आपल्याकडे अशी पुस्तकं खूप प्रकाशित होऊ लागली आहेत.. ‘अशी’ म्हणजे, जणू आपण काही तरी मोठा गौप्यस्फोट करतो आहोत असा आव आणणारी पुस्तकं. प्रकाशनापूर्वीच त्यांचा जबरदस्त बोलबाला होतो! भारतात गेल्या दीड वर्षांत प्रकाशित झालेली किमान चार पुस्तकं, ही लोक ज्यांना एरवीसुद्धा धुडकावणारच होते अशा संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारबद्दलची होती.
याउलट अमेरिकेत झालं. त्या देशाच्या ‘पहिल्या महिला राष्ट्राध्यक्ष’ ठरण्याची इच्छा असलेल्या हिलरी रॉडहॅम- क्लिंटन आणि त्यांचे माजी राष्ट्राध्यक्ष पती बिल क्लिंटन यांनी राजकीय कारणांसाठी कशी माया जमवली आणि त्यापायी कोणत्या धोरणात्मक तडजोडी केल्या, अशा आरोपांचा लेखाजोखा मांडणारं ‘क्लिंटन कॅश’ हे पुस्तक एप्रिलच्या अखेरीस अमेरिकेत प्रकाशित झालं. लेखक पीटर श्वाइर्झर यांनी क्िंलटन दाम्पत्याबद्दलच्या सर्व उपलब्ध माहितीचा (त्यात भारतीय इंग्रजी वृत्तपत्रं आणि वृत्त-संकेतस्थळं आली आणि विकिलीक्सनं बाहेर काढलेल्या ‘केबल्स’देखील) धांडोळा घेऊन, क्लिंटन कुठे कुठे संशयास्पद ठरू शकतात, असा जणू काही खटलाच उभा करणारं हे पुस्तक लिहिलं आहे. हे आधार इतके भरपूर की मूळ पुस्तक १८६ पानांत संपतं आणि पुढली ५६ पानं केवळ अमुक माहिती कुठून मिळाली याबद्दलच्या तळटिपाच! त्यामुळे या पुस्तकाकडे साहजिकच, अधिक गांभीर्यानं पाहिलं गेलं. इतकं की, क्लिंटन दाम्पत्याच्या ‘चाहत्यां’कडून या पुस्तकाला उत्तर देणारं एक प्रति-पुस्तक प्रकाशित झालं आहे. ते पुस्तक भारतात अद्याप आलेलं नाही, परंतु त्याहीबद्दल पुन्हा कधी तरी सांगता येईलच.. सध्या ‘क्लिंटन कॅश’बद्दल!
 आफ्रिका खंडातील देश तसंच रशिया आणि कझाकस्तान यांच्याशी क्लिंटन (हिलरी वा बिल) यांचे व्यवहार कोणत्या प्रकारे संशयास्पद ठरू शकतात, याच्या छाननीसाठी त्या त्या देशांतील सार्वजनिकरीत्या उपलब्ध माहितीचा आधार घेऊन त्याला अर्थातच अमेरिकेतील माहितीची जोड द्यायची, असं या पुस्तकाच्या लिखाणाचं तंत्र आहे.
कदाचित या तंत्रामुळेच असेल, पण भारतीय वाचक अगदी उत्सुकतेनं या पुस्तकाचं चौथं प्रकरण (या प्रकरणाचं नाव : ‘इंडियन न्यूक्स : हाउ टु विन अ मेडल बाय चेंजिंग हिलरीज माइंड) वाचू लागतील, तेव्हा पहिली प्रतिक्रिया बहुधा काहीशी थंडच असेल- ‘हे तर आम्हाला माहितीच होतं,’ अशी! तेही योग्यच, कारण समाजवादी पक्षातून कुणाकुणाशी घरोबे केलेल्या अमरसिंगांवर खासदारांना लाच दिल्याचा आरोप झाला होता किंवा मुळात बिल क्लिंटन यांच्या कार्यकाळात आणि अटलबिहारी वाजपेयी हे तत्कालीन भारतीय पंतप्रधान असताना चाचणी अणुस्फोट घडवले गेल्यानंतर क्लिंटन कसे संतापले, त्यांच्यानंतर जॉर्ज डब्ल्यू. बुश यांच्या कार्यकाळात कसं वातावरण निवळून मनमोहन सिंग व बुश यांनी अणुकराराची घोषणा केली, या अणुवीज सहकार्य कराराच्या बदल्यात भारतानं काहीच कबूल केलं नाही, अशी टीका अमेरिकेत होत असूनसुद्धा मनमोहन सिंग यांना ‘आम्ही आमच्याच अटींवर अणुकरार मिळवला’ असं भारतवासींना सांगण्याची सोयच कशी उरली नव्हती.. हे सारं-सारं भारतात दैनिक वर्तमानपत्रं वाचणाऱ्या कुणालाही माहीत असतं. हा तपशील अर्थातच पुस्तकामध्येही आहे.
पण क्लिंटन यांचं भारत प्रकरण पुस्तकात इतक्यावर संपत नाही. इंडिया टुडे समूहानं त्यांच्या २००८ च्या वार्षिक महापरिषदेत केवळ एका व्हिडीओ प्रक्षेपणाद्वारे मानीव हजेरी लावून भाषण करण्यासाठी बिल क्लिंटन यांना १,५०,००० डॉलर (होय! पुस्तकात छापलेला आकडा दीड लाख डॉलरच.) मोजले होते आणि तेव्हाच, अणुकरारही आकार घेत होता आणि त्याच सुमारास बिल आणि हिलरी क्लिंटन या दोघांच्याही भूमिका पूर्णत: भारतप्रेमी आणि अणुकरारधार्जिण्या अशा झाल्या होत्या, याची संग
ती लेखक लावून दाखवतो. अर्थात, या प्रकरणातली अधिक खुमासदार माहिती संत चटवाल यांच्याबद्दल आहे. याच चटवाल यांना भारतानं (संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारच्या काळात) मानाचा ‘पद्म’ किताबसुद्धा दिलेला आहेच. संत नावाचे हे चटवाल इथिओपियातून कॅनडामार्गे अमेरिकेत आले, न्यूयॉर्कमध्ये रेस्तराँ आणि आलिशान निवासी हॉटेलं काढून त्यांनी जम बसवला आणि मग अनेक अमेरिकी राजकारण्यांवर ‘पैसा लावण्या’त ते रस घेऊ लागले. चटवाल यांनी एकदा दिवाळखोरी घोषित केली होती, एकदा त्यांच्यावर अटकेची वेळ आली होती, तरीही ते आणि त्यांचा कनिष्ठ पुत्र हे अमेरिकेत सेलेब्रिटीसारखे मिरवत. बिल क्लिंटन यांच्याशी तर चटवाल बापलेकांची दोस्तीच, असा दावा त्यांनीच केल्याचं लेखक सांगतो.
या चटवाल यांच्यामार्फत भारतानंच पैसा लावला- म्हणजे भारतानं ‘लॉबिइंग’ केलं, हा लेखकाचा जो निष्कर्ष आहे तो वादग्रस्त ठरू शकतो, पण त्यासाठी तपशिलांची सांगड घालण्याचं काम मात्र या पुस्तकात बेमालूमपणे ‘निर्विवाद’ भासणारं झालं आहे. लेखकाचा आरोप असा की, हिलरी सिनेट सदस्य असताना, त्यांच्यामार्फत भारतविषयक मतपरिवर्तन घडवून आणण्याचं काम बिल करत होते. हिलरी या कामात केवळ पतीला साथ देत होत्या असं नाही, तर त्याही प्रत्यक्ष सहभागीच होत्या, असं लेखक सुचवतो आहे.
हे सारं क्लिंटन यांनी का केलं? केवळ पैसा कमावण्यासाठी? इथे मात्र लेखकाचा पाश्चात्त्यपणा उघडा पडेल.. खाबूगिरीचे व्यक्तिगत आरोप करण्यासाठी हे पुस्तक लिहिलं गेलं नसून क्लिंटन दाम्पत्याचे ‘मार्ग चुकत होते’ हा लेखकाचा महत्त्वाचा दावा आहे. तत्त्वांशी तडजोड करून, धोरणांना मुरड घालून स्वत:ला राजकारणाच्या केंद्रस्थानी ठेवणारं दाम्पत्य पैशाचा खेळ कसा करत होतं, अशा सुरातला युक्तिवाद पुस्तकभर असल्यामुळे त्याचं नाव ‘क्लिंटन कॅश’.  हे सांगण्याच्या भरात लेखकानं अन्य देशांवरही दोषारोप केलेले आहेतच, पण तो त्याचा मुख्य हेतू नसावा (किंवा नसो!). भारताविषयी असे कितीही आरोप झाले, तरी ‘सारं विसरून पुढे पुढे जात राहण्या’ची शक्ती या देशानं कमावलेली आहेच! तेव्हा क्लिंटन दाम्पत्याच्या राजकारणाची चर्चा करणाऱ्या पुस्तकातलं एखादं भारतविषयक प्रकरण हे काही आपल्याला धक्कादायक वगैरे अजिबात वाटणार नाही.