अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलने व ती आयोजित करणाऱ्या साहित्य महामंडळाच्या लौकिकाबद्दल अनेक वाद-प्रतिवाद होत असले, तरी महामंडळात ‘चांगली’ म्हणावी अशी एक गोष्ट मात्र काही वर्षांपूर्वी घडली. ती म्हणजे, संमेलनाचा अध्यक्ष एकमताने निवडण्यासाठी केलेेली घटनादुरुस्ती. एकगठ्ठा मतदानामुळे बदनाम झालेली अप्रिय निवडणूक बंद करून केवळ वाङ्मयीन योगदानाच्या निकषावर अध्यक्षपदाचा बहुमान देणेे सुरू झाल्यापासून वस्तुनिष्ठ व चिकित्सक दृष्टीने लिखाण करणारी मंडळी संमेलनाध्यक्षपदावरून समाजाचे वैचारिक उद्बोधन करताना दिसू लागली. त्या क्रमात यंदा अध्ययन, अध्यापन, संशोधन आणि लेखन यांचा आयुष्यभर ध्यास घेतलेल्या आणि तेच आपले जीवितकार्य मानणाऱ्या डॉ. तारा भवाळकर यांची निवड झाली. ‘‘मावळतीला चालेल, पण अगदीच तिन्हीसांजेला नको’’, ही ताराबाईंची त्यांच्या निवडीनंतरची प्रतिक्रिया फारच बोलकी आहे. उशिरा का होेईना ताराबाईंना हा सन्मान मिळाला याचा आनंद साहित्यप्रेमींनाही आहे. तरीही संमेलनाध्यक्षपदासाठी आधीचीच निवडणूक पद्धत आज असती तर ताराबाई संमेलनाध्यक्ष होऊ शकल्या असत्या का, हा प्रश्नही उरतोच. संस्कृती, लोकसाहित्य, लोककला, हे प्रकार मुख्य धारेतील वलयांकित वाङ्मयाच्या तुलनेत तसे उपेक्षितच राहिलेले. पण ताराबाईंनी अगदी ठरवून या उपेेक्षित विषयांची अभ्यासासाठी निवड केली. त्यांनी लोकसंस्कृती, नाट्यसंशोधन, संतसाहित्य, एकांकिका, ललित लेखन, लोककला यांविषयी तसेच स्त्री जाणिवांवर लक्ष केंद्रित करणारे विपुल लेखन केले. लोककला आणि लोकसाहित्य या विषयांवरील चर्चांना ऐरणीवर आणले. पूर्वसुरींच्या संशोधनपर साहित्याचा सर्वंकष अभ्यास आणि बालजीवनातल्या समृद्ध अनुभवांची शिदोरी यांचा सुंदर मेळ घालत सैद्धांतिक अभ्यासाचा जणू वस्तुपाठच घालून दिला. त्यांनी लिहिलेले ‘लोकपरंपरा आणि स्त्री प्रतिभा’ हे पुस्तक म्हणजे येणाऱ्या पिढीसाठी सैद्धांतिक अभ्यासाचा आदर्श ठरावे, इतके प्रभावी झाले आहे. याचे श्रेय त्यांच्यातील उपजत जिज्ञासू अभ्यासकाचे आहे.

हेही वाचा : उलटा चष्मा: माजी मंडळ

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

संशोधनाची पारंपरिक वाट नाकारून चिंतनाच्या घुसळणीतून हाती आलेला नवा सिद्धांत आपण मांडला पाहिजे, हा ताराबाईंचा आग्रह. त्यातूनच त्यांनी हरिवंशराय बच्चन यांच्या ‘मधुशाला’चे पहिले मराठी भाषांतर केले. नाशिकच्या वास्तव्यात ‘मधुशाला’ त्यांच्या हातात पडले. ताराबाईंचे तेव्हाचे वय असेल २५ वर्षे. ‘मधुशाला’तील काव्याने त्यांना भुरळ घातली. प्रयोग म्हणून केलेला एक दोन रूबायांचा अनुवाद एका भरगच्च चोपडीत झाला व पुढे त्याचे पुस्तकही आले. हे केवळ ताराबाईंच्या पारंपरिक अनुवादकाच्या प्रतिमेस छेद देण्याच्या इच्छाशक्तीतून घडले. भारतीय संस्कृतीतील स्त्री प्रतिमा आणि प्रतिभांचा परिश्रमपूर्वक शोध घेतला. त्यातूनच पुढे ‘प्रियतमा’ (१९८५), ‘महामाया’ (१९८८), ‘लोकसाहित्यातील स्त्री प्रतिमा’ (१९८९), ‘स्त्री मुक्तीचा आत्मस्वर’ (१९९४), ‘माझिये जातीच्या’ (१९९५), ‘तिसऱ्या बिंदूच्या शोधात’ (२००१) आदी ग्रंथ आकारास येऊ शकले. ‘मराठी पौराणिक नाटकाची जडणघडण : प्रारंभ ते १९२०’ या त्यांच्या पीएचडीसाठीच्या प्रबंधाला पुणे विद्यापीठाने सर्वोत्कृष्ट प्रबंध पुरस्कार म्हणून गौरवले. ताराबाईंनी तंजावरची नाटके, यक्षगान, पौराणिक नाटक, दशावतार, कथकली, लोकनाट्य, अशा नाट्य प्रकारांच्या मुळाशी जाऊन त्यांच्या विविधरंगी पैलूंना जगासमोर आणले. सांगलीला नाट्यपंढरी म्हणतात आणि ताराबाईही सांगलीतच राहतात. लोकसंस्कृती, नाटक यांच्या अभ्यासावर ताराबाईंचा वैचारिक पिंड पोसला गेला. समाजावर लक्ष ठेवणारे साहित्यिक, विचारवंत मराठीत कमीच; पण ताराबाई त्यास अपवाद. लोकसंस्कृती ही व्यापक अर्थाने ‘माय’ म्हणजेच मातृपरंपरा असल्याचे आपल्या लिखाणातून सप्रमाण सिद्ध केले. कोकण मराठी साहित्य परिषदेच्या पहिल्या महिला साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी त्या होत्या. इस्लामपूर येथे भरलेल्या जागर साहित्य संमेलनाचे व राजारामबापू ज्ञानप्रबोधिनी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपदही त्यांनी भूषवले. पुण्यात झालेल्या पर्यावरण साहित्य संमेलनासाठी अध्यक्ष निवडण्याची वेेळ आली तेव्हा आयोजकांसमोर ताराबाईंपेक्षा दुसरे नाव नव्हते. परंतु, अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या आयोजकांना मात्र ताराबाईंचे हे कर्तृत्व जरा उशिराच कळले. कळले हे महत्त्वाचे. खान्देशातील लोकगीतांइतक्याच सहजपणे मार्क्सच्या गतिशील भौतिकवादावर बोलणाऱ्या ताराबाई देशाच्या राजधानीत भरणाऱ्या संमेलनातून काय विचार मांडतात, हे पाहणे औत्सुक्याचे.