होऊन स्त्रियांशिवायचे जग कसे असेल याची झलकच दाखवून दिली. अर्थात एवढय़ावरच हे आंदोलन थांबले नाही. इनग्रीडच्या विटंबना झालेल्या मृतदेहाची छायाचित्रे गुन्हेवैद्यक कर्मचाऱ्यांनी स्थानिक प्रसारमाध्यमांमध्ये प्रसिद्ध केली होती. तिची तशी भयंकर आठवण जपली जाऊ नये, तिच्या जगण्याचा सन्मान व्हावा यासाठी तिच्या हसत्याखेळत्या छायाचित्रांबरोबरच वेगवेगळी फुले, पक्षी, प्राणी, सूर्योदय, सूर्यास्त या सगळ्यांची सुंदर छायाचित्रं, व्हिडीओ यांना इनग्रीडचे नाव देऊन ते समाजमाध्यमांमधून प्रसिद्ध केले गेले. आता कुणीही इनग्रीड इसामेलाच्या नावाने नेटवर शोध घेतला तर तिच्यासह ही सुंदर छायाचित्रे मिळतील. या आगळ्यावेगळ्या, कल्पक आंदोलनामुळे सगळ्या जगाचे लक्ष मेक्सिकोकडे, पर्यायाने स्त्रियांविरोधात होणाऱ्या हिंसेकडे वेधले गेले आहे. अर्थात कौटुंबिक अत्याचार, लैंगिक अत्याचार, कामाच्या ठिकाणी होणारी छळणूक, कामाच्या ठिकाणी होणारा लैंगिक छळ अशा वेगवेगळ्या प्रकारांना जगभरातल्या स्त्रियांना सातत्याने तोंड द्यावे लागते. काही देशांमधल्या स्त्रिया या सगळ्याला तोंड देण्याबाबत ‘दुर्दैवी’ ठरतात. कारण त्यांना सामाजिक पाठबळ मिळत नाही, तर काही देशांमधल्या स्त्रियांना त्यांच्यावरच्या अन्यायाविरोधात दाद मागण्यासाठी कायद्याचे तरी पाठबळ मिळते. अर्थात त्यासाठीचा मानसिक, शारीरिक संघर्ष त्यांचा त्यांनाच करावा लागतो. उदाहरण आहे आपल्याच देशातले. इंदूरमध्ये पंजाब अ‍ॅण्ड सिंध बँकेत प्रमुख व्यवस्थापक म्हणून काम करणाऱ्या एका महिलेची जबलपूर जिल्ह्य़ात सारस्वा शाखेत बदली करण्यात आली. तिच्या शाखेतील भ्रष्टाचार आणि अनियमितता याबाबत तिने वेळोवेळी अहवाल दिले होते. तसेच तिने तिच्या वरिष्ठ अधिकाऱ्याविरोधात लैंगिक छळणुकीचीही सातत्याने तक्रार केली होती. पण या सगळ्यात हितसंबंध दुखावले गेलेल्यांनी तिच्या तक्रारीची दखल घेण्याऐवजी तिची बदली केली. या अन्याय्य बदलीविरोधात संबंधित महिला न्यायालयात गेली. उच्च न्यायालयाने तिची तक्रार दाखल करून घेतली आणि तिची बदली रद्द करण्याचे आदेश दिले. त्याविरुद्ध अधिकारी सर्वोच्च न्यायालयात गेले तेव्हा न्यायालयाने सुनावले : संबंधित स्त्रीने बँकेतील अनियमिततेवर बोट ठेवले, याकडे सुडाच्या भावनेने बघितले गेले आणि तिने गप्प बसावे यासाठी तिची वरच्या श्रेणीतील जागेवर बदली केली गेली. कामाच्या ठिकाणी होणारा लैंगिक छळ (प्रतिबंध, मनाई, निराकरण) २०१३ हा कायदा तसेच राज्यघटनेच्या अनुच्छेद १४, १५ आणि २१ अन्वये स्त्रियांना समानतेचा, सन्मानाने जगण्याचा, उदरनिर्वाहासाठी कोणत्याही व्यवसायाचा अवलंब करण्याचा ‘मूलभूत अधिकार’ आहे. संबंधित स्त्रीची अशा रीतीने बदली करणे ही तिला दिलेली चुकीची वागणूक होती. तिला नुकसानभरपाई देण्याचे आदेशही न्यायालयाने दिले आहेत. हिंसाचाराचा निषेध म्हणून एका दिवसासाठी का होईना जगातून गायब होऊन दाखवण्यासारखे कल्पक आंदोलन असो, आपल्या सखीच्या स्मृती निसर्गातल्या सुंदर घटकांच्या छायाचित्रांतून जपण्याचा प्रयत्न असो, की अन्यायाविरोधातली कार्यालयीन आणि न्यायालयीन लढाई हिकमतीने लढण्याची ताकद दाखवणे असो, हे जग स्त्रियांनीच अधिक जिवंत, रसरशीत, जगण्यालायक केले आहे.