बिहार विधानसभेची निवडणूक जवळ येऊन ठेपली असतानाच मतदार याद्यांच्या फेरतपासणीसाठी निवडणूक आयोगाने हाती घेतलेल्या मोहिमेमुळे राज्यातील वातावरण चांगलेच ढवळून निघाले आहे. ही मोहीम मतदारांची नावे वगळण्यासाठी असू नये, असे सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक आयोगाला सुनावले ते एका अर्थी बरेच झाले. मोठ्या प्रमाणावर मतदारांची नावे वगळण्याची शक्यता लक्षात घेता, विरोधी राष्ट्रीय जनता दल, काँग्रेस, डावी आघाडी या ‘इंडिया’ आघाडीकडून विधानसभा निवडणुकीवर बहिष्कार घालण्याच्या पर्यायावर विचार सुरू झाला आहे.
निवडणूक आयोगाच्या निष्पक्षपातीपणावर शंका घेऊन विरोधी पक्षच निवडणुकीवर बहिष्कार घालण्याचे सूतोवाच करतो हे लोकशाहीत नक्कीच शोभादायक चित्र नाही. हा सारा राजकीय गोंधळ सुरू असतानाच खुद्द सत्ताधारी राष्ट्रीय लोकशाही आघाडीत (एनडीए) सारे काही आलबेल नाही, हे लोकजनशक्ती पार्टीचे सर्वेसर्वा आणि केंद्रीय मंत्री चिराग पासवान यांनी सरकारला दिलेल्या पाठिंब्याबद्दल खेद व्यक्त केल्यानेच उघड झाले आहे. ‘गुन्हेगारीवर नियंत्रण आणू शकत नाही अशा सरकारला मी पाठिंबा देतो याची मला लाज वाटते’ असे विधान त्यांनी केले.
बिहारमध्ये गेल्या महिनाभरात सात जणांची हत्या झाली. याखेरीज, गृहरक्षक दलाच्या भरतीसाठी आलेल्या २६ वर्षीय युवतीला चक्कर आल्याने तिला रुग्णालयात नेत असताना चालत्या रुग्णवाहिकेत तिच्यावर सामूहिक बलात्कार करण्यात आला. कायदा- सुव्यवस्थेच्या या चिंताजनक स्थितीबद्दल विरोधकांकडून टीका होणे स्वाभाविक; पण सरकारमधील घटक पक्षाचा नेता पाठिंबा दिल्याची लाज वाटते हे विधान करतो हे अधिकच गंभीर. यानंतर चिराग पासवान यांनी ‘नितीशकुमारच पुन्हा मुख्यमंत्री होतील,’ अशी सारवासारव केली असली तरी बाण भात्यातून बाहेर पडला आहे.
चिराग पासवान यांचा बोलविता धनी कोण, याची मग दिल्ली आणि पाटण्याच्या राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली. बिहार विधानसभेची २०२० ची निवडणूक चिराग पासवान यांनी एनडीएमधून बाहेर पडून स्वतंत्रपणे लढवली होती. त्यांच्या पक्षाने भाजपच्या विरोधात लढण्याचे टाळून, मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्या संयुक्त जनता दलाविरोधातच मुख्यत्वे उमेदवार उभे केले होते. पासवान यांच्या पक्षाचा एकच आमदार निवडून आला पण नितीशकुमार यांच्या पक्षाच्या ३०च्या आसपास उमेदवारांचा पराभव पासवान यांच्या उमेदवारांना मिळालेल्या मतांमुळे झाल्याचा निष्कर्ष काढण्यात आला.
नितीशकुमार यांचे मुख्यमंत्रीपद कायम राहिले; पण संख्याबळाअभावी त्यांची राजकीय ताकद कमी झाली. लोकसभा निवडणुकीपूर्वी चिराग पासवान यांनी पुन्हा एनडीएमध्ये प्रवेश केला. नितीशकुमार यांना राजकीय शह देण्यासाठीच भाजपने पासवान यांचा वापर केल्याचा तेव्हा आरोप झाला होता. मुख्यमंत्री नितीशकुमार यांनीही पासवान यांच्या या खेळीबद्दल भाजपकडे अंगुलीनिर्देश केला होता. राज्यात एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांना भाजप ज्या पद्धतीने झुंझवतो तसाच प्रकार भाजपने बिहारमध्ये नितीशकुमार आणि चिराग पासवान यांच्याबाबत केला होता.
चित्रपट क्षेत्रात अपयशी ठरल्यावर राजकारणात प्रवेश केलेल्या चिराग पासवान यांची मुख्यमंत्रीपदाची महत्त्वाकांक्षा लपून राहिलेली नाही. वडील रामविलास पासवान यांचा बिहारच्या राजकारणावर प्रभाव होता; पण लालूप्रसाद यादव, नितीशकुमार यांच्यासारखी स्वत:च्या पक्षाची ताकद त्यांना निर्माण करता आली नव्हती. चिराग यांनाही अशाच मर्यादा आहेत. उत्तर भारतातील अन्य साऱ्या हिंदी भाषक राज्यांचे मुख्यमंत्रीपद मिळाले. पण बिहारचे अद्याप मिळाले नाही ही सल भाजपला आहेच.
‘नितीशकुमार यांच्या नेतृत्वाखाली आगामी निवडणूक लढवू’ असे आज म्हणणारा भाजप निकालांनंतर संख्याबळ वाढल्यास मुख्यमंत्रीपदावर दावा सांगेल. महाराष्ट्रात एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढवण्यात आली, पण संधी येताच भाजपने त्यांची बोळवण उपमुख्यमंत्रीपदावर केली. ही पार्श्वभूमी लक्षात घेता नितीशकुमार यांची ताकद कमी करण्यासाठी भाजपचीच चिराग पासवान यांना फूस आहे का, अशी शंका घेण्यास वाव उरतो.
मुख्यमंत्री नितीशकुमार यांना वयोमानानुसार प्रकृती साथ देत नाही. २००५ मध्ये मुख्यमंत्रीपदावर येताच गावोगावच्या गुंडांना तुरुंगात टाकून त्यांनी लोकांची सहानुभूती मिळवली होती. यामुळेच भाजप किंवा काँग्रेस अशा कोलांटउड्या मारूनही (लालूप्रसाद यादव यांच्या शब्दांत ‘पलटूराम’ ठरूनही) नितीश यांनी जनाधार कायम राखला होता. सध्या बिहारमध्ये गुंडांनी पुन्हा डोके वर काढलेले दिसते. लोकसभेत नितीशकुमार यांच्या पक्षाच्या १२ खासदारांचा पाठिंबा मोदी सरकारसाठी महत्त्वाचा; म्हणून गेल्या वर्षभरात नितीशकुमार यांना खूश ठेवण्यासाठी बिहारला झुकते माप दिले गेले. बिहारची निवडणूक अटीतटीची होणारच, त्यात चिराग पासवान यांच्या खेळीने नितीशकुमार यांच्या अडचणींमध्ये वाढ झाली आहे.