भाजपचे बुजुर्ग नेते लालकृष्ण अडवाणी हे स्वातंत्र्यानंतरच्या भारतीय राजकारणाचे मुरब्बी साक्षीदार आहेत. १९५२ पासून आजपर्यंत देशातील सर्व निवडणुका जवळून पाहिलेला आणि निवडणुकीच्या राजकारणात सक्रिय असलेला हा ८६ वर्षांचा नेता आता भाजपच्या राजकारणात आशीर्वादापुरता आणि सल्लागाराच्या भूमिकेपुरताच उरला आहे. स्वत: अडवाणीच या भूमिकेचे तंतोतंत पालन करताना दिसू लागले आहेत. उत्तुंग महत्त्वाकांक्षा बाळगणे हा गुन्हा नाही, पण त्या धुंदीमुळे फाजील आत्मविश्वासाचे आंधळेपण येऊ देऊ नका, असा सल्ला रविवारी अडवाणी यांनी भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणी बठकीत नरेंद्र मोदी यांना दिला. अडवाणी यांचे हे स्वानुभवाचे बोल आहेत, हेही तेथेच स्पष्ट झाले. गेल्या लोकसभा निवडणुका भाजपने अडवाणी यांच्या नेतृत्वाखाली लढविल्या. तेव्हा ते पक्षाचे पंतप्रधानपदाचे उमेदवारही होते. मात्र, पक्षाला सत्तेपर्यंत घेऊन जाणारे यश मिळविता आले नाही. त्याआधीच्या, २००४च्या निवडणुकीत तर भाजपला पर्याय नाही अशाच भ्रमात यच्चयावत पक्ष मश्गुल होता. ‘इंडिया शायिनग’चा फाजील आत्मविश्वास त्या वेळी पक्षाच्या अंगलट आला. नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली लढल्या जाणाऱ्या आगामी लोकसभा निवडणुकीसाठी पक्षाने जोरदार हवा तयार केली असली तरी त्या हवेत तरंगत राहू नये, हा सल्ला देताना अडवाणी यांच्या नजरेसमोर २००४ मधील वातावरण तरळत असणार. या फाजील आत्मविश्वासामुळेच अडवाणी यांचे पंतप्रधानपदाचे स्वप्नदेखील कायमचे अधुरे राहिले. पक्षाचे आणि पक्षाच्या मातृसंस्थेचे पाईक असलेल्या अडवाणी यांना ही सल पचविण्यासाठी अतोनात मानसिक संघर्ष करावा लागत असावा. देशातील सत्तापालटाची अनुकूल चिन्हे स्पष्ट दिसू लागलेली असतानाच, साठ वर्षांहूनही अधिक काळ संसदीय राजकारणात सक्रिय राहिलेल्या या नेत्याला आपले स्वप्न गुंडाळून ठेवणे भाग पडावे, हा खरे तर राजकीय दैवदुर्वलिस आहे. पंतप्रधानपदाची आपली संधी दुरावली आहे, पण देशात भाजपचे सरकार यावे, ही त्यांची पारदर्शक इच्छा आहे. त्यामुळेच अगोदरच्या निवडणुकांमधील अति आत्मविश्वासाची झूल पांघरून आगामी निवडणुका लढवू नका हा त्यांनी दिलेला इशारा राजनाथ सिंह आणि नरेंद्र मोदीपासून पक्षाच्या प्रत्येक कार्यकर्त्यांला भानावर आणण्यासाठी महत्त्वाचा ठरणार आहे. अटलबिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारच्या कारकिर्दीमुळे आता सत्ता कायम राहणार या विश्वासातून इंडिया शायिनगचे नारे देशभर घुमवत भाजपचे नेते देशभर प्रचार दौरे करीत होते, तरीही पराजयाचे सावट त्यांना जाणवलेच नव्हते. कारण, त्यांनी डोळ्यांना याच फाजील आत्मविश्वासाची झापडे लावून घेतली होती. निवडणुकांचा काळ जवळ आला, की वास्तविक नजरेने आपल्या राजकीय कर्तृत्वाचे मूल्यमापन करणे आवश्यक असते. अडवाणी यांच्यासारखा राजकारणात मुरलेला नेतादेखील इंडिया शायिनगच्या नारेबाजीमुळे दिपून गेला आणि वास्तवाचे भान विसरला. आता त्यांना याची जाणीव होणे एका अर्थाने साहजिकच आहे. पक्षानेच निर्माण केलेल्या मोदीप्रभावाच्या तेजाने सध्या भाजपमधील साऱ्यांचेच डोळे दिपून गेले आहेत. या बेभान अवस्थेत निवडणुकीचे राजकारण करणाऱ्या नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना अनुभवाचे शहाणपण शिकविण्याची भूमिका अडवाणी यांनी स्वीकारली हे योग्यच झाले. नरेंद्र मोदी यांच्या करिश्म्याने भारावून गेलेल्यांना भानावर आणण्यासाठी अडवाणी यांच्याइतका अन्य अधिकारी नेता पक्षात नाही. मोदी तेजाच्या प्रभावाखाली वावरणाऱ्यांनी अडवाणींच्या अधिकारवाणीचा प्रभाव मान्य केला, तर वास्तवाचे भान देणारी दृष्टी पक्षाला प्राप्त होईल.
संग्रहित लेख, दिनांक 21st Jan 2014 रोजी प्रकाशित
सल आणि सल्ला..
भाजपचे बुजुर्ग नेते लालकृष्ण अडवाणी हे स्वातंत्र्यानंतरच्या भारतीय राजकारणाचे मुरब्बी साक्षीदार आहेत. १९५२ पासून आजपर्यंत देशातील सर्व निवडणुका जवळून पाहिलेला
First published on: 21-01-2014 at 12:13 IST
मराठीतील सर्व अन्वयार्थ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bjp ignoring advani crowns narendra modi