एखाद्या व्यक्तीचे आयुष्य कसे घडत (वा बिघडत) जाते हे त्या व्यक्तीला मिळालेल्या पर्यावरणावरही बऱ्याच अंशी अवलंबून असते, हे नाटय़कर्मी अजित भगत यांच्या आयुष्याकडे पाहिले तर नक्कीच पटते. कनिष्ठ आर्थिक स्तरातील वस्तीत राहणारा एक तरुण नाटकवाल्यांच्या संपर्कात येतो काय आणि त्याचे जीवन आमूलाग्र बदलते काय, याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे अजित भगत! खालसा कॉलेजजवळच्या वस्तीत भणंगपणे जगणारा हा तरुण तिथे नाटके करणाऱ्या लेखक-दिग्दर्शक अशोक समेळ यांच्या संपर्कात आला. तोवर नाटक कशाशी खातात हेही अजित भगत यांना माहीत नव्हते. पुढे खालसा कॉलेजमध्ये शिकणाऱ्या शफाअत खान वगैरे नाटकवेडय़ा मंडळींशी त्यांचा परिचय झाला. नाटकांवरच्या गप्पांचा लळा लागून त्यात सहभागी होता होता अजित भगत नाटकाकडे ओढले गेले. त्या वेळी नॅशनल स्कूल ऑफ ड्रामामधून पदवी घेऊन आलेल्या जयदेव हट्टंगडींनी नाटकाचे एक शिबीर घेतले होते, त्यात ते सहभागी झाले. पुढे छबिलदास नाटय़-चळवळीतील नाटके पाहताना आपणही अशी नाटके करावीत अशी तीव्र इच्छा त्यांच्या मनात निर्माण झाली. इथेच त्यांना पं. सत्यदेव दुबेंची नाटके, त्यांची काम करण्याची पद्धत जवळून पाहता आली. ‘आविष्कार’ संस्थेशी संपर्क आला.
‘आर्य चाणक्य’, ‘जांभूळ आख्यान’, ‘सापत्नेकरांचं मूल’, ‘मुंबईचे कावळे’, ‘रोमन साम्राज्याची पडझड’, ‘जय जय रघुवीर समर्थ’, ‘झाला अनंत हनुमंत’, ‘सगेसोयरे’ अशी नाटके त्यांनी सादर केली. यापैकी ‘जांभूळ आख्यान’ने त्यांच्यापुढे रसिकप्रियता आणि सन्मान दोन्हीच्या पायघडय़ा घातल्या गेल्या. विठ्ठल उमप यांच्यासारखा भरदार बांध्याचा, खणखणीत आवाजाचा, अभिनयाचे बारकावे जाणणारा लोककलावंत त्यांना हे ‘आख्यान’ सादर करण्यासाठी लाभला.. आणि या नाटकाने इतिहास घडवला. अजित भगत हे ढोरमेहनत करणारे दिग्दर्शक म्हणून ओळखले जात. नाटक हाताशी आले की आपल्या आकलनाप्रमाणे त्याच्या शक्य तितक्या खोलात शिरून, कलावंतांकडून पाहिजे ते काढून घेण्यात ते माहीर होते. कलावंतांना घडविण्याचे कसबही त्यांच्यापाशी होते. उपेक्षित, अनघड नटांना घडविण्यात त्यांना विशेष रस होता. त्यामुळेच कामगार कल्याण केंद्रांची नाटके, तसेच पोलीस, कामगार आणि मजुरांची नाटके प्राधान्याने बसवण्याचे व्रत त्यांनी आयुष्यभर सांभाळले. त्यामुळे छोटय़ा छोटय़ा नाटकांच्या गटांबरोबर त्यांनी अनेक नाटके केली. सुशील इनामदारांसारखा पोलीस दलातील हरहुन्नरी नट नावारूपाला आला तो अजित भगतांमुळेच. अध्र्याकच्च्या नटांवर मेहनत घेऊन त्यांना घडवण्यात त्यांना अधिक आनंद मिळे. महोत्सवांतील राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय नाटके पाहणे, त्यावरील चर्चा, परिसंवाद यांत त्यांना फारसे गम्य नव्हते. दुबेंकडे त्यांनी नाटकांतून कामेही केली, परंतु त्यांचा अभिनयाकडे फारसा ओढा नव्हता. त्यांनी काही एकांकिका व नाटके लिहिली. ते कविताही करत असत. नाटक ही त्यांची आस होती. त्यापायी नोकरीकडेही त्यांचे दुर्लक्ष होत असे. पुढे काही मालिकांतून त्यांनी कामे केली. पण त्यांचे पहिले प्रेम राहिले ते कायम नाटकावरच. नाटक जगणारा हा माणूस होता.
