प्रशांत केणी

‘तुम्हाला विजेते घडवायचे असतील, तर तिथे लोकशाही पद्धतीला अजिबात थारा नाही,’ ही भारताचे मुख्य बॅडमिंटन प्रशिक्षक पुलेला गोपीचंद यांची तत्त्वप्रणाली. २००१ मध्ये ऐतिहासिक ‘ऑल इंग्लंड’ जेतेपदाला गवसणी घातल्यानंतर या यशाच्या आनंदात मश्गूल राहण्याऐवजी त्यांनी गुरुकुल पद्धतीप्रमाणे प्रशिक्षणाचा आधुनिक ढाचा बनवला. केवळ स्वप्नाळू मनोमांडणी करण्यात रममाण न होता, त्यांनी २००४ मध्ये हैदराबादला ‘गोपीचंद अकादमी’ची निर्मिती केली. त्यासाठी त्यांना स्वत:चे घरही गहाण टाकावे लागले होते. पण तेव्हा पेरलेल्या बीजांची गोमटी फळे आज दिसू लागली आहेत.

‘द गोपीचंद फॅक्टर : द राइज अ‍ॅण्ड राइज ऑफ इंडियन बॅडमिंटन’ हे वरिष्ठ क्रीडा पत्रकार अभिजीत कुलकर्णी यांचे पुस्तक म्हणजे पुलेला गोपीचंद यांच्यावरील चरित्रपर पुस्तक नाही, तर भारतीय बॅडमिंटनच्या यशोगाथेचा समग्र लेखाजोखा आहे. २००१ ते २०२१ या दोन दशकांचा यशोप्रवास गोपीचंद यांच्या प्रचलित चौकटी भेदणाऱ्या दृष्टिकोनातून यात दाखवला आहे. त्यामुळे चिनी प्रशिक्षण पद्धतीचा आदर्श जोपासणाऱ्या गोपीचंद यांना या पुस्तकाने नायकत्व जरूर बहाल केले आहे; पण पुस्तक या दोन दशकांपुरते मर्यादित न राहता भारतीय बॅडमिंटनचा भूतकाळ, वर्तमानकाळ आणि भविष्यकाळ यांचा अभ्यासपूर्ण वेध घेते. त्यामुळेच पुस्तकाच्या मुखपृष्ठावर गोपीचंद यांच्या छायाचित्राऐवजी भारतीय बॅडमिंटनचे वर्तमान असणाऱ्या पी. व्ही. सिंधूचे प्रतिकारात्मक पवित्र्यातील छायाचित्र पाहायला मिळते.

बॅडमिंटनचे जन्मस्थळ पुणे. १९व्या शतकाच्या उत्तरार्धात भारतातील ब्रिटिशांच्या सैनिकी वसाहतींमध्ये मनोरंजनासाठी खेळला जाणारा हा खेळ कालांतराने जागतिक स्तरावर लोकप्रिय होत गेला. आपल्याकडे तर सत्तरच्या दशकात जितेंद्र आणि लीना चंदावरकर यांच्यावर चित्रित झालेले ‘ढल गया दिन, हो गयी शाम…’ हे बॅडमिंटन खेळतानाचे सिनेगीत प्रसिद्ध झाले होते. परंतु मैदानी यशाची खरी चव ही प्रकाश पदुकोण यांच्यामुळे भारतीय बॅडमिंटनने चाखली. पदुकोण यांनी सर्वप्रथम बॅडमिंटन प्रशिक्षणाला दिशा दिली. प्रशिक्षक यू. विमल कुमार यांना साथीला घेत पदुकोण यांनी बॅडमिंटन अकादमीची निर्मिती केली आणि हेच या खेळातील पहिले बंड ठरले. त्या काळातील ही पायाभरणी दूरदर्शी असली, तरी कालांतराने त्यातील मर्यादा स्पष्ट होत गेल्या. पदुकोण अकादमीने बॅडमिंटनपटूंची कारकीर्द आणि आयुष्य यांकडे पुरेशा गांभीर्याने पाहिले नाही, असे निरीक्षण लेखक नोंदवतात.

पण पुलेला गोपीचंद यांनी अकादमीची निर्मिती करताना अनुभवी आणि भारताचे प्रतिनिधित्व करणाऱ्या बॅडमिंटनपटूंना विश्वासात घेण्याचा प्रयत्न केला. यांपैकी काही जणांना त्यांचे महत्त्व पटले नाही, पण तरीही गोपीचंद यांनी निर्धारपूर्वक राष्ट्रीय शिबिराच्या रचनेत बदल केले. मग अकादमीत गुरुकुल पद्धतीप्रमाणे शिष्टाचार राबवले. पहाटे ५ वाजता सरावाला प्रारंभ करायचा आणि दैनंदिन मार्गदर्शिकेचे पालन करीत रात्री १०.३० वाजता झोपायचे, अकादमीत दाखल झाल्यावर मोबाइल वज्र्य, आदी सारे गोपीचंद प्रशिक्षण पद्धतीचे नियम. ऑलिम्पिकच्या तयारीवेळी गोपीचंद यांनी तब्बल तीनेक महिने पी. व्ही. सिंधूचा मोबाइल जप्त केला होता. इतकेच नव्हे, तर घरापासून दुरावा नको म्हणून अनेक बॅडमिंटनपटूंनी हैदराबादलाच गृहखरेदी करून बस्तान बांधले. काहीशा कठोर वाटणाऱ्या या प्रशिक्षण पद्धतीनेच बॅडमिंटनला सुगीचे दिवस दाखवले. दोन ऑलिम्पिक पदके, नऊ जागतिक पदके आणि अनेक राष्ट्रकुल, आशियाई आणि सुपर सीरिजची पदके/विजेतेपदे यांची पुंजी भारताच्या खात्यावर या दोन दशकांतच जमा झाली. खेळाडूंच्या दिवसभराच्या मनोभूमिकेचा आढावा घेण्याच्या हेतूने एक ‘अ‍ॅप’ बनवून घेण्यासाठीही गोपीचंद सध्या प्रयत्नशील आहेत.

‘ऑल इंग्लंड’ जेतेपद मिळाल्यानंतर बक्षिसी म्हणून मिळालेल्या भूखंडावर गोपीचंद यांनी अकादमी सुरू केली. एकीकडे यशोमालिका सुरू असतानाही, सरकारकडून मिळालेल्या या भूखंडाबाबत नंतर गोपीचंद अकादमीचा न्यायालयीन लढा दीर्घकाळ चालू होता. त्याविषयी पुस्तकात तपशीलवार वाचायला मिळते. उत्तरार्धात भारतीय बॅडमिंटन संघटनेचा गोपीचंद यांच्याशी चिघळत चाललेला संघर्ष आणि त्यातून प्रशिक्षण पद्धतीत काळानुरूप बदलाची गरज, हा मथितार्थसुद्धा लेखकाने मांडला आहे.

अपर्णा पोपटने आपल्या कामगिरीने तारांकित वलय निर्माण केले खरे; पण ऑलिम्पिक कांस्यपदक विजेत्या सायना नेहवालच्या कामगिरीने भारतीय बॅडमिंटनमध्ये आमूलाग्र बदल झाले. सायनाचे युग हे जसे यशोप्रवर्तक होते, तसेच मुलांच्या हाती क्रिकेटच्या बॅटऐवजी बॅडमिंटन रॅकेट देण्याइतपत संस्कृतीप्रवर्तकही होते. २००८ मध्ये एका कंपनीच्या व्यवस्थापकाने आर्थिक मदतीसाठी गोपीचंद यांना सकाळपासून सायंकाळपर्यंत तिष्ठत ठेवले होते. पण सायनायुगामुळे या खेळाकडे पैशांचा ओघ सुरू झाला. २०१२ मध्ये सायनाने ऑलिम्पिक पदक पटकावले; मात्र २०१६च्या रिओ ऑलिम्पिकमध्ये आणखी एका पदकाच्या ईष्र्येने अतिसरावाचा फटका सायनाला बसला. दुखापतीमुळे तिला स्पर्धेतून माघार घ्यावी लागली. आता पुन्हा टोक्यो ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकण्यासाठी ती उत्सुक आहे.

सिंधू ही आंतरराष्ट्रीय व्हॉलीबॉलपटू पी. व्ही. रमणा यांची कन्या. उंचपुऱ्या सिंधूने मेहनत आणि सातत्यामुळे सायनाचा कित्ता गिरवला, किंबहुना ऑलिम्पिक रौप्यपदक आणि विश्वविजेतेपदाला गवसणी घालून सायनापेक्षा एक पाऊल पुढे टाकले. ‘क्रिकेटव्यतिरिक्त अन्य क्रीडा प्रकारांमधील सर्वाधिक कमाई करणारी क्रीडापटू’ म्हणूनही ‘फोब्र्स’ या प्रसिद्ध नियतकालिकाने सिंधूचा गौरव केला आहे. तर… या यशाने भारतीय बॅडमिंटनच्या अर्थकारणाने उच्चांक गाठले. सायना-सिंधू यांच्या या कामगिरीचा आलेख मांडताना त्यांची एकमेकींशी निर्माण झालेली स्पर्धा, त्यांचे अहंकार, त्यातून स्वतंत्र सरावाचा निर्णय, गोपीचंद सरावाला वेळ देत नसल्याच्या तक्रारी, सायनाचा अकादमी सोडून पदुकोण अकादमीत जाण्याचा निर्णय, सिंधूच्या वडिलांचा आततायीपणा हे सारे प्रसंग रेखाटताना लेखकातील क्रीडा पत्रकार दिसून येतो.

ज्वाला गट्टा आणि अश्विनी पोनप्पा यांनी २०११ मध्ये महिला दुहेरीचे कांस्यपदक मिळवून भारतीय बॅडमिंटनला जागतिक दरवाजे खुले केले, पण तरीही दुहेरी प्रकाराला आपल्याकडे कायम सापत्न वागणूक मिळत गेली. बंडखोर विचारसरणीच्या ज्वालाने गोपीचंद आणि संघटनेला अनेकदा धारेवर धरले. बक्षीस रकमेतील तफावत आणि दुय्यम वागणूक याविरोधात तिला कायम लढा द्यावा लागला. एकेरीसाठी आलिशान कार इनाम देण्याच्या कार्यपद्धतीवरही तिने टीका केली. महिला, पुरुष आणि मिश्र दुहेरीच्या मार्गातील खाचखळगे आणि समन्वय या पुस्तकात विस्तृतपणे स्पष्ट होतात. याचप्रमाणे ज्वाला-अश्विनीची जोडी कशी निर्माण झाली, त्यासाठीची रणनीती; तसेच सात्त्विकसाईराज रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टी यांच्यात दुहेरीची जोडी जुळावी यासाठी परदेशी प्रशिक्षकाने दोघांना किमान एक वेळचे एकत्रित भोजन, एकाच खोलीत निवास असे केलेले प्रयोग- यांविषयीच्या पुस्तकातील तपशिलांतून मैदानी कामगिरीच्या पल्याडच्या मानसशास्त्राचे दर्शन घडते. याशिवाय अनेक खेळाडूंच्या कामगिरीचे शास्त्रीय विश्लेषणसुद्धा लेखकाने केले आहे.

सायनाच्या यशामुळे २०१३-१४ पासून वयोगटांच्या स्पर्धांमधील सहभागी खेळाडूंचा आकडा विस्तारू लागला. महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, तेलंगणा, कर्नाटक आणि केरळ या राज्यांच्या खेळाडूंचा यात प्रामुख्याने समावेश होता. गेल्या पाच वर्षांत पुरुष एकेरीतही भारतीय बॅडमिंटनपटू छाप पाडत आहेत. पारुपल्ली कश्यप, किदम्बी श्रीकांत, बी. साईप्रणीथ, एच. एस. प्रणॉय, अजय जयराम यांनी जेतेपदांसह जागतिक क्रमवारीतही मुसंडी मारल्याचे स्पष्ट होते. उदयोन्मुख युवा खेळाडू लक्ष्य सेनची कामगिरीसुद्धा भविष्याविषयी आशा दाखवत आहे.

स्वातंत्र्यपूर्व काळापासूनचे भारतीय बॅडमिंटनमधील स्थित्यंतर लेखकाने मांडले आहे. त्यामुळे हे पुस्तक पुढील अनेक वर्षे संदर्भ म्हणून उपयुक्त ठरेल. परंतु म्हणून यात केवळ जंत्रीच वाचायला मिळेल असे कोणास वाटेल, मात्र ते चूक ठरेल. लेखक केवळ बॅडमिंटनपटूंचे उल्लेख करून थांबत नाही, तर त्या त्या बॅडमिंटनपटूची कारकीर्द, त्याची/तिची ‘गोष्ट’सुद्धा सांगतो. उदाहरणार्थ, सत्तरच्या दशकातील गाजलेली बॅडमिंटनपटू दमयंती तांबेचे पती १९७१च्या भारत-पाकिस्तान युद्धात बेपत्ता झाले, त्यामुळे तिची यशस्वी कारकीर्दच कशी संपुष्टात आली किंवा राजीव बग्गाने बहिरेपणावर मात करीत आपली कारकीर्द कशी घडवली, याची कहाणी पुस्तकात वाचायला मिळते. याशिवाय कंवल ठाकर सिंह, दिनेश खन्ना, सय्यद मोदी, दीपंकर भट्टाचार्जी, शुभंकर डे, अरविंद भट, चेतन आनंद आदी अनेक खेळाडू आणि प्रशिक्षकांच्या लघुकथा पुस्तकात शब्दबद्ध केल्या आहेत. याचप्रमाणे उत्तम खेळूनही उपेक्षा वाट्याला आलेल्या खेळाडूंच्या कारकीर्दीचाही आढावा घेतला आहे. नव्या पिढीचा उदय, बदलता दृष्टिकोन, आव्हाने आणि वाटचाल ही उत्तरार्धातील प्रकरणे भारतीय बॅडमिंटनचे भविष्य आणि त्यातील त्रुटी इत्थंभूत मांडतात.

जागतिक बॅडमिंटन स्पर्धांच्या बक्षीस रकमांनी कधीच टेनिसशी स्पर्धा केली नाही. मात्र गेल्या काही वर्षांत जागतिक बॅडमिंटन महासंघाने जागतिक बॅडमिंटन मालिकेतील १२ स्पर्धा सुरू केल्या. यात वर्षाअखेरीस जागतिक मालिकेचा अंतिम टप्पाही समाविष्ट करण्यात आला. आशियाई देशांमध्ये बॅडमिंटन अधिकाधिक लोकप्रिय होत आहे, पण तरीही पैशांची चणचण संपलेली नाही. १९८३ नंतर जागतिक कांस्यपदक जिंकणारा पहिला खेळाडू ठरूनही साईप्रणीथला आर्थिक साहाय्यासाठी वणवण करावी लागते. त्यामुळे अनेक खेळाडू हे पेट्रोलियम कंपन्यांमधील नोकऱ्या आणि सरकारी मदतीवर विसंबून आहेत. ‘द प्रीमियर बॅडमिंटन लीग’ या प्रकरणात लीगचे नामांतरण, अर्थकारण, राजकारण आणि न्यायालयीन लढाया यांचा वेध घेताना भवितव्यापुढे अनिश्चिततेचे सावट पसरलेल्या या लीगचे समर्पक विश्लेषणही लेखकाने केले आहे. पुस्तकाच्या शेवटी ऑलिम्पिक, जागतिक अजिंक्यपद, थॉमस-उबेर चषक, राष्ट्रकुल, आशियाई, सुपर सीरिज आदी सर्व स्पर्धांमधील भारतीय बॅडमिंटनपटूंनी पटकावलेल्या पदकांची सांख्यिकी दिली आहे.

काही दशकांपूर्वी भारतीय बॅडमिंटनपटूंच्या संघर्षमय पराभवांचेसुद्धा कौतुक व्हायचे; परंतु ऐंशीच्या दशकात प्रकाश पदुकोण यांच्या रूपाने भारतीय बॅडमिंटनला पहिले मोठे यश अनुभवता आले. त्यानंतर दोन दशकांनी असे यश पुलेला गोपीचंदने मिळवले. पण सध्याच्या पिढीतील भारतीय बॅडमिंटनमधील तारे नवी शिखरे पादाक्रांत करीत असतात, ही ‘गोपीचंद फॅक्टर’चीच किमया आहे. चीन, इंडोनेशिया, कोरिया, जपान या देशांना आव्हान देत आज भारत जागतिक बॅर्डंमटन नकाशावर महासत्ता बनू पाहात आहे. पण ही वाटचाल सोपी मुळीच नाही, हेच लेखकाचे सांगणे आहे.

prashant.keni@expressindia.com