‘रिसर्च सोसायटी फॉर व्हिक्टोरिअन पीरिओडिकल्स’ (आरएसव्हीपी) ही ब्रिटनमधील संस्था. यंदा ही संस्था पन्नाशीत प्रवेश करते आहे. एकोणिसाव्या शतकातील वर्तमानपत्रे, नियतकालिके, पत्रके अशा सर्व प्रकारच्या छापील साधनांचा अभ्यास, त्यावर संशोधन करणे हे तिच्या कामाचे स्वरूप. एकोणिसाव्या शतकातील छापील साहित्यावर संशोधनपर ग्रंथलेखनाला गेल्या काही वर्षांपासून संस्थेकडून पुरस्कारही दिला जातो. ‘द रॉबर्ट अॅण्ड विनेता कॉल्बी स्कॉलरली बुक प्राइज’ हा तो पुरस्कार. बातमी त्या पुरस्काराचीच आहे.
या वर्षीचा पुरस्कार अलीकडेच जाहीर करण्यात आला. यंदा ‘द रुटलेज हॅण्डबुक टू नाइन्टीन्थ सेंच्युरी ब्रिटिश पीरिओडिकल्स अॅण्ड न्यूजपेपर्स’ या पुस्तकाची निवड या पुरस्कारासाठी करण्यात आली आहे. अण्ड्रय़ू किंग, अॅलेक्सीज इजले व जॉन मॉर्टन यांनी संपादित केलेल्या या पुस्तकात एकोणिसाव्या शतकातील नियतकालिकांचा अभ्यासपूर्ण आढावा घेण्यात आला आहे. ते करताना ब्रिटनमधील मुद्रण व्यवसायाचे उत्तर अमेरिका, युरोप, ऑस्ट्रेलिया व आशियाई मुद्रण व्यवसायाशी असणारे दुवेही जोडण्याचा प्रयत्नही यात करण्यात आला आहे. त्यामुळे एकोणिसाव्या शतकातील साहित्यात रस असणाऱ्यांसाठी हे पुस्तक पर्वणी ठरणारे आहे.
भारतात, विशेषत: महाराष्ट्रासाठीही हा काळ छापील माध्यमाशी ओळख होण्याचा होता. जांभेकरांपासून गुंजीकर, चिपळूणकर, पुढील काळात टिळक, आगरकरापर्यंत अनेकांचे लेखन अशाच नियतकालिकांतून झाल्याचे दिसते. या नियतकालिकांनी महाराष्ट्रात प्रबोधनाची प्रक्रियाच सुरू करून दिली. त्यामुळे हे सारे लेखन महत्त्वाचे ठरते. या लेखनावर अ. का. प्रियोळकर, गं. बा. सरदार यांसारख्या संशोधक-विचारकांनी संशोधनपर लेखनही केले आहे. परंतु तसे लेखन अलीकडच्या काळात मराठीत फारसे होत नसल्याचेच चित्र दिसते आहे. अशा वेळी आरएसव्हीपी व त्यांच्याकडून दिल्या जाणाऱ्या कॉल्बी पुरस्काराची महत्ता अधोरेखित करण्याजोगीच आहे.