पुस्तकं- त्यातही कथाकादंबऱ्या आणि सिनेमा अशा दोन्हींवर प्रेम करणाऱ्या एकाच्या या नोंदी.. अगदी व्हॅलेंटाइन दिनानिमित्तच; पण कथाकादंबऱ्यांतलं प्रेम कसं सिनेमाळलंय आणि नव्या सिनेमांनी अगदी अभिजात पुस्तकांनाही अर्वाचीनीकरणाच्या वाटेवर कसं नेलंय, ही नवी स्पंदनं टिपणाऱ्या नोंदी! इथं तक्रारीचा सूर अजिबात नाही.. म्हणजे थोडासा आहे, पण चांगली पुस्तकं आणि चांगले सिनेमे सोडून बाकीच्या गोष्टींपुरतीच ही तक्रार आहे!

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

तमाम मुर्दाड गोष्टींपासून फार फार दूर नेणाऱ्या रोमॅण्टिकांनी कुठल्याही भाषिक जगतामध्ये वाचकांची उभारणी केलेली दिसते. पण आजच्या हॉलीवूडी बाजाराच्या अक्राळविक्राळ रूपाने रोमॅण्टिका वाचकांच्या शिरगणतीत भलीमोठी वाढ झाली आहे. मग ते वाचक ‘ममी पोर्न’ म्हणून हिणविल्या जाणाऱ्या ‘फिफ्टी शेड्स ऑफ ग्रे’चे असोत किंवा जॉन ग्रीनच्या तरुण-तुर्की साहित्याचे. सरधोपट वळणांना कवटाळतच दशकोगणिक प्रेमचिंतनाच्या अतिरेकामुळे मध्यंतरी हॉलीवूडमध्ये रोमॅण्टिक कॉमेडीचा दुष्काळ आला होता. खूपविक्या (बेस्टसेलर) पुस्तकांनी त्या दुष्काळाला सुकर करण्याचा प्रयत्न केला. अलीकडच्या दशकांतील या पुस्तक-सिनेमाच्या साटय़ालोटय़ातून तयार झालेल्या वाचनप्रेमाविषयी आणि आजच्या वाचनजाणिवांविषयी हे लिहिणे आहे..
गेल्या दोन दशकांत जग इतके बदलले की जुन्या रोमॅण्टिकांच्या घिश्यापिटय़ा फॉम्र्युलाबद्ध सिनेमा अथवा पुस्तकांतील वर्णनदृश्ये कालबाहय़ झाली आहेत. उदाहरणार्थ, नायक-नायिकेच्या टकरीने हातून पडणाऱ्या पुस्तकांच्या गठ्ठय़ाला एकत्रित करताना नजरांच्या आदान-प्रदानाचा रिकामटेकडा उद्योग आजच्या पिढीला सर्वोत्तम प्रेमविनोद वाटेल. वर किंडल वा इतर मोबाइल गॅजेट हाती असलेल्या आजच्या नायक-नायिकेच्या टकरीतून तिरस्काराची देवाण-घेवाण नक्की होईल. नायकाने नायिकेला भेटणे, मग प्रेम, मग गैरसमजांची लाट, प्रेमाची अल्पकाळ वाट, शेवट मात्र निघण्याच्या वाटेवर असलेल्या रेल्वे, विमान अथवा कुठल्याशा वाहनांना रोखत करून (किंवा वाचक-प्रेक्षकांना पैसेवसुलीची हमी देणारा अन्य तत्समच प्रकार राबवून) गेल्या दोन-तीन दशकांतील रोमॅण्टिका लोकप्रिय झाल्या आहेत. (हॉलीवूडसोबत बॉलीवूडही यात अग्रभागी आहे. लंब्याचवडय़ा नावाच्या सिनेमांनी प्रेक्षकांची नस पकडतच जुन्या फॉम्र्युल्याची नव्याने महाविक्री केलीच की नाही?)
असे मानले जाते की, ‘व्हेन हॅरी मेट सॅली’ या चित्रपटाने हॉलीवूडच्या रोमॅण्टिकांना बदलाची दिशा निश्चित केली. हा चित्रपट कादंबरीवरून बेतला नसला, तरी हाडाची पत्रकार आणि पुढे कादंबरीकार म्हणून नाव कमावलेल्या नोरा एफरॉन नामक लेखिकेचीच ती निर्मिती होती. या सिनेमाने केले काय, तर फॉम्र्युल्यामधील घटनांना धक्का न लावता त्यांना मांडण्याची पद्धत बदलली, प्रेम-मैत्री-नातेसंबंध या विषयांना अनेक जणांच्या मुलाखतींमधून समोर आणले. १९८९ नंतरच्या जवळजवळ सर्वच सिने-पुस्तकी रोमॅण्टिकांनी या चित्रपटातून बरेच काही घेतले. (जेफ्री युजिनीसच्या व्हर्जिन सुसाइड कादंबरीमध्येही आणि त्यावर बेतलेल्या सिनेमामध्येही प्रेमकथा नसूनही याच फॉम्र्युल्याचा वापर झाला होता.)  ऑस्करच्या बाल्यावस्थेपासून (गॉन विथ द विंड) ते बाजारपेठकेंद्रित (स्लमडॉग मिलेनिअर वा क्यू अ‍ॅण्ड ए) रूप होईपर्यंत, इतकेच काय तर सिनेराजकारणाचे युग (लाइफ ऑफ पाय) येईपर्यंत दरवर्षी सवरेत्कृष्ट सिनेमाच्या नामांकनात किंवा सरशीत लोकमान्य पुस्तकांचीच रूपांतरे पुढे आहेत. यंदा वाचण्यास सर्वात कठीण समजल्या जाणाऱ्या ‘इनहरण्ट व्हॉइस’ या थॉमस िपचन यांच्या कादंबरीवरील पटकथेलाही नामांकनात मानाचे स्थान आहे.
पुस्तके आणि त्यांच्या लोकप्रियतेच्या निकषांवर तयार होणारे सिनेमे यांचा दर्जा व लोकप्रियता यांमध्ये बराच भेद असल्याचेही दिसून येते. पण याच काळात काही लेखकांना पुस्तक-सिनेमाच्या साटय़ालोटय़ाने फार मोठय़ा जागतिक पटलावर नेऊन ठेवले. जागतिकीकरणाचा फायदा लेखकांना आणि त्यांच्या पुस्तकांना झाला अशा लेखकांमध्ये पहिले नाव आहे, रोमॅण्टिका- फुटबॉलप्रेम आणि ब्रिटिश तरुणाईचे ‘पॉप कल्चर’मध्ये विरघळलेले रूप दाखविणाऱ्या निक हॉर्नबी या लेखकाचे. ‘हाय फिडेलिटी’ (१९९९) च्या हॉलीवूड रूपांतरानंतर या लेखकाच्या ‘फनी गर्ल’ (२०१५) कादंबरीपर्यंत लोकमान्यतेचा सूर्य ढळलेला नाही. इंटरनेटपासून सर्व पुस्तकव्यवहारांत सहज मिळणाऱ्या हॉर्नबेइतकाच आणखी एक लोकप्रिय लेखक आहे चक पाल्हानिक. माणसातल्या न-नायकत्वावर प्रेम करणाऱ्या व्यक्तिरेखांची अगोचर -बिनधास्त रूपे मांडणाऱ्या या अमेरिकी कादंबरीकाराचाही पुस्तकनिर्मितीचा प्रवाह ‘फाइट क्लब’ (१९९९) या सिनेमाच्या प्रसिद्धीनंतर आटलेला नाही. व्यसनांधतेच्या जगाला तात्त्विक बैठकीतून साकारणाऱ्या आयर्विग वेल्श या ब्रिटिश कादंबरीकाराची ओळखही डॅनी बॉयलच्या ‘ट्रेनस्पॉटिंग’ने उजळून निघाली. त्याच्या अवघड भाषिक हट्टाग्रहाला कुरवाळत जगभरातील वाचकांनी त्याला स्वीकारले. आज हारुकी मुराकामी या जपानी कादंबरीकाराइतकाच प्रचंड मोठा वाचकवर्ग या तिघा लेखकांना आहे. दुसऱ्या बाजूला रोमॅण्टिक कथालेखकांची पंगत निकोलस स्पार्क, जोजो मोयेस, डॅनियल स्टील, स्टीफनी मायर्स आणि जॉन ग्रीनसारख्या ‘यंग अ‍ॅडल्ट’ कादंबऱ्या लिहिणाऱ्या शेकडो कादंबरीकारांनी कायम समृद्ध झालेली दिसते. या प्रत्येक लेखकांनी आपला वाचकवर्ग अंकित केला आहे. फॉम्र्युल्याशी खेळत आजच्या जगण्यातील ताज्या संदर्भानी प्रेमचाहत्यांच्या भावुकतेला खतपाणी देत असल्याने त्यांची पुस्तके चित्रपट-टीव्ही मालिका आदींच्या माध्यमांतून सर्वव्यापी बनली आहेत.
विषय कितीही भिन्न असला, तरी जगातील सर्व कथा या थोडय़ाबहुत अंशाने प्रेमकथाच असतात. ते प्रेम व्यक्तिकेंद्री, बहुकेंद्री वा आत्मकेंद्री पातळीवर वाचक नावाच्या घटकाला पुस्तकाच्या प्रेमात पाडण्यात यशस्वी ठरते. प्रेमदिवसाच्या निमित्ताने इंटरनेटचे मायाजाल उघडल्यास पुस्तकशौकिनांवर प्रेमपुस्तकांच्या अरभाट आणि चिल्लर शिफारशींची बरसात झालेली दिसेल. गुगलइतक्याच ताकदीने सध्या वैयक्तिक वाचनव्यवहारावर राज्य करण्यास सक्रिय झालेल्या अ‍ॅमेझॉनी याद्यांना टाळून शोध घेतल्यास बऱ्याच वेगळ्या गोष्टी सापडू शकतात. अलीकडेच तसा (तरी उशिराने) ‘गर्ल्स गाईड टू हण्टिंग अ‍ॅण्ड फिशिंग’ या पुस्तकाचा शोध लागला.
मेलिसा बॅन्क या लेखिकेचे हे पुस्तक नावावरून यंग-अ‍ॅडल्ट फिक्शन वाटत असले, तरी ते आहे मात्र उच्च कोटीतील शुद्ध साहित्य! यातील नायिका आहे प्रकाशन संस्थेतच काम करणारी लेखिका. वयाच्या विविध टप्प्यांवरील तिच्या प्रेमाच्या समृद्ध किंवा प्रगल्भ होत जाणाऱ्या जाणिवांचे गमतीशीर चिंतन मेलिसा बॅन्कने या पुस्तकातील कथासाखळ्यांद्वारे केले आहे. या कथा विशिष्ट काळाच्या अंतराने लिहिल्या गेल्या असल्याने त्यात आत्म आणि कल्पनांचे अचाट मिश्रण झाले आहे. त्यांना आत्मकेंद्री प्रेमकथाही म्हणता येईल. पण त्यांतून व्यक्तीच्या वयाच्या विविध टप्प्यांवर प्रेमाची बदलत जाणारी गरज दाखविताना लेखिकेने एक आरसाच वाचकांसमोर उभा केला आहे, जिथे प्रत्येक जण स्वत:ला अनुभवत या कादंबरीच्या गुरुत्वाकर्षणाशी एकरूप झालेला आढळतो. अमेरिकी कादंबरीविश्वातील धारदार पूर्वसुरींचा वारसा असल्याची पावती लाभलेल्या या लेखिकेने पुढे फार लेखन केले नाही. तिच्या या कादंबरीवर आधारलेला ‘सबर्बन गर्ल’ (२००८) हा चित्रपट फारसा यशस्वी झाला नसला, तरी पाहणीय मात्र आहे. चित्रपट माध्यमाच्या स्वत:च्या मर्यादेमुळे पुस्तकसुखाची अंमळ मात्राही त्यात नाही, हेही खरे.  
 दुसरे पुस्तक आहे, चित्रपट आणि कादंबरी या दोन्ही माध्यमांमुळे तरुणाईमध्ये सारखेच गाजलेले आणि जॉन ग्रीन या आधीच सोशल मीडियावर लोकप्रिय असलेल्या लेखकाला सेलिब्रिटी बनविणारे ‘द फॉल्ट इन अवर स्टार्स’. आपल्याकडे खपणाऱ्या चेतन भगतच्या लेखनाहून थोडी वरची इयत्ता असणाऱ्या जॉन ग्रीनच्या यंग-अ‍ॅडल्ट कादंबऱ्या प्रेमकथा, तत्त्वज्ञान, वाचनप्रेम, रोजच्या जगण्यात तंत्रज्ञानाने केलेली सुलभता आणि सामाजिक माध्यमांच्या अतिरेकाने लादलेल्या एकारलेपणात जगणाऱ्या आजच्या पिढीची भाषा बोलतात. ग्रीनच्या आधीच्या कादंबऱ्या गाजलेल्या असल्या, तरी ‘द फॉल्ट इन अवर स्टार्स’ने खपाचे केवळ नवे उच्चांकच केले नाहीत, तर त्याच्या आधीच्या कादंबऱ्यांनाही जगभरात मिरविण्याची संधी मिळवून दिली. दिवसागणिक मृत्युवाटेवर निघालेल्या दुर्धर आजारग्रस्त तरुण-तरुणीचे विकसित होत जाणारे प्रेम, त्यांच्या प्रेमाबद्दल, आयुष्याबद्दल, आवडत्या लेखकाबद्दल चालणाऱ्या चर्चा आणि कादंबरीच्या कथानकाला अनपेक्षित वळणांना जोडण्याच्या यशस्वी प्रयत्नांमुळे हे पुस्तक पूर्ण होण्यासाठी वाचकाला अस्वस्थ करते. अर्थातच त्यावर बेतलेल्या चित्रपटाचे यश या पुस्तकगारुडामुळे आणखी वाढले. नंतर अज्ञात वाचनपट्टय़ापर्यंत जॉन ग्रीनच्या कादंबऱ्या पसरत गेल्या. चित्रपट आणि पुस्तक अशा दोन्ही माध्यमांमध्ये ‘द फॉल्ट इन अवर स्टार्स’ आवडून जाणारा आहे.
अमेरिकी-ब्रिटिश सिनेजगतात मोठय़ा प्रमाणावर क्लासिक्सचे सिनेरूपांतर घडते. महाकाय निर्मितीखर्चाने ऑस्करच्या स्पर्धेत शिरणाऱ्या ‘ल मिझेराब्ल’, ‘प्राइड अ‍ॅण्ड प्रेज्युडिस’, ‘द ग्रेट गॅट्सबी’सारख्या कलाकृती अमेरिकेतर जगतात अधिक पोहोचतात. पण इण्डिपेण्डण्ट सिनेमांच्या कलाकृतीच्या अर्वाचीनीकरणाचा प्रयत्न मात्र सिनेवेडय़ांच्या वर्तुळातच ज्ञात राहतो. नेथॅनियल हॉथॉर्नच्या ‘स्कार्लेट लेटर’चे आजचे रोमॅण्टिक कॉमेडीतील रूप ‘इझी ए’ हे त्यातील मोठे उदाहरण. शेक्सपिअरच्या ‘अथेल्लो’चे ‘ओ’ नावाने झालेले हायस्कूलच्या तरुण कहाणीतील रूपांतरही साहित्याच्या अर्वाचीनीकरणाचा उत्तम नमुना आहे.
‘इट- प्रे- लव्ह’ या एका आत्मपर पुस्तकाने आणि त्यावरील चित्रपटाने सुपरिचित सेलिब्रिटी लेखिका बनलेली एलिझाबेथ गिल्बर्ट ही हाडाची कथाकार आहे. जीक्यू मासिकासाठी तिने लिहिलेल्या ‘कयोटे अग्ली’ या बारमध्ये काम केलेल्या अनुभवांवर लिहिलेल्या कथारूपी लेखाचा आधार घेऊन, त्याच नावाचा एक सुंदर रोमॅण्टिक सिनेमाही मागे येऊन गेला. गिल्बर्ट हिच्या लोकविलक्षण लेखणीचा अनुभव तिच्या या (सहज उपलब्ध असलेल्या) लेखातून येऊ शकतो. तिच्या एकूण साहित्याचे भक्त होण्यासाठी हा दहा पानी लेखही पुरेसा आहे.
शोधले, तर ‘वेळ कमी आणि वाचन फार’ अवस्थेला नेणारी परिस्थिती आज तंत्रश्रीमंतीमुळे आलेली आहे. टोरण्ट्स, हबवरून ई-बुक्सचा एक आयुष्य कमी वाटू देणारा ओघ, पुस्तक आपल्या दारी आणणाऱ्या कॉर्पोरेटी सेवा, प्रदर्शन आणि उत्सवांतील सवलतीचे ग्रंथजागर यांची चंगळ यांतून वाचन-गोंधळावस्थेचे प्रमाण वाढत चालले आहे.
 आजचे लोकप्रिय लेखक  ‘हस्ती’ वा लेखकांची लोकप्रियता ही निव्वळ दर्जेदार लिखित गुणांवर ठरत नाही, तर फोफावत चाललेल्या बाजारपेठेवर सत्ता असलेल्या घटकांमुळे, सोशल मीडियाच्या प्रभावांमुळे तिची रीतसर आखणी केली जाते. या धर्तीवर भविष्यात पुस्तकप्रेमाचा अंगरखा मिरवत वाचनसुखाची अपेक्षा करणाऱ्यांना उपलब्ध अजस्र पसाऱ्यातून खूप शोध घेत पुढे जावे लागणार आहे. म्हणूनच आपल्या वाचन जगण्यात ‘अ‍ॅमेझॉनी’ आक्रमण रूढ होण्याआधीच वाचनप्रेमाचे आपले निकष पक्के करण्याची खरी वेळ आली आहे. तसे झाल्यास वाचनाचा प्रत्येक दिवसच ‘प्रेम दिवसात’ परावर्तित होईल, हे नक्की.

मराठीतील सर्व बुकमार्क बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Books devoted to valentine day
First published on: 14-02-2015 at 12:54 IST