‘बेसबॉल’ हा खेळ पाहताना एका साक्षात्कारी क्षणी जपानमधील हारुकी मुराकामी या व्यक्तीला अचानक आपण कादंबरी लिहू शकतो, याची खात्री झाली. घरी जाताना त्याने कागद आणि लिखाणाचे साहित्य घेतले आणि त्याची पहिली कादंबरी सुरू झाली. पॉल ऑस्टर या जन्माने अमेरिकी आणि फ्रान्स-युरोपात मायदेशाहून अधिक गाजलेल्या लेखकाची साधनाही काहीशी बेसबॉल या खेळाशी निगडित आहे.

आपल्या सर्वात लाडक्या बेसबॉलपटूची स्वाक्षरी मिळविण्याची संधी लहानग्या पॉलने दवडली. कारण हा खेळाडू समोर आला, तेव्हा ऑस्टर आणि त्याच्या पालकांकडे लेखणीच नव्हती. तेव्हापासून आपल्यासह सतत लेखणी (पेन्सिल) बाळगू लागला. अन् ती असल्याने तिचा वापर करण्याची खुमखुमी त्याच्यात तयार झाली! वयाच्या चौदाव्या वर्षी उन्हाळ-सहलीवर असताना काही हात अंतरावर असणाऱ्या मुलाचा वीज पडून मृत्यू झालेला ऑस्टरने पाहिला. याची आठवणनोंद त्याला आयुष्यभरासाठी उरली आणि त्याच्या कादंबऱ्यांमध्येही उतरली. १९४७ साली न्यू जर्सीमध्ये जन्मलेल्या ऑस्टर यांनी अमेरिकेत शिक्षण पूर्ण केल्यानंतर पॅरिसची वाट धरली.

हेही वाचा >>> व्यक्तिवेध : सुधीर कक्कर

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

लेखक-कलाकारांना घडविणाऱ्या या शहरात चार वर्षे अनुवाद आणि इतर फुटकळ कामे करून त्यांनी पुन्हा अमेरिकेत पाय ठेवला. फ्रेंच लेखकांची पुस्तके इंग्रजीत भाषांतरित करता करता कादंबरी, कथा, निबंध आणि कविता या साहित्यातील सर्वच प्रकारात लिहिण्यास सुरुवात केली. फ्रान्समध्ये ज्या अमेरिकी मैत्रिणीसह प्रेमालाप केले, त्या लीडिया डेव्हिस या कर्तुकीत सम-तुल्य लेखिकेशी त्यांनी विवाह केला. तो फार काळ टिकला नाही. पण या काडीमोडानंतर आणि सिरी हॉसवेड्ट या आणखी एका तीक्ष्ण लेखिकेसह केलेल्या नव्या विवाहानंतर ऑस्टर यांच्या लिखाणाला धार आली. योगायोगाने भरलेली आणि भारलेली कथानके, निवेदनातला चाणाक्षपणा, तसेच विषय पैशांचा अपव्यय, भाषेचा अपव्यय, दैनंदिन व्यवहारातील नैराश्य, लहानसहान पराभव आणि अमेरिकेचा अर्वाचीन इतिहास आदींवर बेतलेले, म्हणून ऑस्टर यांची पुस्तके ओळखली गेली. ‘न्यू यॉर्क कादंबरीत्रया’त ‘सिटी ऑफ ग्लास’, ‘घोस्ट्स’, ‘द लॉक्ड रूम’ या त्यांच्या १९८५ ते ८७ या कालावधीत लिहिलेल्या लघुकादंबऱ्या सर्वाधिक गाजल्या. वरवर रहस्यकथांचा तोंडवळा घेऊन आलेल्या या कादंबऱ्यांचा पैस शहरापलीकडे मोठा आहे. या कादंबऱ्यांनंतर युरोपात ऑस्टर यांची ख्याती खूपविके लेखक म्हणून वाढत राहिली. फ्रान्समधील महत्त्वाच्या पुरस्कारांवर नाव कोरल्यानंतर दरएक ग्रंथागणिक ऑस्टर यांची महत्ता ठळक होत गेली. ८६६ पानांची ‘फोर थ्री टू वन’ कादंबरी हे त्यांचे शेवटले महत्त्वाचे काम. तीन दिवसांपूर्वी दीर्घ आजाराने ऑस्टर यांचे निधन झाले. पण पानागणिक झपाटून टाकणाऱ्या कादंबऱ्यांमुळे वाचकांसाठी ते अजरामरच राहणार आहेत.