मार्क लेविन हे अमेरिकेतील वादग्रस्त व्यक्तिमत्त्व. पेशाने वकील असणाऱ्या लेविन यांनी ऐंशीच्या दशकात रोनाल्ड रेगन यांच्या प्रशासनात महत्त्वाची जबाबदारी पार पाडलेली. नंतरच्या काळात त्यांनी कायदेविषयक सल्ला देणारी संस्थाही स्थापन केलेली. शिवाय रेडिओवर त्यांचे नियमित कार्यक्रमही प्रसारित होत असतात. हे सारं करताना लेविन यांनी वेळोवेळी घेतलेल्या भूमिका, त्यांनी व्यक्त केलेली मतं, लिहिलेली पुस्तकं हे सारं नेहमीच चर्चेचा आणि टीकेचा विषय राहत आलं आहे. अगदी अलीकडे त्यांनी बराक ओबामांवर केलेला आरोप हे त्याचं उदाहरण. गेल्या वर्षीच्या अखेरीस झालेल्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत ओबामा हे डोनाल्ड ट्रम्प यांच्या प्रचारगटाच्या अंतर्गत हालचालींवर नजर ठेवत होते, इतकंच नव्हे तर त्यासाठी त्यांनी आपल्या अधिकारांचा वापर करत पोलीस दलाला याकामी जुंपलं, असा आरोप करून लेविन यांनी खळबळ उडवून दिली. या आरोपात काही तथ्य नसल्याचं नंतर उघड झालं; पण अशी वक्तव्यं करणं, हे काही लेविन यांच्या बाबतीत नवीन नाही. असो.
बातमी आहे ती त्यांच्या नव्या पुस्तकाची. ‘रीडिस्कव्हिरग अमेरिकानिजम’ हे लेविन यांचं नवं पुस्तक येत्या जुलैमध्ये प्रकाशित होत आहे. पुस्तकातील मांडणीविषयी अद्याप फारसं काही उघड झालं नसलं, तरी लेविन यांची आतापर्यंतची पुस्तकं पाहता या नव्या पुस्तकाचे काही एक आडाखे बांधता येतील. ‘मेन इन ब्लॅक’, ‘लिबर्टी अॅण्ड टीरानी – अ कॉन्झव्र्हेटिव्ह मॅनिफेस्टो’, ‘अमेरिटोपिया – द अनमेकिंग ऑफ अमेरिका’, ‘द लिबर्टी अमेण्डमेंट्स’ ही त्यांची याआधी प्रकाशित झालेली काही पुस्तकं. अमेरिकेचे प्रशासन व न्यायव्यवस्था यांच्याविषयी लेविन यांनी या पुस्तकातून भाष्य केलं आहे. ते करताना त्यांच्या मांडणीचा रोख मात्र उदारमतवादावर टीका करण्याचाच राहत आला आहे. त्यामुळे ‘अमेरिकनत्वाचा पुनशरेध’ घेणारं त्यांचं नवं पुस्तकही त्याचीच पुढची आवृत्ती ठरण्याची शक्यताच अधिक आहे.