दगदग सुटली की सावधानता येईल. ती आली की स्वस्थता येईल. ती साधली की अंतर्यामी स्थिरता येईल. ‘अंतर्यामी स्थिर होणे’ हे परमार्थाच्या पहिल्या टप्प्यातलं शिखर आहे. आता ही दगदग कसली आहे? ती मनाचीच आहे. आपल्याला वाटतं, दगदग शरीराला होते. प्रत्यक्षात शरीराची जी दगदग असते ती मनाच्या दगदगीतूनच आली असते. मन फिरवतं तिथे शरीर फिरतं. समाधान मिळावं म्हणून मनाची ही वणवण सुरू असते. समर्थ रामदास म्हणतात, ‘‘बहू िहडतां सौख्य होणार नाहीं। शिणावें परी नातुडे हीत कांहीं।’’ (मनाचे श्लोक/ ओवी ४१). खूप दगदग केली, वणवण केली म्हणून काही सौख्य लाभणार नाही. हित तर काही साधणार नाही नुसता शीण मात्र वाटय़ाला येईल. आता ही दगदग प्रपंचात असते तशीच परमार्थातही असते! श्रीमहाराज स्पष्ट सांगतात, ‘‘परमार्थ हा समजुतीचा आहे, उगीच कष्ट करण्याचा किंवा पारायणाचा नाही. बद्रीनारायणाची यात्रा करूनही तो साधणार नाही. त्यापेक्षा भगवंताच्या अनुसंधानात राहण्याने जास्त फायदा होईल’’ (चरित्रातील परमार्थविषयक बोधवचने, क्र. ४). परमार्थ म्हणजे काय, हे नेमकं समजलं पाहिजे. भारंभार पारायणं केली, भारंभार तीर्थयात्रा केल्या म्हणजे परमार्थ साधेल, असं नाहीच. श्रीमहाराजांनी एके ठिकाणी सांगितलं आहे की, ‘परमार्थ हा वृत्त्यंतरात आहे, वेषांतरात नाही!’ वृत्ती बदलली नसताना उगाच तासन्तास पोथी वाचत बसलं किंवा तीर्थयात्रांचा सपाटा लावला तर काय उपयोग? बाहेर वणवण करीत बसण्यापेक्षा अंतरंगाचा प्रवास का करीत नाही? पण श्रीमहाराजच म्हणतात त्याप्रमाणे, ‘‘आपल्याला कृती करायची सवय आहे, वृत्ती बनवायची नाही’’ (बोधवचने, क्र. ३३६). आता हेही खरं की, ‘‘आपला परमार्थ बोलका नको. तो कृतीचा असू द्या’’ असंही श्रीमहाराजच सांगतात (बोधवचने, क्र. ३१९ मधून) पण तिथे कृती अभिप्रेत आहे ती वृत्ती घडविण्याची. पण आपल्याला मीपणा वाढविणाऱ्या कृतीचीच  सवय आहे. त्यामुळे मीपणा जोपासणाऱ्या दिखाऊ परमार्थासाठी आपण वणवण करतो पण अंतरंग सुधारू इच्छित नाही. श्रीमहाराज सांगतात, ‘‘काही न करणे, अर्थात मनाने, हा खरा परमार्थ होय’’ (चरित्रातील परमार्थविषयक बोधवचने, क्र. २६). आपण परमार्थ म्हणूनही जो काही देखावा करीत असतो तो मनाचाच एक खेळ होतो. हे मनच ‘मी’चा वकील असल्याने या ‘मी’ची शिकार करणाऱ्या शुद्ध परमार्थाच्या आड ते येतच राहणार. त्यामुळे परमार्थ म्हणून मनाच्या कलानुसार मी जे जे काही करीन तो अखेर प्रपंचच होणार. ‘मी’पणा नष्ट करणाऱ्या परमार्थाच्या मार्गाला लागलो आणि आता भगवंताचं काम म्हणून वेगवेगळ्या संस्था काढल्या, त्यातून आपलाच मोठेपणा आणि वैभव निर्माण केलं आणि मग ते टिकावं आणि आपला नावलौकिक अबाधित राहावा यासाठी धडपड सुरू झाली तर तो प्रपंचच झाला की! तेव्हा मनाच्या होकायंत्रानुसार वाटचाल न करता परमार्थाच्या शुद्ध वाटेनेच जायला हवे.