खूप वर्षांपूर्वी.. म्हणजे पत्रकारितेत येऊन चार-पाच वर्षही झाली नव्हती तेव्हा.. हॅरॉल्ड इव्हान्स यांचं ‘गुड टाइम्स, बॅड टाइम्स’ हे पुस्तक वाचलं होतं. भारी काहीतरी वाटलं होतं ते वाचून. हे इव्हान्स हे लंडनच्या ‘द टाइम्स’च्या रविवार आवृत्तीचे संपादक होते. टाइम्स हे वर्तमानपत्र होतं- म्हणजे ते वाचनीय मजकुरासाठी ओळखलं जात होतं- तेव्हाचा हा काळ. वर्तमानपत्राला प्रेक्षणीयता यायची होती. नंतर रूपर्ट मर्डॉक यांनी टाइम्सच्या मालकीत घुसखोरी सुरू केली. त्यावर ताबा मिळवलाच. पाठोपाठ वर्तमानपत्राच्या छापील पुण्याईला घरघर लागली. या काळात इव्हान्स यांनी टाइम्सचा राजीनामा दिला. त्यांच्या आत्मचरित्रात हे सगळं वाचल्याचं आठवतंय. पण ते आत्मचरित्र पत्रकारितेतल्या आणखी दोन प्रकरणांसाठी लक्षात राहिलं.
एक म्हणजे थॅलिडोमाईड. आणि दुसरं प्रोफ्युमो. इव्हान्स यांना ही दोन्ही प्रकरणं बातमीदार या नात्यानं हाताळायला मिळाली. पहिल्यात गर्भवती महिलांसाठी त्या वेळी नुकत्याच आलेल्या थॅलिडोमाईड या औषधाचे प्रत्यक्षात गर्भावर कसे भयंकर परिणाम होतात, त्याची बातमी होती. हे औषध गर्भार महिलांना ज्या उलटय़ा वगैरे होतात त्यासाठी दिलं जात होतं. पण त्यामुळे पोटातल्या बाळाचे हात किंवा पायच झडून जात असत. ही बातमी इव्हान्स यांच्या नेतृत्वाखाली संडे टाइम्सनं पान १ वर दणदणीत छापल्यानंतर मोठाच गदारोळ उडाला होता त्या वेळी इंग्लंडात.
दुसरं होतं हे प्रोफ्युमो प्रकरण. ते पुस्तक वाचायच्या आधी हे प्रोफ्युमो हे एखाद्या सुगंधाचं – म्हणजे परफ्यूम वगैरे – नाव असावं असा समज होता. जेव्हा हे प्रकरण नक्की काय आहे ते कळलं.. तेव्हा बसलेला धक्का अजूनही आठवतोय. हे प्रकरण मुळात १९६३ सालातलं. म्हणजे आमच्या पिढीतल्या अनेकांचा त्या वेळी जन्मही झाला नव्हता. इव्हान्स यांनी लिहिल्यावर या प्रकरणाची साद्यंत कहाणी समजून आली.
तर हे प्रोफ्युमो हे एक बडं प्रस्थ होतं. जॉन प्रोफ्युमो हे त्यांचं पूर्ण नाव. ब्रिटिश सरकारचे युद्ध खात्याचे मंत्री होते ते. त्या वेळी पंतप्रधान होते हॅरॉल्ड मॅक्मिलन. त्यांच्या हाताखाली मंत्रिपदी असताना या प्रोफ्युमो यांचे ख्रिस्तीन किलर या अवघ्या १९ वर्षीय तरुणीशी संबंध आहेत, अशी बातमी प्रसृत झाली. ही ख्रिस्तीन दिसायला लावण्यवती म्हणावी अशी. मॉडेल व्हायचं होतं तिला. उच्चभ्रूंच्या वर्तुळात ऊठबस होती. हे असं केल्यानं लवकर संधी मिळते असा समज झाला असावा तिचा. असेलही. पण ती या प्रोफ्युमो यांच्या प्रेमात पडली. या प्रकरणाचा बभ्रा झाल्यावर सुरुवातीला अर्थातच प्रोफ्युमो यांनी हे नाकारलं. पण माध्यमांनी पिच्छा सोडला नाही. त्यांनी या दोघांची कुंडलीच मांडली. एक दिवस असा गेला नाही त्या वेळी की या दोघांविषयी काही छापून आलं नाही.
अखेर हा रेटा असह्य झाला. प्रोफ्युमो यांनी पार्लमेंटमध्ये कबुली दिली, हो आमचे संबंध आहेत. प्रोफ्युमो यांना राजीनामा द्यावा लागला.
यात नवं ते काय? ब्रिटिश राजघराण्यांपासून ते अनेक उमरावांपर्यंत तशी अनेकांची अंगवस्त्र वगैरे असायचीच त्या वेळी. त्यामुळे इथपर्यंत तरी तसं यात काही जगावेगळं म्हणावं असं नव्हतं. पण मामला तिथेच थांबला नाही.
या ख्रिस्तीन हिचे त्याच वेळी कॅप्टन येवगेनी इव्हानोव्ह या रशियाच्या लंडनस्थित नौदल अधिकाऱ्याशीसुद्धा संबंध आहेत असं उघड झालं. म्हणजे दिवसा प्रोफ्युमो आणि रात्री इव्हानोव्ह- किंवा कधी उलटही असेल.. असा तिचा उद्योग सुरू होता. माध्यमांनी त्यातून वेगळीच शंका व्यक्त करायला सुरुवात केली.
देशाच्या सुरक्षेला धोका निर्माण झाल्याचं त्यांचं म्हणणं. ही तरुणी एकाच वेळी ब्रिटिश युद्धमंत्री आणि रशियाचा नौदलाधिकारी यांच्याशी शय्यासोबत करीत असेल तर नक्कीच इकडची माहिती तिकडे गेलीच असणार.. असा त्यांचा युक्तिवाद. तो साधारही होता त्या वेळी. कारण जगात हेरगिरीसाठी असा महिलांचा वापर करायची प्रथा होतीच. आणि त्यात या प्रकरणात तर थेट तेव्हाचा सोव्हिएत रशिया गुंतलेला. ते शीत युद्धाचे कढत दिवस. त्यामुळे हे उघड झाल्यावर काय घडलं असेल याची कल्पना करता येईल. या विषयावरनं वातावरण इतकं तापलं, इतकं तापलं की त्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात पंतप्रधान मॅक्मिलन यांच्याच सरकारचा त्यात बळी गेला. त्यांना राजीनामा द्यावा लागलाच. पण पुढच्याच वर्षीच्या निवडणुकीत त्यांचा उमराव पक्षही पराभूत झाला.
पण तरी प्रोफ्युमो प्रकरण काही शांत होण्याची चिन्हं नव्हती. पुढे प्रश्न असा आला की ही तरुणी प्रोफ्युमो किंवा इव्हानोव्ह यांच्यापर्यंत पोहोचली तरी कशी? या प्रश्नाच्या उत्तरात एक नाव समोर आलं – डॉक्टर स्टिफन वॉर्ड. वास्तविक त्या वेळी.. आणि आजही.. लंडनमधला सोहो परिसर हा अशा उद्योगांसाठी प्रसिद्ध आहे. धनिक, अमीर उमराव किंवा साधे हौशेगवशेही या परिसरात नग्नतेचं कलात्मक दर्शन घेण्यासाठी उघडपणे जात असतात. अशाच कोणत्या तरी भेटीत प्रोफ्युमो यांच्या जिवाला ख्रिस्तीननं घोर लावला असं मानता आलं असतं. पण तसं नव्हतं. या वॉर्ड यांनी तिचा परिचय प्रोफ्युमो आणि इव्हानोव्ह यांच्याशी करून दिला होता. हे वॉर्ड उच्चभ्रूंचे वैद्यक सल्लागारसदृश होते. जोपर्यंत हे सगळं सुरळीत सुरू होतं तोपर्यंत काही प्रश्न आला नाही. पण हेरगिरीचाच संशय व्यक्त झाल्यानं वॉर्डपण संकटात आले. त्यांच्याही चौकशीची मागणी पुढे आली.
तशी चौकशी झाली. हे वॉर्ड रशियन हेरयंत्रणा केजीबीचे हस्तक आहेत किंवा काय.. वगैरे तपासणी सुरू झाली. पहिल्या पातळीवर तसं काही नसल्याचं सिद्ध झालं. पण तरीही हा संशय व्यक्त होतच होता. त्यामुळे पुन्हा चौकशी. तीत हे वॉर्ड अपेक्षेपेक्षा जास्त श्रीमंत असल्याचं आढळलं. मग निष्कर्ष हा की ते या अशा तरुणी धनाढय़ांना पुरवून पैसे कमावतात. सरकारी अहवालात ते अशा गैरमार्गानं संपत्ती कमावल्याच्या आरोपात दोषी आढळतील, अशी चिन्हं दिसू लागली. वॉर्ड यांना ते सहन होईना. त्यांनी आत्महत्या केली.
आता ख्रिस्तीन एकटीच राहिली. पुढची लढाई तिला एकटीलाच लढायची होती. एव्हाना ती प्रचंड लोकप्रिय झाली होती. तिचं मादक सौंदर्य हा लंडनमधल्या पुरुषी समाजात चघळायचा विषय होता. त्यात तिचं ते विख्यात छायाचित्र. विवस्त्रावस्थेत ती खुर्चीच्या पाठीला पोट लावून बसलीये असं. ख्रिस्तीनची ओळखच बनलं ते छायाचित्र.
या चित्रानं आणि प्रतिमेनं आणि प्रोफ्युमो.. इव्हानोव्ह प्रकरणानं तिला आयुष्यातनं उठवलं. पुढचं सगळं आयुष्य ख्रिस्तीन देशद्रोहाच्या आरोपाचा शिक्का पुसण्यात लढली. काळ पुढे जाताना शारीर सौंदर्यही घेऊन जात असतो. ख्रिस्तीन कशी अपवाद असेल? नंतर नंतर तर तिला कोणीच विचारेना.
ते वाचल्यापासून ख्रिस्तीन डोक्यात होती. तिचं असं का झालं असेल, ती अशी का वागली असेल.. हे प्रश्न होते. पुढे काही वर्ष गेली. लंडनमध्ये सहज फिरताना एक पुस्तक हाती लागलं. सिक्रेट्स अॅण्ड लाईज. त्यावर फोटो होता. चेहरा ओळखीचा वाटला म्हणून उचललं. तर ते आत्मचरित्र निघालं ख्रिस्तीनचं. खरं तर असं काही तिनं लिहिल्याचं कुठे वाचलंही नव्हतं. उच्चभ्रूंनी तिला नाकारलेलं होतं. म्हणूनही असेल पण अभिजनांनी तिच्या पुस्तकाकडेही काणाडोळाच केला. झपाटय़ानं ते पुस्तक त्या वेळी वाचलं. त्यातला प्रांजळपणा अंगावर आला.
लहानपणीच ख्रिस्तीनचे वडील गेले. घरची गरिबी. आईनं दुसरं लग्न केलं. तर सावत्र बापानं वयाच्या अवघ्या १२ व्या वर्षी तिच्या देहाचा चोळामोळा केला. नंतर ते नेहमीचंच झालं. तिला त्यानं वेश्या केलं नाही इतकंच. पण तिचं सौंदर्य हेच त्याच्या जगण्याचं साधन बनलं. सतराव्या वर्षी तिला दिवस गेले तर पोट पाडायचं कसं हेही तिला माहीत नव्हतं. पेन वापरून तिनं गर्भाला इजा करायचा प्रयत्न केला. झाल्या झाल्या ते मूल मेलं. मग ख्रिस्तीन पळून गेली लंडनला. धक्के खात खात स्टिफन वॉर्ड यांच्यापर्यंत पोहोचली. वॉर्ड यांना उच्चभ्रूंच्या अंगणात शिरायचं होतं. ख्रिस्तीनचा देह हा तिकडे नेणारा जवळचा मार्ग होता. एव्हाना ख्रिस्तीनची आणखी दोन प्रकरणं झाली होती. तिला याचं काहीच वाटलं नाही? आत्मचरित्रात ती म्हणते : कसं वाटणार? जन्मापासून हेच तर सहन करीत आलीये. तेव्हा पुरुष म्हटलं की असंच वागणार हेच मनावर ठसलंय. त्यामुळे ते गैर कधी वाटलंच नाही.
आता तिची कहाणी आठवायचं कारण म्हणजे गेल्या आठवडय़ात ख्रिस्तीन किलर गेली. तिच्या मुलानं तिचा मृत्यू झाल्याचं जाहीर केलं. माझ्या आईच्या संघर्षांचा मला अभिमानच आहे.. असं तो या वेळच्या निवेदनात म्हणाला.
या एका वाक्यानं तिच्या आत्म्याला शांती मिळाली असेल. डॉ. वॉर्ड यांनी आत्महत्या केली. प्रोफ्युमो यांना पुढे सर किताबानं गौरवलं गेलं. पण ख्रिस्तीनच्या नशिबी फक्त हे एवढंच वाक्य.
गिरीश कुबेर
girish.kuber@expressindia.com
@girishkuber