संतांच्या सहवासात साधनाचा लाभ कसा होतो, याच्या दोन गोष्टी आपण पाहिल्या. तिसरी गोष्ट म्हणजे संतांच्या नि:स्वार्थी प्रेमाला वश होऊन साधक त्यांच्या सेवेत आयुष्य घालवतो. या ‘वश’ होण्यावर थोडी चर्चा आपण मागे केलीच, पण तरीही आज बाहेरच्या जगात बुवाबाजीचा जो बाजार भरला आहे, तो पाहता त्या अनुषंगानंही थोडं विवरण केलं पाहिजे. सत्पुरुष डॉ. श्रीकृष्ण देशमुख याचा फार मनोज्ञ मागोवा घेताना म्हणतात की, ‘‘दुर्दैवाने हल्लीच्या शिक्षणाच्या वातावरणातही बहुसंख्य भारतीयांवर आणि काही पाश्चात्यांवरसुद्धा चमत्कारांचा जबर पगडा आहे. अस्सल अध्यात्मावर चमत्कारांच्या धुळीचा मोठा थर साचला आहे. जोपर्यंत माणूस प्रारब्धाचा आनंदाने स्वीकार करून आत्मानंदासाठी झटत नाही, तोपर्यंत त्यावर चमत्काराचा पगडा राहणार आहे आणि असे ‘चमत्कार’ करणारेही राहणार आहेत! माणसालाही असे बाबा-बुवा-महाराज-ताई-आई हवे असतात. ती त्याची गरज आहे. त्यामुळे ही मंडळी (बाबा-बुवा आदी) पर्यायाने त्याचीच निर्मितीही ठरते.’’ (अध्यात्म आणि जीवन, पृ. १००). हा मुद्दा स्पष्ट करताना डॉ. देशमुख आपल्याला अत्यंत परिचित, आपल्या समाजात सहज घडणारी एक गोष्ट सांगतात. ते वर्तमानपत्रातली एक बातमी सांगतात की, ‘एका बदमाशाने नोटा दुप्पट करून देतो, असे सांगून एका खेडुताला फसविले.’ या बातमीचा तटस्थपणे विचार करायला सांगून ते आपल्या एरवी लक्षातही न येणारे काही निष्कर्ष मांडतात. ते निष्कर्ष असे : १) बदमाशाजवळ दोन खोटय़ा नोटा आहेत.
२) त्याला या दोन खोटय़ा नोटांच्या मोबदल्यात एक खरी नोट हवी आहे.
३) खेडुताजवळ एक खरी नोट आहे.
४) त्याला त्याच्या मूर्ख कल्पनेनुसार एकाऐवजी दोन खऱ्या नोटा हव्या आहेत.
५) बदमाश हा धूर्त लोभी आहे.
६) खेडूत हा मूर्ख लोभी आहे.
७) बदमाश हातचलाखी करून दोन खोटय़ा नोटा खेडुताच्या गळ्यात बांधतो आणि त्याची खरी नोट खिशात घालून पसार होतो.
८) सामान्य माणसाची सहानुभूती खेडुताच्या बाजूने असते.
९) माणसाला नेहमी स्वत:सारख्या माणसाविषयी सहानुभूती वाटते.
१०) धूर्त लोभी ही मूर्ख लोभ्याचीच निर्मिती आहे!
मग त्या खेडुताप्रमाणे ‘चमत्कारा’ची आस बाळगणाऱ्याची गत असते, हे उकलून दाखवताना पू. डॉ. देशमुख सांगतात की, ‘‘अगदी याप्रमाणे योग्यता, कर्तबगारी, श्रम, कौशल्य आणि अनुकूल प्रारब्ध नसल्यामुळे, जे मिळणार नाही किंवा घडणार नाही, ते कोणा बुवा-आईच्या पायावर डोके ठेवून आणि भरपूर दक्षिणा देऊन मिळेल किंवा घडेल, असे ज्यांना वाटते त्यांना ते तसे तथाकथित देणारे किंवा घडविणारे अवश्य भेटतात! मूर्ख शिष्याला धूर्त गुरू जरूर भेटतात. ते त्या शिष्यांच्याच गरजेपोटी निर्माण झालेले असतात.’’ पू. डॉ. देशमुख यांच्या या बोधाचा मागोवा आपण घेणार आहोत. या बोधातलं अत्यंत महत्त्वाचं वाक्य आहे की, ‘‘जोपर्यंत माणूस प्रारब्धाचा आनंदाने स्वीकार करून आत्मानंदासाठी झटत नाही, तोपर्यंत त्यावर चमत्काराचा पगडा राहणार आहे आणि असे ‘चमत्कार’ करणारेही राहणार आहेत!’’ मूर्ख लोभी भूमंडळी आहेत तोवर धूर्त लोभ्यांची मांदियाळीही अनवरत भेटणार आहे!
चैतन्य प्रेम