|| अभिजीत ताम्हणे

चित्रकर्ती अमृता शेर-गिल यांच्यावरील नव्या चरित्रपर पुस्तकाविषयी..

भारतीय चित्रकलेच्या इतिहासात अजरामर झालेली हंगेरियन-भारतीय चित्रकर्ती अमृता शेर-गिल (१९१३-१९४१) हिच्याविषयी इंग्रजीत तीन-चार पुस्तकं उपलब्ध आहेत. मराठीतसुद्धा, रमेशचंद्र पाटकर यांनी अमृताच्या ढीगभर पत्रांतून अगदी नेमकी आणि महत्त्वाचीच पत्रं निवडून या पत्रसंग्रहाचा केलेला अनुवाद पुस्तकरूपानं उपलब्ध आहे, त्या पत्रांसोबत पाटकरांनी विस्तृत टिपाही लिहिल्यामुळे अमृता शेर-गिलचं चरित्र वाचकाला समजतंच. हे एक मराठी पुस्तक वगळता, बहुतेक इंग्रजी पुस्तकं ही ‘सर्व प्रकारच्या वाचकांसाठी’ या प्रकारातली नव्हती. चित्रकलेत रस असेल, तरच ती वाचण्यात अर्थ आहे, असा काहीसा बाज याआधीच्या इंग्रजी पुस्तकांचा होता. या पाश्र्वभूमीवर, प्रामुख्यानं किशोरवयीन वाचकांसाठी पुस्तकं लिहिणाऱ्या अनिता वच्छराजानी यांनी अमृता शेर-गिलची गोष्ट सांगणारं पुस्तक लिहिलं आहे.

अमृताची गोष्ट सांगायलाच हवी अशी आहे.. पहिल्या महायुद्धाच्या काळात जन्मलेली ही लहानगी, दुसऱ्या महायुद्धापूर्वीच पोटाच्या विकारानं वारली. अवघ्या २८ वर्षांचं तिचं आयुष्य. पण हंगेरी, फ्रान्स आणि भारत हे तिन्ही देश आपलेसे करून तिनं त्या त्या देशांत, निरनिराळ्या शैलींत चित्रं काढली. चित्रांचा हा प्रवास अमृतासाठी ‘स्वत:चा आवाज- स्वत:ची शैली’ शोधण्याचा प्रयत्न होता. परंतु हा प्रयत्न त्या काळात तिनं केला, जेव्हा भारतीय चित्रकलेत मरगळ आली होती. अजिंठा लेण्यांमधल्या तसंच केरळच्या देवळांमधल्या भित्तिचित्रांच्या परंपरेची वैशिष्टय़ं सांभाळून आधुनिक चित्रविषय कसे रंगवता येतील, हे अमृता शेर-गिलनं अक्षरश: ‘शोधून काढलं’! म्हणून भारतीय-आधुनिक चित्रशैलीचा ‘शोध’ लावणाऱ्यांत अमृताचं नाव अजरामर झालं. जवळपास ८० वर्षांपूर्वी मनस्वी जगणारी अमृता, ही आजच्या मुलींनाही आपलीच वाटेल. तिच्या आयुष्याला प्रचंड वेग होता आणि ही गती तिच्याच स्वभावामुळे मिळालेली होती. ती कशी, हे वाचण्यासाठी अमृताची गोष्ट समजायलाच हवी!

ही गोष्ट अनिता वच्छराजानी यांनी सर्वासाठी सांगितलेली आहे, हे विशेष. आठवी-नववीतल्या मुलामुलींपासून ‘चित्रकला समजून घेणं राहूनच गेलं’ अशी खंत करणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांपर्यंत कुणीही हे पुस्तक वाचलं, तरी त्यांना नक्की काहीतरी मिळेल. अगदी स्वत:ला चित्रकलेतलं सगळं कळतं अशा ताठय़ात वावरणाऱ्यांनाही, ‘अमृताचे वडील शीख होते, मग ते हंगेरीला कसे गेले? त्यांना तिथलीच बायको मिळाली, पण आधी लग्न आणि मग स्थलांतर, असं कसं काय?’ यांसारख्या प्रश्नांची उत्तरं मिळतील. पण बाकी पुस्तकात, अमृतानं हत्ती कुठे रंगवले? तिनं पहुडलेल्या बायकांची जी चित्रं केली आहेत ती कधी, कुठे आणि कोणत्या विचारानं केली आहेत? या छोटय़ा छोटय़ा शंकांचं निरसन करत, भरपूर तपशील भरत गोष्ट सांगितलेली आहे. सोबत ‘बुडापेस्ट शहर कुठेय?’ इथपासून ते ‘बशोली शैलीची लघुचित्रं म्हणजे काय?’ इथवरच्या नानापरींच्या प्रश्नांना उत्तरं म्हणून माहिती देण्याचा विडाच या पुस्तकानं उचललाय!

या पुस्तकामध्ये अमृता शेर-गिल यांची ६५ चित्रं आहेत आणि जवळपास प्रत्येक चित्राबद्दल अगदी माहीतगारीनं केलेलं लिखाणही आहे. एक मात्र खरं की, अनिता वच्छराजानी या कुणी मोठय़ा चित्रसमीक्षक नाहीत आणि त्यांची सर्व संदर्भ-साधनं दुय्यमच आहेत. परंतु गोष्टीरूप चरित्र कसं सांगावं, याचा पक्का अंदाज त्यांना आहे. चरित्रविषयाशी अत्यंत प्रामाणिक राहून (दुय्यम का होईना) साधनांचा कसून अभ्यास व पुरेपूर वापर त्यांनी केला आहे.

म्हणजे थोडक्यात असं की, अमृताची आणि तिच्या चित्रांची जी गोष्ट आजवर फक्त अभ्यासकांनाच माहीत होती, ती आता सर्वाना सहज कळावी यासाठी या पुस्तकाचा उपयोग होतो. पुस्तकात कल्याणी गणपति यांची बोधचित्रं (इलस्ट्रेशन) आहेत. कल्याणी यांची चित्र-पद्धत युरोपीय – विशेषत: फ्रेंच – बोधचित्रांकडे झुकणारी आहे. यामुळे पुस्तक वाचताना एक मजेदार अनुभव येतो.. ‘भारतीयतेचा शोध’ घेणाऱ्या एका महान चित्रकर्तीचं माणूसपण आपण जाणून घेत असताना, आता मात्र आपण ‘ग्लोबल’ जगात वावरतो आहोत आणि सर्व चित्रभाषा ‘आपल्या’च आहेत याची आठवण कुणीतरी मधाळ आवाजात विनम्रपणे करून द्यावी, तसं काम ही बोधचित्रं करतात.

परदेशांत पर्यटक म्हणून गेलो असता एखादं चित्रप्रदर्शन पाहिलं आणि त्या चित्रकाराबद्दल सबकुछ माहीत करून घेऊनच बाहेर पडलो, असा अनुभव बऱ्याच जणांना आला असेल.. तस्सा अनुभव देणारं हे पुस्तक आहे. त्याची किंमतसुद्धा, परदेशांतल्या प्रदर्शनांचं तिकीट जसं आठ- दहा युरो किंवा बारा-तेरा डॉलर असतं, तशीच आहे!

  • ‘अमृता शेर-गिल : रिबेल विथ अ पेन्टब्रश’
  • लेखिका : अनिता वच्छराजानी
  • चित्रे व मांडणी : कल्याणी गणपति
  • प्रकाशक : हार्पर कॉलिन्स
  • पृष्ठे : १८४, किंमत : ६९९ रुपये

abhijit.tamhane@expressindia.com