एकोणिसाव्या शतकामध्ये पोस्टकार्ड मिळविण्यासाठी इंग्लंडमध्ये तयार झालेल्या ‘व्हेंडिंग मशीन’चे रूपांतर कालांतराने खाद्यवस्तू आणि पेय मिळविण्यासाठी झाले. गाणी ऐकविणारे ‘ज्युकबॉक्स’ही त्याचीच आवृत्ती होती. आपल्याकडे आर. के. नारायण यांनी लिहिलेल्या ‘वेंडर ऑफ स्वीट’ कादंबरीमध्ये अमेरिकेत राहून आलेले एक पात्र कथा लिहून देणारे मशीन बनविण्याच्या मृगजळी व्यवसायात बुडालेले होते. ही कादंबरी बऱ्यापैकी विस्मृतीत गेली असली, तरी त्यातील कथा लिहिण्याच्या यंत्राची संकल्पना मात्र फ्रान्समध्ये प्रत्यक्षात अवतरली आहे. ग्रनोब्ल नामक शहरात जगातील पहिले ‘कथा व्हेंडिंग मशीन’ तयार करण्यात आले आहे. ज्याद्वारे एक ते पाच मिनिटांत वाचता येईल अशी लोकप्रिय लघुकथा कुणाही वाचनोत्सुक व्यक्तीला पूर्णपणे मोफत वाचता येते. तंत्रज्ञानाच्या माऱ्याने वाचन हरवत चाललेली पिढी वाचनाकडे ओढली जावी या हेतूने या शहराने ‘शॉर्ट एडिशन’ या कंपनीशी करार करून रेल्वे- बस स्थानके, हॉटेल्स आणि कित्येक सार्वजनिक गर्दीच्या जागांमध्ये या कथायंत्रांची आखणी केली. लोकांचा सार्वजनिक ठिकाणी वाया जाणारा वेळ वाचनानंदात परावर्तित करण्यासाठी ही कंपनी आणि शहर प्रशासन हजारो लघुकथांची पेरणी करणार आहे. या मशीनचे स्वागत शहरामधील नागरिकांनी मोठय़ा प्रमाणावर केले. फ्रान्समध्ये नुकताच दहशतवादी हल्ला झाला, त्या आठवडय़ामध्येच या कथायंत्रांची जोडणी होत होती. ख्रिस्तोफर सिब्यूड या ‘शॉर्ट एडिशन’ कंपनीच्या संस्थापकाच्या डोक्यात कथेचे व्हेंडिंग मशीन तयार करण्याची चमत्कारिक कल्पना आली. चॉकलेट आणि कॅण्डी व्हेंिडग मशीनमधून काढले जात असताना, या जागी कथा वाचायला दिल्या तर लोक काय करतील, या कुतूहलातून त्यांनी हा प्रयोग राबवला. गेल्या दोन-तीन महिन्यांमध्ये या लघुकथा वाचणाऱ्यांची संख्या टिपेला पोहोचली. पार्कजवळ, इस्पितळाजवळ, बस- रेल्वे स्थानकांजवळ या व्हेंडिंग मशीनची प्रचंड चलती सुरू आहे. लोकांना आपल्या वाचनआवडीची जाणीव या कथायंत्रांनी करून दिली. सदासर्वकाळ मोबाइलमध्ये तोंड खुपसून असलेली पिढी या यंत्रकथांत विरंगुळा शोधू लागली अन् छापील पुस्तकांकडे वळू लागली आहे. कथाप्रेमी ख्रिस्तोफर यांच्या कंपनीतर्फे मोबाइल अ‍ॅप्सद्वारे नवनव्या कथा पुरविल्या जातात. त्यांचा वाचनालयासमान प्रचंड मोठा सभासद वर्गही आहे. फावल्या वेळातही लोकांना चांगले वाचायला मिळावे या हेतूने ‘स्टोरी व्हेंडिंग मशीन’ करण्याच्या या कल्पकतेचे आता युरोपभर आणि अमेरिकेतही स्वागत होते आहे. गेले शतकभर भारतीय भाषांत समीक्षकांपासून खुद्द कथालेखकांनीही दुय्यम ठरविलेल्या कथाप्रकाराची मोठय़ा प्रमाणावर वाताहत होत असताना या दूर दिसणाऱ्या कथाप्रेमाच्या गोष्टी आपल्याकडे साजऱ्या वाटतील. पण प्रादेशिक भाषांमधील वाचनप्रवाह अस्तंगत होण्यापासून वाचविण्यासाठी असे प्रयोग लवकरच घेण्याची वेळ आली आहे.