‘शब्दांचे अर्थ काही केवळ शब्दकोशात नसतात’ असे म्हणणाऱ्या लक्ष्मी होल्मस्ट्रोम या तमिळ साहित्याचे इंग्रजी अनुवाद करण्यासाठी प्रख्यात असल्या, तरी ६ मे रोजी त्यांचे निधन झाल्यानंतर अनुवादकलेच्या तत्त्वचिंतक म्हणून त्यांची ओळखही नव्याने करून घ्यायला हवी. लक्ष्मी यांनी अनुवादित आणि संपादित केलेले ‘द इनर कोर्टयार्ड’ हे स्त्री-कथांचे पुस्तक १९९० मध्ये ‘पेंग्विन’ने काढले, तेव्हापासून आजवर त्यांनी अनुवादिलेली १७ पुस्तके प्रकाशित झाली आहेत. ही पुस्तके वाचकांच्या साथसंगतीला असतीलच, पण लक्ष्मी यांनी वेळोवेळी अनुवादांविषयी केलेले लिखाण अद्याप ग्रंथरूपाने प्रकाशित झालेले नाही. अनेकदा वृत्तपत्रांना दिलेल्या मुलाखतींतून किंवा अनुवादकलेविषयीच्या परिसंवादांतून तसेच मार्गदर्शनपर सत्रांतून त्यांनी व्यक्त केलेले विचार, हे आता सूत्रहीन माळेतील मोत्यांप्रमाणे विखुरले आहेत. हे मोती, अनेक अनुभवांच्या शिंपल्यांमध्ये तयार झाले.. तमिळ आणि इंग्रजी या भाषा जणू शिंपल्याच्या दोन पंखांप्रमाणे अभेद्य असाव्यात, असे लक्ष्मी यांची व्याख्याने ऐकताना किंवा त्यांची पुस्तके वाचताना वाटे.
तमिळमधील अंबाईसारख्या स्त्री-लेखिकांना लक्ष्मी यांच्या अनुवादांमुळे इंग्रजीचा प्रकाश दिसला. अंबाई यांच्या कथासंग्रहांचे अनुवाद लक्ष्मी यांनीच केले. तमिळ कवींच्या कविता समकालीन आहेत, त्या केवळ प्रादेशिक अनुभवाच्या नसून जागतिक स्थितीचा एक पैलू दाखविणाऱ्या आहेत, हे लक्ष्मी यांनी कवितांच्या केलेल्या अनुवादांमुळे इंग्रजीभाषक जगाने ओळखले. अगदी अलीकडे, श्रीलंकेतील तमिळ कवींच्या कविताही लक्ष्मी यांनी अनुवादित केल्या.
अनुवाद कधी एका भाषेच्या भल्यासाठी करायचा नसतो. ज्यातून अनुवाद केला आणि ज्या भाषेत अनुवाद झाला, त्या दोन्ही भाषांना काही ना काही लाभ अनुवादामुळे होत असेल, पण आदानप्रदान सुरू राहणे आणि साहित्यसंवादाचे पूल बांधले जाणे हा अनुवादांचा महत्त्वाचा हेतू आहे, असे लक्ष्मी म्हणत. ‘आजकाल ललित साहित्य – फिक्शन- फारसे वाचले जात नाही असा तक्रारीचा सूर ऐकू येतो.. तरीही फिक्शनचे अनुवाद मात्र सुरूच असतात, ते वाढत असताना दिसतात आणि त्यांना प्रतिसादही मिळतो आहे.. म्हणजे, एकमेकांशी परिचय नसताना एकमेकांच्या गोष्टी, व्यथा आणि कथा ऐकण्यातला लोकांचा रस आजही कमी झालेला नाही’ हे त्या सांगत तेव्हा वार्धक्याकडे झुकलेली ही मूर्ती जगण्यात इतका रस कसा काय घेते, हा समोरच्याने न विचारलेला प्रश्नसुद्धा आपोआप सुटून जाई!
लक्ष्मी यांचे अनुवादविषयक विचार निगुतीने संकलित होणे, ही त्यांना खरी आदरांजली ठरेल.