हरदहळ्ळी दोड्डेगौडा देवेगौडा अर्थात एच. डी. देवेगौडा हे  स्वतंत्र भारताचे बारावे पंतप्रधान होते. त्यांना कार्यकाळ अगदी कमी- उण्यापुऱ्या पाऊण वर्षाचा- मिळाला आणि या काळातले त्यांचे कर्तृत्व आज कुणालाही चटकन आठवणार नाही, परंतु  आघाडी सरकार चालवणारे, सर्वांना सांभाळून घेण्याचा प्रयत्न करणारे हे व्यक्तिमत्व कर्नाटकच्या मातीत मुरलेले आणि ग्रामीण भारताशी नाळ जुळलेले होते, असे म्हटले जाई. त्यांच्या  विषयी त्यांच्या कार्यकाळातच दिल्लीच्या कुणा ‘ओम बुक्स’ने एक पुस्तक झटपट छापून प्रकाशित केले होते खरे, पण दिल्लीच्या सत्तावर्तुळातील लोकांची अशी झटपट चरित्रे परस्पर प्रकाशित होणे हे अजिबात कौतुकाचे नसते त्यामुळे त्या पुस्तकाचा ठावठिकाणा आज कुणालाच नसणे स्वाभाविक. याउलट पेन्ग्विन रँडम हाउस इंडिया या नावाजलेल्या प्रकाशन संस्थेने ज्या पुस्तकाची घोषणा अलीकडेच केली, त्या ‘फरोज इन अ फील्ड- द अनएक्स्प्लोअर्ड लाइफ ऑफ एच. डी देवेगौडा’ या पुस्तकाविषयी माध्यमवर्तुळात आतापासूनच कुतूहल आहे, असे दिसते.

पुस्तकाचे प्रकाशन होण्यास अद्याप दहाबारा दिवस बाकी आहेत. त्यापूर्वीच काही इंग्रजी दैनिकांनी  या पुस्तकात काय आहे, याचा कानोसा घेणाऱ्या बातम्या दिल्या.  यापैकी पहिली बातमी अशी की, १९९६ मध्ये डाव्या आघाडीचे नेते आणि पश्चिम बंगालचे तत्कालीन मुख्यमंत्री ज्योती बसू यांनी पंतप्रधान पद स्वीकारण्यास नकार दिल्यामुळे जेव्हा देवेगौडा यांना विचारणा झाली, तेव्हा ‘सर, मलाही तुमच्यासारखीच मुख्यमंत्री म्हणून दीर्घ कारकीर्द  करायची आहे’ अशा शब्दांत दिल्ली टाळून बेंगळूरुमध्येच राहण्याचा प्रयत्न देवेगौडांनी केला होता! १९९४ मध्ये कर्नाटकचे मुख्यमंत्रीपद महत्प्रयासानेच त्यांना मिळाले होते. ते टिकवण्याऐवजी देवेगौडा पंतप्रधान झाले.

या पुस्तकाचे लेखक सुगाता श्रीनिवासराजु हे पत्रकारितेचा दीर्घ अनुभव असलेले आणि दक्षिणेकडील राज्यांच्या राजकारणाशी परिचित. त्यांनी देवेगौडांच्या कारकीर्दीत नवीन काही झाले का, याचा कसून शोध घेतला आहे. त्यातूनच, ‘जम्मू-काश्मीर धुमसत असताना, राजौरी हवाई तळापासून राजौरी गावापर्यंत उघड्या जीपमधून प्रवास करणारे देवेगौडा हे एकमेव पंतप्रधान असावेत’ असे त्यांनी म्हटले आहे. योगायोगाने, १९९६ सालची ती तारीख होती ‘पाच ऑगस्ट’(पुढे याच दिवशी २०१९ मध्ये अनुच्छेद ३७० निष्प्रभ करण्यात आला)! लेफ्टनंट जनरल कंवलजीत सिंग धिल्लन हे प्रथेप्रमाणे पंतप्रधानांच्या स्वागतासाठी आले होते. ‘तुम्ही जीप चालवणार असाल, तर उघड्या जीपमधून मी तुमच्यासह यायला तयार आहे’ असे देवेगौडा म्हणाले, त्यांनी तसे काही करू नये असे सुचवण्याचा प्रयत्न ले. ज. धिल्लन यांनी वारंवार केला तरीही ते ऐकेनात. अखेर ‘काहीही होणार नाही’ हे देवेगौडांचे शब्द खरे ठरले  आणि हा ताफा राजौरी गावात पोहोचला!

काही बातम्यांनुसार, देवेगौडा यांनी नंतरचे पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांना लिहिलेल्या पत्रांतील काही मजकूर या पुस्तकात समाविष्ट आहे. यापैकी काही पत्रे २००२ मध्ये, गोध्रा येथील रेल्वेडबा जळितकांडानंतर गुजरातमध्ये उसळलेल्या दंगलीबाबतही आहेत. त्या पत्रांमधील मजकुराची वाच्यता आजवर झालेली नाही.

देवेगौडा यांच्याविषयी कन्नडिगांना आदर वा प्रेम असणे स्वाभाविकच. पण उर्वरित देशात त्यांची प्रतिमा तशी नाही. देवेगौडांवरील ‘साधनेय शिखरारोहणा’ हे गुरुदत्त प्रधान आणि सी. नागण्णा यांनी कन्नडमध्ये लिहिलेले पुस्तक आणि आगामी इंग्रजी पुस्तक यांच्या मुखपृष्ठांमधील छायाचित्रांमध्ये जो फरक दिसतो आहे, तोच देवेगौडांच्या कर्नाटकातील व बाहेरील प्रतिमेतही आहे. ती प्रतिमा इंग्रजी पुस्तकामुळे बदलेल का?