मलिक अंबरापासून ते मनुचीपर्यंत आणि गार्सिया डी ओर्टापासून सरमद कशानीपर्यंतच्या अनेक अभारतीयांनी भारतात राहून भारतीयत्व आपलेसे केले.. हे सारे जण भारताच्या इतिहासाचा भाग आहेतच आणि काहींनी या देशाच्या इतिहासात भरही घातली आहे.. सोळाव्या-सतराव्या शतकातल्या फिरंग्यांनी भारताशी कसे जुळवून घेतले याच्या कथा ‘भारतीयत्वाचा शोध’ या सूत्रात गोवणारे हे पुस्तक आहे..
‘ब्रिटिश राजवटीपूर्वी भारतात येऊन पूर्णपणे भारतीय झालेल्या फिरंगींवरील बहुरंगी पुस्तक,’ असे जोनाथन गिल हॅरिस यांच्या पुस्तकाचे एका वाक्यात वर्णन करता येईल. सोळाव्या आणि सतराव्या शतकांतील घडामोडींची सैर हॅरिस आपल्याला घडवून आणतात. ऐतिहासिक दस्तावेज ओघवत्या कथारूपात मांडण्यात आला असल्याने एक रसाळपणा अनुभवास येतो. शैलीदार इंग्रजी लिखाणाचा नमुना म्हणून वाचलेच पाहिजे, असे हे पुस्तक. एवढय़ाने त्याचा बहुरंगीपणा संपत नाही. या कथा आपण आजच्या ‘ग्लोबल’ वाचकांना सांगत आहोत आणि त्यांत भारतीयही आहेत, याचे भान या लेखकाला आहे. संशोधकासारखे खोदकाम करून लेखक पुन्हा वाचकाला आजच्या काळातील जमिनीवर आणतात आणि मध्येच ‘भारतीयत्व म्हणजे काय?’ याबद्दलची निरीक्षणे नोंदवतात. हे सारे करताना आपण ‘परकायाप्रवेश’ या तंत्रामुळे प्रेरित झालो, असे लेखकानेच म्हटले आहे.
भारतातील १६ व्या शतकातील गुलामगिरी तत्कालीन अमेरिका व पाश्चिमात्य देशांमधील गुलामगिरीपेक्षा वेगळी होती, असे महत्त्वाचे निरीक्षण लेखकाने नोंदविले आहे. पाश्चिमात्य देशांमधील गुलाम शेतमजूर म्हणून वेठबिगारीचे जीवन कंठत होते. तुलनेत भारतातील गुलामांचे विशेषत: युद्धकैदी म्हणून येथे आणण्यात आलेल्यांचे जीवन सामाजिकदृष्टय़ा वरच्या श्रेणीतील होते. युद्धकैद्यांबाबतची मामलूक ही अफलातून प्रथा अस्तित्वात होती. त्यामुळे गुलामांना चक्क सत्ताधीश होण्याची संधी मिळत असे. अशा काही सत्ताधीशांच्या कर्तृत्वाची नोंदही लेखकाने घेतलेली आहे. रशियातून गुलाम म्हणून आलेला आणि नंतर नौसेनापती म्हणून नावारूपास आलेला, दीव बंदराभोवती अभेद्य तटबंदी उभारणारा मलिक अयाझ आणि त्रावणकोरमध्ये सत्ता गाजवणारा डच युद्धकैदी डिलिआनी, औरंगाबादची उभारणी करणारा पूर्व आफ्रिकेतून येथे गुलाम म्हणून आलेला मलिक अंबर ही काही उदाहरणे. मलिक अयाझला तत्कालीन गुजरातच्या सुलतानाने दीवची सत्ता सोपविली. तो सागरी युद्धात प्रवीण होता. त्याने ४४ वर्षे दीव बेटावर सत्ता गाजवली. मसाल्याच्या व्यापारामुळे मलबारच्या किनाऱ्यावर चीनची उपस्थिती होतीच. मूळचा चिनी असलेल्या चिनालीला पोर्तुगीजांनी गुलाम म्हणून येथे आणले. नंतर त्याने योद्धा म्हणून नाव कमावले आणि पोर्तुगीज सेनेलाच आव्हान दिले.
मामलूक राज्यपद्धती म्हणजे गुलामांकडे काही अधिकार सोपविण्याची व्यवस्था ही प्रामुख्याने मुस्लीम राज्यकर्त्यांनी राबविली. तिची पाळेमुळे पर्शियन आणि अरब जगतातील. मात्र, डिलिआनीबाबत वेगळे घडले. हिंदू राजाने त्याच्याकडे त्रावणकोरची लष्करी सूत्रे सोपविली. तो कुशल सेनापती होता. त्याचे युद्धकौशल्य वादातीत होते. त्याने डच तंत्र वापरून त्रावणकोरच्या सैन्याची फेररचना केली आणि मसाल्याच्या व्यापारावर प्रदीर्घ काळ नियंत्रण ठेवले. त्याने तामिळ भाषेवर प्रभुत्व मिळवीत ३७ वर्षे हिंदू राजाची निष्ठेने सेवा केली. त्याचे रोमन कॅथॉलिक असणे हे या सेवेआड आले नाही.
मलिक अंबरचा जीवनपट तर चित्रपटाच्या पटकथेला साजेसा आहे, असे हॅरिस यांचे मत आहे आणि ते वाचकांनाही पटेल, असे त्यांनी लिहिले आहे. शिवाजी महाराजांच्या गनिमी काव्याचे धागेदोरे मलिक अंबर याने यशस्वीपणे राबविलेल्या ‘बारगिरी’
या युद्धतंत्रात सापडतात, अशी नोंद सविस्तरपणे केली आहे. बिबी ज्युलिआना आणि ज्युलिआना डायस डी कास्टा या फिरंगी महिलांच्या जीवनपटाचा वेध घेण्याचा लेखकाने प्रयत्न केला, पण अपुऱ्या उपलब्ध नोंदींमुळे त्यांची व्यक्तिमत्त्वे ठळकपणे त्याला चितारता आलेली नाहीत. ही चुटपुट लेखकाबरोबर आपल्यालाही लागून राहते. थॉमस कॉयराइट आणि सैद सरमद कशानी या दोन फकिरांच्या जगण्याचा घेतलेला शोधही वाचनीय ठरला आहे. बंगालनजीकच्या सॅन्डवीप या ५० किलोमीटर भूभागाच्या बेटावरील चाच्यांच्या राजवटीचा वृत्तांतही असाच रोचक वाटतो. तो देताना लेखकाला शेक्सपिअरच्या ‘द टेंपेस्ट’ची आठवण झाली. हा उल्लेख मुळापासूनच वाचायला हवा.
भारतीय आहार पद्धतींचा आणि येथील हवामानात होणाऱ्या आजारांचा पोर्तुगालमधून येथे आलेल्या गार्सिया डी ओर्टा यांनी अभ्यास केला आणि त्यावर ग्रंथही लिहिला. तो नंतर येथे आलेल्या फिरंगींसाठी उपयुक्त ठरला. ओर्टा हे मूळचे ज्यू. धार्मिक छळामुळे त्यांनी मायभूमी सोडली आणि भारताचा किनारा गाठला. गोव्यात आणि नंतर अहमदनगरमध्ये त्यांनी राजवैद्य म्हणून मोठे नाव कमावले. तिकडे पोर्तुगालमध्येही त्यांचा देशभक्त म्हणून गौरव झाला. पोर्तुगालच्या चलनावर त्यांची छबी अगदी अलीकडेपर्यंत छापली जात होती, इतके ते आदरणीय ठरले.
असेच आणखी एक उल्लेखनीय व्यक्तिमत्त्व म्हणजे इंग्लंडहून येऊन गोव्यात स्थायिक झालेले थॉमस स्टीफन. ख्रिस्तपुराणामुळे ते तसे मराठी वाचकांना परिचित आहेत. कोकणीतही त्यांनी रोमन लिपीतून विपुल लिखाण केले आहे. कोकणी-मराठी भाषांच्या प्रेमात पडलेले आणि ४० वर्षांच्या वास्तव्यात पूर्णपणे भारतीय झालेले हे व्यक्तिमत्त्व. त्यांच्यासारखे काही फिरंगी शरीर, मन आणि आत्म्याने देशी होऊन गेले. याउलट निकोलो मनुची याचे उदाहरण. कोवळ्या वयात व्हेनिसमधून येथे आल्यानंतर तब्बल ६० वर्षे भारतात घालवूनदेखील त्याचा आत्मा मायदेशातच घोटाळत राहिला. हिंदुस्तानविषयी त्याची तुच्छतेची भावना कायम राहिली. त्याचे शरीर आणि व्यवहार मात्र पूर्णपणे भारतीय झालेले दिसतात. येथील हवामान त्याने पचविले. एवढेच नव्हे तर दक्षिण भारतातील पारंपरिक वैद्यकीय ज्ञान आत्मसात करून तो सिद्ध वैद्य म्हणूनही नावारूपास आला. तीस वर्षे मुघलांची चाकरी आणि नंतरची तीस वर्षे दक्षिण भारतात वास्तव्य असा या मनुचीचा भारतीयत्वाचा समृद्ध अनुभव. मुघल राजवटीवर त्याने ग्रंथही लिहिला.
फिरंगी शब्दाचा वापर सुरुवातीला युरोपमधून भारतात आलेल्या गौरवर्णीयांसंदर्भात होत होता; परंतु लेखकाने तो सर्वच स्थलांतरितांबाबत केला आहे. सांस्कृतिक घुसळणीची भूमी ही भारताची ओळख हजारो वर्षांपासूनची आहे. स्थलांतरितांच्या लाटांवर लाटा येथे सागरी लाटांबरोबर येऊन स्थिरावल्या. पर्शियापासून ग्रीसपर्यंतचे फिरंगी येथे येऊन भारतीय म्हणून जगले. त्यातील काही व्यक्तिमत्त्वांच्या भारतीयत्वाच्या प्रवासाचा वेध स्वत: एके काळी फिरंगी असणाऱ्या लेखकाने घेतलेला आहे. काही साहसी दर्यावर्दी दरमजल करीत भारतीय किनाऱ्यांवर पोहोचले आणि येथील मसाल्यांच्या पदार्थाच्या मोहात पडले, असा उल्लेख आपल्या वाचनात आलेला असतो. मात्र, याशिवाय तऱ्हेतऱ्हेच्या मंडळींना भारतभूमीची ओढ वाटली. त्यात वैदू आहेत, सैनिक आहेत, कारागीर आहेत, कलाकार आहेत आणि चोर, भामटे, चाचे किंवा वारांगनाही आहेत. यातील बरेच जण उदरनिर्वाहासाठी येथे आले, तर काही जण मायभूमीतील धार्मिक जाचाला कंटाळून सहिष्णू भारतात आले. (त्या वेळी असहिष्णुता आणि त्याबाबतचा वाद नव्हताच की काय असा प्रश्न पडू शकतो!) अनेकांना येथे गुलाम म्हणून आणण्यात आले. त्यातील काही जण राज्यकर्ते बनले. अनेक फिरंगी सैन्यात सामावले गेले. पोर्तुगाल आणि इटलीतून येथे आलेल्या काहींनी वैद्यकीय व्यवसायात नाव कमावले. अकबर आणि जहांगिराच्या दरबारात काही कलाकारांनी आपली कला रुजू केली आणि उत्तम कलाकृती निर्माण केल्या.
या सर्व फिरंगींनी हळुवारपणे भारतीयत्व आत्मसात केले. येथील संस्कृती, चालीरीती स्वत:त मुरवल्या. हवामानाशी जुळवून घेतले, अन्नपदार्थ पचविले. भारतीय वेशाचा अंगीकार केला. अर्थात ही प्रक्रिया खडतर आणि अपरिहार्य अशीच होती. स्वानुभवाचा दाखला देत हॅरिस यांनी तिची चिकित्सा केली आहे. भारताबाहेरून येऊन भारतीय होणे हे अवघड, पण प्रयत्नसाध्य हे त्यांचे निरीक्षण. न्यूझीलंडमध्ये जन्मलेल्या हॅरिस यांचे शिक्षण इंग्लंडमध्ये झाले. त्यानंतर त्यांचे अमेरिकेत तब्बल २३ वर्षे वास्तव्य होते. सध्या मात्र ते पूर्णपणे भारतीय झालेले आहेत. एकीकडे शेक्सपिअर आणि दुसरीकडे हिंदी सिनेमा हे त्यांचे आवडीचे व अभ्यासाचे विषय. तूर्त वास्तव्य दिल्लीत आणि पेशा अध्यापनाचा. आयुष्याची जोडीदार दिल्लीवाली. त्यामुळे लिंबूपाणी घेत आणि खादीचे कपडे वापरत त्यांनी येथील भाजून काढणाऱ्या उन्हाळ्याशी दोस्ताना केला. हे सारे सांगताना हॅरिस, ‘भारतीयत्व’ म्हणजे आजच्या संदर्भात काय, याबद्दलची त्यांची निरीक्षणे नोंदवतात. त्यापैकी एक निरीक्षण तर ‘एका वेळी अनेक गोष्टींकडे लक्ष असणे, एककल्ली न राहणे’ हेही आहे. अर्थात, ही अशी निरीक्षणे अतिशय व्यक्तिनिष्ठ (सब्जेक्टिव्ह) आहेत, तरीही त्यातली काही पटतील!
भारतीयत्वाकडे वाटचाल करायची असेल, तर कोणत्याही फिरंगीला येथील कडक उन्हाशी आणि मुसळधार पावसाशी जुळवून घ्यावेच लागते. त्याप्रमाणे आवश्यक ते शारीरिक बदल करावे लागतात, हे या पुस्तकाचे मध्यवर्ती सूत्र आहे. सतरा-अठरा व्यक्तिरेखांची ऐतिहासिक तपशिलांनिशी मांडणी करीत लेखक हॅरिस यांनी ते फुलविले आहे. यातील बरीचशी व्यक्तिमत्त्वे अपरिचित असल्याने लेखकाने त्यांच्या भारतीयत्वाचा घेतलेला वेध वाचनीय ठरला आहे.
– संजय डोंगरे
sanjay.dongare@expressindia.com
द फर्स्ट फिरंगीज
लेखक : जोनाथन गिल हॅरिस
प्रकाशक : अलेफ बुक्स
पृष्ठे : ३१८, किंमत : ४९५ रुपये