जगात सर्वात मोठा फुटबॉलवेडा देश म्हणजे ब्राझील. पण तिथं फुटबॉल विश्वचषकासाठी इतका खर्च का? देश आर्थिक संकटात असताना इतकी उधळपट्टी का? हे प्रश्न, आतापर्यंत अनभिषिक्त देवत्व ज्याला बहाल केलं त्यालाही विचारण्याचं धाडस लोकांनी दाखवलं..
क्रिकेट आपला राष्ट्रीय खेळ. या खेळानं काय काय दिलंय आपल्याला.. राष्ट्रीयत्वाची भावना, अमाप आनंद आणि काही जणांसाठी तर अगदी देव वगैरे. खरं तर हे असं वट्ट वाजवून पैसे कमावणाऱ्या खेळाडूंना देव वगैरे म्हणणं तसं फारच. एक प्रकारचा अतिरेकच तो. पण आपल्याला आता त्या अतिरेकाचं काही वाटेनासं झालंय. वरकरणी तसं लक्षात येत नाही अनेकांच्या पण एखाद्याला देवबिव म्हणण्यात अनेकांचे हितसंबंध असतात. कारण एकदा का हा असा देव नक्की केला की त्याच्या आरतीची, पूजेची दुकानं चालवायला वेगवेगळे भोट तयार. आणि दुसरं असं की, देव म्हटलं की कोणी काही विचारतच नाही. काही स्पष्टीकरण द्यावं लागत नाही. कारण काही प्रश्न विचारले जात नाहीत.
कसे विचारणार? देव काय कुठे बोलतो का कधी खुलासे देतो?
त्यामुळे या अशा देवांचं आणि त्याच्या भाट, बडवे वगैरेंचं सुखानं चालू असतं.    
सध्या या धर्मातल्या ट्वेंटी-२० षटकांच्या लुटुपुटुच्या लढाईचे विश्वचषकाचे सामने सुरू आहेत. ही या क्रिकेट धर्माची नवीनच उपशाखा. किंवा पोटजात. या धर्माचा मूळ उत्सव पाच पाच दिवस चालायचा. पांढऱ्याशुभ्र कपडय़ातले खेळाडू इतके दिवस मैदानात घाम काढत हा उत्सव सजवायचे आणि सारा देश आकाशवाणीवरनं त्याचं समालोचन ऐकत उत्साहात सहभागी व्हायचा. पुढे या उत्सवाला नवं रूप मिळालं. एका दिवसाचंच. म्हणजे ५० षटकं हा संघ खेळणार, ५० षटकं दुसरा संघ की झालं. सामना संपला. संसारातल्या सुखाने आलेल्या मांद्याचं गांभीर्य वाटून एखाद्या श्रीमंती महिलेनं अचानक चवळीच्या शेंगेइतकं बारीक व्हावं तसं या विस्तारणाऱ्या क्रिकेटोत्सवाचं स्वरूप मग आटलं आणि ते २० षटकांचं झालं. त्याच्यात मग पुन्हा वेगवेगळे प्रकार आले. विश्वचषक, आयपीएल वगैरे. एकंदर मुद्दा काय तर देवांच्या आरत्या चालू राहतील याची व्यवस्था करायची. तर हे झालं क्रिकेटचं.
असाच दुसरा उत्सवाच्या पातळीवर गेलेला खेळ म्हणजे फुटबॉल. जवळपास २०० देशांत तो खेळला जातो. क्रिकेट जेमतेम १० देशांपुरता. जगात सर्वात मोठा फुटबॉलवेडा देश म्हणजे ब्राझील. त्या देशातल्या खेळाडूंच्या पायातच लय असते की काय कळत नाही. ज्या पद्धतीनं ब्राझीलचे खेळाडू फुटबॉलला घोळवत घोळवत गोलकक्षापर्यंत नेतात ते पाहणं हा अवर्णनीय आनंदच. रंगमंचावर चपल नृत्यांगनांचं पदलालित्य पाहून डोळे निवावेत तसा आनंद फुटबॉलच्या मैदानावर ब्राझीलच्या खेळाडूंकडून आपल्याला मिळतो. आपल्याकडे हॉकी जेव्हा लोकप्रिय होता तेव्हा ध्यानचंद यांचं जे स्थान होतं ते फुटबॉलच्या क्षेत्रात मिळालं एडसन अरांतेस द नासिमेंटो या खेळाडूला. आपल्याला हा भल्या मोठय़ा नावाचा खेळाडू त्याच्या दोनाक्षरी नावानं माहीत. पेले. ते ब्राझीलचे. पेले ही व्यक्ती क्रीडाविश्वात दंतकथा बनून राहिलेली आहे. अजूनही. आणि आता तर या दंतकथेची उजळणी पुन्हा पुन्हा होण्याची एक सुसंधी ब्राझीलसमोर.. आणि अर्थातच आपल्या सारख्या समस्त फुटबॉलप्रेमींसमोर.. हाकेच्या अंतरावर उभी ठाकली आहे.    
ती म्हणजे वर्ल्ड कप फुटबॉल. यंदा तो ब्राझीलमध्ये होतोय. म्हणजे तर फुटबॉलप्रेमींच्या आनंदाला ते ४० हजार चौ फुटाचं मैदानही पुरणार नाही. पेलेंच्या भूमीत फुटबॉलचा विश्वचषक म्हणजे दैवदुर्लभ म्हणावी अशीच संधी. किती जणांनी या काळात आपापले ब्राझील दौरे आखलेत.. एक तरी सामना आपण पाहायचाच.. यासाठी चहूदिशांनी प्रयत्न सुरू आहेत. काय वातावरण असेल.. फुटबॉलमधल्या देवाच्या घरी फुटबॉलचा विश्वचषक. त्या देशात नुसत्या आनंदाच्या उन्माद लहरींच्या लाटांवर लाटा अगदी आतापासूनच उसळत असतील.
पण..
पण या वेळी समस्त ब्राझील पेले यांच्याविरोधात उभा ठाकला असून पेलेंनी आपला विश्वासघात केल्याची भावना जनसामान्य उघडपणे बोलून दाखवतायत. केलं काय असं या पेलेंनी?    
त्यांच्या हातून एक चूक झाली. ती म्हणजे त्या देशात भरत असलेल्या फुटबॉल विश्वचषकाचं त्यांनी उघड उघड समर्थन केलं. अजूनही ते करतायत.
वरकरणी यात कोणालाच काही वावगं वाटणार नाही, कदाचित. फुटबॉल खेळातला देव, साऱ्या विश्वात असामान्य म्हणून ओळखला जाणारा खेळाडू फुटबॉलच्या विश्वचषकाचं समर्थन करणार, तो भरावा यासाठी प्रयत्न करणार.. यात विशेष ते काय?
पण विशेष हे की साऱ्या ब्राझील देशाला प्रश्न पडलाय की देश आर्थिक संकटात असताना, बेकारी वाढत असताना, जनसामान्यांचं जगणं कमालीचं महाग होत असताना, भ्रष्टाचाराचे आरोप होत असताना विश्वचषक सामने भरवणं या देशाला परवडणारं आहे का? अनेक महत्त्वाच्या प्रश्नांनी देश जर्जर झालेला असताना या सामन्यांवर उधळपट्टी करणं योग्य आहे का? या विश्वचषकाच्या निमित्तानं म्हणून ज्या काही सोयीसुविधा उभारल्या जात आहेत, त्यासाठीच्या खर्चात प्रचंड भ्रष्टाचार झालेला दिसत असताना केवळ सामने आलेत म्हणून त्याकडे दुर्लक्ष करावं का?
अत्यंत फुटबॉलवेडे म्हणून ओळखल्या जाणाऱ्या, ज्या देशात फुटबॉल हा धर्मच आहे त्या ब्राझील देशांतील बहुसंख्य जनतेचं या सर्व प्रश्नांवरचं उत्तर नाही- ठाम नाही असं आहे. जगद्विख्यात खेळाडू, दंतकथा बनून गेलेले पेले बरोबर याच्या विरोधी मताचे आहेत. म्हणजे त्यांचं मत आहे काहीही असलं..भ्रष्टाचार, महागाई, बेकारी.. तरी फुटबॉलचा विश्चचषक हा त्यापेक्षा वरचा मानायला हवा आणि त्याचं आयोजन आपण उत्तमपणे करायला हवं. हे मत पेले यांनी अलीकडे वेगवेगळय़ा व्यासपीठांवर मांडलं. देशात मांडलं. ईएसपीएनसारख्या क्रीडा वाहिनीवर मांडलं. पेले म्हणाले आपण हे सर्व प्रश्न उपस्थित करून विश्वचषकाचं वातावरण गढूळ करतोय.भ्रष्टाचाराचा फुटबॉलशी काय संबंध?
आता इतकं स्पष्टपणे बोलल्यावर फुटबॉलवेडय़ा वगैरे ब्राझिलियन जनतेनं काय करावं?
ब्राझीलमध्ये पेलेंविरोधात निदर्शनं सुरू झालीयेत!
हे अघटित आहे. पण सत्य आहे. अगदी अलीकडेपर्यंत ब्राझिली जनतेच्या गळय़ातले ताईत असलेले पेले त्या देशात निंदेचा, टिंगलीचा आणि त्याही पलीकडे घृणेचा विषय झालेत. पेले म्हणाले होते, फुटबॉल विश्वचषकामुळे समृद्धी येईल. त्यावर नाराज जनता त्यांच्या घरासमोर निदर्शनांसाठी जमली. निदर्शकांकडच्या फलकांवर प्रश्न होता : समृद्धी येईल, पण कोणासाठी? निदर्शकांना दु:ख याचं आहे की देशातील भयाण आर्थिक वास्तवाकडे दुर्लक्ष करून केवळ फुटबॉलच्या विश्वचषकासाठी निधी उपलब्ध करून दिला जातोय. त्यांना राग याचा आहे की अनेक ठिकाणी मूलभूत, पायाभूत सोयीसुविधा निर्माण करण्यासाठी सरकारकडे किमान निधी नाही, अर्थव्यवस्था डबघाईला आलेली. तेव्हा केवळ मनोरंजन या पलीकडे ज्यापासून कोणतंही उद्दिष्ट साध्य होणार नाही त्याला इतकं महत्त्व देण्याचं कारणच काय?
पेले यांच्याकडे याचं उत्तर नाही.
पण प्रश्न पेले यांच्याकडे उत्तर नाही हा नाही.
आपल्यासारखा ब्राझील हा तिसऱ्या जगातलाच देश. शिवाय ब्रिक्स (ब्राझील, रशिया, भारत, चीन आणि दक्षिण अफ्रिका) या संघटनेत आपल्या मांडीला मांडी लावून बसणारा. जगातल्या बलाढय़ देशांत त्याची गणना होतीय असं म्हणावं तर तसंही नाही.    
तरीही आतापर्यंत अनभिषिक्त देवत्व ज्याला बहाल केलं त्यालाही प्रश्न विचारण्याचं धाडस ब्राझीलनं दाखवलं. फुटबॉलवर अतोनात प्रेम करणाऱ्या सामान्य ब्राझिली नागरिकानं या फुटबॉलच्या कुलदैवताला आव्हान दिलंय.. देश, त्यासमोरचे प्रश्न हे खेळापेक्षा जास्त महत्त्वाचे हे त्यांना ठणकावून सांगितलंय. फार म्हणजे फारच मोठी घटना ही.  आता त्या पाश्र्वभूमीवर आपल्याकडचे खेळ आणि त्यातल्या देवांचं सामाजिक, राजकीय स्थान आणि भूमिका याचा विचार ज्यानं त्यानं करावा. तसा तो करण्याचे कष्ट घेतले तर कळेल काही खटकतंय का.. हे.    
मग हेही कळेल की समाजापासून फटकून राहणारे हे देव आणि त्यांच्या खासगी स्वर्गाला आव्हान देणं ही प्रगतीची पहिली खूण असते.