दिल्लीवाला

काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांना सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) चौकशीला बोलावल्यापासून काँग्रेसने जणू नवा स्वातंत्र्यसंग्राम सुरू झाल्याचं चित्र उभं केलं आहे. राहुल गांधींची ईडी विनाकारण चौकशी करत असून काँग्रेस सत्यासाठी संघर्ष करत असल्याची विधाने पक्षाचे नेते करत आहेत. सत्यमेव जयते म्हणताना त्यांनी राहुल गांधींची तुलना थेट महात्मा गांधींशी करून टाकली. आम्ही गांधी आहोत.. सत्य आणि न्यायासाठी संघर्ष करणे हीच आमची ओळख आहे.. सत्याचा आवाज त्या वेळी (म्हणजे महात्मा गांधींचा स्वातंत्र्याचा लढा) दाबून टाकता आला नव्हता, आताही (म्हणजे राहुल यांचा ईडीच्या चौकशीचा (!) लढा) हा आवाज दाबून टाकता येणार नाही, असे ट्वीट पक्षाने केले होते. सत्यासाठी होणाऱ्या आताच्या संघर्षांत काँग्रेसने सावरकरांनाही आणले होते. आम्ही सावरकर नाही, आमचे मनोबल पोलादी आहे.. ज्यांचा इतिहासच माफीनाम्याचा आहे, ते ‘गांधीं’चे मनोबल काय तोडणार?.. असे एक प्रकारे भाजपला आव्हान दिलेले होते. राहुल गांधी म्हणजे सत्याचा आवाज असे काँग्रेसने म्हटले आहे. हाथरसमधील मुलीवर झालेल्या अत्याचाराविरोधात संघर्ष करण्यासाठी ते रस्त्यावर उतरले. करोनाच्या काळात मैलोन् मैल तंगडतोड करून गाव गाठणाऱ्या स्थलांतरितांची विचारपूस कोणी केली? आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांच्या बाजूने कोण उभे राहिले? असे प्रश्न काँग्रेसने भाजपला विचारले. राहुल गांधी हे सामान्य जनतेसाठी, वंचितांसाठी लढणारे नेते असल्याची प्रतिमा उभी करण्याचा प्रयत्न काँग्रेसने केला आहे. ईडीसमोर राहुल गांधी ‘माफी’ मागणार नाहीत, रस्त्यावर उतरून संघर्ष करतील, असे राहुल निष्ठावान रणदीप सुरजेवाला सातत्याने म्हणत होते. पण, ही सगळी प्रतिमानिर्मिती एकटय़ा राहुल गांधींसाठी आणि तुलनाही थेट महात्मा गांधींशी.. यावर हसावे की रडावे? भाजपच्या डिजिटल विभागाला काँग्रेसने कोलीतच मिळवून दिले आहे.

controversy, nitin Gadkari photo, agitation of congress, nagpur
मतचिठ्ठीवर गडकरींचे छायाचित्र, नागपुरात भाजप- काँग्रेसमध्ये वादावादी !
Uneasiness in Congress as Priyanka Gandhi is not getting a meeting
चंद्रपूर : प्रियंका गांधींची सभा मिळत नसल्याने काँग्रेसमध्ये अस्वस्थता; मुख्यमंत्री रेवंत रेड्डींची सभाही रद्द
sangli Mahavikas Aghadi
मविआची उमेदवारी चंद्रहार पाटील यांना जाहीर होताच कॉंग्रेस संतप्त, बैठकीत पुढील निर्णय – आमदार सावंत
kolhapur lok sabha marathi news, kolhapur sanjay mandlik latest news in marath
काँग्रेस नेत्यांशी मैत्री विसरा, भाजपचा महायुतीच्या नेतेमंडळींना संदेश

‘राष्ट्रमंचा’चे काय झाले?

कोणाला आठवत असेल तर एक वर्षांपूर्वी भाजपचे माजी नेते यशवंत सिन्हा यांनी ‘राष्ट्रमंच’ नावाच्या व्यासपीठावरून बिगरभाजप पक्षांना एकत्र आणण्याचा प्रयत्न केला होता. ‘राष्ट्रमंचा’ची स्थापना करून दोन-तीन वर्ष झाली पण, आता यशवंत सिन्हाही हा मंच विसरून गेले आहेत. गेल्या वर्षी जूनमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या दिल्लीतील सहा जनपथ या निवासस्थानी झालेली राष्ट्रमंचाची बैठक प्रसारमाध्यमांचे लक्ष वेधून घेणारी ठरली होती. या बैठकीआधी राजकीय आखणीकार प्रशांत भूषण यांनी पवारांची भेट घेतली होती. पवार या बैठकीला उपस्थित असल्यामुळे तिला वेगळे महत्त्व आले होते. काँग्रेसला वगळून तिसरी आघाडी तयार करण्याची ही सगळी तयारी असल्याचे सांगितले जात होते. पण, पवारांनी काँग्रेसशिवाय भाजपविरोधी आघाडीचे सगळेच प्रयत्न हळूहळू मोडून काढले. राष्ट्रमंचच्या त्या बैठकीला अर्थतज्ज्ञ अरुण कुमार, माजी राजनैतिक मुत्सद्दी के. सी. सिंग, गीतकार जावेद अख्तर असे सामाजिक क्षेत्रातील नामवंतही होते. भाजपविरोधी अजेंडा ठरवण्याच्या उद्देशाने ही मंडळी जमलेली होती. पण, वर्षभरानंतर ‘राष्ट्रमंचा’चे महत्त्व संपलेले आहे. यशवंत सिन्हा तृणमूल काँग्रेसमध्ये जाऊन त्या पक्षाचे उपाध्यक्ष झाले, त्यांचे राजकीय पुनर्वसन झाले. पवारांनीही ममता बॅनर्जी यांच्या आक्रमकपणाला आवर घालत संभाव्य महाआघाडीत काँग्रेसला सामावून घेतले आहे. ‘राष्ट्रमंच’ ही तात्कालिक गरज होती, आता तर राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीनिमित्त ममता बॅनर्जीनीच बिगरभाजप पक्षांची बैठक बोलावल्याने अन्य व्यासपीठे हवीत कुणाला? ‘राष्ट्रमंचा’त असलेली मंडळी ममतांच्या बैठकीच्या आयोजनात होतीच.

लॅपटॉपवाले काँग्रेसी

काँग्रेसच्या माध्यम विभागात अपेक्षित बदल झाला आहे. पक्षाच्या माध्यम विभाग प्रमुखपदावरून रणदीप सुरजेवाला यांची हकालपट्टी झाली असून सोनिया गांधी यांचे अत्यंत विश्वासू जयराम रमेश यांच्याकडे संपूर्ण माध्यम विभाग सोपवण्यात आला आहे. उदयपूरमधील चिंतन शिबिरामध्ये पक्षाच्या माध्यम विभागाच्या कामकाजाबद्दल चर्चा झाली होती. भाजपचा माध्यम विभाग आक्रमक आणि वेगवान प्रतिक्रियावादी असतो. काँग्रेसचा हा विभाग मात्र सुशेगात असतो. पारंपरिक माध्यम विभागच नव्हे तर, समाजमाध्यम तसेच डिजिटल विभाग एकत्र करून या विभागांची फेररचना करण्याचा प्रस्ताव शिबिरात संमत झाला होता. वास्तविक, हा प्रस्ताव प्रशांत किशोर यांनी सादरीकरणात दिला होता. किशोर काँग्रेसमध्ये आले नाहीत, पण, त्यातले काही अजेंडे काँग्रेसने सामावून घेतले आहेत. या एकत्रित माध्यम विभागाची जबाबदारी जयराम रमेश यांच्याकडे देण्यात आलेली आहे. रणदीप सुरजेवाला यांची जागा आता पवन खेरा यांनी घेतली आहे. त्यामुळे काँग्रेसच्या वतीने खेरा दैनंदिन पत्रकार परिषदा घेतील. जयराम रमेश हे संयुक्त माध्यम विभागप्रमुख झाल्यापासून काँग्रेसच्या माहितीवहनाला गती आली आहे. सोनिया गांधींना नेमके काय झाले आहे, त्यांना रुग्णालयात का दाखल केले आहे, ही माहिती रमेश यांनी लगेच दिली. यापूर्वी माध्यम विभागाला राहुल गांधींच्या प्रचार विभागाचे स्वरूप होतं. त्यामध्ये आता फरक पडू शकेल अशी आशा आहे. जयराम रमेश हे राहुलपेक्षा सोनिया निष्ठावान आहेत. सुरजेवाला यांच्या हरयाणी आक्रमकपणापेक्षा चपखल युक्तिवाद करून ते भाजपला चोख उत्तरही देऊ शकतील. त्यांना मंत्रीपदाचा तसेच खासदार या नात्याने संसदीय कामकाजाचाही प्रदीर्घ अनुभव आहे. त्यांच्या वैयक्तिक महत्त्वाकांक्षा सीमित आहेत. एखादी व्यक्ती नगरसेवक झाली की लगेच स्कॉर्पियोमधून फिरायला लागते. जयराम रमेश गेली कित्येक वर्ष दिल्लीच्या राजकारणात असूनही जुन्या सॅन्ट्रोमधून ये-जा करतात. त्यांच्याकडे दिल्लीत स्वत:च्या मालकीचे घरही नाही, काँग्रेसने राज्यसभेचे सदस्यत्व दिले नसते तर राहायचे कुठे हा त्यांच्यापुढे प्रश्न होता. त्यांना ‘लॅपटॉपवाले काँग्रेसी’ असे म्हटले जाते. अडीच वर्षांपूर्वी महाविकास आघाडी सरकार स्थापनेच्या चर्चा शरद पवारांच्या घरी होत होत्या, तेव्हा सोनियांचे दूत म्हणून जयराम रमेश या बैठकांमध्ये लॅपटॉप घेऊन बसलेले असायचे. पण, रमेश जुन्या ल्युटन्स दिल्लीचं प्रतिनिधित्व करतात. इंग्रजी माध्यमांतील प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींकडे त्यांचा ओढा अधिक. त्यामुळे त्यांच्या ‘डिब्रीिफग’च्या वर्तुळाचा ते किती विस्तार करतात हे बघायचे.

‘सेंट्रल व्हिस्टा’चा मुहूर्त

सध्या इंडिया गेट ते विजय चौक अशा तीन किमीच्या अंतरात सुशोभीकरण केले जाते आहे. इंडिया गेटच्या षटकोनी आवारातही जाण्यास मनाई करण्यात आलेली आहे. पण, पुढच्या महिन्यात, जुलैच्या पहिल्या आठवडय़ात कदाचित राजपथाचा संपूर्ण परिसर पर्यटकांसाठी खुला केला जाण्याची शक्यता आहे. इंडिया गेटवरील ‘अमर जवान ज्योती’ पलीकडे असलेल्या राष्ट्रीय युद्धस्मारकामध्ये स्थलांतरित करण्यात आली आहे. राजपथाच्या दोन्ही बाजूंची तळी नव्याने बांधली जात आहेत. तिथे छोटे पूल बांधले असल्याने मोकळेपणाने फिरता येऊ शकेल. इंडिया गेट ते विजय चौक यांच्या मधोमध असलेल्या रस्त्यावर एका बाजूला तळय़ाच्या शेजारी मशीद असून तिला धक्का न लावता तळय़ांचे सौंदर्यीकरण केले गेले आहे. राजपथाच्या दोन्ही बाजूला पूर्वीप्रमाणे हिरवळ असेल. इथले बांधकाम पूर्ण झाल्यावर हिरवळ दिसू लागेल. राजपथावरील ‘सेंट्रल विस्टा अ‍ॅव्हेन्यू’ प्रकल्पाचे काम झाले की, दोन्ही बाजूला केंद्रीय सचिवालयाच्या इमारती उभ्या राहतील. आत्ता नवी दिल्लीभर कुठे कुठे पसरलेली सगळी मंत्रालये एकाच आवारात वसतील. संसदेची नवी इमारत आणि राजपथाचे सौंदर्यीकरणाचे काम पूर्ण होत असून त्यानंतर नवी मंत्रालये उभी राहतील.