नारा महाराजांचा अभंग ऐकून योगेंद्र आणि ज्ञानेंद्र विचारात पडले होते. विचारात बुडालेल्या तिघा मित्रांकडे पाहात कर्मेद्रनं शांततेचा भंग केला..
कर्मेद्र – संतांची इस्टेट ती काय असणार? त्यामुळे हे भांडण काही औरच असलं पाहिजे, हे नक्की..
योगेंद्र – वा.. कर्मू तू आमच्या विचाराला वेगळीच दिशा देत आहेस.. आम्हीही इस्टेटीच्याच विचारात अडकलो होतो..
हृदयेंद्र – योगा असं उपहासानं बोलू नकोस.. कर्मू एखाद्या अभंगावर विचार करतोय, याचंच मला अप्रूप वाटतंय..
कर्मेद्र – बाबांनो, मला खरंतर वाचताच अभंगाचा अर्थ समजतो.. फक्त तुम्हाला बोलायला मिळावं आणि तुम्ही बरोबर अर्थ लावता का, हे पाहण्यासाठी मी गप्प बसतो..
ज्ञानेंद्र – (हसत) बरं कर्मेद्र महाराज मग या अभंगाचा अर्थ तुम्हीच सांगा आम्हा पामरांना..
कर्मेद्र – नको नको.. तुम्हीच झटापट करा..
योगेंद्र – का? आता का घाबरतोस?
कर्मेद्र – एऽऽ घाबरत नाही.. मन चळू नये म्हणून घाबरायला मी योगी नाही, बुद्धी कमी पडू नये म्हणून घाबरायला मी ज्ञानी नाही की भाव कमी पडू नये म्हणून घाबरायला मी भक्त नाही..
हृदयेंद्र – (हसत) आता निर्भयपणे मग सांगूनच टाक की अर्थ!
कर्मेद्र – ठीक आहे.. पामरांनो ऐका.. नामयाची पोरं पुंडलिकाच्या दाराशी का भांडताहेत? अरे तुमच्या वडिलांनी काय ठेवलं काय नाही ठेवलं, यासाठी भांडायचं तर आपल्याच घरात भांडा ना? दुसऱ्याचा दाराशी का जाता? सांगा सांगा..
हृदयेंद्र – (आश्चर्यानं) ग्रेट कर्मू.. हा मुद्दा लक्षातच आला नव्हता..
कर्मेद्र – आता कौतुक बस.. सांगा की का पुंडलिकाच्या दाराशी भांडायचं आणि आळ विठ्ठलावर का घ्यायचा? इस्टेट बाबाची आणि जबाबदार धरायचं दुसऱ्याच दोघांना? बाबांनो पडतोय का डोक्यात प्रकाश?
हृदयेंद्र – हो बाबा हो.. कर्मू हा मोठाच धक्का आहे..
योगेंद्र – अरे एवढी बुद्धी होती तर परीक्षेच्या वेळी कुठे गेली होती? किती र्वष वाचली असती..
कर्मेद्र – (हसत आणि योगेंद्रच्या पाठीत गुद्दा मारत) मी बुद्धीचा गुलाम नाही.. पण सांगा तर असं का व्हावं? इस्टेट कुणाची आणि त्रागा कुणाकडे?
हृदयेंद्र – धन्यवाद कर्मू.. आता कळतंय.. मुळात विठोबाचं विटेवर अठ्ठावीस युगं उभं राहाणं घडलं ते पुंडलिकामुळेच.. (हृदयेंद्रचे डोळे भरून आले) आम्ही बिघडलो तुम्ही बिघडाना.. एक पुंडलिक बिघडला.. आईबापाच्या सेवेसाठी आधीच व्यवहार विसरला होता.. मग त्याला जाणवलं अठ्ठावीस युगं हेच आईबाप नसतील.. पण अठ्ठावीस युगं हाच विठ्ठल मायबाप बनून माझ्यासाठी.. माझी वाट पाहात असाच उभा ठाकणार आहे.. अनंत जन्मं खेळात सरले.. वय वाढलं तसतशी खेळणी बदलली, पण खेळणं संपलं नाही.. लहानपणी बाहुल्या होत्या, म्हातारपणी नातवंडं आली.. खेळ आणि खेळणं संपलं नाही.. खेळण्यातला रस आटला नाही.. तो मायबाप निर्धारानं माझी वाट पाहात उभा आहे.. पुंडलिकाला जेव्हा हे उमगलं तेव्हा पंढरीत भावभक्तीची चंद्रभागा वाहू लागली.. त्या चंद्रभागेत कित्येक मनसोक्त डुंबले.. एकाच काळात कितीतरी योगीविरागी संत झाले.. निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान, मुक्ताबाईंपासून भक्तीची पताका कित्येकांनी आपल्या खांद्यावर घेतली.. नामदेवही त्यातलेच ना? अरे पुंडलिका तुझ्या नादानं इतके संत आणि आमचा बाही नादावला.. जगाच्या दृष्टीनं बिघडला.. खऱ्या अर्थानं घडला.. मग आम्हीच मागे का? आम्ही त्याचीच पोरं ना? मग त्याच्या आंतरिक भक्तीचा वारसा आमच्या मनात का येत नाही? आम्ही कुठे कमी पडतो? बासारखं समर्पण आम्हाला का साधत नाही? चौघं पुंडलिकाच्या दारी भांडत आहेत.. त्यासाठी पुराणांतरीचे दाखले देत आहेत.. इस्टेटीसाठी जुन्या कागदपत्रांच्या नोंदी दाखवाव्यात ना? तसे! अरे पुराणांत तर सांगितलंय की भक्तीनं देव अंकित होतो.. नामाच्या ऋणानं बांधला जातो! मग आम्ही भक्तीत कमी पडतो की नामात कमी पडतो? जर आम्ही कमी पडत असू तर सांगा नाहीतर हा विठ्ठलच आम्हाला फसवतोय का, ते तरी सांगा!!
चैतन्य प्रेम