माणसाला मिळणारे संस्कार जगातील अन्य सजीवांना मिळाले असते, तर माणूस आणि अन्य जीव यांच्यातील संघर्षांची मुळे किती तरी कमी झाली असती. ‘प्राण्यांवर दया करा’ अशी शिकवण माणसांना मिळू लागल्यापासून, जगातील अनेक सजीवांना नाहक मारू नये, अशी जाणीव तरी माणसाच्या मनात जागी झाली. अशी शिकवण प्राण्यांना मिळाली असती, तर प्राण्यांकडून नाहकपणे होणाऱ्या माणसांच्या हत्यादेखील कमी झाल्या असत्या. अर्थात, अशी शिकवण मिळूनदेखील प्रत्येक प्राणी तसे वागलाच असता, असेही नाही. तसे असते, तर ते माणसापेक्षा वेगळेपण ठरले असते. माणूस आणि अन्य सजीव यांच्यात मुख्य फरक हाच तर आहे. माणूस विचार करू लागला, तेव्हापासून, त्या विचारांची देवाणघेवाणही सुरू झाली आणि लेखन, वाचन हे त्याचे प्रमुख माध्यम बनले. वाचनातून विचारांना चालना मिळते आणि मनावरही संस्कार घडतात. अन्य सजीवांना ही संधी मिळालेली नाही. हे त्यांचे सुदैव की दुर्दैव हा एक वेगळा मुद्दा! पण वाचन हा माणसाच्या मनाचा दागिना ठरला हे खरे. म्हणूनच, जेव्हा जेव्हा समाजप्रबोधनाच्या मोहिमा आखल्या जातात आणि निधीच्या थैल्यांची तोंडे मोकळी होतात, तेव्हा मोहिमेचा पहिला भाग म्हणून भित्तिपत्रके, पोस्टर, जाहिरात फलकांचा आधार घेतला जातो. वाचनातून तरी शहाणपण यावे, आणि ‘जनजागरण’ व्हावे हा त्यामागचा पहिला विचार असला तरी, ‘मलिद्याचे माध्यम’ म्हणूनही अनेक मोहिमा राबविल्या जात असतात. अशी मोहीम आखली गेली, की गुळगुळीत कागदांवर रंगीबेरंगी चित्रांसोबत, ‘काय करावे, काय करू नये’, याची वर्णने छापली जातात. मोहिमांचा हेतू साध्य व्हावा हा त्यामागचा हेतू असला, तरी तो साध्य होतो की नाही हे प्रश्नचिन्ह मोहिमा संपल्यानंतरही मागे राहतेच. अशा वेळी, माणसांबरोबरच अन्य सजीवांनादेखील वाचनाची कला अवगत असती, तर या मोहिमा संयुक्तपणे पार पाडून यशस्वी करता आल्या असता, असा अशक्य विचारदेखील मनात येऊ शकतो. मुंबई महापालिकेने डेंग्यूचा फैलाव रोखण्यासाठी डासांची चित्रे असलेले हजारो, लाखो फलक गल्लोगल्ली लावले. त्यासाठी लाखो रुपये खर्च केले. डासांना वाचता आले असते, तर हे फलक पाहून त्यांनी तातडीने घर गाठले असते. मुलाबाळांना तंबी दिली असती, आणि माणसांच्या वस्तीत फिरकू नका असा फतवाही काढला असता. पण ‘वाचायला’ येत नसल्यामुळे डासांच्या झुंडी ‘चावा’ घेण्यासाठी दबा धरून बसलेल्याच आहेत. आपल्या चावण्यामुळे माणसाला ‘डेंग्यू’ होणार की ‘मलेरिया’ याची त्या डासांना कल्पना असते किंवा नाही, याबद्दलचे संशोधन झाल्याचे ऐकिवात नाही. पण माणसाला मात्र, डास चावल्याने काय होते हे पुरेपूर माहीत असतानाही, पालिकेच्या जनजागरण मोहिमांमध्ये लाखो रुपये ओतूनही डेंग्यूचा फैलाव मात्र सुरूच आहे. डेंग्यू रोखण्यासाठी डासांचा प्रादुर्भाव रोखण्याची गरज असते. पण पालिकेने माणसांना न्यायालयात खेचण्याचा नामी उपाय शोधून काढला आहे. डेंग्यूचा डास आसपास आढळला, तर माणसांवर खटले भरण्याची ही पालिकेची ही अभिनव योजना डासांना समजणे शक्य नाही; पण तसे मानले, तर डासांच्या जगात आनंदोत्सव साजरे होतील यात शंका नाही. गुळगुळीत कागदांवर छापलेल्या तंबीचे फलक डासांना रोखू शकत नाहीत, तर त्यासाठी डास प्रतिबंधक उपाययोजनाच आवश्यक आहेत. पण पालिकेलाही सोनाराकडूनच कान टोचून घ्यायचे असतील, तर त्याला इलाजच नाही!