सहा राज्यांमधील विधानसभेच्या सात जागांसाठी झालेल्या पोटनिवडणुकांमध्ये इंडिया आघाडीत सहभागी झालेल्या घटक पक्षांनी चार तर भाजपने तीन जागा जिंकल्या. गेल्याच आठवडय़ात मुंबईत झालेल्या इंडिया आघाडीच्या बैठकीत आगामी लोकसभा निवडणूक जिंकण्याचा निर्धार करण्यात आला होता. त्यापाठापोठ स्वतंत्रपणे लढूनही इंडिया आघाडीच्या घटक पक्षांना मिळालेल्या यशाने आघाडीच्या आशा नक्कीच पल्लवित होणार आहेत. उत्तर प्रदेशातील घोशी मतदारसंघात समाजवादी पार्टी विरुद्ध भाजप म्हणजेच इंडिया विरुद्ध भाजप अशी सरळ लढत झाली होती. समाजवादी पार्टीने ही जागा कायम राखली. गेल्या वर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीत समाजवादी पार्टीकडून विजयी झालेल्या आमदाराने पक्षांतर करून भाजपमध्ये प्रवेश केला व त्यामुळे या मतदारसंघात पोटनिवडणूक झाली. पक्षांतर केल्याने पोटनिवडणूक घेण्यास भाग पाडलेल्या आमदाराला मतदारांनी नाकारले व घरी बसविले. गेल्या वेळी समाजवादी पार्टीने ही जागा २२ हजार मतांनी जिंकली होती. पोटनिवडणुकीत समाजवादी पार्टीचा उमेदवार ४० हजारांपेक्षा अधिक मतांनी विजयी झाला. ८० जागा असलेल्या उत्तर प्रदेशमध्ये लोकसभेच्या जास्तीत जास्त जागा जिंकण्याचे भाजपचे ध्येय आहे. २०१४ आणि २०१९ मध्ये उत्तर प्रदेशने भाजपच्या बाजूने कौल दिला होता. एका विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीच्या निकालावरून राजकीय चित्र बदलेल, असा दावा करता येणार नाही. पण काँग्रेसचा पाठिंबा, इंडिया आघाडीचा घटक पक्ष नसला तरी बसपाचा उमेदवार रिंगणात नसणे याचा पोटनिवडणुकीत समाजवादी पार्टीला चांगलाच फायदा झाला. लोकसभा निवडणुकीत एकास एक लढत झाल्यास उत्तर भारतातील चित्र बदलू शकते. यामुळेच मायावती यांच्या बसपाला महत्त्व येणार आहे. तिरंगी लढत व्हावी, असा भाजपचा प्रयत्न राहील. कारण तिरंगी लढतीशिवाय भाजपचे विजयाचे गणित जुळू शकणार नाही, असा पोटनिवडणुकीच्या निकालाचा अर्थ काढता येईल.

उत्तर प्रदेशपाठोपाठ पश्चिम बंगालमधील तृणमूलचा विजयही भाजपला चपराक समजली जाते. कारण ही जागा कायम राखण्यात भाजपला यश आले नाही. भाजप आमदाराच्या निधनामुळे झालेल्या पोटनिवडणुकीत पक्षाने कारगीलमध्ये शहीद झालेल्या सैनिकाच्या पत्नीला उमेदवारी देऊन सहानुभूतीचा लाभ उठविण्याचा प्रयत्न केला होता. पण तृणमूलने ही जागा ४३०९ मतांनी काबीज केली. पश्चिम बंगालमध्ये तृणमूल, भाजप आणि मार्क्सवादी कम्युनिस्ट अशी तिरंगी लढत झाली होती. इंडिया आघाडीत ममता व डावे पक्ष एकत्र असले तरी आगामी लोकसभा निवडणुकीत पश्चिम बंगाल आणि केरळमध्ये आघाडीतील घटक पक्ष एकत्र लढणार नाहीत हे आधीच जाहीर करण्यात आले आहे. तरीही भाजपने गेल्या वेळी जिंकलेल्या मतदारसंघात तृणमूलला मिळालेला विजय हा मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यासाठी दिलासाजनक ठरावा. पश्चिम बंगालमध्ये गेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपने अनपेक्षितपणे मुसंडी मारत ४२ पैकी १८ जागा जिंकून ममतांना मोठा धक्का दिला होता. पोटनिवडणुकीच्या निकालाने भाजपची चिंता वाढणार आहे. केरळमध्ये डावी आघाडी आणि काँग्रेस परस्परांचे प्रतिस्पर्धी आहेत. भाजपला हातपाय रोवता येऊ नयेत म्हणून दोन्ही पक्षांनी स्वतंत्रपणे लढण्याचा निर्णय यापूर्वीच घेतला आहे. माजी मुख्यमंत्री ओमान चंडी यांच्या निधनाने झालेल्या पोटनिवडणुकीत त्यांचे पुत्र ३७ हजार मतांनी विजयी झाले. प. बंगाल आणि केरळमध्ये इंडिया आघाडीतील पक्ष परस्परांच्या विरोधात लढूनही विजय इंडिया आघाडीच्या घटक पक्षांचाच झाला.

ईशान्येकडील भाजपची सत्ता असलेले मणिपूर हे राज्य वांशिक संघर्षांने धुमसत असताना ईशान्येकडीलच त्रिपुरामधील दोन्ही जागा जिंकल्याने भाजपला साहजिकच दिलासा मिळाला आहे. एकेकाळी डाव्यांचा बालेकिल्ला असलेल्या या राज्यात भाजपने आता हातपाय रोवले आहेत. गेल्या वेळी डाव्यांनी विजय मिळविलेल्या मतदारसंघात भाजपने विजय संपादन केला तर दुसरी जागा कायम राखली. ६६ टक्के अल्पसंख्याक मतदार असलेल्या बोक्सानगर मतदारसंघातील भाजपचा एकतर्फी विजय पाहता मुस्लीम मतदारांची मानसिकता बदलली का, हा विचार करण्यासारखा आहे. अर्थात, सरकारी यंत्रणांचा गैरवापर करून विजय संपादन केल्याचा डाव्यांचा आरोप आहे. सहा महिन्यांपूर्वी झालेल्या निवडणुकीत मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने ही जागा मोठय़ा फरकाने जिंकली होती. यंदा मात्र चित्र बदलले. मणिपूरमधील वांशिक संघर्ष हाताळण्यावरून किंवा ख्रिश्चन समाजावर झालेल्या हल्ल्यांमुळे भाजप टीकेचा धनी होत असताना ईशान्येकडील दुसऱ्या राज्यात अल्पसंख्याक मतदारांनी एकतर्फी भाजपवर विश्वास संपादन करणे हे भाजपला निश्चितच फायदेशीर ठरणार आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आघाडी आकारास आल्यावर पहिल्याच लढतीत इंडियातील घटक पक्षांनी वेगवेगळे लढूनही भाजपवर ४ विरुद्ध ३ अशी मात केली आहे. भाजपच्या विरोधात एकास एक उमेदवार उभे केल्यास चित्र बदलू शकते हा पोटनिवडणुकीचा या आघाडीच्या नेत्यांना इशारा आहे. इंडियाची सुरुवात चांगली झाली असली तरी लोकसभा निवडणुकीपर्यंत घटक पक्षांची एकजूट कायम राखणे आणि भाजप विरोधात एकास एक उमेदवार जास्तीत जास्त मतदारसंघांमध्ये उभे करणे हे मोठे आव्हान आहे.