भगवंत अर्जुनाला सांगतात, माझे आणि तुझे मन एक कर. माझा भक्त हो. मलाच समर्पित हो. मग तुझ्या माझ्यात भेद राहणार नाही! हे साधण्याचा उपाय म्हणजे सर्वधर्मान् परित्यज्य मामेकं शरणं व्रज! सद् गुरूंचा खरा समागम तेव्हाच साधतो जेव्हा त्यांचं आणि माझं मन एक होतं, जेव्हा आपण भक्त होतो, त्यांनाच समर्पित होतो. आता मन एक होणं म्हणजे काय? आपल्या आणि त्यांच्या मनात नेमका काय फरक असतो? पू. बाबा बेलसरे सांगतात, ‘‘वासना हे मानवी मनाचे मूलद्रव्य आहे. प्रत्येक माणसाचे मन म्हणजे अनेक वासनांचा संच होय. तृप्त होण्यासाठी धडपड करणे हा वासनेचा मूळ स्वभाव आहे. धडपड करण्यास शक्ती लागते. प्रत्येक वासनेच्या अंगी ती शक्ती सहजपणे असते. शक्ती गतिमान असल्यामुळे ती प्रत्येक वासनेला तृप्त होण्यास प्रवृत्त करते. म्हणून वासना माणसाला चैन पडू देत नाही. ‘मला हे हवे, ते हवे’ आणि ‘मला हे नको, ते नको’ या प्रेरणांच्या रूपाने वासना माणसाला सतत अतृप्त, अशांत व अस्वस्थ ठेवतात. वासना कितीही तृप्त केल्या तरी काही अतृप्त वासना शिल्लक उरतात. त्या अतृप्त वासनापुंजांतून निर्माण होणाऱ्या प्रेरणा माणसाच्या मनाचे समाधान बिघडवतात. समाधान बिघडले की मनाचे समत्व भंग पावते.’’ तेव्हा आपल्यासारख्या सामान्य माणसाचं मन हे असं असमाधानी आणि समत्व भंग पावलेलं असतं. सत्पुरुषाच्या मनाची स्थिती कशी असते? पू. बाबा सांगतात, ‘‘ज्या समाजरचनेत सामान्य माणसे अशांत, अतृप्त व असुरक्षित जीवन जगतात त्याच समाजरचनेत संत शांत, तृप्त व निर्भय जीवन जगतात. सामान्य माणसांना ज्या समस्या असतात त्या समस्या संतांनादेखील असतात. पण सर्व समस्यांच्या गदारोळामध्ये त्यांचे मन ताणमुक्त राहते.’’ सामान्य माणूस आणि संत यांची जीवनपद्धती बाह्य़ांगाने समान असते. तरी संतांच्या मनाची साम्यावस्था का टिकते याची उकल करताना पू. बाबा सांगतात, ‘‘एकच जीवनशक्ती सर्व प्राण्यांना जन्मास घालते आणि मरेपर्यंत त्यांची जीवनयात्रा चालवते. जीवनशक्तीचा हा महासागर विश्वात अफाट पसरला आहे. प्रत्येक प्राण्याच्या अंतरी या जीवनशक्तीचा एक अंश प्रभावीपणे वास करतो व जीवन चालवतो.’’ या जीवनशक्तीचा अंश प्रत्येकात आहे. अंश हा पूर्णापासून दुरावला तर तो अशांत होतो. त्यामुळेच अंशाची पूर्णत्वापर्यंत पोहोचण्याची अखंड धडपड जीवनभर चालते. वासनातृप्तीतून पूर्णत्व लाभेल, या अज्ञानाने माणूस त्यासाठी धडपडतो पण पूर्णत्व पावत नाही. पू. बाबा सांगतात, ‘‘जन्मभर वासनांना तृप्त करीत गेले तरी माणसाचा जीव समाधान पावत नाही. जो माणूस पूर्णतेच्या हाकेला प्रतिसाद देतो आणि जीवनशक्तीच्या महासागरात विलीन होतो तो एकदम पूर्ण तृप्त व परम शांत होतो. पूर्णतेच्या समग्रपणामुळे वासना शून्य होते. वासनाशून्य मनाला अभंग साम्यावस्था प्राप्त होते. मनाच्या साम्यावस्थेत स्थिर झालेल्या माणसाला संत म्हणतात. नि:शेष वासनारहित होणे ही संताची खूण आहे’’ (शरणागती, पृ. ११ ते १६ मधील विचारांचा संक्षेप).
संग्रहित लेख, दिनांक 23rd Aug 2013 रोजी प्रकाशित
१६६. मनोभेद
भगवंत अर्जुनाला सांगतात, माझे आणि तुझे मन एक कर. माझा भक्त हो. मलाच समर्पित हो. मग तुझ्या माझ्यात भेद राहणार नाही! हे साधण्याचा उपाय म्हणजे सर्वधर्मान् परित्यज्य मामेकं शरणं व्रज!
First published on: 23-08-2013 at 01:01 IST
मराठीतील सर्व चैतन्य चिंतन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Chaitanya chintan psychological differences