क्युबाचे नेते फिडेल कॅस्ट्रो आणि साहित्याच्या नोबेल पारितोषिकाचे मानकरी गॅब्रिएल गार्सिआ माख्रेज यांची मैत्री नेमकी कशी होती, याचे गूढ अनेकांना वाटत असे.. कॅस्ट्रो अलीकडेच दिवंगत झाले, तर माख्रेज २०१४ सालच्या एप्रिलमध्ये कालवश झाले. त्यानंतर हे कुतूहल पुन्हा दिसू लागले. या दोघांच्या मैत्रीबद्दल ‘फिडेल अॅण्ड गाबो’ हे पुस्तक दोघांच्याही हयातीतच आणि दोघांशीही बोलून मगच (२००९ मध्ये ) लिहिले गेले आहे, त्या पुस्तकाकडे आता पुन्हा लक्ष वेधले गेले! अँजेल इस्टेबान आणि स्टिफनी पानिचेली यांनी लिहिलेले हे पुस्तक २००४ साली पहिल्यांदा स्पॅनिश भाषेत प्रकाशित झाले. पुढे २०१३ पर्यंत इंग्रजी आणि फ्रेंचमध्येही त्याची भाषांतरे झाली आणि तिन्ही भाषांत मिळून २१ आवृत्त्या, जगभरच्या ७३ देशांत पोहोचल्या. मात्र या आवृत्त्या निघाल्या, त्या विविध देशांच्या प्रकाशनविषयक नियमांमुळे आणि स्थानिक प्रकाशक आवश्यक असल्यामुळे. एरवी स्पॅनिशखेरीज, निव्वळ खपामुळे आवृत्ती काढावी लागली, असे झाले नाही.
या पुस्तकाचे आंतरराष्ट्रीय स्तरावर स्वागत झाले, पण ते जेमतेम प्रमाणातच. पुढे हे पुस्तक विस्मृतीतच गेले. असे का झाले, याचे एक कारण पुस्तकातच सापडेल. हे पुस्तक खूप तपशील असलेल्या वर्णनांनी भरले असले, तरी त्यातून हाती काहीच ‘ठोस’ लागत नाही.. ‘माख्रेज कॅस्ट्रोसमर्थक होता, पण कॅस्ट्रोचा अंकित नव्हता’ अशा अर्थाचे जे प्रतिपादन अख्ख्या पुस्तकातून दिसेल, ते दक्षिण अमेरिकेबाहेरील देशांतील वाचकांना मोघम वाटते!
उदाहरणार्थ, माख्रेजचे प्रचंड घर त्याला फिडेल कॅस्ट्रो यांनीच बहाल केले होते, पण या दोघांची मैत्री देणारा-घेणारा या स्तरावर कधीच नव्हती; कॅस्ट्रोला माख्रेजचे समर्थन इतके की, हर्बटरे पॅडिला या लेखकावर ‘कॅस्ट्रोद्वेष म्हणजे देशद्रोहच’ अशा थाटात खटला भरला गेला, तेव्हा जनमत आणि सारे साहित्यिक पॅडिलाच्या बाजूने असूनही माख्रेजने मात्र कचखाऊपणा केला; मात्र माख्रेजच्या साहित्यकृतींना त्याच्या कॅस्ट्रो-प्रेमाची बाधा कधीच झालेली नाही.. अशी काहीशी परस्परविरोधी वाटणारी विधाने या पुस्तकात असल्यामुळे ते वैतागवाणेही वाटेल. अमेरिकादी देशांनी कॅस्ट्रोला निव्वळ ‘हुकूमशहा’च मानले, त्यामुळे लेखकांनी अशा एकाधिकारशाहीच्या विरोधात असायला हवे ही अपेक्षा काही वाचकांची असू शकते. पण असा कथित ‘हुकूमशहा’ आणि लेखक यांचे संबंध किती गुंतागुंतीचे असू शकतात, याचा अभ्यास करू इच्छिणाऱ्यांसाठी यापुढेही हे पुस्तक म्हणजे मोठाच ठेवा ठरणार आहे!