scorecardresearch

चतु:सूत्र : ‘आंबेडकराईट थिअरी’ची आशा..

आपण मानव हे सामाजिक प्राणी आहोत, असे इसवीसनाच्या ४०० वर्षांपूर्वी होऊन गेलेले ग्रीक विचारवंत अ‍ॅरिस्टॉटल यांनी आपल्या ‘मॅग्नम ऑपस’ अर्थात अतिप्रभावशाली मानल्या जाणाऱ्या ‘पॉलिटिक्स’ या प्रबंधात म्हटले आहे.

सुरज मिलिंद एंगडे

जो समाज समानतेच्या मूलभूत गरजांपासून वंचित आहे, त्या समाजासाठी पुनर्रचना हाच एकमेव पर्याय ठरतो, असे ‘आंबेडकराईट थिअरी’ सांगते. समतेचा हक्क, नागरिकत्व असे टप्पे पार करत करदाता घडवून त्याद्वारे राज्यव्यवस्थेला हातभार लावण्यापर्यंतच्या मार्गाविषयी ही थिअरी मार्गदर्शन करते..

आपण मानव हे सामाजिक प्राणी आहोत, असे इसवीसनाच्या ४०० वर्षांपूर्वी होऊन गेलेले ग्रीक विचारवंत अ‍ॅरिस्टॉटल यांनी आपल्या ‘मॅग्नम ऑपस’ अर्थात अतिप्रभावशाली मानल्या जाणाऱ्या ‘पॉलिटिक्स’ या प्रबंधात म्हटले आहे. ते त्याही पुढे जाऊन सांगतात की, ‘समाज ही एक अशी गोष्ट आहे, जी व्यक्तीच्या आधी येते’. समाज या घटकात अनेक व्यक्ती आढळतात. या व्यक्ती व त्यांचे स्थान दुय्यम आहे. व्यक्तीने कितीही प्रयत्न केला तरी ती समाज या घटकाचा एक भाग ठरते. समाजातून व्यक्ती तयार होतात आणि अशा व्यक्तींचा मिळून समाज निर्माण होतो. एखाद्या व्यक्तीने ठरवले की मी समाजात वावरणारच नाही आणि मी एवढा/ एवढी सक्षम आहे की मला समाजाची आवश्यकताच नाही, तर ती व्यक्ती एकतर प्राणी आहे- ज्याला मनुष्याच्या खालचा दर्जा दिला आहे किंवा देव आहे- जो मनुष्य वा समाजाच्या वर आहे.

व्यक्तिकेंद्री व्यवस्थापन आणि व्यक्तिवाद हा आधुनिक काळातील भांडवलशाहीच्या मदतीने युरोपातील प्रबोधनयुगापासून औद्योगिक क्रांतीपर्यंतच्या काळात सक्षम होत गेला. चौदाव्या शतकापासून पश्चिम युरोपातील ख्रिस्ती व्यावसायिक व तेथील नवकॅथलिक पाद्र्यांच्या चर्चने संमती देऊन एक काटेकोर व्यवस्था उभी केली. त्यातूनच पुढे साम्राज्यवाद उदयास आला.

ग्रीक साम्राज्याचा काळ असो वा आधुनिक युरोपातला भांडवलवाद, या काळात एक वैचारिक दृष्टिकोन उदयास आला. तो कधी लिखित स्वरूपात मांडला गेला तर कधी चर्चेतून पुढे आला. असा दृष्टिकोन जर प्रस्थापित वर्गाने स्वीकारला, तर तो त्या समाजात रुजतो. एखादा दृष्टिकोन प्रस्थापित वर्गाला अथवा राजाला मान्य नसेल, तर तो मांडणाऱ्यांना अटक झाल्याची, त्यांची कत्तल झाल्याचीही उदाहरणे आहेत. एखाद्या व्यक्तीने संशोधन करून नवा विचार मांडल्यास अथवा समाजव्यवस्थेचा नवा अर्थ लावल्यास, अशी परिस्थिती उद्भवत असे. असे वेगळे विचार मांडणाऱ्यांत आणि त्याचे परिणाम भोगणाऱ्यांत पुरुषांचे प्रमाण अधिक असले, तरी त्यात स्त्रियांचाही समावेश होताच.

आपण जेव्हा जगाचा, आपल्या अवतीभोवती असलेल्या समाजाचा विचार करतो, त्याच्याकडे डोळसपणे पाहण्याचा प्रयत्न करतो, तेव्हा अनेक प्रश्न उपस्थित होतात. या प्रश्नांची उकल होण्यासाठी आपल्याला एका आधाराची गरज असते. हा आधार आपल्याला सिद्धांतात मिळतो. सिद्धांत आपल्याला दिसत असलेल्या गोष्टींचा अर्थ लावण्यास मदत करतात. या गोष्टींना नावे देतात, त्यातील संकल्पनांची उकल करतात. एकदा या संकल्पना आपल्याला समजल्या की मग दुसरी पायरी असते ती त्यावर काम करण्याची. त्यात काही बदल करणे आवश्यक आहे का, काही भर घालता येईल का याचे विश्लेषण केले जाते. ‘आंबेडकराईट थिअरी’चेही असेच आहे. ही दिशा देणारी व प्रश्न विचारणारी मांडणी आहे. जोवर जात व जातव्यवस्थेने मांडलेली रचना अस्तित्वात आहे तोवर आपल्याला ‘आंबेडकराईट थिअरी’ची आवश्यकता भासणार आहे.

काय आहे ‘आंबेडकराईट थिअरी’?

एखाद्या व्यवस्थेला विषमतेने ग्रासले आहे आणि तरीही त्या व्यवस्थेला समाजाने मान्यता दिली आहे, अशा परिस्थितीत कमजोर, अल्पसंख्याक नाजूक समूहांच्या मानवी हक्कांचे संरक्षण आणि मानवतेचा पुरस्कार ही ‘आंबेडकराईट थिअरी’ची एक व्याख्या असू शकते. ही मांडणी संवाद, विचार, वाद, आंदोलनांच्या स्वरूपात पाहायला मिळते. प्रत्येक चळवळीला उद्देश असतात आणि ते साध्य करण्यासाठी अनेक कार्यक्रम आखले जातात. चळवळ ही कृती असते. त्यामध्ये लोक स्वत:ला झोकून देतात. त्यांचा देह व विचार या दोहोंचा संगम होऊन एक क्रांतीचे बीज जन्म घेते. चळवळीला एका पद्धतशीर विचाराची आवश्यकता असते. तो विचार ‘थिअरी’ असतो. ‘थिअरी’ दिशा देणारी, मार्ग ठरवणारी प्राथमिक पायरी असते. त्यामुळे अन्यायाविरोधात बंधुतेसाठी, जातीअंतासाठी लढणारी ‘आंबेडकराईट थिअरी’ भारतातील अनेक जातींसाठी, गोरगरीब- कष्टकऱ्यांसाठी, शिकलेल्या- न शिकलेल्या सर्वासाठीच मार्गदर्शक ठरते.

‘आंबेडकराईट थिअरी’ आंबेडकरवादाच्या अफाट, विस्तीर्ण प्रक्रियेतून पुढे आली आहे. हा एक शास्त्रशुद्ध कार्यपद्धतीचा प्रस्ताव आहे, ज्याचे ध्येय हे समाजाची पुनर्रचना करणे होय.

 पुनर्रचना कशासाठी?

 जो समाज मानवतावादी, समानतेच्या मूलभूत गरजांपासून वंचित आहे, त्या समाजासाठी पुनर्रचना हाच एकमेव पर्याय ठरतो. पुनर्रचनेचा मार्ग न अवंबल्यास समाज उद्रेकी होऊन रक्तरंजित क्रांतीच्या स्वरूपात व्यक्त होऊ शकतो. त्यामुळे आंबेडकराईट थिअरी ही एक जबाबदार पद्धती आहे, तिचा जोर रक्तरंजित वा रक्तहीन क्रांतीत नसून व्यक्तिकेंद्रित बदलांत आहे. व्यक्तीचे हक्क व तिचे स्वातंत्र्य यावर ही ‘थिअरी’ अधिक भर देते, म्हणून जिथे जिथे व्यक्तिस्वातंत्र्यावर गदा आली, तिथे तिथे आंबेडकरांच्या अनुयायांनी आपल्या मूल्यांना प्राधान्य दिले. व्यक्तीच्या स्वातंत्र्याची गोष्ट तिथे उपयुक्त ठरू शकते. भारताच्या व्यवस्थेत जिथे अद्याप व्यक्तीच्या माणूसपणाचा पूर्ण स्वीकार झालेला नाही, तिथे व्यक्तिस्वातंत्र्याची कल्पना कशी उपयुक्त ठरेल?

म्हणूनच डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी उपेक्षितांना ओळख देण्याचे प्राथमिक कार्य केले. ज्या समाजाला साडेतीन हजार वर्षे अमानुष वागणूक दिली, त्या समाजाला मानवी ओळख मिळवून देण्यासाठी आंबेडकरांनी प्रयत्न केले आणि त्यात ते यशस्वीही झाले. त्यानंतर आला दुसरा टप्पा. हा टप्पा आहे नागरिकत्वाचा.

एकदा व्यक्तीला समान दर्जा प्राप्त झाला की, तो दर्जा सुरक्षित ठेवणेही तेवढेच महत्त्वाचे आहे. त्यासाठी कायदेशीर हमी मिळणे आवश्यक आहे, परिणामी त्यांना नागरिकत्व मिळवून देणे अत्यंत महत्त्वाचे ठरते. नागरिकत्व व्यक्तींना अधिकार देते आणि हे अधिकार त्यांना समान दर्जा मिळवून देतात. समानतेच्या तत्त्वावर नागरिकांचा विकास व्हावा, म्हणून निवडून आलेली सरकारे आवश्यक त्या उपाययोजना करतात. उपेक्षितांना सवलती, आरक्षण आणि विविध योजनांतून विकासाच्या संधी मिळवून दिल्या जातात. या साऱ्याचा दस्तावेज संविधानात मांडला जातो.

तिसरा टप्पा हा या नव्याने नागरिक झालेल्यांना मुख्य प्रवाहात आणण्याचा असतो. त्यांना मताधिकार देऊन हे उद्दिष्ट साध्य केले जाते. मताधिकारामुळे नागरिक आपले नागरी व राजकीय हक्क बजावण्यासाठी सक्षम होतात. मग ते आपल्या संस्था व संघटना स्थापन करून दबाव गट म्हणून काम करतात. चौथ्या टप्प्यावर नागरिक सक्षम झाल्यानंतर त्यांना कर देणारे घटक बनवले जाते. त्यांच्याकडून मिळवलेल्या करांतून राज्याचे व्यवस्थापन चालवले जाते.

हा आहे ‘आंबेडकराईट थिअरी’चा आशावाद

मात्र ही प्रक्रिया सुरळीतरीत्या पार पडेलच असे नाही. यात अनेक अडथळेही येतात. पण हे अडथळे संवैधानिक मार्गानी दूरही करता येतात. भारतातील बहुजन समाजाने या सूत्राचे काटेकोर पालन केले आहे. समाजाने अन्याय केला तरीही त्यांनी आपले नागरिकत्व प्रत्यक्ष कृतींतून सिद्ध केले आहे. त्यामुळे यापुढेही व्यवस्थेने त्यांना कायदेशीर आणि अहिसेंच्या मार्गाने न्याय मिळवून दिला नाही, तर अन्य मार्ग स्वीकारणे त्या समाजास भाग पडेल, मात्र तो मार्ग अपेक्षितच आहे असे नाही.

suraj.loksatta@gmail.com

मराठीतील सर्व चतु:सूत्र ( Chatusutra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Chatusutra hope ambedkarite theory society equality basic needs reconstruction equality state system social ysh

ताज्या बातम्या