शिक्षकदिनानिमित्त, डॉ. राधाकृष्णन् यांच्या ग्रंथसंपदेची व ग्रंथप्रेमाची ही ओळख..

मी तेव्हा अवघ्या सोळा वर्षांचा होतो आणि तत्कालीन अकरावीची (शालान्त) परीक्षा देऊन महाविद्यालयीन शिक्षणाची वाट चोखाळण्याची स्वप्नं बघत होतो. १९६२ सालचा तो एप्रिल महिना होता. डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन् यांची उपराष्ट्रपतिपदाची दुसरी कारकीर्द संपत आली होती, कारण १३ मे १९५२ पासून ते त्या पदावर गेली दहा वष्रे विराजमान होते. डॉ. राधाकृष्णन् यांना मी पत्र पाठवून केवळ पंधरा-वीस दिवस झाले असतील-नसतील तोच मला प्रत्यक्ष त्यांच्याच स्वाक्षरीनं त्यांचं टंकलिखित पत्र प्राप्त झालं. माझा आनंद गगनात मावेनासा झाला. पत्र अगदी त्रोटक असलं तरी त्याखालची दस्तुरखुद्द उपराष्ट्रपतींची स्वाक्षरी माझ्यासाठी फार महत्त्वाची होती. त्या पत्रातलं एक वाक्य हे लाखमोलाचा संदेश होता. ते वाक्य होतं, ‘गहन अध्ययनही सफलता की कुँजी है’.

गहन अध्ययन आणि आयुष्याची सफलता यांचा संबंध काय, हे समजण्यासाठीही डॉ. राधाकृष्णन् यांच्या आयुष्याकडे पाहावं लागेल. तत्त्वज्ञान हा विषय त्यांनी पदवी परीक्षेसाठी घेतला तो त्या विषयाची त्यांना विशेष आवड होती म्हणून मुळीच नव्हे! त्यांच्या एका जवळच्या नातेवाईकानं, त्याच्याकडे असलेला या विषयाच्या पाठय़पुस्तकांचा संपूर्ण संच राधाकृष्णन् यांना फुकट दिला होता. तो चाळल्यानंतर या विषयाबद्दलचं कुतूहल जागं झालं आणि त्यांनी याच विषयात प्रावीण्य मिळविण्याचा ठाम निश्चय केला. पुढे तत्त्वज्ञानातली मास्टर्स डिग्री मिळविण्यासाठी त्यांनी संशोधनात्मक प्रबंध लिहिला ज्याचं शीर्षक होतं, ‘एथिक्स ऑफ वेदान्त अ‍ॅण्ड इटस् मेटॅफिजिकल प्री-सपोझिशन्स’. हा प्रबंध तपासण्यासाठी मद्रास विद्यापीठानं डॉ. आल्फ्रेड हॉग या इंग्रज तज्ज्ञाची नियुक्ती केली होती. त्यांनी राधाकृष्णन् यांचा प्रबंध एम.ए. पदवीसाठी स्वीकृत तर केलाच, परंतु त्यातले विचार जगभर पोहोचावेत म्हणून विद्यापीठातर्फे तो १९०८ सालीच प्रकाशितदेखील केला. त्या वेळी राधाकृष्णन् अवघ्या वीस वर्षांचे होते. मद्रास प्रेसिडेन्सी कॉलेजमधली लेक्चररपदाची नोकरी त्यांना चालून आली. अशा रीतीनं राधाकृष्णन् यांच्या शिक्षकी कारकीर्दीस प्रारंभ झाला. तत्त्वज्ञानाचा गाढा अभ्यास, इंग्रजी भाषेवरील अफाट प्रभुत्व आणि कठीण विषय सोपा करून सांगण्याचं कसब या गुणवैशिष्टय़ांमुळे एक आदर्श शिक्षक असा त्यांचा लौकिक झाला. कलकत्ता विद्यापीठानं त्यांना ‘प्राध्यापक’ म्हणून आमंत्रित केलं. तिथं असताना त्यांनी गुरुदेव रवीन्द्रनाथ टागोरांच्या सर्वस्पर्शी लेखनातून प्रतििबबित होत असलेल्या मानवतावादी दृष्टिकोनाची उकल करणारा ग्रंथ लिहिला. हिन्दू धर्मशास्त्राप्रमाणेच जैन आणि बौद्ध धर्माच्या तत्त्वज्ञानाचा साकल्यानं परामर्श घेणारा त्यांचा ग्रंथ ‘इंडियन फिलॉसॉफी’ या शीर्षकानं दोन जाडजूड खंडांमध्ये प्रकाशित झाला. १९३१ ते १९३६ या पाच वर्षांत त्यांनी आंध्र विद्यापीठाचं उपकुलगुरूपद भूषविलं. बनारस हिन्दू विश्वविद्यालयाचे संस्थापक आणि पहिले उपकुलगुरू पंडित मदन मोहन मालवीय यांनी स्वत: अनेक वष्रे सांभाळलेलं उपकुलगुरूपद सोडून, त्या जागी डॉ. राधाकृष्णन् यांची नियुक्ती केली. डॉ. राधाकृष्णन् यांनी १९३९ ते ४८ अशी नऊ वष्रे ते पद सांभाळलं. पुढे पॅरिसमध्ये मुख्यालय असलेल्या युनेस्कोच्या शिक्षण विभागात त्यांना ‘चेअरमन- युनिव्हर्सिटी एज्युकेशन’ हे मानाचं पद देऊ करण्यात आलं. त्याच दरम्यान ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीनं त्यांना हिन्दू तत्त्वज्ञान शिकविण्यासाठी मँचेस्टर कॉलेजमध्ये पाचारण केलं. त्या वास्तव्यातील त्यांचा एक महत्त्वाचा ग्रंथ म्हणजे पौर्वात्य व पाश्चात्य तत्त्वज्ञानाचा तुलनात्मक अभ्यास मांडणारा ‘ईस्टर्न रिलीजन अ‍ॅण्ड वेस्टर्न एथिक्स’. या व इतर अनेक ग्रंथांमुळे बटरड्र रसेलसारखे विचारवंत डॉ. राधाकृष्णन् यांचे चाहते झाले. कादंबरीकार व आधुनिक युरोपीय इतिहासाचे तज्ज्ञ एच. जी. वेल्स हे तर परममित्र झाले.

डॉ. राधाकृष्णन् हे राष्ट्रपती असतानाचीच एक गोष्ट, त्यांच्या ग्रंथप्रेमाचा प्रत्यय देणारी.. त्यांचा मुक्काम लंडनला होता. एके दिवशी ते सेंट्रल लंडनमधून जात असताना त्यांनी अचानक आपल्या ड्रायव्हरला गाडीची दिशा बदलून ती बॉस्वेल स्ट्रीटला न्यायला सांगितलं. ड्रायव्हर संभ्रमात पडला. राष्ट्रपती महोदयांना ठरावीक वेळी ठरावीकच मार्गानं आणि ठरावीक ठिकाणीच नेण्याचे लेखी आदेश होते आणि त्या आदेशांचं तंतोतंत पालन करणं त्याला बंधनकारक होतं. तरीही डॉ. राधाकृष्णन् यांची इच्छा इतकी प्रबळ होती की तिच्यापुढे त्याचं चाललंच नाही. त्यानं आपली गाडी थेट बॉस्वेल स्ट्रीटवरच्या ‘अ‍ॅलन अ‍ॅण्ड अनविन पब्लिशग हाऊस’समोर उभी केली. इंग्लंडमधली ती एक जगद्विख्यात प्रकाशन संस्था होती, जिथं जाऊन डॉ. राधाकृष्णन् यांना ग्रंथांच्या दुनियेत रममाण व्हायचं होतं. जॉर्ज अ‍ॅलन आणि स्टॅनले अनविन या दोघा बुद्धिमान इंग्रजांनी स्थापन केलेल्या या संस्थेनं बटर्रण्ड रसेल आणि डॉ. राधाकृष्णन् या दोन समकालीन विचारवंतांचे ग्रंथ प्रकाशित करून जगभर वितरित केले होते. लंडनमधल्या त्या प्रकाशन संस्थेच्या वास्तूमध्ये असलेली ग्रंथसंपदा इतकी अफाट आहे की, ती केवळ पाहूनदेखील मन थक्क होतं हे मी स्वानुभवानं सांगू शकतो. डॉ. राधाकृष्णन् हे तर ‘ग्रंथचि अमुच्या जिवाचे जीवन’ असं मानणाऱ्यांपकी एक. त्यातून या प्रकाशन संस्थेचे मालक जॉर्ज अ‍ॅलन यांच्याशी त्यांचे स्नेहसंबंध होते. त्यामुळे शिष्टाचार वगरे गोष्टी क्षणभर बाजूला ठेवून ते सरळ त्या वास्तूत शिरले, मिस्टर अ‍ॅलन यांना अगदी अनौपचारिक रीतीनं भेटले आणि बराच काळ ग्रंथांच्या दुनियेत स्वत:ला हरवून गेले!

 

– प्रवीण कारखानीस

pravinkarkhanis@yahoo.com