आचार्य शंकरराव दत्तात्रय जावडेकर यांचे निधन १० डिसेंबर, १९५५ रोजी झाले. त्यांच्या कार्य आणि विचारांचे स्मरण करणारा लेख तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांनी जानेवारी, १९५६च्या ‘नवभारत’ मासिकात लिहिला आहे. त्यानुसार आचार्यांचा मन:पिंड मननात्मक होता. वृत्ती सत्त्वस्थ होती व निष्ठा राष्ट्रीय होती. समन्वय शोधक दृष्टिकोन आणि अध्यात्माची ओढ यामुळे ते अजातशत्रू बनले. ते लेखक, वक्ते आणि कार्यकर्ते होते. त्यांच्या लेखणीने अहिंसेचे सार्वभौम महाव्रत आजन्म पाळले. आचार्य जावडेकर दैनिक ‘नवशक्ती’, साप्ताहिक ‘साधना’ आणि मासिक ‘नवभारत’चे काही काळ संपादक होते. ते जन्मत: ‘दग्ध किल्विष’ (पापमुक्त) होते.

आचार्य शं. द. जावडेकरांच्या सार्वजनिक जीवनाचा प्रारंभ महात्मा गांधीप्रणीत असहकार आंदोलनाने झाला. ते ‘कायदेभंग’, ‘भारत छोडो’ आंदोलनात सुमारे पाच वर्षे तुरुंगात होते. ‘या काळात आपणास विचारवाढीचा अनुभव चाखता आला,’ अशी नोंद आचार्यांनी आपल्या ‘तुरुंगातील माझी विचारवाढ’ शीर्षक लेखात करून ठेवली आहे. ते प्रजा समाजवादी पक्षाचे प्रवक्ते होते. जावडेकर हे स्वतंत्र प्रज्ञेचे गृहस्थ होते. त्यांनी टिळकांचा राष्ट्रवाद, गांधींचा सर्वोदयवाद आणि कार्ल मार्क्सचा समाजवाद या तिन्ही विचारप्रवाहांचे खोल अवगाहन केले होते. त्यातून त्यांची समन्वयी विचारधारा विकसित झाल्याची नोंद या लेखात तर्कतीर्थांनी केली आहे. ‘लोकमान्य टिळकांच्या राष्ट्रीय विकासाचा पुढचा टप्पा म्हणजे महात्मा गांधी होत,’ असे आचार्य मानत होते, असे मत डॉ. तारा भवाळकरांनी ‘आचार्य जावडेकर : पत्रे आणि संस्मरणे’ ग्रंथाच्या प्रस्तावनेत व्यक्त केले आहे. यात आचार्यांचा विचारविकास प्रतिबिंबित होतो. आचार्यांच्या समन्वयी वृत्तीवर त्यांच्या हयातीत टीका झालेली होती. तेव्हा ‘समन्वय म्हणजे दुबळी, लाचार तडजोड नव्हे, तर ती एक उच्च ज्ञानप्रक्रिया आहे,’ असे आचार्यांनी निक्षून सांगितले होते. त्यातून त्यांच्या विचार नि वृत्तीच्या बाणेदारपणाचे जे दर्शन होते, त्यातून त्यांचे व्यक्तिमत्त्व विचार नि मूल्यांवर उभे होते, हे समजून येते.

आचार्य शं. द. जावडेकर १९४९ ला पुणे येथे संपन्न झालेल्या ३२व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते. आपल्या अध्यक्षीय भाषणात आचार्यांनी ‘क्रांती’ या नव्या रसाची मांडणी करून स्वप्रज्ञता सिद्ध केली होती. याची दखल घेऊन त्याचे समर्थन करीत तर्कतीर्थांनी आपल्या या स्मृतिलेखात स्पष्ट केले आहे की, ‘‘साहित्य समीक्षकांनी या रसाची उपेक्षा केली. परंतु, क्रांतिरसाची कल्पना हे जावडेकरांच्या सूक्ष्म संदेवनशील अशा नवसाहित्यिविषयक सहृदयतेचे प्रामाण आहे. साहित्याची सामाजिक समीक्षा ही गोष्ट आधुनिक समीक्षाशास्त्रातील अत्यंत महत्त्वास पोहोचलेली शाखा आहे. क्रांतिरस कल्पना आचार्य जावडेकर यांनी सामाजिक समीक्षेस दिलेली एक अप्रतिम देणगी आहे. मनुष्यजातीच्या आधुनिक सामाजिक इतिहासाचे साहित्यात प्रतिबिंब पाहायचे झाले, तर ते प्रतिबिंब क्रांतिरस या कल्पनेने अधिक उज्ज्वल स्वरूपात दिसते. या क्रांतिरसात परिणत पावणारे वाङ्मय अस्सल पुरोगामी वाङ्मय होय.’’

‘आधुनिक भारत’, ‘राजनीतिशास्त्र परिचय’, ‘गांधीवाद’, ‘जवाहरलाल नेहरू’, ‘लोकशाही’, ‘लोकमान्य टिळक आणि महात्मा गांधी’, ‘हिंदू-मुसलमान ऐक्य’ ही त्यांची ग्रंथ शीर्षके त्यांच्या वैचारिक दिशेचे दिग्दर्शन करणारी आहेत. या ग्रंथसंपदेतून आधुनिक भारताची त्यांनी केलेली मीमांसा शास्त्रीय इतिहासाचे नमुनेदार उदाहरण असल्याचे तर्कतीर्थांचे मत होते. आचार्यांच्या खासगी व सार्वजनिक जीवनात अद्वैतता होती. त्यांचे जीवन व वृत्ती संताला शोभणारी होती. सार्वजनिक, त्यातही राजकीय क्षेत्रात त्यांच्या चाहत्यांची मोठी संख्या होती. सद्विचारांचा निर्मळ झरा जसा तृषितांना आकर्षित करतो, तसे ते विचारांची कदर असलेल्या माणसांना आकर्षित करीत. त्यांना सहा दशकांचे कृतार्थ जीवन लाभले. त्यांनी धर्मनिरपेक्ष भारतीय राष्ट्रवादाची मांडणी सातत्याने केल्याचे दिसून येते. हिंदू राष्ट्रवाद ही विकृती असून, ती खऱ्या अर्थाने भारतीय संस्कृतीचे प्रतिनिधित्व करीत नाही, हे त्यांचे मत आचार्यांना पुरोगामी विचारवंत ठरविण्यास पुरेसे आहे. कोणत्याही प्रकारचा संकीर्ण वा संकुचित विचार त्यांच्या मनास न शिवणे यातूनही त्यांचे ‘दग्ध किल्विषत्व’ अधोरेखित होत राहते.
drsklawate@gmail.com