वाफेचे इंजिन, वीज आणि संगणक यांचा शोध हे आधुनिक जगाच्या वाटचालीतील महत्त्वाचे टप्पे, किंबहुना या शोधांनी त्या त्या काळात औद्योगिक क्रांतीच घडवून आणली. सध्याचा काळ हा तर विविध क्षेत्रांतील तंत्रज्ञानबदलाचा. या बदलांची गतिमानता आणि सर्वव्यापकता पाहता त्यातून नवी औद्योगिक क्रांतीच अवतरू पाहत आहे; तिचे स्वरूप आणि त्याचे मानवी समाजावरील परिणाम, या सर्वाचा वेध घेणारं हे पुस्तक..

स्वयंचलनामुळे (ऑटोमेशनमुळे) भारतातील ६९ टक्के, तर चीनमधील ७७ टक्के रोजगार धोक्यात!

– जागतिक बँकेने केलेल्या संशोधनाचा निष्कर्ष

कृत्रिम बुद्धिमत्तेच्या प्रसारामुळे पुढच्या २५ वर्षांत पुढारलेल्या देशांमधील ४७ टक्के नोकऱ्या नाहीशा होणार! – ऑक्सफर्ड विद्यापीठ

अमेरिकन शास्त्रज्ञांना ३-डी पिट्रिंग तंत्रज्ञानाच्या वापराने मानवाच्या रक्तवाहिन्या बनवण्यात यश; इतर अनेक अवयव बनवण्याचा मार्ग खुला..

२०२० सालापर्यंत ड्रायव्हर न लागणाऱ्या स्वयंचलित मोटारगाडय़ा रस्त्यावर..

आपल्या अगदी जवळच्या भविष्यकाळाबद्दल या आणि अशाच अनेक सुरस बातम्या आपण ऐकत असतो. मनात निरनिराळे विचार, शंका-कुशंका येत राहतात. हे खरंच घडेल का? असे झाले तर त्याचा आमच्या भविष्यावर काय परिणाम होईल? बेकारी वाढेल का? या भविष्यासाठी आम्ही स्वत:ला आणि आमच्या कुटुंबीयांना कसे तयार करावे? या सर्व बदलांचा सामाजिक परिणाम काय असेल? सरकार आणि उद्योगधंदे या बदलांना कसे सामोरे जातील? इत्यादी. पण या सर्व प्रश्नांना विश्वासार्ह उत्तरे कुठून मिळतील आणि ती काय असतील हे मात्र आपल्याला माहीत नसते. या आणि अशा बऱ्याच प्रश्नांना उत्तर देण्याचा प्रयत्न ‘फोर्थ इंडस्ट्रियल रिव्होल्यूशन’ या क्लॉस श्वाब लिखित पुस्तकात केला आहे.

आपण सर्वच ‘वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम’ या आंतरराष्ट्रीय संस्थेशी परिचित आहोत आणि जरी संस्था परिचित नसली, तरीही त्यांच्या दरवर्षी डेव्हॉसला होणाऱ्या जागतिक संमेलनाबद्दल ऐकले नाही असा माणूस विरळाच. क्लॉस श्वाब हे वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमचे संस्थापक आणि कार्यकारी अध्यक्ष. समाजातील राजकीय, सामाजिक, औद्योगिक आणि शैक्षणिक नेतृत्वाच्या सहभागाने जगाची परिस्थिती सुधारण्यासाठी व जागतिक, प्रादेशिक आणि औद्योगिक कार्यक्रम ठरवण्यासाठी वाहून घेतलेली ही संस्था आहे. वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमचे हे उद्दिष्ट पूर्ण करण्याकरिता अनेक वेगवेगळ्या क्षेत्रांतले नेते एकत्र येऊन संशोधन आणि विचारविनिमय करतात. त्यांचे हे संशोधन शोधनिबंध आणि दिशादर्शक अहवाल यांच्या स्वरूपात प्रसिद्ध होते. ‘द फोर्थ इंडस्ट्रियल रिव्होल्यूशन’ हे पुस्तक फोरमने केलेल्या चौथ्या औद्योगिक क्रांतीसंबंधीच्या संशोधनावर आधारित आहे.

कृत्रिम बुद्धिमत्ता (Artificial Intelligence), रोबॉटिक्स, त्रिमित छपाई (३-डी िपट्रिंग), नॅनो तंत्रज्ञान, जैव तंत्रज्ञान, स्वयंचलित मोटारगाडय़ा, वस्तूंचे इंटरनेट (इंटरनेट ऑफ थिंग्ज, ज्यात तुमचा फ्रिज आणि ओव्हन एकमेकांशी बोलू शकतात आणि संपत आलेल्या वस्तू फ्रिज इंटरनेटवरून मागवू शकतो.) यांसारख्या असंख्य उदयोन्मुख तंत्रज्ञानाच्या अभिसरणाला आणि त्यातून निर्माण होणाऱ्या शक्यतांना लेखक चौथी औद्योगिक क्रांती म्हणून संबोधतो.

आपण सर्वानी ‘वाफेच्या इंजिनाने औद्योगिक क्रांतीची सुरुवात झाली’ हे ऐकलेच आहे. मग ही चौथी औद्योगिक क्रांती कशी? या आधीच्या तीन औद्योगिक क्रांती आहेत तरी कुठल्या? लेखकाच्या मते आधीच्या तीन औद्योगिक क्रांती पुढीलप्रमाणे (तक्त्यात)-

ज्याला लेखक चौथी औद्योगिक क्रांती म्हणतो त्यालाच काही तज्ज्ञ तिसऱ्या क्रांतीचाच भाग मानतात; पण या बदलांचा वेग, व्याप्ती आणि त्यांचे सर्वस्पर्शी परिणाम एवढे अफाट आहेत, की ही एक नवीन क्रांतीच आहे असे लेखक ठामपणे सांगतो. लेखकाच्या मते, ‘होणारे हे बदल एवढे सखोल आणि मूलभूत आहेत, की आतापर्यंतच्या इतिहासात मानवजातीने एवढय़ा प्रचंड संधीचा किंवा संभाव्य धोक्यांचा सामना केलेला नाही.’

आपल्या आजूबाजूला सगळ्याच उद्योगांमध्ये अत्यंत मूलभूत फरक होताना दिसत आहेत. या सर्व बदलांचा आणि त्यांचा जगावर होणाऱ्या परिणामांचा आपल्याला अजिबात अंदाज नाही; परंतु हे सर्व समजून घेण्याची जबाबदारी मात्र समाज, सरकारे, उद्योगधंदे आणि विचारवंत या सर्वाचीच आहे. चौथी औद्योगिक क्रांती म्हणजे काय, तिच्यामुळे काय बदल होतील, तिचे संभाव्य परिणाम काय असू शकतात आणि त्यातून सर्वाकरिता चांगली निष्पत्ती कशी साधून घेता येईल हे समजून घ्यायला मदत करावी, हे लेखकाचे उद्दिष्ट आहे.

तंत्रज्ञानाच्या मालकीमुळे आणि संपत्तीच्या हव्यासामुळे ‘आहे रे’ आणि ‘नाही रे’ यांच्यातली दरी आणखीनच वाढणे; नव्या तंत्रज्ञानामुळे अनेक सुस्थापित उद्योगधंदे मोडकळीस येणे किंवा बंद पडणे; सार्वत्रिक बेरोजगारी, शासनव्यवस्थेची झीज, रोबॉटिक्स, जैवअभियांत्रिकी यांचे दुरुपयोग.. यांसारख्या अनेक संभाव्य धोक्यांचे लेखक विश्लेषण करतो.

untitled-8

सुस्थापित उद्योगधंद्यांना असलेल्या धोक्याचे उदाहरण म्हणून नव्या आणि जुन्या पिढीतल्या उद्योगांमधील एका मोठय़ा फरकाकडे लेखक लक्ष वेधून घेतो. जुन्या पिढीतले व्यवसाय मुख्यत: त्यांच्या ग्राहकांना वस्तू किंवा सेवा पुरवत असत. नवीन पद्धतीचे व्यवसाय हे ग्राहकांना आणि उद्योगांना एकमेकांशी संपर्क साधण्यासाठी व्यासपीठ  उपलब्ध करून देतात. उदाहरणार्थ, ‘उबर’ किंवा ‘ओला’ या कंपन्यांच्या मालकीची एकही टॅक्सी नाही; पण त्या प्रचंड मोठय़ा टॅक्सी कंपन्या आहेत. त्या फक्त ग्राहकांना टॅक्सीचालकांशी संपर्क साधण्याचे साधन, एक व्यासपीठ निर्माण करून देतात किंवा ‘एयरबीएनबी’ या जगातल्या सर्वात मोठय़ा हॉटेल कंपनीच्या (भारतामध्ये ‘ओयो रूम्स’च्या) मालकीचे एकही हॉटेल नाही. या कंपन्या हॉटेल ग्राहकांना हॉटेल मालकांशी संपर्क साधण्याचे साधन उपलब्ध करून देतात.

या अशा नवनवीन, कल्पक पर्यायांपुढे टिकाव धरण्यासाठी प्रस्थापित उद्योगांनीही सदैव स्पर्धात्मक राहणे अत्यंत आवश्यक आहे आणि जर ते तसे राहिले नाहीत, तर त्यांचा विनाश अटळ आहे. यामुळेच काही काळापूर्वीपर्यंत एखाद्या कंपनीचे ‘एस अ‍ॅण्ड पी’च्या ‘टॉप ५००’ या अमेरिकेतल्या सर्वोच्च ५०० कंपन्यांच्या यादीवरचे सरासरी आयुष्यमान ६० वर्षांवरून १८ वर्षांवर आले आहे.

बऱ्याच तज्ज्ञांच्या मते, या औद्योगिक क्रांतीचा फायदा गरिबांपेक्षा श्रीमंतांनाच जास्त होईल. कमी कौशल्य लागणारे आणि कमी प्रतीचे रोजगार ऑटोमेशनमुळे नष्ट होतील; पण हे पूर्वीच्या प्रत्येक क्रांतीमध्ये झाले आहे. क्रांतीच्या सुरुवातीला नेहमीच गरीब आणि श्रीमंत यांच्यामधील विषमता वाढते आणि त्यानंतर समाजात राजकीय आणि रचनात्मक बदल घडून येतात. त्यातून सर्व जगच पूर्वीपेक्षा वरच्या स्तरावर जाऊन पोचते. पहिल्या औद्योगिक क्रांतीनंतरही असेच प्रचंड ध्रुवीकरण झाले, पण त्यानंतर पुढच्या शंभर वर्षांत कामगारांचे संघटन, लोकशाहीचा प्रसार, प्रगतिशील करनिर्धारण इत्यादी रचनात्मक बदल घडून आले.

चौथ्या औद्योगिक क्रांतीबद्दल बोलणारे तज्ज्ञ दोन टोकांचे बोलतात. तिच्या प्रशंसकांच्या मते, ही क्रांती संपूर्ण मानवजातीचे उत्थान करेल आणि पृथ्वीवर स्वर्गच अवतरेल. तर तिच्या निंदकांच्या मते, ही क्रांती मानवाच्या सर्वच दुर्गुणांना खतपाणी घालून जगाचा नरक बनवून टाकेल. लेखक मात्र स्वत:ला ‘वास्तविक आशावादी’ म्हणवतो. या घडीला आपल्या सामाजिक, राजकीय आणि औद्योगिक रचना या क्रांतीमुळे उद्भवणाऱ्या बदलांना सामोरे जाण्यासाठी तयार नाहीत आणि आपल्याला बऱ्याच मोठय़ा बदलांना सामोरे जावे लागेल. त्याच्या मते, भविष्यातल्या संधी धोक्यांना पुरून उरतील. त्याच्या अशा आशावादाकरिता तो अनेक कारणे देतो-

  • डिजिटल नेटवर्क्‍समुळे आज जगातल्या गरिबातल्या गरिबालाही जागतिक व्यवहारात सामील होण्याच्या प्राप्त झालेल्या संधी.
  • आरोग्य क्षेत्रात कृत्रिम अवयव आणि व्यक्तिगत औषधांमुळे घडणारे क्रांतिकारी बदल.
  • उद्योगांमध्ये प्रचंड वाढलेली कार्यक्षमता आणि उत्पादकता.
  • ऊर्जा आणि कृषी क्षेत्रात घडणारी प्रगती आणि त्यामुळे पर्यावरण समस्यांवर उपाय सापडण्याच्या शक्यता.

पण हे शक्य होण्यासाठी सरकार, उद्योग, विचारवंत  व शिक्षणतज्ज्ञ या सर्वानी एकत्र येऊन काम केले पाहिजे. सगळ्यांनीच आजूबाजूच्या परिस्थितीशी जुळवून घेत सर्वाच्या हिताच्या दृष्टीने विचार केला पाहिजे.

पुस्तक चार प्रकरणांत विभागले आहे. पहिल्या प्रकरणात चौथ्या औद्योगिक क्रांतीची व्याख्या केली आहे. दुसऱ्या प्रकरणात औद्योगिक क्रांती घडवणाऱ्या तंत्रज्ञानांची ओळख करून दिली आहे. तिसऱ्या प्रकरणात या क्रांतीचा अर्थव्यवस्था, उद्योग, आंतरराष्ट्रीय संबंध, समाज आणि प्रत्येक व्यक्ती यांच्यावर होणाऱ्या परिणामांचा ऊहापोह केला आहे. हे प्रकरण सर्वात व्यापक आहे. शेवटचे प्रकरण ‘पुढे काय?’ याची चर्चा करते. हे प्रकरण कुठल्याही प्रकारचे ठोस उपाय न सांगता वेगवेगळ्या शक्यतांची गुळमुळीत चर्चा करते.

यात चर्चा केलेल्या तंत्रज्ञानांचे ज्ञान असलेल्या व्यावसायिकांसाठीच हे पुस्तक लिहिलेले आहे. पुस्तकाची रचना एखाद्या िथकटँकच्या अहवालासारखी आहे. पुस्तकात प्रत्यक्ष तंत्रज्ञान, त्यांचे अभिसरण कसे होते आणि त्याच्या विकासाचा वेग कसा वाढतो हे स्पष्ट करण्याचा काहीही प्रयत्न केलेला नाही. त्याचप्रमाणे तंत्रज्ञान आणि त्याचा व्यावसायिक किंवा आíथक परिणाम कसा होतो हे स्पष्ट करण्यासाठी फारशी उदाहरणेही दिलेली नाहीत. हे सर्व वाचकाला माहीत असण्याची अपेक्षा आहे. पुस्तकाची भाषाही ओघवती नसून क्लिष्ट आहे. याच विषयावर समजण्यास सोपी असलेली इतर अनेक पुस्तके इंग्रजीत  उपलब्ध आहेत.

पुस्तकाच्या शेवटी मात्र ‘डीप शिफ्ट’ हे खूप वाचनीय परिशिष्ट आहे आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे, पुस्तकातील इतर प्रकरणांपेक्षा समजण्यास खूप सोपे आहे. त्याची मांडणी सुलभ असून, मूळ पुस्तक संपूर्णपणे न वाचता, फक्त पहिली दोन छोटी प्रकरणे वाचून तडक या परिशिष्टाकडे वळता येऊ शकते.

कोणतेही तंत्रज्ञान हे सुरुवातीला एका प्रायोगिक अवस्थेत असते. तेथून ते मुख्य प्रवाहात येऊ शकते किंवा अपेक्षेस न उतरल्याने नाहीसे होऊ शकते. एखादे उदयोन्मुख तंत्रज्ञान मुख्य प्रवाहात येणार की नाही, हा अंदाज ज्या घटनेवरून बांधता येतो त्याला ‘टिप्पिंग पॉइंट्’ असे म्हणतात. स्वयंचलित मोटारगाडीचेच उदाहरण घेऊ या. स्वयंचलित मोटारगाडी हे एक प्रस्थापित झालेले तंत्रज्ञान आहे, असे केव्हा म्हणता येईल? त्याचा वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमने ठरवलेला टिप्पिंग पॉइंट् आहे, ‘अमेरिकेतील रस्त्यावरच्या १० टक्के गाडय़ा स्वयंचलित असणे’. २०१५ साली वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमने त्यांच्या ८०० तज्ज्ञांच्या मदतीने तयार केलेल्या टिप्पिंग पॉइंट्सची एक यादी प्रसिद्ध केली होती. या यादीतली प्रत्येक घटना २०२५ पर्यंत घडण्याची शक्यता आहे.  या परिशिष्टात एकूण २३ टिप्पिंग पॉइंट्स, त्यांचे बरे-वाईट आणि अज्ञात परिणाम व त्यांची आजची स्थिती यांविषयी माहिती दिली आहे. वानगीदाखल, हे आहेत काही टिप्पिंग पॉइंट्स. (टिप्पिंग पॉइंट्पुढील कंसातील आकडा ही घटना २०२५ पर्यंत घडली असण्याच्या शक्यतेची टक्केवारी देतो.)

  • शरीरात बसवता येईल असा स्मार्टफोन व्यावसायिकरीत्या बाजारात उपलब्ध होईल. (८२%)
  • अमेरिकेतील रस्त्यावरच्या १०% गाडय़ा स्वयंचलित असतील. (७९%)
  • ३०% ऑडिट्स कृत्रिम बुद्धिमत्ता असलेल्या यंत्राकडून (७५%)
  • अमेरिकेत पहिला रोबोटिक फार्मासिस्ट (८६%)
  • त्रिमित छपाईने बनवलेल्या पहिल्या मानवनिर्मित यकृताचे प्रत्यारोपण (लिव्हर ट्रान्सप्लांट) (७६%)

हे टिप्पिंग पॉइंट्स आपल्याला येणाऱ्या भविष्याची एक झलक देतात.

एकंदरीतच, आपल्या भविष्यकाळाची ओळख करून देणारे, पण सर्वानाच वाचायला सुलभ नसलेले हे एक महत्त्वाचे पुस्तक आहे.

 

 

  • द फोर्थ इंडस्ट्रियल रिव्होल्यूशन
  • लेखक : क्लॉस श्वाब,
  • प्रकाशक : पोर्टफोलिओ/ पेंग्विन,
  • पृष्ठे : १८४, किंमत : ६९९ रुपये

 

मकरंद करकरे

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

mkarkare@hotmail.com