समुद्री कासवांच्या संवर्धनाच्या भारतीय प्रयत्नांचा आढावा घेतानाच, सागरी अन्नसाखळीत कासवांचं महत्त्व पटवून देणारं पुस्तक..

एखाद्या प्राण्याच्या संवर्धनाचा अभ्यासपूर्ण इतिहास लिहिला जाणे ही आपल्याकडे अतिशय दुर्मीळ गोष्ट आहे; परंतु ‘फ्रॉम सूप टु सुपरस्टार’ हे पुस्तक याला सुखद असा अपवाद आहे. बंगळुरूच्या इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ सायन्स या संस्थेत प्राध्यापक असलेले कार्तिक शंकर हे गेली बरीच वर्षे समुद्री कासवांच्या संवर्धनाच्या क्षेत्रात कार्यरत आहेत. हे पुस्तक म्हणजे कासव संवर्धनाचा केवळ इतिहास नाही, तर ‘ज्या समुद्री कासवांना मारून एके काळी जेवणात सूप बनत होतं तीच समुद्री कासवं आज पर्यावरण संवर्धनाच्या क्षेत्रातील सुपरस्टार कशी बनली’ याचीदेखील ही कहाणी आहे.

समुद्री कासवांचे समुद्री पर्यावरणातील महत्त्व लेखक सुरुवातीच्या काही प्रकरणांत अधोरेखित करतो. समुद्री कासवे ही समुद्रातल्या अन्नसाखळीतील महत्त्वाचा घटक आहेत. ती जेलीफिशवर जगतात. आणि हे जेलीफिश छोटे शेवाळ आणि माशांची छोटी पिल्ले खाऊन जगतात. समुद्री कासवांची संख्या कमी झाली की जेलीफिशची संख्या अतोनात वाढते. त्यामुळे आपोआपच, जेलीफिशचे भक्ष्य ठरून माशांची संख्या कमी होते. समुद्रातल्या अन्नसाखळीत सर्वात वरच्या स्थानावर असलेली समुद्री कासवे आज संकटात सापडली आहेत. जमिनीवर जे महत्त्व वाघाला आहे तेच महत्त्व समुद्रात कासवांना आहे; परंतु आज मासे पकडण्याच्या मोठमोठय़ा ट्रॉलरमुळे, जाळय़ात अडकण्यामुळे ही कासवे जायबंदी होत आहेत. समुद्रातले भयानक वाढलेले प्रदूषण, किनाऱ्यावर होत असलेली बांधकामे, कृत्रिम प्रकाशाने उजळणारे किनारे, किनाऱ्यावरच्या वाळूचा उपसा, त्यामुळे या कासवांचे पुनरुत्पादनच आज धोक्यात आले आहे. समुद्रात प्लास्टिकच्या पिशव्यांचे प्रदूषण वाढल्यानेदेखील ही कासवं आजारी पडत आहेत याकडेही लेखकाने लक्ष्य वेधले आहे.

या पुस्तकात कार्तिक शंकर हे आपल्याला या संवर्धनासाठी झोकून देऊन ज्यांनी काम केले त्या विविध शास्त्रज्ञांच्या कामाचा परिचय करून देतात. भारतात सॅम्युएल व्हिटेकर यांनी सन १९७३ मध्ये ‘मद्रास स्नेक पार्क’ आणि ‘क्रोकोडाइल बँके’ची स्थापना करून सरपटणाऱ्या प्राण्यांबद्दल जागृती करण्याचे महत्त्वाचे काम केले. समुद्री कासवांच्या संवर्धनाचा भारतात सन १९७० मध्ये सर्वप्रथम विचार मांडला तो ई.जी. सिलास यांनी. ओरिसाच्या किनाऱ्यावर हजारोंच्या संख्येने ऑलिव्ह रिडले ही कासवं अंडी घालायला येतात. कासवांच्या या एकाच वेळी हजारोंनी अंडी घालायच्या क्रियेला ‘अरिबादा’ असे म्हणतात. अरिबादा म्हणजे स्पॅनिश भाषेत आगमन. ‘ओरिसाच्या किनाऱ्यावर होणारे अरिबादा हे भविष्यात ऑलिव्ह रिडले कासवांची जगातील सर्वात मोठी दफनभूमी ठरेल’ असे भाकीत ई.जी. सिलास यांनी केले होते. हे भाकीत दुर्दैवाने त्यांच्याच हयातीत खरे ठरले. एकाच वेळेला ओरिसाच्या किनाऱ्यावर ७००० ऑलिव्ह रिडले कासवांची कत्तल त्यांना पाहायला मिळाली. समुद्रात मासे पकडण्याच्या ट्रॉलरपासून कासवांचा बचाव करण्यासाठी त्यांनी मासे पकडायच्या ट्रॉलरना ‘टर्टल एक्स्क्लूडर डिव्हाइस’ बसवण्याची शिफारस केली. त्याच काळात ओरिसाच्या किनाऱ्यावर अंडी घालायला येणाऱ्या लाखो कासवांची कत्तल करून कलकत्त्याच्या बाजारात ही कासवे विकली जात होती. ही कत्तल जर अशीच होत राहिली तर पुढील दहा वर्षांत आपल्याला ऑलिव्ह रिडले बघायलाही मिळणार नाही, असा इशारा बऱ्याच शास्त्रज्ञांनी व कासव संवर्धनासाठी काम करणाऱ्यांनी त्या काळातच दिला होता.

ओरिसातील गहिरमाता या किनाऱ्यावरील जगातील सर्वात मोठय़ा ‘अरिबादा’चा शोध रॉबर्ट बस्टार्ड या शास्त्रज्ञाने लावला. परदेशी असणाऱ्या रॉबर्ट बस्टार्ड यांनी समुद्री कासवांच्या अंडय़ाच्या विक्रीवर बंदी घालण्यासाठी भारत सरकार व राज्य सरकार दोन्हीकडे पाठपुरावा केला. गहिरमाता येथील अरिबादाचा सखोल अभ्यास करण्यासाठी बस्टार्ड यांनी चंद्रशेखर कार या तरुणाला प्रेरित केले. डॉ. चंद्रशेखर हे गहिरमाता या ओरिसातील एकाकी किनाऱ्यावर सात ते आठ वर्षे अतिशय कठीण परिस्थितीत राहिले. डॉ. चंद्रशेखर यांची ओरिसाच्या वनखात्यात संशोधक म्हणून नेमणूक झाली होती. त्यांनी आपल्या संशोधनाच्या आधारावर ‘गहिरमाता : अ टर्टल्स पॅराडाइज’ हे पुस्तक लिहिले. सन १९८१ मध्ये त्यांनी देवी नदीच्या मुखाजवळच  कासवांचे अंडी घालण्याचे एक नवीन ठिकाण शोधून काढले.

पुस्तकात ज्यांच्या कामाचा संदर्भ सतत येत राहतो त्या सतीश भास्कर यांच्या संशोधन कार्याबद्दल वाचून आपण स्तिमित होतो. सतत वीस वर्षे सतीश भास्कर हे भारताच्या पूर्व किनारपट्टय़ा धुंडाळत होते. सन १९८२ मध्ये ते लक्षद्वीपच्या सुहेली वाली या एकाकी निर्मनुष्य बेटावर चार महिने राहिले. या कालावधीत त्यांनी पत्नीला पत्र लिहिले. ते बाटलीत भरले. बाटली समुद्रात सोडून दिली. पाचशे किलोमीटर दूर असलेल्या श्रीलंकेच्या एका मच्छीमाराला ते बाटलीतले पत्र मिळाले. त्याने ते पत्र पाकिटात भरून सतीशच्या पत्नीच्या पत्त्यावर पाठवून दिले. चार महिने त्या निर्जन बेटावर राहून सतीश भास्कर यांनी हे बेट हिरव्या समुद्री कासवांच्या पदाशीसाठी नंदनवन असल्याचा निष्कर्ष काढला. अंदमान, निकोबार व लक्षद्वीपच्या त्यांच्या संशोधनामुळे या बेटांवरचे किनारे समुद्री कासवांसाठी संरक्षित करण्याच्या प्रयत्नांना वेग आला. अन्यथा त्या वेळी हे किनारे पर्यटनासाठी ‘विकसित’ करण्याचे जोरदार प्रयत्न सुरू होते. सतीश भास्कर यांच्याबरोबरीने त्या काळात चेन्नईला समुद्री कासवांच्या संवर्धनासाठी काम करणारी शास्त्रज्ञांची मोठी फळीच्या फळी उभी राहिली होती. अतिदुर्मीळ अशा ‘फॉरेस्ट केन टर्टल’च्या भारतातील अस्तित्वाचा जे. विजया या तरुणीने पुन्हा शोध लावला. हजारो समुद्री कासवांच्या कत्तलीचे विजया यांनी घेतलेले छायाचित्र ‘इंडिया टुडे’त प्रसिद्ध झाले. त्या छायाचित्राने सर्वसामान्य जनता हादरली. त्या वेळेच्या पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी ताबडतोब ही कत्तल थांबवण्याचे आदेश किनाऱ्यावरील गार्डना दिले. एका रात्रीत कासवांच्या कत्तलीवर बंदी आणण्यात आली. एकटा माणूस संवर्धनासाठी काय करू शकतो याचे उदाहरण विजया यांनी घालून दिले. भारतातील सरिसृप वर्गातील प्राण्यांची पहिली महिला तज्ज्ञ असलेल्या जे. विजया यांचा मानसिक आजारामुळे अकाली झालेला मृत्यू चटका लावून जातो.

सन १९९३ मध्ये बिवाश पांडव यांनी ओरिसाच्या किनाऱ्यावर १०,००० पेक्षा जास्त मृत कासवे पाहिल्याची नोंद केली. त्यांनी बेलिंडा राइट यांच्याबरोबर ओरिसाच्या किनाऱ्यावर ‘ऑपरेशन कछप्प’ ही कासव वाचवण्याची मोठी मोहीम चालू केली. या वेळेपर्यंत सरकारने ऑलिव्ह रिडले कासवांच्या संरक्षणासाठी किती तरी कायदे केले होते. या साऱ्या शास्त्रज्ञांच्या आणि कासव संवर्धकांच्या प्रयत्नांना एक मोठे यश मिळाले. गहिरमाताचा किनारा व समुद्रातला काही भाग सन १९९८ मध्ये ‘कासवांसाठी समुद्र अभयारण्य’ म्हणून घोषित करण्यात आला.

लेखक या पुस्तकाद्वारे केवळ शास्त्रज्ञांच्या कथाच सांगत नाही, तर भारतातल्या विविध समुद्रकिनाऱ्यांची समुद्री कासव संवर्धन संदर्भातली आगळीवेगळी सफरही घडवतो. या विविध किनाऱ्यांवर कासव संवर्धनासाठी झालेले प्रयत्नही लेखक अधोरेखित करतो. यामध्ये महाराष्ट्रातील किनाऱ्यावर झालेल्या व्यक्तिगत आणि संघटनात्मक प्रयत्नांचाही लेखकाने आढावा घेतला आहे. सन १९८४ मध्ये महाराष्ट्राच्या वनखात्यातील काफिल शेख या ठाण्याच्या उपवनसंरक्षकांनी महाराष्ट्रातल्या किनाऱ्यांचा कासव संवर्धनाबाबत अभ्यास केला. त्यांनी ऑलिव्ह रिडले व हिरव्या समुद्री कासवांच्या अंडी घालण्याच्या विविध जिल्हय़ांतील ठिकाणांचा शोध घेतला होता. सन १९९२ मध्ये स्थापन झालेल्या व कासव संवर्धनाच्या क्षेत्रात महत्त्वाचे काम करणाऱ्या, कोकणातील ‘सह्याद्री निसर्गमित्र’ या संस्थेच्या कामाचाही आढावा लेखकाने घेतलेला आहे.

अतिशय अभ्यासपूर्ण असलेल्या या पुस्तकाने भारतातील विज्ञान साहित्यात एक मोलाची भर टाकली आहे. पर्यावरणाच्या क्षेत्रात काम करणारे तसेच वनखात्याचे व्यवस्थापक यांना हे पुस्तक मार्गदर्शक आहेच, परंतु सर्वसामान्य वाचकांनीही आवर्जून वाचावे असेच हे पुस्तक आहे.

51Hy4cV+VmL

 

  • फ्रॉम सूप टु सुपरस्टार
  • लेखक : कार्तिक शंकर,
  • प्रकाशक : हार्पर लिटमस,
  • पृष्ठे : ३६८,
  • किंमत : ५५० रु. (पुठ्ठाबांधणी), ३५० रु. (पेपरबॅक)

 

– विनया जंगले

vetvinaya@gmail.com