गिरीश कुबेर

लंडनला जसं वेस्ट एण्ड तसं न्यूयॉर्कला ब्रॉडवे. आणि तिथं जाऊन ‘फँटम..’ पाहायचा! स्वरांना शारीर स्पर्शही असतो की काय, असा अनुभव घ्यायचा..

न्यूयॉर्कची पहिली भेट वेगळय़ाच कारणासाठी जशीच्या तशी लक्षात आहे. २०-२२ वर्षांपूर्वीची ही गोष्ट. जेव्हा भेटीचं नक्की झालं तेव्हा तिथल्या काही मित्रमंडळींना कळवलं. त्यातले दोघे लंडनला शिष्यवृत्तीच्या काळात बरोबर होते. लंडनच्या वास्तव्यात ‘मादाम तुसा’ वगैरे आम्हा तिघांच्याही यादीत नव्हतं आणि ते तसं नाही हे लक्षात आलं तेव्हा दोस्ताना सुरू झाला. न्यूयॉर्कला येणार आहे हे कळल्यावर त्यातल्या एकानं सांगितलं.. ‘‘जरा काही फॉर्मल कपडे पण घेऊन ये, नुसतंच जीन्स/ टीशर्ट / झब्बे वगैरे नको.’’ नंतर असंही म्हणाला: एक शनिवार संध्याकाळ रिकामी ठेव.

विचित्रच वाटलं. फॉर्मल कपडे म्हणजे हा काही महत्त्वाच्या कार्यालयीन भेटीगाठी ठरवत असणार. पण मग शनिवार संध्याकाळ? तिकडे शनिवारी संध्याकाळी कोण काम करतं..? न्यूयॉर्कला पोहोचलो. जी काही अधिकृत कामं वगैरे होती ती केली. मग ठरल्याप्रमाणे शुक्रवारी याच्याकडे. या दिवसाची संध्याकाळ जशी साजरी होते आणि जशी व्हायला हवी.. तश्शीच झाली. दुसऱ्या दिवशी सकाळी त्यानं काही भेटीगाठी ठरवल्या होत्या. पण त्या अनौपचारिक कपडय़ांतच झाल्या. दुपारी पाचच्या सुमारास घरी परतलो. तेव्हा हा म्हणाला.. शॉवर वगैरे घे.. फ्रेश हो. चेंज कर.. फॉर्मल्स घाल.. तासाभरात आपल्याला निघायचंय.

नक्की कुठे याचा तोवर अंदाज नव्हता. आवरून निघालो. सेंट्रल पार्कला वळसा घालून टाइम्स स्क्वेअर.. मॅनहॅटन.. लिंकन सेंटर.. आणि पुढच्या स्टॉपला उतरलो. दोनपाच मिनिटं चालल्याचं आठवतंय. आणि पोहोचलो. संध्याकाळ होत आलेली. इंदिराबाईंच्या शब्दात आकाश ‘झळंबलेलं’. दिवेलागणी सुरू झालेली. त्यावेळी सुदैवाने आतासारखे उठवळ पिटके-पिटके चिनी दिवे नव्हते. छान भरलेले मोठे बल्ब. रांगेत लावलेले. दुकानांवर. त्यांच्या बोर्डावर. आणि खाली रस्त्यावर पारलौकी वाटावं असे सुंदर-सुंदर सजलेले स्त्री-पुरुष. महिलांचे रंगीबेरंगी फ्रॉक्स. त्याला साजेशी गळय़ात/कानात मंद खडय़ांची आभूषणं. ज्या महिला वयस्कर होत्या त्यांच्या गळय़ात टपोऱ्या मोत्यांच्या माळा. आणि सर्व पुरुष मात्र काळय़ा किंवा काळाच वाटेल अशा दाट निळय़ा रंगाच्या सुटांत. काहींचे थ्री पीस. काहींनी अगदी बो वगैरे लावलेले. बहुतांश सर्व जोडी-जोडीनं. समोर नाटय़गृह. त्यावर महाकाय झगमगीत बोर्ड : फँटम ऑफ द ऑपेरा..!

वेलकम टु ब्रॉडवे.. असं मित्रानं म्हटल्यावर लक्षात आलं आपण कुठे आहोत ते. सगळा रस्ता उजळलेला. त्या रस्त्यावर, आसपास अशी ४० नाटय़गृहं आहेत. आसपास दिसत होती त्या सगळय़ांसमोर गर्दी होती. पण ‘फँटम.. ’ला विशेष. आत गेलो. प्रयोग सुरू झाला. ज्यांनी कोणी अकॅडमी अ‍ॅवॉर्ड सोहळा (म्हणजे ऑस्कर्स) टीव्हीवर पाहिला असेल त्यांना कळेल असं वातावरण. वर डाव्या उजव्या हाताला बाल्कनी. आणि प्रयोग सुरू झाला. तो अनुभव व्यक्त करायला ‘पारणं फिटलं’ हा वाक्प्रचार फारच लहान असल्याचं लक्षात आलं.

वास्तविक ही मूळ कथा फ्रेंच. विसाव्या शतकाच्या सुरुवातीची. तिथल्या एका ऑपेरात घडलेल्या काल्पनिक प्रसंगावरची ही संगीतिका. त्या ऑपेऱ्यातली नायिका तिला मनवण्याच्या प्रयत्नात असलेल्या नायकाऐवजी त्या ऑपेराला ज्याची बाधा झाल्याची वदंता असते त्या भुताच्या प्रेमात पडते.. अशी काहीशी गोष्ट. तिचं मोठेपण सादरीकरणात आहे.

खरं तर सांस्कृतिकदृष्टय़ा हे ऑपेराज वगैरे ऐकायची सवय रक्तातच नव्हती. लहानपण जिथं गेलं तिकडे नाटय़संगीत, अभंगवाणी आणि चैत्रात गीतरामायण ही संगीतानुभवांची परमावधी. कुमार गंधर्व, बेगम अख्म्तर वगैरेही तिकडे पोहोचायचे होते. तेव्हाच्या काळात ऑपेराज माहिती असायची काही शक्यताच नाही. पण नाही म्हणायला तेव्हाच्या काळय़ापांढऱ्या टीव्हीवर पावरोट्टी नावाच्या एका गायकाला अनेकदा ऐकल्याचं आठवतं. पण तेव्हा तो गाण्यासाठी लक्षात राहायचा का नावासाठी हे नक्की सांगणं अवघड. आणि इथे ब्रॉडवेला अशी अख्खी संगीतिका समोर घडत होती.

तसं लहानपणी वडील नाटकांनाही घेऊन जायचे. त्यात लक्षात राहिला तो ‘फिरता रंगमंच’ नावाचा प्रकार. ‘फुलाला सुगंध मातीचा’ (बहुधा) या नाटकातला शेवटचा रंगमंचावर रेल्वे आल्याचा आभास किंवा ‘अश्रूंची झाली फुले’चा अखेरचा मागच्या पडद्यावर दिसणारा विमानतळ वगैरे पाहिलं होतं. तेव्हा ते फारच भारी वाटलं. पण ९८ साली लंडनला राणीच्या पैशावर जगताना (आणि विद्यार्थी म्हणून अर्ध्या रकमेत ऑपेरा पाहण्याची सवलत पुरेपूर वसूल करताना..) जेव्हा ‘वेस्ट एण्ड’ला ‘मिस सायगांव’ पाहिलं तेव्हा स्वत:ची पीएचडी मिरवणाऱ्याला ‘‘तू खरं तर बिगरीत बसायला हवं..’’ असं कोणी सांगितलं तर काय वाटेल ते वाटलं. रंगमंचाचा आकार, कलाकारांची संख्या, त्यांची ऊर्जा वगैरे वर्णनातीत. त्यात त्या संगीतिकेत शेवटी सायगावला अडकलेल्यांची सुटका करण्यासाठी रंगमंचावर खरं खरं हेलिकॉप्टर उतरतं तेव्हा जे छातीत होतं ते शब्दांत सांगणं अशक्य. लंडनला जसं वेस्ट एण्ड तसं न्यूयॉर्कला ब्रॉडवे. आणि त्यात तिथं जाऊन ‘फँटम..’ पाहायचा! सुखाची/ आनंदाची भावना शरीरात मावेनाशी होते, अशा काही मोजक्या अनुभवांतील हा एक!

कशाकशाचं कौतुक करायचं? त्यांचे गायक-वादक खरे असतात. आपल्या समोर असतात. या ऑपेरासाठी तर असे २५-३० वादक. आणि त्यात थक्क करतात ते त्यांचे ऑर्गन्स. नाटय़गृहाच्या छतापर्यंत पोहोचलेल्या त्यांच्या त्या पाइप्समुळे त्या ऑर्गनमधून येणारे सूर पाताळातून येत असल्यासारखे वजनदार वाटतात. घनगंभीर. की-बोर्डचा छछोरपणा नाही. आणि ‘फँटम’चं संगीत तर साक्षात अँडर्य़ू लॉईड वेबर यांचं. अनेक कारणांसाठी अनेकदा ‘फँटम’ पाहणारे अक्षरश: अनेक आहेत. त्यापैकी एक कारण वेबर यांचं संगीत आहे. बऱ्याचदा आपला संगीताचा अनुभव श्रवणापुरताच मर्यादित राहतो. पण ब्रॉडवेला फँटम पाहताना स्वरांना शारीर स्पर्शही असतो की काय, असं वाटून जातं.

पण आता हा अनुभव येणार नाही. निदान काही काळापुरता तरी.. कारण सलग ३५ वर्षे चालल्यानंतर ‘फँटम ऑफ द ऑपेरा’चे प्रयोग या आठवडय़ापासनं बंद झाले. १६ एप्रिलच्या रविवारी याचा शेवटचा खेळ झाला. त्याची बातमी आली आणि हे सगळं आठवून गेलं. मुळात ३५ वर्षे एखादं नाटक एकाच ठिकाणी तुफान गर्दीत चालतं ही घटनाच किती त्या सगळय़ांची श्रीमंती दाखवणारी आहे. एखाद्या सणासमारंभाला, घरातल्या कोणाच्या लग्नाला वगैरे उत्साहानं जावं तसं तिकडे नटूनथटून नाटकांना जातात. तीन-तीन महिने आधी बुकिंग करावं लागतं. या ३५ वर्षांत एका ‘फँटम’नं ४०० हून अधिक अभिनेते दिले आणि या एका नाटकाच्या नोकरीत ६५०० जण होते, असा तपशील या बातम्यांत होता. या नाटकाचा कपडेपट म्हणजे तर कपडय़ांचा कारखानाच वाटावा. महाग असतं नाटक पाहाणं तिकडे. पण मग त्यासाठी वर्षभरातल्या मोठय़ा खर्चाच्या घटकांत नाटकाचा समावेश आवर्जून असतो.

‘फँटम’मध्ये मध्यवर्ती ‘व्यक्तिरेखा’ आहे ती एका प्रचंड झुंबराची. काही टनांचं हे झुंबर प्रयोगात शेवटी खाली येतं. १६ एप्रिलला ते शेवटचं खाली आलं. या समग्र नाटकावर रसिकांचं इतकं प्रचंड प्रेम की त्या शेवटच्या दिवशी कलाकारांच्या ‘कर्टनकॉल’नंतर या झुंबरासाठी खास वेगळा कर्टनकॉल झाला. सगळय़ांनी उभं राहून त्या झुंबराला – आणि ते हाताळणाऱ्या इलेक्ट्रिशियनला-  मानवंदना दिली.

ते झुंबर एक प्रतीक.. कलासक्त संस्कृतीचं!