प्रगल्भ समाज रातोरात निर्माण होत नाहीत आणि प्रगल्भ समाजाशिवाय सुधारणा शक्य नाहीत. युरोपात अकराव्या शतकात सुरू झालेला ज्ञानयज्ञ सलग पाचशे वर्षे चालू राहिला तेव्हा कुठे प्रबोधनयुग अवतरलं आणि कॅलेंडर सुधारणेचा मार्ग प्रशस्त झाला. जूलियन कॅलेंडरमध्ये बदल करायला १६०० वर्षे लागली. यामागची कारणं दोन — समाजाचं शैथिल्य आणि प्रगल्भ समाजमनाची आवश्यकता. हे थोडं विस्ताराने पाहिलं पाहिजे. थोडक्यात, त्या काळची परिस्थिती नीट समजून घेतली पाहिजे.

कॅलेंडरची उपयुक्तता ही काही दिवस मोजण्याचं एक साधन एवढ्यापुरतीच मर्यादित नसते. अनेकदा त्याचा धर्माशी थेट संबंध असतो. जूलियन कॅलेंडर ख्रिास्तपूर्व ४५ मध्येच लागू झालं. त्यामुळे त्या अर्थाने ते ‘ख्रिास्ती कॅलेंडर’ नव्हे. पण ख्रिास्ती धर्माचे सगळे सण, उत्सव या कॅलेंडरनुसारच साजरे केले जात. तेव्हा, त्या दृष्टीने जूलियन कॅलेंडर धार्मिक कॅलेंडरच झालं होतं. अशा कॅलेंडरमध्ये बदल करणं चक्क धार्मिक बाबतीत ढवळाढवळ ठरू शकते.

अंधश्रद्ध, जुनाट समजुतींना घट्ट धरून ठेवणाऱ्या समाजात हे करणं आत्मघातकी ठरू शकतं. हे असे बदल करायचे तर समाज पुढारलेला असायला हवा आणि सन १५०० पर्यंत युरोप या दृष्टिकोनातून पुढारलेला होता असं म्हणवत नाही. धर्माचा प्रचंड पगडा समाजमनावर होता. कॅथलिक धर्मप्रमुख पोप ही धर्मसत्ताही होती आणि राजसत्ताही.

पण परिस्थिती हळूहळू बदलत होती. सुरुवात झाली विद्यापीठांच्या स्थापनेपासून. सन १०८८ मध्ये इटलीतल्या बलोना इथे एका विद्यापीठाची स्थापना झाली. हे युरोपातलं पहिलं विद्यापीठ. पुढे ११५० मध्ये पॅरिस इथे, ११६७ मध्ये ऑक्सफर्ड इथे, १२०९ मध्ये केंब्रिज इथे आणि १२१८ मध्ये सालामान्का इथे विद्यापीठं स्थापन झाली. यातली बहुतेक विद्यापीठं आजही कार्यरत आहेत. ही काही धर्मपीठं नव्हती. इथे आधुनिक विद्याशाखांचा अभ्यास होत असे.

या विद्यापीठांची स्थापना ही जणू वैचारिक स्वातंत्र्याची पहाट होती. पुढे पंधरावं आणि सोळावं शतक हा तर युरोपातल्या प्रबोधन युगाचा काळ. या काळात आधुनिक विद्या, कला, विज्ञान या प्रांतांमध्ये प्रचंड प्रगती होत होती.

लिओनार्डो दा विंचीसारखी एखादी व्यक्ती एकाच वेळी कलांमध्येही भरीव योगदान देत होता आणि विज्ञानातही नवनवे शोध लावत होती. मायकेलएंजलोसारखे चित्रकार आणि शिल्पकार अद्वितीय मूर्ती घडवत होते आणि चित्र रंगवत होते. माकियाव्हेली राजकीय तत्त्वज्ञान उलगडून दाखवत होता आणि गुटेनबर्गच्या छापखान्याने हे सगळे विचार जनसामान्यांपर्यंत पोहोचवायचा सोपा, सुटसुटीत मार्ग उपलब्ध झाला होता.

धर्मापलीकडे काही तत्त्वज्ञान असू शकतं, धर्मातही काही चुकीचं, वाईट असू शकतं, त्याचा त्याग करण्यात काही गैर नाही वगैरे विचार मूळ धरू लागले होते. थोडक्यात, कॅलेंडरमधले बदल स्वीकारण्यासाठी समाज सज्ज होत होता.

समाजातला हा बदल पाहूनच कदाचित, पोप सिक्स्ट्स — चौथे यांनी कॅलेंडरमध्ये बदल करायचा हे मनावरच घेतलं. जूलियन कॅलेंडरमध्ये बदल करण्याचा हा पहिला प्रयत्न मानला पाहिजे. या सुधारणा सुचवण्यासाठी सन १४७५ मध्ये त्यांनी योहानेस म्यूलर फॉन कूनिग्सबर्ग या विद्वानाला रोममध्ये बोलावून घेतलं. दुर्दैवाने तो रोमला पोहोचल्यावर काही काळातच निवर्तला. त्यामुळे कॅलेंडर सुधारणांचा हा प्रकल्प बारगळला. हे जर झालं नसतं तर पोप सिक्स्ट्स यांच्याच कारकीर्दीत कॅलेंडर सुधारणा झाल्या असत्या! आणि मग सध्याचं कॅलेंडर ‘ग्रेगरियन’ऐवजी ‘सिस्टाईन’ झालं असतं!

पंधराव्या शतकाच्या अखेरीपर्यंत खगोलशास्त्रात चिक्कार प्रगती झाली होती. रेजिओमोंटॅनस, कोपरनिकस यांसारख्या शास्त्रज्ञांनी खगोलशास्त्रात अतिशय मूलभूत काम केलं होतं. जूलियन कॅलेंडरमधल्या त्रुटी दाखवणारे आपले शोधनिबंध सालामान्का विद्यापीठाने सन १५१५ मध्ये चक्क व्हॅटिकनला पाठवून दिले होते.

याच सुमारास – सन १५१७ – मार्टिन ल्यूथर यांनी त्यांचे अतिशय मूलगामी धार्मिक विचार मांडले. मार्टिन ल्यूथर हे ख्रिास्ती जर्मन धर्मोपदेशक. पण ख्रिास्ती धर्मातल्या अनिष्ट चालींविरुद्ध त्यांनी बंडच पुकारलं. प्रोटेस्टंट पंथाची सुरुवात मार्टिन ल्यूथर यांच्या विचारांतून झाली असंही म्हणता येईल. पोप आणि एकूणच कॅथलिक चर्च यांच्या राजकीय आणि धार्मिक सत्तेला या विचारांनी प्रचंड आव्हान दिलं होतं.

धर्म हा केवळ कर्मकांडं आणि पोप किंवा एकुणातच कॅथलिक चर्च काय म्हणतं या पलीकडे आहे अशी काहीशी आधुनिक विचारांशी जवळीक दाखवणारी त्यांची शिकवण होती आणि त्यांच्या शिकवणीला उत्तम प्रतिसादही मिळत होता.

या सगळ्याला तोंड देण्यासाठी म्हणून पोप पॉल- तिसरे यांनी १५४५ मध्ये ट्रेंट इथे एक धर्म परिषद भरवली. विविध कारणांनी लांबलेली ही परिषद अखेर सन १५६३ मध्ये संपली. पण या परिषदेने ‘कॅलेंडरमध्ये बदल करणं गरजेचं आहे आणि पोप महाशयांनी आवश्यक ते बदल करावेत’ असा ठराव संमत केला! हा ठराव मंजूर झाला खरा पण तत्कालीन पोप महाशयांनी हे कॅलेंडर सुधारणांचं काही मनावर घेतलं नाही.

पण आता सगळी सिद्धता झाली होती. प्रश्न फक्त एवढाच होता की सुधारणांचा हा बार उडवायचा कधी आणि कोणी. ते श्रेय पोप ग्रेगरी – तेरावे यांना मिळायचं होतं.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

@KalacheGanit
kalache.ganit @gmail.com