एका बीतूनच वृक्ष तयार होतो पण तो वृक्ष बीपासून अभिन्न असल्यानं त्याला तो ज्या बीतून उत्पन्न झाला तिचा शोध घेता येत नाही, तो घ्यायचा तर त्याला स्वतत शिरावं लागेल. अर्थात आपल्यातील जीवनशक्तीचा, जीवनरसाचा स्रोत त्याला न्याहाळावा लागेल. एका बीतूनच जी जीवनशक्ती गवसली तीच आज आपल्या रूपात विस्तारली आहे, हे जाणावं लागेल. अगदी त्याचप्रमाणे ज्या परमात्म्यातून जीव निर्माण झाला त्या परमात्म्याला शोधायचं तर जिवालाही स्वततच उतरावं लागेल. हे स्वतत उतरणं म्हणजे नेमकं काय, हे पाहू पण त्याचबरोबर एक प्रश्नही मनात उत्पन्न होऊ शकतो, त्याचा आधी विचार करू. बी आणि वृक्ष अभिन्न आहेत, हे आपल्याला दिसतं पण परमात्मा आणि जीव अभिन्न आहेत, हे स्वीकारणं कठीण जातं. कारण परमात्मा जर सच्चिदानंदस्वरूप असेल तर त्याचाच अंश असलेला जीव दुखी का? परमात्मा स्वतंत्र, मुक्त, सर्वशक्तिमान, पूर्ण असताना त्याचाच अंश असलेला जीव हा परतंत्र, बंधनात जखडलेला, शक्तीची मर्यादा असलेला आणि अपूर्ण कसा, असाही मार्मीक प्रश्न उपस्थित होऊ शकतो. मग जीव त्या परमात्म्याचा अंश आहे, असं कसं मानावं? याचं उत्तर या प्रश्नातच दडलेलं आहे. आपणच स्वतशी विचार करा. परमात्मा स्वतंत्र आहे, जीव परतंत्र आहे पण जिवाला परतंत्रता आवडत नाही! परमात्मा मुक्त आहे, पण जीव अनंत बंधनांत आहे, पण जिवाला बंधन आवडत नाही! परमात्मा पूर्ण आहे, जीव अपूर्ण आहे. पण जिवाला अपूर्णता आवडत नाही! परमात्मा सर्वशक्तिमान आहे, जिवाच्या शक्तिला मर्यादा आहेत, पण जिवाला शक्तीहीनता आवडत नाही!! आता आवड-नावड केव्हा असते? एखाद्याला अमका पदार्थ आवडत नाही आणि अमका आवडतो हे तेव्हाच घडू शकते जेव्हा दोन्ही पदार्थ त्याने चाखले असतात. त्यामुळे जिवाला परतंत्रता आवडत नसेल आणि स्वातंत्र्य आवडत असेल तर परमस्वातंत्र्याचा अनुभव त्याला कधी ना कधी असलाच पाहिजे. जिवाला मुक्ती आवडत असेल आणि बंधन आवडत नसेल तर मुक्तीचा अनुभव त्याला कधी ना कधी असलाच पाहिजे. जिवाला पूूर्णता आवडत असेल आणि अपूर्णता आवडत नसेल तर पूर्णतेचा अनुभव त्याला आधी असलाच पाहिजे. त्यामुळेच जे परमतत्त्व परमस्वतंत्र आहे, परमपूर्ण आहे, परममुक्त आहे, परमशक्तीमान आहे त्याच तत्त्वाचा अंश असलेल्या जिवाची त्याच गोष्टींकडे ओढ आहे त्याचीच त्याला आवड आहे. आज अंश स्वतला परमात्म्यापासून वेगळा मानतो नव्हे क्षुद्र अशी आपली ओळख आणि अस्तित्व जपण्यासाठी तो धडपडतो. माया आणि भ्रमाने बरबरटलेलं त्याचं हे जगणं तोवरच अपूर्ण, बद्ध, परतंत्र राहाणार जोवर तो परमात्म्याचा शोध घेत नाही, आपल्या मूळ स्वरूपाकडे वळत नाही, परमात्म्याशी ऐक्य साधत नाही.
संग्रहित लेख, दिनांक 11th Nov 2012 रोजी प्रकाशित
अरूपाचे रूप सत्यमार्गदर्शक २४९ : अंश
एका बीतूनच वृक्ष तयार होतो पण तो वृक्ष बीपासून अभिन्न असल्यानं त्याला तो ज्या बीतून उत्पन्न झाला तिचा शोध घेता येत नाही, तो घ्यायचा तर त्याला स्वतत शिरावं लागेल.
First published on: 11-11-2012 at 11:49 IST
मराठीतील सर्व अरूपाचे रूप सत्यमार्गदर्शक बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Aroopache roop satyamargadarshak religion sampadakiya god