भारतीय समाजाने, येथील विचारविश्वाने आचार्य वात्सायनांवर मोठाच अन्याय केला आहे. एखाद्या विचारवंताला, तत्त्वज्ञाला असे उपेक्षेच्या सुळावर चढविले, त्याच्या साहित्याचा लगदा केला म्हणून त्याचे फार काही नुकसान होत नसते. ते सहन करावे लागते समाजाला. आज संपूर्ण समाजवाढीस लागलेली असहिष्णुता, आचार-विचार-उच्चार यांवर लादण्यात येत असलेली सेन्सॉरशिप हे सहन करीत आहे. या काळाला आचार्य वात्सायनांची, त्यांच्या कामसूत्राची आठवण करून देण्याची गरज आहे असे त्यांना वाटले. त्यातून त्यांनी ‘द मेअर्स ट्रॅप- नेचर अ‍ॅण्ड कल्चर इन द कामसूत्र’ हे पुस्तक साकारले.
भारतीय परंपरेत काम हा एक पुरुषार्थ मानण्यात आला आहे. याच परंपरेत काम हा देव मानण्यात आला आहे. ही परंपरा अगदी सिंधू संस्कृतीपर्यंत न्यायची, तर तेथेही िलगाची पूजा केली जात होती. िलग वा योनीपूजा हा यात्वात्मक वैचारिकतेचा भाग झाला हे मानले तरी त्यातून एक बाब स्पष्ट होते की काम ही तेव्हा काही तिरस्करणीय बाब नव्हती. अश्वमेध यज्ञातील नाटिकेत अत्यंत अश्लील असे संवाद आहेत. पुढे आपण आपल्या नित्याच्या सवयीनुसार त्या स्वच्छ उघडय़ा-नागडय़ा संवादांचा अर्थच बदलला आणि त्यात अश्लील वगरे काहीही नसून, किती छान अध्यात्म सांगितले आहे हे जगास सांगत सुटलो. हे न्यूनगंडातून घडले आहे. आपल्या पूर्वजांनी असे कसे अश्लील आणि घाणेरडे लिहून ठेवले आहे. ते वाचून लोकांना काय वाटेल, याची लाज वाटण्यातून घडले आहे. बंगाल रेनेसाँ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या काळात तर जणू असे तेव्हाच्या व्हिक्टोरियन नतिक कल्पनांच्या विपरीत असलेल्या सगळ्या गोष्टींवर आपले धार्मिक नेते रंगसफेदीच करीत सुटल्याचे दिसले. पण भारतात ब्रिटिश वा तत्पूर्वी मुघल आले आणि त्यामुळे आमच्या नतिकतेला पडदे आले असे म्हणून चालणार नाही. ते अर्धसत्य ठरेल.
याचे कारण तत्पूर्वीच आपण इंद्रियदमन, संन्यास, वैराग्य, मायामोह यांपासून मुक्ती, ब्रह्मचर्य अशा आध्यात्मिक कल्पनांच्या आहारी जाऊन एक अख्खा पुरुषार्थच वगळण्याचा प्रयत्न केला होता. त्यातून आपण संपूर्ण समाजच्या समाज दुभंग व्यक्तिमत्त्वाचा करून टाकला. काम तर सोडता येत नाही. मदनबाण काही चुकवता येत नाही. मनातल्या भावना दडपता येत नाहीत. पण त्या दडपल्या नाहीत तर तुम्ही पापी ठरता. का? तर धर्माने तसे सांगितले आहे. श्रुती, स्मृती, इतिहास, पुराणे यांच्या विरोधात येथे आगम तत्त्वज्ञान उभे राहिले ते या दडपशाहीचीच प्रतिक्रिया म्हणून हे एकदा नीट लक्षात घेतले पाहिजे. अभिनव गुप्त हा दहाव्या शतकातला तत्त्वज्ञ. तो जेव्हा सांगतो की रतिक्रीडेचा आनंद आणि मोक्षाचा आनंद यांची जात एकच आहे, तेव्हा ते तोवरच्या सर्व इंद्रियदमनाच्या तत्त्वज्ञानाविरोधातील बंड असते हे समजून घेतले पाहिजे. हा अभिनव गुप्त म्हणजे सर्व भारतभरच्या शैव परंपरेतला सर्वाना वंदनीय असणारा असा आचार्य आहे. या भूमीत मद्य, मांस, मत्स्य, मुद्रा आणि मथुन हे पंच म-कार मानणारा तंत्रमार्ग फोफावला, त्याचे कालमुख, पाशुपत, कापालिक, लकुलिश, गाणपत्य, शाक्त, भरवनाथ असे संप्रदाय निर्माण झाले. बौद्ध धर्मातही तो प्रतिष्ठा पावला. याचे कारण काम या पुरुषार्थाची परंपरेच्या मुख्य प्रवाहाने केलेली उपेक्षा.
ती एवढी घोर होती, की धर्म, अर्थ आणि काम या तीन पुरुषार्थापकी धर्म आणि अर्थाचे शास्त्र सांगणारे ग्रंथ आपण पूजतो. मनुस्मृती, कौटिल्याचे अर्थशास्त्र अनेकांच्या ग्रंथसंग्रहाची शोभाही वाढवीत असेल. मात्र त्यात कामाची महती गाणारे वात्सायनाचे कामसूत्र नसेल. जेथे कामसूत्राची ही गत तेथे कवी कुक्कोकांचे रतिरहस्य (अर्थात कोकशास्त्र), ज्योतिरिशांचे पंचशक्य, कल्याणमल्लांचे अनंगरंग, जयदेवांचे रतिमंजिरी यांसारख्या ग्रंथांची तर गोष्टच निराळी. किंबहुना हे सर्व ग्रंथ म्हणजे तमाम भारतीयांच्या दृष्टीने पिवळी पुस्तके. ती लपूनछपून वाचायची आणि मित्रांमध्ये त्याबद्दल खुदुखुदु हसत कुजबुजत्या आवाजात चर्चा करायची. लैंगिकता म्हणजे पाप या कल्पनेच्या अमिट पगडय़ाातून हे घडते. ख्यातकीर्त अमेरिकी विदुषी वेंडी डोनिगर यांची खंत हीच आहे. भारतीय समाजाने, येथील विचारविश्वाने आचार्य वात्सायनांवर मोठाच अन्याय केला आहे. एखाद्या विचारवंताला, तत्त्वज्ञाला असे उपेक्षेच्या सुळावर चढविले, त्याच्या साहित्याचा लगदा केला म्हणून त्याचे फार काही नुकसान होत नसते. ते सहन करावे लागते समाजाला. आज संपूर्ण समाज- वाढीस लागलेली असहिष्णुता, आचार-विचार-उच्चार यांवर लादण्यात येत असलेली सेन्सॉरशिप हे सहन करीत आहे. या काळाला आचार्य वात्सायनांची, त्यांच्या कामसूत्राची आठवण करून देण्याची गरज आहे असे त्यांना वाटले. त्यातून त्यांनी ‘द मेअर्स ट्रॅप- नेचर अ‍ॅण्ड कल्चर इन द कामसूत्र’ हे पुस्तक साकारले.
डोनिगर यांच्या मते मनुस्मृती आणि कौटिल्याचे अर्थशास्त्र यांच्याप्रमाणेच नव्हे, तर त्यांच्या बरोबरीने वात्सायनांचे कामसूत्र महत्त्वाचे आहे. एके काळच्या समाजाला हे पटलेले होते. डोनिगर यांच्या प्रस्तावनेत भवभूतीच्या (हा संस्कृतमधला महान कवी. तो महाराष्ट्रातल्या गोंदियाचा.) मालतीमाधवातील एका प्रसंगाचा उल्लेख येतो. त्यात एक तरुणी आपल्या मत्रिणीशी एकांतात गप्पा मारत आहे. मधुचंद्राच्या रात्री पतीने आपल्यावर बळजोरी केल्याचे ती सांगते. त्यावर दुसरी तरुणी सहजच कामसूत्रातील एक श्लोक उद्धृत करते. पुरुषाने आपल्या पत्नीशी हळुवारपणे रत व्हावे, नाही तर तिच्या मनात संभोगाबद्दल तिटकारा निर्माण होईल, असा इशारा देणारा तो श्लोक. डोनिगर सांगतात, हे वाचले आणि पूर्वीच्या काळात कामसूत्र किती परिचित होते, हे फिरून माझ्या लक्षात आले. नाटकातील एखाद्या नायिकेच्या मुखातही त्यातील श्लोक घालण्यात येत असेल तर ते निश्चितच लोकप्रिय असणार. कोणी रोज सकाळी उठून त्याचे पारायण करीत असेल असे नव्हे, पण ते अनेकांच्या वाचनात असणार. डोनिजर यांच्या मते मुघल काळापर्यंत ते सुपरिचित होते. त्या काळात त्याचे पíशयनमध्ये भाषांतर करण्यात आले होते. सुबक पíशयन चित्रकारीने सजविलेल्या त्याच्या पíशयन आणि संस्कृत प्रती नकलून काढण्यात येत होत्या.
याचे सर्वात महत्त्वाचे कारण म्हणजे कामसूत्र आपण समजतो तशी केवळ ६४ आसनांची माहिती देणारी, लैंगिक भावना चाळवणारी रचना नाही. पण तो ओळखला जातो तो अशक्य, तिरपागडी आणि म्हणून हास्यास्पद संभोगासने करणारा ग्रंथ म्हणूनच. याला काही अंशी जबाबदार आहेत ते सर रिचर्ड बर्टन यांनी केलेले कामसूत्राचे भाषांतर. ते पाश्चात्त्य देशांत मोठय़ा प्रमाणावर वाचले जाते. लोक ते गमतीने वाचतात. डोनिजर सांगतात, बर्टन यांचे भाषांतर, त्याची पद्धतीच मुळात चुकीची आहे (हे भाषांतर बर्टन यांच्या नावावर खपत असले, तरी ते एकटय़ा त्यांचे नाही. ते फॉस्टर फित्झेराल्ड अरबट्नॉट यांच्याबरोबरच काही भारतीय पंडितांचे आहे. त्यातील एक नाव आहे भगवानलाल इंद्रजीत यांचे आणि दुसरे आहेत शिवराम परशुराम भिडे. या सगळ्यांनी मिळून हे भाषांतर साकारले आहे.). त्यात समजुतीच्याच चुका आहेत.
मुळात हा काम या पुरुषार्थाचा गौरव करणारा ग्रंथ आहे. त्यात सामाजिक आशय आहे. प्रस्थापित धार्मिक आणि नतिक मूल्यांविरोधातील बंड आहे. स्त्री, पुरुष, तृतीयपंथी, समलैंगिक या सर्वाच्या कामजीवनाचा सहानुभूतीपूर्वक विचार आहे. यातील विशेष अशी बाब म्हणजे, डोनिजर सांगतात, हा ग्रंथ जेवढा पुरुषांसाठीचा आहे, तेवढाच तो स्त्रियांसाठीसुद्धा आहे. एकीकडे मनुस्मृती आणि सर्वच धर्मशास्त्रे स्त्री स्वातंत्र्याची अधिकारी नाही, असे सांगत असताना वात्सायन मात्र स्त्रियांना आपल्या आवडत्या पुरुषांशी लैंगिक क्रीडांचेही स्वातंत्र्य देत आहेत. अपत्यप्राप्ती हाच संभोगाचा हेतू असे धर्मशास्त्रे आणि पुराणे लोकमानसावर ठसवत असताना वात्सायनांचे कामसूत्र संभोगातील आनंदाची वृद्धी कशी करावी याचे शास्त्र सांगत आहे. अपत्यप्राप्ती आणि संभोग यांचा संबंध तोडण्याचाच हा प्रयत्न आहे. यातून लैंगिकदृष्टय़ा स्वतंत्र आणि सुजाण नागरिक हा त्याच्या नजरेसमोरील समाजाचा अविभाज्य भाग दिसतो आहे. वात्सायनासमोरील हा समाज श्रेष्ठींचा, धनाढय़ांचा आहे. तो नागरिकांचा उल्लेख करतो. ते शहरी आहेत आणि श्रीमंतही. त्यांना दिलेल्या सल्ल्यांमधून आपल्यासमोर जणू तत्कालीन तृतीयपर्णी संस्कृतीच उभी राहते. अशी संस्कृती जी लैंगिक विचारांनी पूर्णत: सेक्युलर आहे. मनु असे व्यवहार करणारांना दंड सांगतो आहे. अर्थशास्त्र व्यभिचाराला शिक्षा फर्मावत आहे आणि वात्सायन त्यांच्याविरोधात उभे राहात आहेत, असे हे तेव्हाचे चित्र आहे.
आजच्या समाजाने ते स्वीकारावे का, हा खरा प्रश्न आहे. डोनिजर यांच्या पुस्तकलेखनाचा हेतू वात्सायनाचे साहित्य-संस्कृतीतील योग्य स्थान लोकांच्या नजरेस आणून देण्याचा आहे. सवाल ते करण्यामागील उद्दिष्टांचा आहे. वात्सायन आज वाचायचा तो व्यभिचार कसा करावा हे शिकण्यासाठी? डोनिजर यांचे मत वेगळे आहे. हा ग्रंथ वाचायचा तो आपल्या पूर्वजांची व्यापक, बंधनातीत दृष्टी समजून घेण्यासाठी. कामभावनेबाबतच्या गरसमजुतींनी आपले वैचारिक अवकाश भरलेले आहे. दुसरीकडे समाजात आज जी जी लैंगिक मोकळीकता दिसते, स्त्रियांच्याही लैंगिक अधिकारांबाबत जागरूकता निर्माण होत आहे, समलैंगिकांनाही जगण्याचा हक्क देण्याची चर्चा होत आहे त्याला पाश्चात्त्यांचा प्रभाव कारणीभूत असल्याचे सांगितले जात आहे. हाही अर्थातच गरसमज.
पाश्चात्त्यांचा खरा कोणता प्रभाव आपल्या समाजाने मुरवला असेल, तर तो नतिक कोतवालीचा, सेन्सॉरशिपचा. या सगळ्या गरसमजुतींपासून येथील समाजमन मोकळे करायचे असेल तर त्याला आपल्या या प्राचीन वारशांची खरी ओळख झाली पाहिजे- तीही इतिहासाचे पुनल्रेखन होण्याच्या आत. डोनिजर यांच्या पुस्तकलेखनाचा हा खरा हेतू दिसतो. समाजाला कामाबद्दल मोकळे, बोलते करण्याचा. समाजमन विकृत बंधनांतून मोकळे करण्याचा. येथील या विकृत बंधनांचा परिणाम त्यांनी आपल्या एका पुस्तकावरील सेन्सॉरशिपच्या रूपाने स्वत: भोगला आहे. त्यामुळे या पुस्तकलेखनाला एक वेगळीच धार आली आहे. ती अनुभवतानाच वात्सायनाच्या कामसूत्राचा खरा अर्थ समजून घेणे हा मोठा छान अनुभव आहे.
ravi.amale@expressindia.com