डॉ. जयदेव पंचवाघ brainandspinesurgery60@gmail.com

मेंदूमध्ये साधारण मध्यभागी असलेल्या ‘पायनियल ग्रंथी’तून स्रवणाऱ्या या संप्रेरकामुळे निद्रा-जागृतीचं चक्र सुरू राहातं..

mumbai, KEM Hospital, Artificial Insemination Center, Project Stalled, Election Code of Conduct, child, Infertility, husband wife, couple for Artificial Insemination, mumbai KEM Hospital,
मुंबई : ‘केईएम’च्या कृत्रिम गर्भधारणा केंद्राला आचारसंहितेचा फटका
Loksatta vasturang Lessons from redevelopment buildings Layout of flats
पुनर्विकासाचे धडे : कौटुंबिक अवकाश जपू या!
dombivli ganesh nagar marathi news, dombivli concrete road broken marathi news
डोंबिवली: पंधरा दिवसांपूर्वी तयार केलेल्या गणेशनगर मधील काँक्रीट रस्त्याची तोडफोड, नागरिकांमध्ये तीव्र संताप
istanbul fire
इस्तंबूलच्या नाईटक्लबमध्ये भीषण आग, २९ जणांचा होरपळून मृत्यू!

मेंदूच्या मध्यभागी स्थित असलेल्या पायनियल ग्रंथीच्या इतिहासाचा एक उद्बोधक पैलू आपण मागच्या आठवडय़ात पाहिला. प्राचीन काळापासून या ग्रंथीचा उपयोग करून आत्मा व शरीर यांना जोडण्याचे प्रयत्न किती विविध प्रकारे केले गेले हे आपण पाहिलं.

पायनियल ग्रंथीच्या कार्याविषयी शास्त्रीय माहिती मात्र गेल्या काही वर्षांतच हळूहळू उपलब्ध झाली आहे. अजूनही या ग्रंथीची मेंदूतील आणि शरीरातील इतर भागांशी होणारी माहितीची देवाणघेवाण कशी होते हे पूर्णपणे समजलं आहे असं म्हणता येणार नाही, पण पायनियल ग्रंथीचं मुख्य कार्य काय आहे हे मात्र स्पष्ट आहे.

प्रत्येक प्राण्यात निद्रावस्था व जागृत अवस्था यांचं एक व्यवस्थित चक्र असणं महत्त्वाचं असतं. आणि निसर्गाने ते तसं तयारही केलेलं आहे. आपल्या आसपास याचं रोजचं दिसणारं उदाहरण म्हणजे पक्षी. सूर्यास्ताची वेळ जवळ येईल तसं, अक्षरश: घडय़ाळ लावल्याप्रमाणे पक्षी घरटय़ाकडे जाण्याची तयारी करू लागतात आणि सूर्योदयापूर्वीच त्यांची हालचाल व पुढच्या दिवसाची तयारी सुरू होते. हे नेमकं घडय़ाळाच्या अचूकतेनं कसं घडतं ? या प्रश्नाचं उत्तर मुख्यत्वे पायनियल ग्रंथीत आहे. पायनियल ग्रंथीमधून मेलॅटोनिन नावाचं जे विशेष रसायन तयार होतं त्याची वर-खाली होणारी पातळी हे चक्र अचूकतेने घडवून आणते.

आपल्या शरीरातसुद्धा अशी काही नैसर्गिक चक्रं असतात. ‘मीटर’ असतात. उदाहरणार्थ झोप येणं आणि जाग येणं. शरीराचं तापमान विशिष्ट पातळीवर ठेवणं. आपल्या वजनाची पातळी अचूकपणे नियमित करणं वगैरे. मात्र निसर्गानं त्याचबरोबर माणसाला बुद्धी दिलेली आहे. काही गोष्टी साधारण निसर्गनियमांविपरीत माणूस स्वत:च्या इच्छेनुसार करू शकतो. उदा. भूक लागलेली नसताना फक्त चवीसाठी खाणं, सूर्यास्तानंतर न झोपता उशिरापर्यंत जागणं, विविध ड्रग्स व औषधांच्या मदतीने शरीरातील निसर्गचक्र बदलणं.. इत्यादी.

साधारणपणे शरीरातील समतोल राखणारी केंद्रं मेंदूतील ‘हायपोथॅलॅमस’ या भागात असतात. हा समतोल ठेवता यावा म्हणून हायपोथॅलॅमसला मेंदूतील आणि शरीरातील इतर भागांतून चेतासंस्थेमार्फत माहिती पोहोचत असते. या आधारावर हायपोथॅलॅमस मेंदूतल्या इतर भागांकडे संदेश पाठवून पाहिजे ते बदल घडवून आणत असतो. याच तत्त्वाने हायपोथॅलॅमस व इतर काही भागांतून पायनियल ग्रंथीकडे संदेश जातात. या ग्रंथीतून स्रवणाऱ्या मेलॅटोनिन या संप्रेरकाची पातळी कमी किंवा जास्त करण्याची क्षमता या संदेशांमध्ये असते. ‘झोप येणे’ या प्रक्रियेपासून प्रत्यक्ष झोप लागण्यापर्यंतच्या घटनाक्रमात मेलॅटोनिनचा महत्त्वाचा सहभाग असतो. एवढंच नाही तर शांत व गाढ झोप होण्यासाठी मेलॅटोनिन उपयुक्त ठरतं. अर्थातच गाढ झोपेचा आपल्या संप्रेरकांवर (हॉर्मोन) आणि इतर चयापचय क्रियेवर जो चांगला परिणाम होतो तोसुद्धा प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षपणे मेलॅटोनिनमुळे होतो असं म्हणता येईल.

आपल्या डोळय़ात पडणारा प्रकाश जितका प्रखर व अधिक वेळ, तितकी मेलॅटोनिन तयार होण्याची प्रक्रिया कमी होते. साध्या शब्दांत सांगायचं तर झोपण्यापूर्वी आपण जितका प्रलंबित वेळ प्रकाशाकडे बघण्यात घालवू, तितकी मेलॅटोनिनची पातळी कमी राहते आणि झोप येण्याची प्रक्रिया लांबणीवर पडते. हा प्रकाश कुठलाही असला तरी चालतो. दूरदर्शन, संगणक, मोबाइल फोन यांचा प्रकाशसुद्धा पुरतो.

आजच्या जगात एक तर सूर्य मावळल्यावर जिवाची मुंबई (किंवा जिवाचा न्यूयॉर्क, लास व्हेगास, थायलंड.. काहीही म्हणा) करण्याची संस्कृती जगभर वेगाने पसरली आहे. या जिवाची मुंबई करण्याच्या विविध प्रकारांत कृत्रिम प्रकाश सगळीकडे असतो. अगदी आपल्या नेहमीच्या आयुष्यातसुद्धा रात्री उशिरापर्यंत आपल्या सभोवताली सगळीकडेच प्रकाश पसरलेला असतो किंवा अशा कृत्रिम प्रकाश फेकणाऱ्या उपकरणांकडे आपण बघत असतो. दुसरं म्हणजे वेगवान विमानप्रवासाच्या युगात अनेक व्यक्ती निरनिराळय़ा टाइम झोनमध्ये फिरत असतात. सकाळच्या वेळी प्रस्थान करून पोहोचण्याच्या ठिकाणीसुद्धा सकाळच असू शकते. त्याचे शरीरावरचे व मनावरचे दुष्परिणाम आपण स्वत: अनुभवत असतो आणि आजूबाजूला बघतही असतो.

या अनुषंगाने सध्या पायनियल ग्रंथीवरच्या संशोधनाला खूपच महत्त्व येत चाललं आहे. या संशोधनातून गेल्या काही वर्षांत ज्या महत्त्वाच्या गोष्टी समजल्या आहेत त्या अशा : 

पायनियल ग्रंथीकडे मेंदूच्या महत्त्वाच्या विविध भागांतून संदेश येतात. यातले मुख्य संदेश हे डोळय़ातील दृष्टिपटलापासून हायपोथॅलॅमसच्या एका विशिष्ट भागाकडे जाऊन पायनियल ग्रंथीकडे पाठवले जातात. अशा रीतीने डोळय़ात पडणाऱ्या प्रकाशाच्या प्रमाणावर पायनियल ग्रंथीचं कार्य कमीजास्त होतं. संध्याकाळ व रात्रीच्या वेळी हा प्रकाश कमी होत जातो आणि मेलॅटोनिनचं स्रवणं वाढत जाऊन झोप येऊ लागते. त्याचबरोबर झोप येण्यास कारणीभूत ठरणाऱ्या इतर गोष्टींचा परिणामसुद्धा होऊन व्यक्ती वेळेवर झोपते. झोपेच्या पहिल्या काळातसुद्धा मेलॅटोनिनचं प्रमाण जास्त राहून गाढ झोप चालू राहते. सकाळी उजाडण्याच्या वेळेच्या आधीपासूनच मेलॅटोनिनचं प्रमाण कमीतकमी होत जातं. वेळच्या वेळी जाग येण्यासाठी हे गरजेचं असतं. हे निद्रा – जागृतीचं नैसर्गिक चक्र प्रत्येक व्यक्तीचं विशिष्ट पद्धतीने बसलेलं असतं.

पायनियल ग्रंथीचं कार्य बिघडलं तर मग झोपच येणार नाही का? तर ते तसं नाही. झोप येईल पण या निश्चित चक्रावर मात्र परिणाम होईल.

गेल्या दहा-पंधरा वर्षांत मेलॅटोनिनच्या इतर कार्याविषयी संशोधन झालं आहे. मेलॅटोनिन एक अँटी ऑक्सिडंट म्हणून कार्य करतं, वजन बेतात ठेवायला मदत करतं, शरीरातील दाह कमी करतं, मधुमेहासारखे काही आजार काबूत ठेवतं आणि मानसिक ताणतणाव कमी करतं, असं लक्षात आलं आहे. यातली बरीच कार्ये योग्य प्रमाणात आणि गाढ झोप झाल्याने घडून येत असावीत, असंही विज्ञानाचा प्राथमिक ठोकताळा आहे.

झोपेची फक्त ‘एकूण वेळ’च महत्त्वाची आहे की दिवसाच्या कोणत्या काळात ही झोप होणं महत्त्वाचं आहे, यावरही संशोधन चालू आहे. साध्या शब्दांत सांगायचं तर पायनियल ग्रंथीत तयार होणारं मेलटोनिन आपल्याला ‘लवकर निजे लवकर उठे..’ हे शास्त्रीय निकषावर खरं असल्याचा संदेश देत असण्याची शक्यता आहे.

आणि म्हणूनच या ग्रंथीला ‘प्रगाढ विश्रांती देणारी आणि त्याद्वारे शरीर व मनाची झीज भरून काढणारी ग्रंथी’ असं म्हणता येईल.

एक न्यूरोसर्जन म्हणून काम करताना ब्रेन  टय़ूमर क्लिनिकमध्ये पायनियल ग्रंथीच्या गाठी नेहमीच बघाव्या लागतात. या गाठींविषयी काही गोष्टी थोडक्यात सांगितल्या तर उद्बोधक होतील.

पायनियल ग्रंथीपासून किंवा तिच्या अगदी लगतच्या भागापासून साध्या, मध्यम किंवा कॅन्सरच्या गाठी निर्माण होऊ शकतात. या गाठीचा दाब मेंदूच्या मिडब्रेन या नाजूक भागावर येत जातो. हेन्री पेरिनॉड या फ्रेंच डॉक्टरने या गाठींमुळे होणाऱ्या लक्षणांचं वर्णन १८८० ते १९०० सालादरम्यान प्रथम केलं.  डोळय़ांच्या हालचालीवर परिणाम होऊन दोन्ही डोळे जमिनीच्या दिशेने फिरलेल्या अवस्थेत राहतात आणि डोळे वर फिरवून बघण्याची क्षमता नाहीशी होते हे त्यातलं एक कोणालाही पटकन समजेल असं ठळक लक्षण आहे.

पायनियलच्या गाठींसंदर्भात दुसरं नाव आवर्जून सांगावं लागेल ते म्हणजे डॉक्टर क्राऊज यांचं. १९१३ साली पायनियल ग्रंथीची गाठ त्यांनी प्रथम शस्त्रक्रिया करून काढली.

मागच्याच लेखात सांगितल्याप्रमाणे ही ग्रंथी मेंदूच्या जवळजवळ मध्यभागी असते. त्या ग्रंथीच्या सभोवताली मेंदूतील अनेक नाजूक व महत्त्वाची केंद्रं असतात. थोडक्यात त्या गाठीपर्यंत पोहोचणं तसं अवघड असतं.

गेल्या काही वर्षांत एण्डोस्कोप आणि कॉम्प्युटर निर्देशित उपकरणांमुळे खूप फरक पडत चालला आहे.

तर ज्या ग्रंथीचा इतिहास हा आत्म्यापासून सुरू झाला तिचा आजच्या काळात सर्वानाच आवश्यक असणाऱ्या गाढ झोप आणि ‘रीचार्ज’शी कसा संबंध आहे याचा आढावा या लेखात घेतला.

मेलॅटोनिन हे संप्रेरक औषध म्हणूनसुद्धा आज उपलब्ध आहे. ज्यांचं निद्रा -जागृतीचं चक्र ‘गंडलेलं’ आहे अशा लोकांमध्ये व जेट लॅगमध्ये याचा उपयोग सुरू झाला आहे. लेखक मेंदू व मणक्याचे शस्त्रक्रियातज्ज्ञ आहेत.