मुंबईकर इंग्रजी लेखक जेरी पिंटो यांची अमेरिकेतल्या ‘विंडहॅम-कॅम्प्बेल पारितोषिका’साठी निवड पंधरवडय़ापूर्वी घोषित झाली, त्याहीनंतर त्यांच्या नेहमीच्या दिनक्रमात फरक पडलेला नाही. या गौरवानंतर त्यांनी फेसबुकद्वारे जी प्रतिक्रिया दिली, त्यावरूनही याचा अंदाज आला होता.. पुरस्कार जणू ‘तिचा’च आहे, अशा रीतीनं ही नोंद पिंटो यांनी केली होती. ‘ती’ म्हणजे ‘एम अँड द बिग हूम’ या पुस्तकातली आई. तिचं नाव इमेल्डा, पण घरचं नाव ‘एम’. बिग हूम म्हणजे तिचा नवरा. इमेल्डा मनोरुग्ण आहे. तिचं दुखणं ‘बायपोलर डिसऑर्डर’. त्यामुळे ती कधी ‘या जगात’ तर कधी ‘तिच्या जगात’ अशीच असते.. यामुळे संसारावर परिणाम होतो, मुलांवरही होतो. ‘ही असं का बोलते?’ , ‘आपल्या घरी पाहुणेच येत नाहीत’ हे मुलांना जाणवत असतं. या मुलांच्या – म्हणजे सूझन ही मोठी बहीण आणि ‘स्वत’ यांच्या दृष्टिकोनातून हे पुस्तक जेरी पिंटो यांनी लिहिलं. ‘एम’बद्दल त्यांना लहानपणी पडणारे प्रश्न आणि मोठेपणी त्यांची उत्तरं मिळवण्याचा केलेला आटोकाट प्रयत्न, आईबद्दल वाटणारं प्रेम आणि काहीसा तिरस्कारसुद्धा.. त्यातून तरुण मुलगा म्हणून जे स्वातंत्र्य मिळतं ते मिळत गेल्यामुळे आईपासून घरच्याघरीच थोडं दुरावणं.. महाविद्यालयीन विद्यार्थी म्हणून ठाण्याच्या मेंटल हॉस्पिटलला भेट दिली असता तिथे आलेले अनुभव टिपून ‘घरच्या’ अनुभवांशी सहज उजळणी करणं, अशा टप्प्यांनिशी हे पुस्तक अखेर अटळ अंताकडे पोहोचतं. आई गेल्याचा दिवस. ती रात्र.
पुस्तकाला कथा नाहीये, हे पुस्तक आत्मचरित्र आणि ललितेतर गद्य यांच्या मधलं कुठलंतरी आहे, हे वाचकानं जाणलेलं असूनसुद्धा ललित साहित्याचं मूल्य या पुस्तकाला येतं, ते त्यातल्या भाषेमुळे, त्या भाषेमागच्या संस्कृतीचाही वेध आणि त्या संस्कृतीच्या दुखऱ्या नसा माहीत असल्यामुळे. स्वातंत्र्यपूर्व काळापासून ते ‘चायनीय गाडय़ा मोठय़ा होऊन त्यांचं नूतनीकरण’ होण्याच्या १९९० च्या दशकाअखेपर्यंतचा काळ या पुस्तकात आहे. पण त्याहीपेक्षा महत्त्वाची ठरते तरी जेरी यांची संवेदना. हे पुस्तक वाचल्यावर जेरी यांनी दया पवार यांच्या ‘बलुतं’चा इंग्रजी अनुवाद का केला, चित्रकला/ नाटक यांत त्यांना रस कसा आणि ‘हेलन’ हे (नर्तिका-अभिनेत्रीच्या आयुष्याचा वेध घेणारं) पुस्तक अगदी स्त्रीवादी भूमिकेतून वाचलं तरीही ते भारावूनच का टाकतं, हेलनची नवी ओळख का करून देतं.. या सगळय़ा प्रश्नांची किल्ली ‘एम’ आणि ‘बिग हूम’ यांच्या सहवासातले क्षण जेरी पिंटो यांनी कसे टिपले, यात आहे. जगण्याची तयार सूत्रं नसतात. संवेदनशील विचारीपणा आणि जगायचंय हे मान्य करणं एवढंही पुरेसं असतं, हे जेरी यांना पटलं असावं, असं त्यांच्या साहित्यातून लक्षात येतं.
या पुस्तकाचा अनुवाद शांता गोखले यांनी मराठीत ‘एम आणि हूमराव’ या नावानं (पॉप्युलर प्रकाशन) केला आहेच, किमान तो तरी वाचला, तरच ‘जेरी पिंटो हे एक लाख पन्नास हजार डॉलरचा पुरस्कार (हो, इतके!) मिळूनही ‘नेहमीसारखे’ राहू शकतात, ही ताजी बातमी नीट समजेल. बाकी पुरस्कार घोषित झाल्याची बातमी आता तशी जुनीच झालीय.