एकेकाळी ‘व्हर्नाक्युलर फायनल’ या परीक्षेला फार महत्त्व असे. ही परीक्षा म्हणजे आताची सातवी. या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्यांना तेवढय़ा ज्ञानावर नोकऱ्या वगैरेही मिळत असत. काळानुसार व्ह. फा. या परीक्षेची जागा अकरावीच्या परीक्षेने घेतली. मॅट्रिक असे त्याचे सामान्य नाम होते. या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्यांना तेव्हा आकाश ठेंगणे होत असे. दहावीच्या परीक्षेने तेवढे नाही, तरी काहीसे महत्त्व मिळवले, पण ते बारावीच्या परीक्षेबरोबर विभागून. दहावीनंतर विद्याशाखा ठरवायची असल्याने तिचे महत्त्व अधिक तर बारावीच्या गुणांवर वैद्यकीय आणि अभियांत्रिकीचे प्रवेश अवलंबून असल्याने तिचे नाक जरा जास्तच वर असे. नंतरच्या काळात या दोन्ही व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी प्रवेशपूर्व परीक्षा घेण्याची पद्धत सुरू झाल्याने बारावीपेक्षा प्रवेशपूर्व परीक्षेत किती गुण मिळाले, हेच महत्त्वाचे ठरू लागले. आजच्या काळात बारावी उत्तीर्ण झाल्यामुळे नोकरी मिळणे शक्य होत नाही. किमान पदवीधारक ही आजही आवश्यक अट ठरते. त्या पाश्र्वभूमीवर बारावीच्या निकालाची महत्ता हळूहळू कमी होत जाणे स्वाभाविकच म्हटले पाहिजे. त्यातच दंत आणि वैद्यकीय अभ्यासक्रमांसाठी नीट या प्रवेशपूर्व परीक्षेसाठी केंद्रीय परीक्षा मंडळाचा अभ्यासक्रम लागू झाल्याने, ते अधिक स्पष्टपणे जाणवू लागले आहे. यंदाच्या बारावीच्या निकालात मागील वर्षांपेक्षा मोठी घट झाली आहे. यंदा ८६.६० टक्के निकाल लागला आहे आणि त्यातही विशेष आणि प्रथम श्रेणीतील गुणवत्ताधारकांची संख्या कमी झाली आहे. मागील वर्षी लागलेला ९१ टक्के निकाल पाहता, यंदा त्याहून अधिक विद्यार्थी उत्तीर्ण करून आनंद साजरा करण्याचे धैर्य परीक्षा मंडळाने दाखवले नाही, हे योग्य झाले. मात्र कनिष्ठ ते मध्यम श्रेणीतील सर्वाधिक विद्यार्थ्यांच्या भविष्याची चिंता करण्यासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे, हे लक्षात घेऊन, त्यांना जीवनात उभे राहण्यासाठी किमान कौशल्ये विकसित करण्याच्या अनेकविध संधी निर्माण करण्यासाठी शासनाने पुढाकार घ्यायला हवा. ४० आणि ८० टक्के मिळवलेल्या विद्यार्थ्यांना एकाच तागडीत न तोलता त्यांच्यासाठी वेगवेगळय़ा छोटय़ा आणि उपयुक्त अभ्यासक्रमांची आखणी करणे अतिशय आवश्यक आहे. विविध कौशल्यांची गुणवत्ता मिळवणारे विद्यार्थी विकासासाठी पूरक ठरणारे असतात, हे ध्यानात ठेवून शिक्षणाची पुढील दिशा ठरवण्याशिवाय आता पर्याय नाही. पुढील वर्षांपासून व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी वेगळी परीक्षा घेण्याची कल्पना शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी पुढे आणली आहे. तिचे स्वागत करतानाच सीबीएसईच्या शाळांची संख्या वाढते आहे, हे लक्षात घेऊन आपल्या सर्वच शाळांमध्ये पहिलीपासूनच काठिण्यपातळी वाढवत नेणे अधिक उचित ठरणारे आहे, हे लक्षात घेतले पाहिजे. सगळेच विद्यार्थी डॉक्टर वा इंजिनीअर होणार नाहीत हे खरे, मात्र कोणत्याही नोकरीत किंवा व्यवसायात आवश्यक असणारी पात्रता मिळवण्यासाठी पूर्वप्राथमिकपासून ते पदवीपर्यंतच्या अभ्यासक्रमातून किमान गुणवत्तेचे शिंपण होणे आवश्यक आहे, हे मान्य करायला हवे. ज्यांना व्यावसायिक अभ्यासक्रमांना जायचे आहे, त्यांच्यासाठी वेगळी परीक्षा घेण्याने अन्य विद्यार्थ्यांवर अन्याय होणार नाही, हे बरोबर. पण जे विद्यार्थी आठवीपर्यंत अनुत्तीर्णच होत नाहीत, त्यांना नेमके काय आणि किती समजले आहे, हे कळवण्याची अन्य पद्धत तरी शोधायला हवी. बारावीच्या परीक्षेत जे विद्यार्थी उत्तम गुणांनी उत्तीर्ण झाले आहेत, त्यांचे अभिनंदन करत असतानाच, ज्यांना ती पायरी गाठता आली नाही, त्यांनी खचून न जाता नवी कौशल्ये आत्मसात करण्याची तयारी करण्याचे आवाहन करणेही उचित ठरणारे आहे.
संग्रहित लेख, दिनांक 26th May 2016 रोजी प्रकाशित
शिक्षणाची दिशा
एकेकाळी ‘व्हर्नाक्युलर फायनल’ या परीक्षेला फार महत्त्व असे. ही परीक्षा म्हणजे आताची सातवी.
Written by लोकसत्ता टीम

First published on: 26-05-2016 at 02:48 IST
मराठीतील सर्व अन्वयार्थ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Vernacular final exam