माध्यमांपुढील आव्हाने

वर्तमानपत्र असो वा दूरचित्रवाणी. ही माध्यमे हाताळणाऱ्यांपाशी व्यक्त होण्यासाठी ती ती माध्यमे असतातच. अशा वेळी ही चौकट बाजूला ठेवून उगाच चिथावणीखोर मते मांडत हिंडण्याची काहीही गरज नसते..

वर्तमानपत्र असो वा दूरचित्रवाणी. ही माध्यमे हाताळणाऱ्यांपाशी व्यक्त होण्यासाठी ती ती माध्यमे असतातच. अशा वेळी ही चौकट बाजूला ठेवून उगाच चिथावणीखोर मते मांडत हिंडण्याची काहीही गरज नसते..

तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे माध्यमांचे लोकशाहीकरण झाले असले तरी त्यामुळे माध्यमात काम करणाऱ्यांसमोर एक वेगळेच संकट उभे ठाकले आहे. ते म्हणजे चिथावणीखोर प्रतिक्रियांनी चिथवून न घेण्याचे. हे आव्हान किती गंभीर आहे ते सीएनएन या जगातील बडय़ा वृत्तवाहिनीचे जिम क्लान्सी यांच्यावर जी वेळ आली तीवरून समजून घेता येईल. योगायोग असा की ज्या वेळी लोकशाही आणि विचारस्वातंत्र्याची परिसीमा असलेल्या अमेरिकेत क्लान्सी यांच्यावर भावनांवर नियंत्रण  न ठेवल्यामुळे प्रायश्चित्त घेण्याची वेळ आली त्याच वेळी भारतात माहिती आणि प्रसारणमंत्री अरुण जेटली हेदेखील प्रसारमाध्यमांतील जबाबदारीच्या अभावाविषयी काही गंभीर निरीक्षणे नोंदवत होते.
प्रथम क्लान्सी यांच्याविषयी. १९८९ साली बर्लिनची भिंत कोसळल्यापासून जगातील अनेक महत्त्वाच्या घटनांचे वार्ताकन, संपादन क्लान्सी यांनी सीएनएन या वाहिनीसाठी केले आहे. सीएनएनच्या प्रेक्षकांना क्लान्सी हे अत्यंत परिचित. त्यांचा तो खास, कमावलेला जाडसर आवाज आणि निवेदनाची गंभीर शैली ही लक्षणीय वैशिष्टय़ेच. पहाडी शरीरयष्टीच्या क्लान्सी यांना हसताना पाहिलेला प्रेक्षक शोधूनही सापडणार नाही. असे हे धीरगंभीर क्लान्सी ट्विटरच्या नटव्या मोहात अडकले. ट्विटर वा फेसबुक यांसारख्या माध्यमांमुळे जनसामान्यांना वेगळ्याच प्रकारचा मताधिकार मिळाला असून त्यामुळे कोणीही कोणत्याही विषयावर काहीही मतप्रदर्शन करू शकतो. एका अर्थाने हे प्रसारमाध्यमांचे लोकशाहीकरण म्हणावयास हवे. याचे कारण असे की या माध्यमांच्या उदयापूर्वी कोणत्याही विषयावर जाहीररीत्या व्यक्त होऊ पाहणाऱ्यांच्या अधिकारांना मर्यादा होत्या. ही व्यक्त होण्याची मक्तेदारी माध्यमांत काम करणाऱ्यांपुरतीच मर्यादित होती. त्यामुळे ज्या काही भावभावना वा प्रतिक्रिया व्यक्त होत, त्या माध्यमांतील मंडळींच्या असत. अन्यांस व्यक्त व्हावेसे वाटलेच तर माध्यमांतील प्रतिक्रियांवर त्यांना प्रतिक्रिया द्याव्या लागत. म्हणजे वर्तमानपत्रातील अग्रलेखावर पत्रव्यवहार करणे वगरे. त्या अर्थाने या प्रतिक्रिया प्रत्यक्ष घटनेवर असतीलच असे नाही. त्या बऱ्याचदा या प्रतिक्रियांच्या माध्यमांतील प्रतिमेवर असत. फेसबुक वा ट्विटर यांसारख्या माध्यमांच्या उदयामुळे हे चित्र बदलले आणि सर्वसामान्यांना आपल्या मतांचे उत्सर्जन हवे तेव्हा करण्याची संधी मिळाली. म्हणजे एखाद्या घटनेवर माध्यमे काय म्हणतात याची वाट न पाहता थेट व्यक्तहोण्याची सोय झाली. हा बदल फार मोठा होता. त्यामुळे जनसामान्यांच्या प्रतिक्रिया उद्दीपनावरील माध्यमांची मक्तेदारी संपुष्टात आलीच. पण त्याच वेळी या नव्या माध्यमांतील प्रतिक्रियांना सामोरे जाणे हे नवेच आव्हान तयार झाले. कारण इतके दिवस फक्त घटनांवरच प्रतिक्रिया देणारे आता माध्यमांवरही भाष्य करू लागले. एखाद्या घटनेचे सादरीकरण एखाद्या वर्तमानपत्राने वा वृत्तवाहिनीने कसे केले हा या नव्या माध्यमांच्या अलिखित कार्यक्षेत्राचा भाग झाला. म्हणजेच ज्यांना इतके दिवस इतरांवर भाष्य करायची सवय होती त्यांच्यावर आता इतरांकडून भाष्य करून घेण्याची वेळ आली. हे अनेकांना झेपले नाही. क्लान्सी हे त्याचे उदाहरण. गेल्या महिन्यात पॅरिसमधून प्रकाशित होणाऱ्या शार्ली एब्दो या नियतकालिकावर दहशतवादी हल्ला झाल्यानंतर जगभरातून प्रतिक्रियांचा पूर आला आणि ते साहजिकही होते. हा हल्ला इस्लामी दहशतवाद्यांनी केला होता. ते निमित्त साधून इस्रायलची पाठराखण करणाऱ्यांनी सरसकट मुसलमानांवर टीकास्त्र सोडणे सुरू केले. त्यावर प्रतिक्रिया व्यक्त करताना क्लान्सी यांचा तोल सुटला आणि ते इस्रायलच्या विरोधात अकारण भाष्य करू लागले. अमेरिकेत सामाजिक, आíथक आणि सांस्कृतिक जीवनावर इस्रायली वा यहुदींचे प्रचंड नियंत्रण आहे. हे सर्व त्यामुळे क्लान्सी यांच्यावर तुटून पडले आणि परिणामी क्लान्सी जेथे काम करीत त्या सीएनएन या वृत्तवाहिनीवरही त्या टीकेचे धनी व्हायची वेळ आली.
यात क्लान्सी यांचे चुकले ते हे की आपले जे काही व्यक्तिमत्त्व आहे ते सीएनएनच्या प्रभावामुळे तयार झाले आहे, हे ते विसरले. माध्यमांतील अनेकांकडून हे होते. माध्यमातील उपस्थितीमुळे जी प्रसिद्धी मिळते तिचा अनेकांना विसर पडतो आणि मग ते स्वयंभू असल्यासारखे वागू लागतात. आपल्याकडे अशी सुमार उदाहरणे पशाला पासरी मिळतील. वास्तविक माध्यमवीरांच्या या अभिनिवेशामुळे माध्यमांचेच नुकसान होत असते, याची जाणीव ना या पत्रपंडितांना असते ना जनतेला. त्यामुळे कानात प्रसिद्धीचा वारा गेल्यामुळे चौखूर उधळणारे हे माध्यमवीर आपल्या चौकटीबाहेर जाऊन व्यक्त होऊ लागतात. असे करणे वास्तविक अनतिक. याचे कारण वर्तमानपत्र असो वा दूरचित्रवाणी. ही माध्यमे हाताळणाऱ्यांपाशी व्यक्त होण्यासाठी ती ती माध्यमे असतातच. या व्यक्तींचे अस्तित्व त्यांच्या हातातील माध्यमांतून व्यक्त होणाऱ्या मतांशी निगडित असते. अशा वेळी ही चौकट बाजूला ठेवून उगाच चिथावणीखोर मते मांडत िहडण्याची काहीही गरज नसते. किंबहुना तसे करणे टाळायलाच हवे. परंतु हा मोह भल्याभल्यांना सोडवत नाही आणि मग ते क्लान्सी यांच्याप्रमाणे व्यक्ततेच्या जाळ्यात अलगद अडकतात. तेव्हा माध्यमातील उपस्थितीपेक्षा आणि त्याहूनही मुख्य म्हणजे आपण काम करीत असलेल्या माध्यमापेक्षा आपण मोठे नाही याचे भान या क्षेत्रातील मंडळींनी ठेवणे गरजेचे आहे. क्लान्सी यांची ज्या प्रकारे गच्छंती झाली, तिचा हा धडा आहे.
त्याच वेळी स्वत:वर कोणतेही र्निबध घालून घेण्यास तयार नसणाऱ्या आणि इतरांच्या बंधांवर गदा आणू पाहणाऱ्या माध्यमांना जेटली यांनी चार शब्द सुनावले ते बरे झाले. दहशतवादी हल्ला आदी घडत असताना दूरचित्रवाणी वाहिन्यांना तर चेवच येतो. हा आपला थेट प्रक्षेपणाचा, जसे घडले तसे वगरे दाखवण्याचा सोस राष्ट्रहिताच्या आणि त्याहूनही मुख्य मानवतेच्या आड येत आहे, याचेदेखील भान या माध्यमांना राहत नाही. २६/११ च्या हल्ल्यात ते दिसून आले. या भीषण हल्ल्याचे थेट प्रक्षेपण दूरचित्रवाणी वाहिन्यांनी सुरू ठेवल्यामुळे त्याचा फायदा उलट दहशतवाद्यांना वा त्यांच्या नियंत्रकांनाच झाला. कारण बसल्या ठिकाणी विनासायास त्यांना लष्कर आदी हल्ल्यांची माहिती मिळत गेली. याबरोबर उलट बीबीसी आदी वृत्तवाहिन्यांचे वर्तन शार्ली एब्दो हल्ल्याचे प्रक्षेपण करताना होते. दहशतवाद्यांना अधिक माहिती मिळू नये म्हणून आम्ही थेट प्रक्षेपण नियंत्रित करीत आहोत, असे या वाहिन्यांवरून जाहीर केले जात होते. यास प्रौढपणा म्हणतात. परंतु भारतीय वाहिन्यांत अद्याप तो रुजावयाचा असल्याने तू पुढे की मी या बालिश स्पध्रेतच ती गुंतून पडलेली दिसतात. तेव्हा त्यांना वेसण घालण्याचा विचार सरकार करीत असेल तर त्याचे स्वागतच करावयास हवे. युद्ध, दहशतवादी हल्ला आदींचे वृत्तांकन करताना माध्यमांना किती मर्यादेपर्यंत घटनास्थळी जाऊ द्यायचे यावर सरकार विचार करीत असून त्या अनुषंगाने काही नियंत्रणे सरकारच्या विचाराधीन आहेत, असे जेटली म्हणाले.
माध्यमांचा सध्याचा बेताल आणि बेधुंद असा कारभार पाहता अशा नियंत्रणांची गरज आहे, हे अमान्य करता येणार नाही. त्याचप्रमाणे माध्यमांच्या मालकीबाबतही सरकार काही र्निबध आणू पाहते. तेव्हा माध्यमांनी काय किती दाखवावे याचबरोबर माध्यमांवर मालकी कोणाची असावी यावर सरकारच्या बाजूने आणि दुसरीकडे ट्विटर आदी माध्यमांमुळे जनतेच्या बाजूने माध्यमांवर वचक निर्माण होताना दिसतो. या धोक्याच्या घंटेचा नाद समजून घेण्याइतके शहाणपण माध्यमांना दाखवावेच लागेल.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व अग्रलेख बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Challenges facing by media

Next Story
चीनमधील भूकंपात ५० ठार, १५० जखमी
ताज्या बातम्या